वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी आपली भेट होणार आहे. खरं सांगू, माझ्या आगमनाची तुम्ही जितक्या आतुरतेने वाट पाहता, तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त उत्सुकता मला लागली आहे. दरवर्षी आपल्या सर्वांचे प्रेम, भक्तीमुळे तुमचे आणि माझे नाते अधिकच सुंदर बनत चालले आहे. माझ्या येण्याची चाहूल लागताच तुमच्यामध्ये जो काही उत्साह संचारतो, त्यातून मी खूपच सुखावतो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला आणि त्यानिमित्ताने चिमुकल्यांपासून अगदी अबालवृद्ध माझ्या निमित्ताने का होईना, एकत्र येऊ लागले. पण आज या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरुप मलाही काहीसे विचलित करुन जाते. तेव्हा, तुमच्या भेटीला येण्यापूर्वी मला काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात.
मी जे काही सांगणार आहे, त्यातून कदाचित काहींची मने दुखावतील, काहींना वाईटही वाटेल, पण त्यामागचा माझा हेतू केवळ तुमची चूक सुधारण्याचा आहे.
सर्व प्रथम मला हेच सांगावेसे वाटते की, बाबांनो, तुमच्यामध्ये माझी जी उंचच उंच मूर्ती विराजमान करण्याची स्पर्धा आहे, ती बंद करा. कारण, मी या विश्वाच्या कणाकणांत, तुम्हा भक्तांच्या मनामनांत वसतो. तेव्हा, माझ्या मूर्त्यांच्या उंचीची स्पर्धा कशासाठी?
आज मुंबईसारख्या शहरांमध्ये गल्ल्यागल्ल्यांतून जिथे चालायला धड जागा नाही, तिथे मिरवणुकीमधून माझी भलीमोठी मूर्ती नेताना-आणताना तुम्हालाही किती कसरत करावी लागते... मिरवणुकीत इतकी मंडळी सहभागी होतात की त्यांची गर्दी, रस्त्यावरचे पादचारी, वाहने या सर्वांतून वाट काढताना सर्वांचीच दमछाक होते, तुमच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. शिवाय, पोलीस बांधवांवरचाही ताण प्रचंड वाढतो. हे तुमच्या का बरं लक्षात येत नाही? उंच मूर्त्या मिरवणुकीमधून मंडपात आणताना किंवा विसर्जनावेळी, तुम्ही योग्य काळजी घेत असलात, तरी त्यातून नाही म्हटलं तरी एखादी दुर्घटना होते. माझी मूर्ती तर दुंभगतेच, पण तुम्हीही टीकेचे धनी बनता. तेव्हा, उत्सवाच्या काळात निर्माण झालेले वाद, रुसवे-फुगवे मला नको. माझ्या स्वागतासाठी तुम्ही मिरवणुका काढू नका, असं माझं मुळीचं म्हणणं नाही. पण, त्यामुळे कोणाची गैरसोय होणार नाही याची तेवढी काळजी घ्या. कारण, शिस्तबद्ध पद्धतीने माझं स्वागत केलतं तर मला निश्चितच आनंद होईल. आज एकाच परिसरात अनेक सार्वजनिक मंडळांची गर्दीही वाढत चालली आहे. त्यामुळे माझ्या भक्तांमध्ये एवढी फूट का बरं पडली? असा प्रश्न मला अलीकडे अधिकच सतावू लागला आहे. चार-पाच पावलांवर आज अनेक सार्वजनिक मंडळे नजरेस पडतात. बरं, या मंडपांच्या अवतीभोवती बॅनरचा, होर्डिंग्जचा किती विळखा करून ठेवला आहे तुम्ही!! आणि हो, मला ’अमुकचा राजा’ ’तमुकचा राजा’ या नावाने जे संबोधले जाते, ते कृपया आधी थांबवा. मी फक्त आणि फक्त तुमचा गणपती बाप्पा आहे. आज अनेक सार्वजनिक मंडळे उत्सवाच्या काळात विविध स्पर्धा ठेवत असतात. अर्थात एक विरंगुळा आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने तुम्ही राबवत असलेले उपक्रमचांगले आहेतच. पण आज कित्येक ठिकाणी नृत्यस्पर्धांमध्ये लहान लहान मुली अश्लील गाण्यांवर, तोकडे कपडे घालून, अश्लील हावभाव करून नाचतात, जे नक्कीच माझ्या उत्सवाला साजेसे-शोभेसे नाही. तेव्हा, एक पालक म्हणून तुमच्या पाल्यांना कोणती शिकवण देत आहात, याचं किमान भान राखा. आज जागरणाच्या नावाखाली माझ्या मंडपामध्ये जुगाराचा खेळ रंगतो. पूर्वी जागरणाच्या निमित्ताने गाणी, छोट्या-मोठ्या स्पर्धा, खेळ, अभंगांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रंगत यायची आणि आता त्या पवित्र जागीच जुगाराचा अड्डा बनल्या आहेत. काळानुसार मनोरंजनाची साधने बदलली आहे, हे मान्य आहे मला, पण माझ्या डोळ्यांसमोर जर जुगार खेळणे किंवा इतर गैरप्रकार होत असतील, तर अशा भक्तांनी मंडपात प्रवेश न केलेलाच बरे! मला मुळातच ना भल्यामोठ्या उंच मूर्तीची अपेक्षा आहे, ना अवाढव्य मंडप, कानठळ्या बसतील अशा लाऊडस्पीकर्सची.
मला माहिती आहे की, तुमचं माझ्यावर खूप प्रेम, श्रद्धा आहे, परंतु अलीकडे त्यातला ओलावा कमी व्हायला लागला आहे. या उत्सवाचे बाजारीकरण झाले आहे. आज तुम्हीच तुमच्यामध्ये एक नाहक स्पर्धा निर्माण करून ठेवली आहे. अर्थात, याला तुमची मानसिकता अणि त्याला पूरक असलेले वातावरण कारणीभूत आहे, पण त्याला बळी पडायचे की नाही, हे तुम्ही ठरवायला हवं. निव्वळ पैसा ओतून, माझं थाटामाटात स्वागत करून माझा दहा दिवस पाहुणचार करावा, अशी अपेक्षा नाही. मी तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही सर्वांनी माझी स्वेच्छेने, झेपेल, जमेल तेवढी सेवा करावी. रोजच्या कामातून थोडासा वेळ काढून गुण्यागोविंदाने माझ्यासमोर नांदावं, हीच अपेक्षा... अर्थात काही ठिकाणी घरांमध्ये, तसेच सार्वजनिक मंडळे या उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमराबवित आहेत. समाजभानाची जाणीव करून देणारे देखावे उभारून सामाजिक संदेशही दिले जातात. उत्सवासाठी ठराविक रकमेपर्यंत खर्च करून उर्वरित रक्कमगरजूंनाही दिली जाते. तुमच्या या कार्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. खरंच यातून मी खूप सुखावतो. फक्त बाकीच्या मंडळींनी जरा आपली चूक सुधारून आपल्या हातून असे काही घडणार नाही, याची मात्र काळजी घ्यावी. मग मात्र माझी कोणतीच तक्रार नसेल. असो. तर मग मी येतोय तुमच्या भेटीला आणि हो, माझे आवडते मोदक तयार ठेवायला विसरू नका बरं! भेटूच!!!
- सोनाली रासकर