कोळी समाज. एक दर्यावर्दी समाज. प्रचंड मेहनती आणि पराक्रमी अशी या समाजाची ओळख. शिवाजी महाराजांनी या समाजाची हीच ताकद ओळखून स्वराज्याचं आरमार उभारलं. त्यामुळे आपली पश्चिम किनारपट्टी परकियांपासून नेहमीच सुरक्षित राहिली. नंतरच्या काळात मात्र या समाजाकडे राजवटींनी लक्ष दिलं नाही. नाहीतर आपल्याकडेदेखील एखादा कोलंबस सारखा दर्यावर्दी जन्माला आलाच असता. मुंबई हे सात बेटांचं घर असल्यापासून हा कोळी समाज मुंबईमध्ये वास्तव्य करून आहे. खर्या अर्थाने तेच मुंबईचे खरे पुत्र आहेत. अशाच बेटा पैकी एक बेट म्हणजे कुलाबा बेट होय आणि या बेटावर पिढ्यान् पिढ्या राहत होतं कोळी कुटुंब. या कुटुंबातील एक म्हणजे संजय कोळी. त्यांचीच ही गोष्ट.
१९७२ साली कुलाब्यातील मधुकर काशीनाथ कोळ्याच्या घरी संजयचा जन्म झाला. मधुकर कोळी १८ ते २० तास बोटीवर असायचे. मासेमारी करायचे. त्यांनी आणलेले मासे संजयची आई बाजारात नेऊन विकायची. अशाप्रकारे दिनक्रम चालू होता. जवळपास प्रत्येक कोळी कुटुंबाचा हाच दिनक्रम आहे. संजय मराठी माध्यमाच्या शाळेत शिकू लागला. मात्र, त्याला अभ्यासात गोडी नव्हती. गोडी नसल्याने गतीसुद्धा नव्हती. दहावीत त्याने अशीच गटांगळी खाल्ली. दहावी नापास झाला आणि त्याने शिक्षणाला कायमचा रामराम केला. मात्र, मेहनत आणि साहस हे दोन गुण त्याच्या अंगी कायम होते. शिक्षणात नाही, पण आपण बाबांना हातभार लावला पाहिजे. हे त्याने मनाशी पक्कं केलं होतं. तो बाबांसोबत बोटीवर जाऊ लागला. वर्ष होतं १९८६. दिवसाचे १८ ते २० तास तो काम करू लागला. कधी चार दिवस, तर कधी आठवडाभर बोटीवरच त्याला राहावे लागे. यामुळे तो इतका तरबेज झाला की, निव्वळ पाण्याकडे पाहून त्याला भरती-ओहोटीचा अंदाज येऊ लागला. भूगोलाच्या पुस्तकात भले तो भरती-ओहोटीची व्याख्या नीट शिकू शकला नाही. मात्र, येथे वास्तवाच्या समुद्रावर अचूक आडाखे बांधू लागला. खरंतर संजयचे आजोबा अस्सल नाखवा होते. आजकाल नाखवा म्हणजे ज्याची बोट तो नाखवा अशी एक परिभाषा झाली आहे. मात्र संजय सांगतो की, इंग्रजांच्या काळात चंद्र, सूर्य, तारे, वारा यांच्या साहय्याने जे दिशादर्शन करायचे त्यांस ‘इंग्रज नाखवा’ हा किताब द्यायचे. संजयच्या आजोबांना इंग्रजांनी हा ‘नाखवा’ किताब बहाल केला होता. मुंबईहून सूरत येथे इंग्रजांच्या मालवाहू जहाजांना दिशादिग्दर्शनाचे काम संजयचे आजोबा करायचे. त्यांनी संजयच्या बाबांना शाळेत पाठविले. संजयचे बाबा, मधुकर काशीनाथ कोळी त्याकाळची जुनी मॅट्रिक पास झाले होते. मात्र, आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी ते वंशपरंपरागत मासेमारीचा व्यवसाय करू लागले. त्यांची काही ब्रिटिशांसोबत घट्ट मैत्री होती. त्यापैकी एक होता फिलिप्स ब्रेक. या फिलिप्सचा कुलाब्याला बोटी तयार करण्याचा छोटासा कारखाना होता. सगळेजण त्यावेळी लाकडाच्या बोटी वापरत त्याकाळी हा फिलिप्स फायबरच्या बोटी तयार करत असे. त्यासाठी खास ब्रिटनहून कच्चा माल घेऊन पिंप यायचे. या फिलिप्सकडे संजयचे बाबा फायबरच्या बोटी तयार करू लागले.

