गेल्या वर्षी साधारण ह्याच वेळेला हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेलो होतो. फक्त चंबा ह्या एकाच तालुक्यात आमची भटकंती चालू होती. चंबा खोऱ्यातून पांगी खोऱ्यात जाणाऱ्या वाटेवर साच पास नावाची बर्फाच्छादित खिंड लागते. हिमालयाच्याच पीर पंजल ह्या पर्वतरांगांमधून ही खिंड आहे. तिथे बाराही महिने कायम बर्फ असतं, पण हा रस्ता अत्यंत चिंचोळा आणि धोकादायक वळणांचा असल्यामुळे केवळ जुलै ते ऑक्टोबर हे चारच महिने वाहतुकीसाठी खुला असतो. साच पासची उंची समुद्रसपाटीपासून जवळजवळ पंधरा हजार फूट आहे. दोन्ही बाजूनी बर्फाचे कडे, हातपाय गोठवणारी थंडी आणि अत्यंत निरुंद, निसरडा, वळणावळणांचा रस्ता, त्यामुळे हा रस्ता भारतातल्या सर्वाधिक धोकादायक रस्त्यांपैकी एक समजला जातो. हा रस्ता नव्वदीच्या दशकात बनवला गेला.
पीर पंजलची पर्वतरांग पार केली की जम्मू-काश्मीर मध्ये जाता येतं, त्यामुळे भारतीय सैन्याच्या दळणवळणासाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. पठाणकोटवरून थेट लेहला ह्या रस्त्याने जाता येतं. हा रस्ता जेव्हा बनवला जात होता तेव्हा तो पूर्ण होऊ नये म्हणून १९९८ साली काश्मीरमधल्या दहशतवाद्यांनी रस्त्याचं काम करणाऱ्या मजुरांच्या छावणीवर खूप मोठा भ्याड हल्ला केला होता, तो देखील पहाटे दीड वाजता, दिवसभराच्या श्रमाने थकलेले मजूर त्यांच्या तंबूत गाढ झोपलेले असताना. कालाबान आणि सतरुंदी ह्या दोन ठिकाणच्या मजूर छावण्यांवर हे हल्ले झाले. ह्या हल्ल्यात तब्बल ३५ गरीब, निःशस्त्र मजूर मारले गेले. सगळे हिंदू व बौद्ध होते. हिमाचल प्रदेशमध्ये झालेला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला. ह्या हल्ल्याची खबर खाली चंबा शहरात सरकारला कळायला एक पूर्ण दिवस जावा लागला. ध्यान सिंग आणि बेली राम नावाच्या दोन जखमी मजुरांनी त्या रक्तबंबाळ अवस्थेतही पायवाटेने आठ किलोमीटर धावत जाऊन जवळच्या गावात ही बातमी कळवली. वैद्यकीय मदत पोचेपर्यंत जखमी लोक विव्हळत तिथेच पडून ओलांडून होते. दहशतवाद्यांनी निरपराध मजुरांना कापून तर काढलेच पण त्यांच्याजवळचे पैसे, घड्याळे, बांधकामाचे साहित्य, स्फोटके वगैरे गोष्टी लुटून नेल्या. हिझबुल मुजाहिदिनच्या बिल्लू गुज्जर नावाच्या दहशतवाद्याला नंतर ह्या प्रकरणात अटकही झाली. पण दहशतवाद्यांना मजूर छावणीचा पत्ता सांगणारे होते चंबा जिल्ल्यातले मुसलमान गुज्जर जमातीचे लोक. चंबा जिल्ह्यात गुज्जर लोकांची खूप वस्ती आहे आणि गद्दी लोकांचीही. गुज्जर गाई-म्हशी चारतात आणि गद्दी लोकांच्या शेळ्या-मेंढऱ्या असतात. चराऊ कुरणांसाठी दोन्ही जमातीच्या लोकांमध्ये संघर्ष चालूच असतो, त्यात गद्दी प्रामुख्याने हिंदू आणि गुज्जर मुसलमान. गुज्जरांचे जम्मू काश्मीर मधल्या डोडा जिल्ह्यातल्या अतिरेक्यांशी संबंध आहेत असा गद्दी लोकांचा सतत आरोप असायचा पण १९९८ मधल्या त्या भयानक कत्तलीनंतर त्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले.
