गौरी महात्म्य ... !!

    29-Aug-2017   
Total Views | 36

 

 

चैत्र पाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी असेल, रामनवमीच्या दिवशीचा सुंठवडा असेल, गोकुळाष्टमीची हंडी असेल, बैलपोळा, संक्रांतीचे पतंग असतील अथवा छोट्या मुलांचे बोरन्हाण असेल. प्रत्येक सणात, प्रत्येक उत्सवात, प्रत्येक कौटुंबिक समारंभात  निसर्गाच्या साथीने आणि गाई - गुरांच्या सह आनंद साजरा करणारा आपला पारंपरिक भारतीय शेतकरी समाज...!! निसर्गातील झाडे, गाय, बैल, फळे - फुले, नभोमंडळातील आकाशस्थ सूर्य – चंद्र - तारे, पंचमहाभूते आणि कुटुंबातील आणि समाजातील प्रत्येकाचे भान ठेवले गेले, प्रत्येकाचे ऋण मानले गेले आणि या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली गेली कित्येक शतके. नियमितपणे याच समाजात...! बदलते ऋतु, बदलणारे हवामान, बदलणार्‍या मोसमात उपलब्ध होणारे धान्य – फुले – फळे - भाजा या प्रत्येकाचा संदर्भ घेऊनच असे सण - उत्सव आणि व्रते आखली गेली. आज प्रचलित असलेल्या एका शब्दाचा संदर्भ घ्यायचा तर तत्कालीन बहुतांश समाज सुशिक्षित नसेल कदाचित मात्र साक्षर नक्की होता आणि त्याची साक्षरता होती निसर्गाच्या अभ्यासाची, कुटुंबातील आपुलकीची - नाते जपण्याची आणि समाजाप्रती असलेल्या सहजीवनाची...!! प्रत्येक उत्सव – व्रते - सण रूपकात्मक आणि प्रतिकात्मक आहेत हे नव्याने सांगायला नकोच...!  

 

कै आनंद के कुमारस्वामी म्हणजे संस्कृती – कला – शिल्पकला - मूर्तिकला आणि चिन्हसंस्कृतीचे नामवंत आंतरराष्ट्रीय  अभ्यासक-विद्वान आणि विश्लेषक. सिंबॉलीझम अर्थात चिन्हसंस्कृती आणि चिन्हसंकेत या विषयी त्यांनी अनेक निबंध लिहीले. भारतीय कुटुंबसंस्कृतीमधील रांगोळीच्या चिन्हसंकेतांचा त्यांचा अभ्यास जगभरात प्रमाण मानला गेला. अशा चिन्हसंस्कृती विषयी ते लिहितात, तीनशे वर्षांपूर्वीपर्यंत, साधारण सतराव्या शतकाअखेरपर्यंत, चिन्हे, प्रतिके आणि रूपके हीच मानवी संवादाची प्रभावी भाषा होती. यानंतर मात्र लिखित भाषा, मुद्रणकला आणि अन्य माध्यमांची वेगाने प्रगती झाली आणि चिन्हे – प्रतीके - रूपकांच्या भाषेचा आणि चित्रभाषेत विचार करण्याचा समाजाला विसर पडला. परिणामी, आज आपल्या हिंदू संस्कृतीतील प्रतिकात्मक उत्सव - सणांच्या रूपकांचाही आपल्याला विसर पडला आहे असे.

 

प्रचलित हिंदू परंपरेनुसार शक्तीरूप देवीची अनेक रुपे चित्र, प्रतिमा, शिल्प आणि मूर्तींमधे निर्माण केली गेली. त्यातील एक सौम्य आणि प्रेमळ मातेचे स्वरूप म्हणजे देवी गौरी. गुढी पाडव्याला चैत्र प्रतिपदेला याच जेष्ठा चैत्र गौरीची स्थापना करतात. ही जेष्ठा गौरी म्हणजेच श्री गणेशाची आई, कुटुंबातील विवाहित कन्येचे हे रूपक आहे जी आपल्या मुलासह आई + वडील आणि कुटुंबीयांना भेटायला आलेलेली आहे. तिसर्‍या दिवशी गौरी तृतीया साजरी होते आणि चैत्र शुक्ल चतुर्थीला गौरीपुत्र श्री विनायकाचे स्मरण केले जाते. पारंपारिक भारतीय समाज शेती प्रधान होता आणि अजूनही आहे. गुढी पाडवा आणि चैत्र महिना हे सुगीचे दिवस मानले जातात ज्यावेळी कुटुंबातील सर्वांनी भेटण्याच्या पद्धतीचा हा प्रतिकात्मक समारंभ...!!

