मेधाकाकू : अवंती... आपल्या आवडत्या श्रीगणेशाचे आगमन झालय आणि मला ऐकायला येतय सकाळपासून तुझ्या आईचे, पूजा पौरोहित्य विषयातले कौशल्य. फार छान सांगतीये आहे ती पूजा, आणि स्पष्ट-स्वच्छ शब्दोच्चार आणि सहज आणि प्रवाही, अर्थासह निवेदन आम्ही सगळे लक्षपूर्वक ऐकतो आहोत, तुमच्या घरातली पूजा आणि आरती एक मस्त वातावरण तयार झालय आज. आता या श्रीगणेशाला नमस्कार करून आपला आजचा अभ्यास सुरू करूया....!!
अवंती : वोके... वोके... मेधाकाकू, अगं अशी बघू नको... आता शाळेत आम्हा मुला-मुलींचे वोके-वोके म्हणजे ’चालतय की’ असं समजायचे असते. तू उगाच ‘टेंसण’ घेऊ नको...!!
मेधाकाकू : अरे अवंती... आज ही कुठली नवीन भाषा वापरत्येस बोलताना. एकदम धक्काच दिलास तू आज मला.. अगं, एक लक्षात ठेव, या अशा सवयी नको लाऊन घेऊस तू. एक तर ही अशी भाषा बोलणे चुकीचे आहे आणि चुकीचे काही आपण पटकन शिकतो हे लक्षात ठेव. तुला ही संस्कृत म्हण काय सांगते आहे ते बघ, ही मराठीत सुद्धा प्रचलित आहे काही शतकांपासून...!! ही म्हण अशासाठी, की यात कुसळ आणि मुसळ या दोन वस्तूंची तुलना करताना, आपल्या काही इशारे आणि सल्लाही दिला आहे...!!
कुसल प्रवेशं मुसल प्रवेश -
ही म्हण असा सल्ला देते आहे की कुसल म्हणजे गवताच्या छोट्याशा पात्याच्या प्रवेशाने सुद्धा प्रथम एक मार्ग तयार होतो, वहिवाट बनते आणि मुसल म्हणजे मुसळाच्या आकाराच्या वस्तूंना कालांतराने तिथे सहज प्रवेश मिळतो. आणि हे वर्णन फक्त वस्तूंनाच लागू होत नसते, तर भाषा, संगीत, काव्य, साहित्य, चित्रकला, शिल्पकला, आपले घर आणि संस्कृतीचे सुद्धा असेच असते. रोमन तत्वज्ञ प्लूटो सांगून गेलाय एखाद्या देशावर आक्रमण करायचे असेल तर प्रथम त्यांच्या संगीत, भाषा आणि संस्कृतीवर हल्ला करा. मग असा दुर्बळ झालेला देश सहज पादाक्रांत करता येतो.. म्हणून लक्षात ठेव, अशी अयोग्य भाषा आपला कालांतराने सहज घात करू शकते. असेच आपल्या घराचे सुद्धा होऊ शकते म्हणूनच घरात सुद्धा अशा अनिष्ट-अयोग्य गोष्टी आणि प्रवृत्ति शिरणार नाही याची खबरदारी घरातल्या महिलांनी घ्यायची असते...!!
अवंती : ओहो... मेधाकाकू मी मनापासून क्षमा मागते. आम्ही मुलं-मुली फक्त गम्मत करत होतो, पण तू सांगितलेल्या गोष्टीचे गांभीर्य मला समजलय आणि मी तसे नाही होऊ देणार...!!
मेधाकाकू : ठीक आहे अवंती... तुला योग्य वेळी मी जागे करू शकले, याच गोष्टीचे मला बरे वाटतयं...!! कुसळ आणि मुसळ याच दोन रूपकांचा वापर करून ही पुढची म्हण घरातल्या, कुटुंबातल्या व्यक्तिना थोडासा सावधानतेचा वेगळा सल्ला देते आहे...!!
