गुलजार.... हे नाव ऐकता क्षणीच आपण एका वेगळ्या दुनियेत जातो, एका वेगळ्या भावविश्वात. जिथे केवळ भावना असतात, आणि त्या भावनांना तितक्याच तीव्रतेने व्यक्त करणारे शब्द. हे सगळं आज मी संगतेय कारण आज प्रसिद्ध गीतकार, लेखक गुलजार यांचा वाढदिवस. भारतीय सिनेसृष्टीतील एक महत्वाचं, मोठं आणि चिरतरुण असणारे नाव म्हणजेच गुलजार..
गुलजार यांचे खरे नाव आहे, संपूर्ण सिंह कालरा. मात्र त्यांना या नावाने कुणीच ओळखत नाही. कारण भारतीय सिनेसष्टीला जो शायर, लेखक आणि कवी मिळाला आहे त्याने या सिनेसृष्टीला खऱ्या अर्थाने 'गुलजार' केले आहे. आणि म्हणजूनच त्यांचे नाव आहे.. गुलजार..
१८ ऑगस्ट १९३४ ला त्यांचा जन्म आताच्या पाकिस्तान येथे झाला, मात्र फाळणीनंतर ते भारतात आले आणि इथलेच झाले. त्यांची कारकीर्द सुरु झाली ती एस.डी. बर्मन यांच्यासोबत. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. अनेक दिग्गज दिग्दर्शकांसाठी, कलाकारांसाठी त्यांनी लेखन केले आहे.
आज त्यांचा ८३ वा वाढदिवस. त्यांचे नाव ऐकले की माझ्या कानात आपोआप काही गाणी वाजायला लागतात... (अरे खरंच...) आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या या खास दिवशी त्यांची हीच खास गाणी मला तुमच्या सोबत शेअर करायची आहेत..
चला आज गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त या खास गाण्यांचा आस्वाद घेवूयात..
१. तुझसे नाराज नहीं जिंदगी...
हे गाणं आलं तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, त्याच्या ३० वर्षांनंतर वगैरे मी या जगात आले, मात्र पहिल्यांदा हे गाणं ऐकलं आणि ते माझ्या आवडीचंच झालं. त्याचं मुख्य कारण म्हणजे, त्यातील शब्द. "जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे, मुस्कुराएँ तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे.." जसे जसे आपण मोठे होतो, तसे तसे हे शब्द कित्ती खरे वाटायला लागतात नाही. १९६० मध्ये आलेल्या मासूम चित्रपटातील हे गाणं देखील तितकंच मासूम (निरागस) आहे.. अगदी आपलं आहे...
२. इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते :
१९७५ साली आलेल्या आँधी या चित्रपटातील हे गीत.. अनेक कारणांनी हे गीत खूप खास आहे. यात त्याकाळातील प्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार आहेत, हे गाणे किशोर कुमार यांनी गायले आहे, मात्र त्याहूनही हे खास आहे कारण हे गुलजार यांनी लिहिले आहे. "इन रेशमी राहों में इक राह तो वो होगी, तुम तक जो पँहुचती है, इस मोड से जाते हैं..." या शब्दातील भावना कित्ती सुंदर आहेत नाही. प्रेमात असलेल्या दोन व्यक्तींसाठी असलेले हे गाणे आजच्या काळातही चपखल बसतं. आजच्या दगदगीच्या आयुष्यात किती का व्याप असेना.. लेकिन "इक राह तो वो होगी तुम तक जो पँहुचती है..." तुझ्या पर्यंत पोहोचणारा एक रस्ता नेहमी असणार... अद्भुत सुंदर...
३. आपकी आँखों में कुछ मेहके हुए से राज हैं... :
१९७८ मध्ये घर हा चित्रपट आला. त्यातीलच हे गाणं, रेखा आणि विनोद मेहरा यांनी सुंदर साकारलेलं. पुन्हा एकदा या गाण्यातील शब्दच मोहून टाकतात. "आपसे भी खूबसूरत आपके अंदाज हैं... " तिचं आणि त्याचं एकमेकांसाठी असलेलं अमाप प्रेम या शब्दांमधून अगदी सहज व्यक्त होतंय.. गुलजार यांची हीच खासियत आहे.. त्यांनी लिहिलेल्या गाण्यांमध्ये कधी खूप कठीण भावना, कठीण शब्द नसतात.. तुमचं आमचं.. आपलं असं ते गाणं असतं. किशोर कुमार आणि लता दीदी यांनी या गाण्याचा गोडवा आणखीनच वाढवला आहे.