 

या बरोबरच वसंत आणि ग्रीष्म ऋतूंनंतर येणारा वर्षा ऋतु, श्रावण-भाद्रपदात पुनश्च उत्तम पाऊस घेऊन येतो आणि गणेशोत्सवात पुनश्च जगतजननी गौरीची प्रतिस्थापना केली जाते. यावेळी मात्र विघ्नहर्त्या श्री गणेशाचे आगमन आधी होते आणि माता गौरी त्यानंतर येतात. माघारी जाताना ही गौरी माता आपल्या चिरंजीवांना बरोबर घेऊनच आपला निरोप घेते. ज्या घरात गौरीची प्रतिस्थापना होत नाही त्या घरात मात्र श्री गणेश अनंत चतुर्दशीपर्यन्त निवास करता.

 

कनिष्ठा गौरी ही जेष्ठेची धाकटी बहीण आहे जी कुटुंबातील कुमारिकेचे रूपक आहे. अनेक शतकांपासून आपल्या सुसंस्कृत आणि प्रगत शेतीप्रधान समाजात कुटुंबातील या दोन्ही कन्यांचा सन्मान करणारी ही प्रतीके-रूपके आहेत. या सुगीच्या काळात सर्जनशील आणि बहूप्रसवा भूमातेचा सन्मान करतानाच या जेष्ठा स्वरूप विवाहित आणि कनिष्ठा स्वरूप अविवाहित अशा दोन्ही रूपातील स्त्रियांचा आदर-सन्मान करण्याची आणि तो नियमित राखण्याची पद्धत आपल्या समाजाने या मंगल व्रत-वैकल्ये आणि सण-समारंभातून जाणीवपूर्वक आखलेली आहे.

 

अनेक पद्धतीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात या गौरी पूजनाची तयारी केली जाते. सोन्या-चांदीच्या अथवा शाडूच्या मुखवट्यांपासून पांच खडे अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रांच्या माध्यमातून गौरीपूजन करण्याच्या पद्धती प्रचलित आहेत. तेरड्याची अथवा सुवासिक फुले यांचे गुच्छ बनवून गौरीची प्रतिमा तयार केली जाते.

 

सन १९१६ मधे रावबहादूर बाळकृष्ण आत्माराम गुप्ते यांचे, “HINDU HOLIDAYS & CEREMONIES with DISSERTATION on ORIGIN, FOLKLORE & SYMBOLS” हे इंग्लिश भाषेत लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाले. रावबहादूर गुप्ते हे इंग्लंडच्या राणीच्या सेवेत Asst. Superintendent, Ethnology Dept. या हुद्दयावर काम करत होते. त्यांनी सौभाग्यवतीच्या मदतीने लिहिलेले हे पुस्तक, मराठी संस्कृती परंपरेत तीन शतके म्हणजे साधारण आठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून प्रचलित अशा दोनशे सण-समारंभ-व्रत-वैकल्यांचा सविस्तर परिचय करून देते. या पुस्तकात चैत्र गौरी, भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवातील जेष्ठा-कनिष्ठा गौरी आणि नवरात्रातील दुर्गा पूजनाचे सखोल वर्णन, पद्धती, उद्देश आणि त्याच्या प्रतिमा आणि रूपकांच्या अर्थासह वाचायला मिळते. गणेशोत्सवातील गौरीचे आगमन, ताज्या-सुवासिक फुलांच्या गुच्छापासून बनवलेली गौरीची प्रतिमा, घराच्या अंगणापासून थेट माजघर आणि स्वयंपाकघरात फिरून येणारी गौरीची प्रतिमा, कुटुंबातील कुमारिका आणि जेष्ठा गौरी यांचा संवाद, सर्व कुटुंबाला गौरीने दिलेले आशीर्वाद या समारंभाचे विलक्षण वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. आज, अशा पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे गौरीपूजन माझ्या पाहण्यात आलेले नाही...!!

 

परदेशी विचारसरणीने प्रभावित झालेल्या आणि हिंदू संस्कृतीतल्या सण-समारंभांना अंधश्रद्धा मानून नाकारणार्‍या लोकांनी यातील विज्ञाननिष्ठ मांडणी, कुटुंब आणि समजातिल सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी प्रेम-आपुलकी आणि यातील चिन्ह-प्रतिमा-रूपकातून मिळणारी ऊर्जा आणि स्फूर्ती आणि या सर्वातून अबाधित राहणारे कुटुंब-समाजाचे मानसिक आरोग्य याचा अभ्यास केला नाही. तर दुसर्‍या बाजूला या समारंभांचा राजकीय उद्देशांसाठी गैरफायदा घेतला गेला, अगदी गणेशोत्सव असो की कडवा चौथ असो...!!

 

अपेक्षा इतकीच, जिच्या हाती पाळण्याची डोरी आहे तीनेच अशा विज्ञाननिष्ठ परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अर्थासह पोहोचवाव्या...!!

 

- अरुण फडके 

 

 

 

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.

अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121