१९९९ संजयच्या बाबांचं निधन झालं. तोपर्यंत संजयच्या बाबांनी ‘मधुकर काशीनाथ कोळी ऍण्ड सन्स’ अर्थात ‘एमकेके ऍण्ड सन्स’ नावाची बोट बनविणारी कंपनी सुरू केली होती. ती कंपनी अगदीच प्राथमिक स्वरूपात होती. १९८६ ते १९९९ असा १३ वर्षांचा समुद्राचा अनुभव संजयच्या गाठिशी होता. अगदी मराठी कॅलेंडरच्या तिथीनुसार तो समुद्राच्या भरती- ओहोटीची अचून माहिती सांगू शकतो. हा त्याचा अनुभव बोटीसाठी कामी आला. पाण्याच्या प्रवाहानुसार बोटीचा आकार कसा असावा ते त्याच्या डोक्यात अगदी आकाराला आलं होतं. त्याला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संजय ऑटोकॅड शिकला आणि पाण्याच्या प्रवाहाला छेद देत वायूवेगाने मार्गक्रमण करणार्या बोटी तो तयार करू लागला. आज एमकेके १२ फुटांपासून ते अगदी ६५ फुटांपर्यंत बोटी तयार करतात. करंजा, मोरा, रेवस, वर्सोवा, मुरुड यासारख्या कोळीवाड्यांत या बोटी वापरल्या जातात. तसेच रिलायन्स, इंडियाबुल्स, युबीजी, टाटासारख्या नामांकित कंपन्यांनादेखील एमकेके बोटी पुरवितात. लाकूडविरहीत बोट हे एमकेकेचं वैशिष्ट्य असून पवनचक्कीच्या पात्यांमध्ये वापरले जाणारे घटक बोटीमध्ये वापरले जाते. यामुळे एमकेकेची बोट इतर बोटींपेक्षा ६० टक्क्यांने हलकी होते. ‘हाय डेन्सिटी पफ’ हे तंत्रज्ञान बोटीत वापरल्याने बोट पाण्यावर तरंगत राहते ती कधीच बुडत नाही. अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी संजय कोळी शारजाह, दुबई, न्यूझीलंड येथे सातत्याने जात असतात. एमकेकेच्या बोटी काचेसारख्या गुळगुळीत असतात. त्या पाण्यावरून विजेच्या वेगाने निसटतात, जर एखाद्या बोटीला गोव्याला जाण्यासाठी ४८ तास लागत असतील, तर एमकेकेच्या बोटीने गोव्याला जायला फक्त तास लागतील. कामाचा व्याप वाढल्याने त्यांनी आपला बोटी तयार करण्याचा कारखाना अलिबागला येथे सुरू केला आहे. शालेय शिक्षणात गती नसलेला हा तरुण आज काही कोटींची सहज उलाढाल करतो. गणेश विसर्जनाच्यावेळी महानगरपालिका संजय कोळी यांच्याकडून खास सहकार्य घेते. गेली दहा वर्षे संजय कोळी आपल्या ज्ञानाचा आणि पायाभूत सुविधांची सेवा गणेश विसर्जनासाठी देत आहेत, तेदेखील विनामूल्य.

२००५ साली नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या समुद्रात कोसळले होते. त्यावेळी संजय कोळी यांनी जीवावर उदार होऊन हेलिकॉप्टरचा पायलट आणि अन्य एका नौदल कर्मचार्याचे प्राण वाचविले होते. आज त्यांच्या मुली ‘सेलर’ या साहसी क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी आपल्या मुलींना खास शिडाच्या बोटी घेऊन दिल्या आहेत. साहसीपणा जणू या कोळी कुटुंबाचा अविभाज्य घटकच बनला आहे. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ कुसुमाग्रजांनी लिहिलेलं कोलंबसाचं गर्वगीत संजय कोळी आणि आता त्यांच्या पुढच्या पिढीला चपखल बसले आहे.
- प्रमोद सावंत