आज त्या रस्त्यावर जिथे ही कत्तल झाली तिथे एक छोटंसं स्मारक बनवलं गेलंय. ते बघताना आपल्या गळ्यात आवंढा आल्याशिवाय राहवत नाही. इंग्रजीत 'अ मॅन अ माईल रोड' नावाचा एक वाक्प्रचार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रस्ता बनवताना कित्येकदा मजुरांना जीव गमवावा लागतो. अशी रक्तरंजित किंमत देऊन बनवलेल्या रस्त्याला 'अ मॅन अ माईल रोड' म्हणतात. साच पासचा ३५ किलोमीटरचा हा अत्यंत खडतर रस्ता खरोखरच मैलागणिक एका माणसाच्या जीवाची किंमत देऊन घडवलेला आहे. ते लोक कोण होते त्यांची नावेही आपल्याला माहित नाहीत, पण त्या रस्त्यावर डांबराबरोबरच त्यांचे रक्तही सम प्रमाणात मिसळलेले आहे.
सतरुंदीचे ते स्मारक मागे टाकून आम्ही साच पासच्या दिशेने निघालो. एका बाजूला खूप खोल अशी दरी, दुसऱ्या बाजूला उंच कडा आणि मधूनच सरपटत जाणारा तो निरुंद रस्ता. पवनचे म्हणजे आमच्या गाडीच्या चालकाचे सर्व कौशल्य पणाला लागले होते. जसजसे आम्ही उंच उंच चढत होतो तसतशी झाडी विरळ होत होती. आम्ही ट्रीलाईनच्या पलीकडे जात होतो. काही वेळाने झाडी संपलीच आणि बर्फ दिसायला लागलं. रस्ता आता ओलसर आणि जास्त निसरडा झाला होता. अत्यंत कमी वेगाने आम्ही पुढे जात होतो. आम्ही सकाळी लवकर निघालो होतो त्यामुळे फक्त आमचीच गाडी रस्त्यावर होती, बाकी कुठे मानवी वस्तीची कुठलीही खूण दिसत नव्हती. शेवटी एकदाचे साच पासच्या पायथ्याशी आलो. तिथे हिमाचल पोलिसांचे चेकपोस्ट होते. तिथे एंट्री केली आणि खिंड चढू लागलो. आता रस्त्यावरही फ्रॉस्ट होतं त्यामुळे गाडी अत्यंत जपून हाकावी लागत होती. जसजसे वर चढत होतो तसतशी थंडी वाढत होती, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बर्फाच्या भिंती दिसत होत्या. पुढे पुढे तर त्या भिंतींची उंची वाढून चांगली पंधरा-वीस फुटांपर्यंत गेली. रस्ता आता इतका चिंचोळा झाला होता की बर्फाच्या बोगद्यातून आम्ही चाललोय असंच वाटत होतं. पवन अत्यंत दक्षतेने गाडी चालवत होता कारण जराशी चूक झाली असती तरी आम्ही तिथेच अडकून पडलो असतो आणि मदत तर कित्येक किलोमीटर दूर होती. ते शेवटचे आठ किलोमीटर कापायला आम्हाला जवळजवळ दोन तास लागले. दुसरी कुठलीही गाडी आम्हाला दिसली नव्हती, आमच्या मागेही आणि पुढून येणारीही. आता हवेतला प्राणवायूचा विरळपणाही चांगलाच जाणवायला लागला होता. मुलांची डोकी दुखायला लागली होती. दीर्घ श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला होता. गाडी सतत वळणे घेत होती त्यामुळे पोटात ढवळायला लागलं होतं सगळ्यांच्याच. तरीही आम्ही पुढे पुढे चाललो होतो कारण एकतर रस्ता इतका अरुंद होता की परत जायचं म्हटलं तरी गाडी वळवून घेणं शक्य नव्हतं त्यामुळे मी स्वतःलाच 'सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे' असे बजावीत होते. चढ मात्र संपायचं काही चिन्ह दिसत नव्हतं.