उभे कुसळ आडवे मुसळ
कूस किंवा कुसल म्हणजेच प्रचलित बोलीत कुसळ, गवताचे तीक्ष्ण पाते किंवा पायात रुतणारा काटा. आणि मुसल म्हणजे उखळीत धान्य कांडायचे उंच जाड काठी सारखे अवजार, प्रचलित भाषेत मुसळ...!!..आता सावधानतेचा इशारा आणि सल्ला असा की चालताना वाटेवर उभा असलेला कूस-काटा जसा पायाला रुतून वेदना होतात आणि चालणे कठीण होते किंवा घरात अथवा अंगणात आडवे ठेवलेले मुसळ कधी वाट अडवते त्याप्रमाणेच दैनंदिन जीवनात कुठलेही व्यवहार करताना, अशा उभ्या – आडव्या अडचणी येतातच...!!..सजग-सतर्क राहून वाटेतल्या अशा अडचणी आधी बघा, खबरदारी घ्या तर त्या ओलांडून नक्की पुढे जाता येईल, मार्गात थांबावे लागणार नाही...!!
अवंती : मेधाकाकू... इतक्या सूक्ष्म निरीक्षणाने ज्यांनी या म्हणी आणि वाकप्रचार प्रचारात आणले आणि परंपरा शाबूत ठेवली त्या आपल्या समाजातील या चतुर आणि विवेकी पूर्वजांना मी नमस्कार करते. शाळेच्या पुस्तकातील एका धडयासारखाच प्रभावी, या चार-सहा शब्दातला इशारा आणि सल्ला आहे याची खात्रीच आहे माझी...!!
मेधाकाकू : छान अवंती...आता तुझी गाडी जरा रुळावर आलेली दिसत्ये मला. आता तू म्हणालीस तसे याच पूर्वजांनी या कुसळ-मुसळ जोडीचा वापर रूपक म्हणू वेगळ्या प्रकारे या म्हणीत केला आहे...!!
आपल्या डोळ्यातील मुसळ काढून मग दुसर्याचे डोळ्यातले कुसळ काढावे
समोरच्या व्यक्तीकडे पाहताना त्याच्या बोलणे-वागणे-चालणे-कपडे घालणे-कपड्याची निवड-रंग अशा दर्शनी गोष्टींवर अनेकांचे फार बारीक लक्ष असते. प्रत्येकाची आकलनशक्ति - समजूत – आवड-निवड – कुटुंब संस्कार आणि संस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी असते आणि आपल्या भारतासारख्या देशात याचे फार वैविध्य असते, याचा यांना विसर पडतो. समोरची व्यक्ति मला हवे तसे बोलत नाहीये, त्याचे कपडे मला आवडत नाहियेत आणि त्याची भाषा तर माझ्यासारखी नाही ती अशुद्ध आहे असे अनुमान काढणारे महाभाग आपल्या समाजात मोठ्या संख्येने वावरतांना दिसतात. मात्र असे महाभाग स्वत: मात्र समाजाला त्रासदायक असे वर्तन करत असताना, स्वत:ची अर्वाच्य भाषा, सौजन्याचा अभाव, आक्षेपार्ह परिधान याचा यांना विसर पडतो आणि दुसर्याला सल्ले देणे सुरू असते...!!..अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा ही म्हण देत राहते...!!
अवंती : मस्त-मस्त... मेधाकाकू... या कुसळ+मुसळ ह्या जोडीने अजून काय इशारे–सल्ले दिलेत ते ऐकायचे मला. आता भेटूया थेट गौरी विसर्जना नंतर. मेधाकाकू.. रागाऊ नकोस हं माझ्यावर. मला माझी चूक समजल्ये...!!
मेधाकाकू : अवंती... काही अलंकार वाक्यन्यायमूलक अशा स्वरूपाचे असतात. यातील वाक्यातील शब्दांचा आणि अर्थाचा विशिष्ट क्रम असतो किंवा यातील वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ आणि वाक्यार्थ यांवर हे अलंकार आधारित असतात. आपल्या वरच्या म्हणींमधे, वाक्यन्यायमूलक प्रकारातील 'यथासंख्य' या अलंकाराचा प्रभाव आहे कारण कुसळ आणि मुसळ या दोन निर्जीव वस्तूंच्या गुणवत्ता आणि दैनंदिन वापरातिल उपयोग आणि म्हणीतील त्यांच्या एकत्रित वापराने निर्माण त्यातून होणारा यथार्थ याची वेगळीच गम्मत अनुभवता येते...!!
- अरुण फडके