४. जंगल जंगल बात चली है पता चला है.. चड्डी पहन के फूल खिला है.. :
गुलजार हे एक वेगळंच रसायन आहे. जितक्या ताकदीची त्यांची वरील उल्लेखित गाणी आहेत, तितक्याच ताकदीचे त्यांचं हे गाणं देखील आहे. ९० च्या दशकातील प्रत्येक लहान मुलाच्या मनाच्या अगदी जवळचं. हो माझ्याही... रविवार सकाळ ही याच गाण्यानी तर होत असत.. मोगली लागणार याचा आनंद तर असायचाच, मात्र चुकुन एखाद्या वेळी मोगलीच्या सुरुवातीचं हे गाणं मिस झालं तर खरं सांगते संपूर्ण मोगली बघण्याचा मूडच जायचा.. लहान मुलांच्या मनात घर करणारं गुलजार यांचं हे गाणं माझं आजही आवडतं आहे.
५. तेरे बिना बेसुआदी बेसुआदी रतियाँ :
गुरु चित्रपट, ए.आर रहमान यांचं संगीत, ऐश्वर्याचे सौंदर्य, हे सगळं बघत असताना आपण "तेरे बिना' हे गाणं विसरणं शक्यच नाही. तेरे बिना चाँद का सोना खोटा रे.. पीली पीली धूल उडाये झूठा रे.. तेरे बिना सोना पीतल.. तेरे संग तीतर-बीतर आजा कटे नां रतियाँ...." एखाद्याची आपल्याला कित्ती गरज असते नाही आपल्या आयुष्यात, त्याच्या शिवाय सगळंत रितं रितं, खोटं खोटं, भकास वाटायला लागतं. याच भावना सुंदर शब्दांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचल्या आहेत. हे गाणं लागलं की आजही मी एका वेगळ्या भावविश्वात जाते..
६. कजरा रे.. :
मोरा गोरा रंग लै ले, होश वालों को खबर, तुझसे नाराज नहीं, छोटी सी कहानी से अशा अनेक गाण्यांमधून मनातल्या भावना सहजपणे व्यक्त करणारे गुलजार, बंटी और बबली सारख्या चित्रपटातील आयटम साँग कजरा रे देखील लिहीतात, जे पुढले एक दहशक प्रत्येकाच्या ओठांवर बसलेलं गाणं ठरतं. विलक्षण नाही का... "आँखे भी कमाल करती हैँ पर्सनल से सवाल करती हैं...पलकों को उठाके ही नहीं, परदे का खयाल करती हैं... " मूड, काळ वेळ सगळ्याला साजेसे शब्द, मस्ती, नृत्य या सगळ्यांना लक्षात ठेवून लिहिलेले शब्द. या अशा गाण्यांमधून गुलजार यांच्या कलेच्या विविध छटा दिसून येतात.
गुलजार यांनी असंख्य गाणी लिहिली, अनेक चित्रपट दिग्दर्शितही केले. मात्र वरील असलेली गाणी माझ्या मनाच्या जवळची आहेत, माझी आवडती आहेत, म्हणून मी आज तुमच्यासोबत त्या शेअर करतेय.. गुलजार यांचे व्यक्तीमत्व इतके मोठे आहे की, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, कामाचा, गाण्यांचा आढावा घेण्यासाठी एक मोठे पुस्तकच लिहावे लागेल. गुलजार यांच्या विविधतेने नटलेल्या गाण्यांनी लहान मुलांना बालपण जगवणारे 'जंगल जंगल पता चला है" गाणे दिले... तर नाचण्यासाठी "कजरा रे गाणे दिले.." प्रेम साजरे करण्यासाठी "होश वालों को खबर" हे गाणे दिले... प्रत्येका वयाच्या व्यक्तीसाठी गुलजार हे खरच खूप खूप खास आहे... आणि नेहमी राहतील..
- निहारिका पोळ