आता आमच्यापुढे पीर पंजल पर्वतरांगेचा विशाल पट हळूहळू उलगडत होता. पांढराशुभ्र बर्फाचा मुगुट घातलेली उंच शिखरे आणि त्यांना जोडणारी बर्फाने आच्छादलेली विस्तीर्ण खोरी. वर निळेभोर, केवळ हाय अल्टीट्युडमध्येच दिसू शकते असे निरभ्र आकाश, आणि नीरव, सर्वसमावेशक शांतता. केवळ आमच्या गाडीच्या चाकांचा आणि घोंगावणाऱ्या वाऱ्याचा सोडला तर इतर कुठलाच आवाज नव्हता, कुणाची चाहूल नव्हती. आम्ही सगळे आपसूकच निःशब्द झालो होतो. सारखं 'गाणी लाव, गाणी लाव' असा हट्ट करणाऱ्या मुलांनीदेखील आपण होऊन गाडीतलं संगीत बंद केलं होतं. निसर्गाच्या त्या विराट अविष्कारापुढे आपण कुणीच नाही असं सारखं वाटत होतं. काही वेळ तसाच पूर्ण शांततेत गेला.
तेव्हढ्यात दरीच्या दिशेने बोट दाखवत अनन्या म्हणाली, 'ते बघ, ते बघ मम्मा'. आम्ही त्या दिशेने बघितलं तर खूप खाली पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या लादीवर सारखे हलणारे खूप इवले इवले ठिपके दिसत होते. 'गद्दी लोक आपल्या शेळ्या घेऊन चाललेत', पवन तिकडे नजर टाकून म्हणाला, 'खाली पांगी खोऱ्यात कुरणे खूप आहेत. आता काही आठवडे आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन हे लोक तिथेच मुक्काम करतील'. तो कळप बऱ्याच वेगाने वाटचाल करत होता. आम्ही ज्या रस्त्याने जात होतो त्याच रस्त्याकडे त्यांचाही प्रवास सुरु होता हे साफ दिसत होतं. एवढा मोठा खडा बर्फाळ चढ चढून ते लोक वर येत होते, पण त्यांच्या वाटचालीत वेग होता. मेंढरे आणि माणसे, सगळीच न थकता, वेगाने चालत होती. आमची गाडी पुढे जात होती आणि तो कळप वर येत होता. जसजसे ते जवळ यायला लागले तसतसे ते आम्हाला स्पष्ट दिसायला लागले. प्रचंड मोठा कळप होता. तीनशे-चारशे तरी शेळ्या मेंढ्या असतील. बरोबर सात-आठ लोक आणि चार पाच केसाळ, धिप्पाड, पहाडी कुत्री. लांडग्याने किंवा स्नो लेपर्डने मानगूट धरू नये म्हणून त्यांच्या गळ्याभोवती अणकुचीदार खिळे असलेल्या जाड लोखंडी कॉलर्स होत्या.
आमची गाडी एकदाची साच पासच्या सर्वोच्च पॉईंटवर येऊन पोचली. भारतात जवळजवळ सगळ्याच ठिकाणी असते तसे इथेही घाटमाथ्यावर एक छोटे देऊळ होते. गाडी वळवून घ्यायला थोडी जागा होती. पवनने गाडी वळवून शक्य तितक्या बाजूला लावली. आम्ही देवळात जाऊन दर्शन घेतले. शंकराचे देऊळ होते. छोटेशे. घुमटीवजा. पण अत्यंत सुंदर. त्या तश्या निर्मनुष्य ठिकाणी, हिमालयात, शंकरच शोभून दिसत होता.
'आप लोग अभी कहाँ जायेंगे'? मी विचारलं. 'नीचे पांगीमें. वहाँ एक-दो महिने रुकेंगे फार दशहरे टाईम गांव वापस जायेंगे' तो म्हणाला. 'और रहेंगे कहाँ?' मी विचारलं. तो गोरापान, पण उन्हाने रापलेला, पंचविशीचा गद्दी दिलखुलास हसला आणि म्हणाला. 'हमारा क्या. शिवजी की किरपा है. सारा सामान तो है. जहाँ मन किया वहाँ बिस्तरा लगा दिया दीदी'. अनिकेत शिवाचा तो अनिकेत भक्त शोभत होता खरा. मला त्या एका क्षणी त्याच्या त्या उन्मुक्त जगण्याचा फार फार हेवा वाटला!
- शेफाली वैद्य