माझ्या पिढीच्या लोकांसाठी मराठी बालसाहित्य म्हटलं की तीन नावं प्रामुख्याने समोर येतात, भा. रा. भागवत, विंदा करंदीकर आणि रत्नाकर मतकरी. मतकरींनी लहान मुलांसाठी नाटकं लिहिली, तर भा. रा. भागवतांनी रहस्यप्रधान बालसाहित्य मराठीत प्रचंड लोकप्रिय केलं. त्यांच्या मानसपुत्राचं, फास्टर फेणेचं गारूड आज इतकी वर्षे झाली तरी माझ्या मनावर अजून तसेच आहे. पण आज मी लिहिणार आहे ते विंदा करंदीकरांच्या बालकवितांविषयी. आज २३ ऑगस्टपासून विंदांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत आहे. मला स्वतःला विंदांनी मोठ्या माणसांसाठी लिहिलेल्या कवितांपेक्षाही त्यांच्या बालकविता जास्त आवडतात. त्या कवितांचा मी आधी एक वाचक म्हणून आणि आता एक आई म्हणून घेतलेला हा आढावा.
विंदा कवी म्हणून फार मोठे होते, ज्ञानपीठ पारितोषिकाचे मानकरी होते. पण त्यांच्या बालकविता इतकी वर्षे लोटली तरी अजून तश्याच ताज्या वाटतात. मी लहान असताना वाचलेल्या ह्या बालकविता आता मी माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींना जेव्हा वाचून दाखवते तेव्हा त्यांनाही त्या तितक्याच मजेशीर आणि नादमधुर वाटतात. मी विंदांच्या कविता पहिल्यांदा वाचल्या त्या तिसरी-चौथीत असताना. 'पिशीमावशी आणि तिची भुतावळ' हे त्यांचं मला सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक. अगदी आजही ते माझ्या संग्रही आहे आणि त्यातल्या कविता मला आजही तितक्याच भारून टाकतात जितक्या मी चौथीत असताना मला त्या आवडायच्या. माझ्या मुलांना जेव्हा मी पिशीमावशीच्या भुतावळीची पहिल्यांदा ओळख करून दिली तेव्हा त्यातल्या थातू-मातू ह्या नखे खाणाऱ्या भित्र्या भुताची गोष्ट ऐकताना त्यांनाही खदखदून हसू आले होते. 'हे भूत आहे मुत्रे, तरी त्याला भितात कुत्रे' ह्या ओळी तर मुले परत परत म्हणायला लावायची.
खरंतर मोठ्या माणसांसाठी लिहिणं त्या मानाने सोपं असतं पण लहान मुलांसाठी लिहिणं फार कठीण. भाषा सोपी तर वापरायची असते पण कुठेही मुलांच्या अंगभूत हुशारीला कमी न लेखता. मुलांचा भाषिक प्रवास हा नादाकडून अर्थाकडे जातो हे बालमानसशास्त्राने सिद्ध केलेलं आहेच, त्यामुळेच मुलं अगदी लहान असताना आपण ज्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या कविता व बालगीतं म्हणून त्यांना भाषा शिकवायचा प्रयत्न करतो, त्यामध्ये बरेचदा निरर्थक पण नादमधुर शब्द परत परत वापरून गेयता आणलेली असते. 'इथे इथे इथे इथे, नाच रे मोरा, मामा नाही घरा, तुला कोण घाली चारा' किंवा 'अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं, रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा', किंवा कोकणी भाषेतल्या 'ता करी गे कशी ताताची, गोऱ्या गोमट्या हाताची' ह्यासारख्या काव्यरचनेमध्ये अर्थापेक्षा नादावर जास्त भर दिलेला असतो, आणि म्हणूनच पिढ्यानपिढ्या ही गाणी आयांच्या ओठावर रेंगाळत असतात, ती गाणी मुळात रचली कुणी ही माहिती पार विस्मृतीत गेली असली तरी.
विंदांच्या बालकवितेत ही नादमधुरता फार सुंदर रीतीने व्यक्त होते. ‘अडमतडम तडतड बाजा अक्कड नगरी फक्कड राजा’ किंवा 'हूंका चूं, चूंका हूं, हे दोघे सख्खे भाऊ' किंवा 'किर्र रात्री सुन्न रानी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती' ह्यासारख्या ओळी निव्वळ ऐकून ऐकून मुलांना सहज पाठ होतात. पण विंदांच्या कवितेत निव्वळ यमक जुळवायचा अट्टाहास कधीच नसतो. विलक्षण नादमाधुर्याबरोबरच लहान मुलांचे अफाट कल्पनाविश्व त्यांच्या कवितेत फार सुंदर रीतीने व्यक्त झालेले दिसते. मग ते एटू लोकांचा देश निर्माण करतात, जो 'तिबेटाच्या जरा खाली, हिमालयाच्या जरा वर' वसलेला आहे आणि तिथल्या प्रत्येकाकडे 'उडते घर' आहे, जे 'टींग' म्हणता येते खाली आणि 'टंग' म्हणता जाते वर!' विंदांचा कुंभकर्ण झोप आली म्हणून उशाला डोंगरच घेऊन झोपतो, आणि कुंभकर्णच तो, त्यामुळे त्याला उठवायला रावणाला त्याच्या 'नाकात तोफ' झाडावी लागते तेव्हा कुठे कुंभकर्णाची झोप उडते. नंतर पुढे पु. ल. देशपांडेंचे असा मी असामी वाचताना त्यातल्या नानू सरंजामेला 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' असले युगप्रवर्तक काव्य रचताना पाहून मला विंदांच्या कुंभकर्णाची आठवण येऊन खूप हसायला आले होते.
काही मुलांना मोठमोठ्या बाता मारायची सवय असते, अश्या मुलांची विंदांनी 'बाताराम' ह्या कवितेतून सुरेख, खेळकर खिल्ली उडवलेली आहे. त्यांचा 'एवढासा बाताराम' म्हणतो कसा, 'नंद्या, मीच माझ्या आजोबाना शिकविली संध्या'. नंदू आणि उदय ही विंदांची मुले लहान असताना विंदांनी ह्या कविता लिहिल्या त्यामुळे त्यांचा उल्लेख बरेचदा ह्या कवितांमधून होतो. विशेषतः उदयला लहानपणी भुतांसंबंधीच्या भयाने ग्रासले होते. त्याला ह्या भयगंडातून बाहेर काढण्यासाठी म्हणून विंदांनी 'पिशीमावशी व तिची भुतावळ' हे पुस्तक लिहिले असे मी वाचले आहे. विंदांचे बालपण कोकणात गेले. कोकणात काय, किंवा आमच्या गोव्यात काय, भुताखेतांच्या कहाण्या फार चवीने गावागावातून सांगितल्या जातात. त्या दंतकथांचे, प्रतिमांचे, विविध प्रकारच्या भुतांच्या नावांचे प्रतिबिंब पिशीमावशीतल्या सर्व कवितांमध्ये उमटले आहे.
पण आज जेव्हा मी पिशीमावशी वाचते तेव्हा मला त्या भुतांच्या गोष्टींमधली गंमत अजूनही जाणवते, पण आता त्या ‘मसणवटीच्या राईमध्ये, पडक्या घुमटीच्या वाटेवर, भेंडवताच्या डोहापाशी' राहणाऱ्या पिशी मावशीची करुणा येते कारण आता मला जी पिशी दिसते ती असते खाष्ट सासूच्या छळाने भांबावलेली कोवळी मुलगी. विंदांच्या कित्येक कविता अश्या आहेत. ज्या लहानपणी वेगळ्या जाणवल्या होत्या आणि आता मुलांना वाचून दाखवताना त्यांचे वेगळेच पदर जाणवायला लागतात. फूलवेडी ही त्यांची कविता वाचताना पूर्वी 'फुलाचीच साडी' नेसणारी ही परी फार गोड वाटायची. आता जेव्हा मी ह्या कवितेचं शेवटचं कडवं वाचते तेव्हा त्यातलं कारुण्य चटका लावून जातं. विंदांची ही परी पाळण्यात फूल ठेवते कारण 'तिला बिचारीला नाही मूल'. हा खरंतर फार प्रौढ आशय आहे, पण अतिशय साध्या शब्दात, अतिशय संवेदनशीलतेने व्यक्त केलेला.
विंदांच्या बालकविता कालातीत आहेत कारण चांगल्या कवितेच्या सर्वच निकषांवर त्या खऱ्या उतरतात. नादमाधुर्य तर आहेच पण आशयाच्या, उपमांच्या आणि कल्पनांच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध अश्या ह्या कविता आहेत. विंदांनीच एकदा विजया राज्याध्यक्ष यांच्याबरोबरच्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की 'वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत.' विंदांनी त्यांच्या कवितांमधून मराठी साहित्याला चिरकाल टिकणारे मोठमोठे वृक्ष तर दिलेच, पण त्यांच्या बालकवितांच्या रूपाने त्यांनी मराठी मुलांना मुक्त बागडण्यासाठी सुंदर रंगीत रानफुलांनी बहरलेला, टवटवीत माळदेखील दिला.
- शेफाली वैद्य