अवंती : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात तुझे संपूर्ण वंदेमातरम हे राष्ट्रगान खूपच प्रभावी झाले मेधाकाकू...!! एकदम जबरदस्त राष्ट्रगान आणि त्याच्या निर्मितीची कहाणी आम्हाला सगळ्याना नवीनच होती. काय सुरेख वर्णन आहे आपल्या भारतमातेचे त्या गीतात आणि आता उत्सुकता आहे आपल्या अभ्यासातील नव्या विषयाची...!!
मेधाकाकू : वा.. अवंती, छान वाटले... तुझे कौतुक ऐकून...! आणि आता ती उत्सुकताही फार ताणू नकोस. आहार-अन्न या संदर्भातील लोकश्रुती नंतर आता तीन प्राथमिक गरजांमधील ‘निवारा’ या महत्वाच्या विषयाचा अभ्यास आजपासून सुरू. या आधी क्रमाने ‘वस्त्र’ हा विषय याला हवा. परंतु तो विषय मी, नवरात्र-दिवाळी अशा वर्षातील आवडत्या सणांच्या दिवसांसाठी राखून ठेवलाय कारण त्या सणांना नवीन कपडे आणि नटण्या-मुरडण्याची आपली सर्वांची आवड...! तर आता प्रत्येकासाठी घर हा अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आणि या संदर्भात गेली अनेक शतके आपल्या मातृभाषेत अनेक म्हणी - वाकप्रचार परंपरेने प्रचलित झाले. त्यातला आजचा पहिला वाकप्रचार...
अंगणावरुन घराची कळा
आपण जरा शंभर वर्षे मागे जाऊया... ज्या काळात प्रत्येक घरासमोर छोटेसे अंगण असे...! घरातली गृहिणी जशी तिच्या स्वयंपाकघरात व्यस्त असलेली आपण पाहिली तशीच ती तिच्या अंगणाचीही निगरणी करत असे. अंगणात फळा-फुलांची झाडे तिने हौसेने लावलेली असत. अंगणाची नियमित स्वच्छता, सण-समारंभात आनंदी दिसणारे, सारवलेले, सजवलेले अंगण ही प्रत्येक घराची ओळख असे त्या काळात. म्हणूनच या अंगणाचे प्रतीक वापरले गेले त्या घरातील राहणार्या कुटुंबाचा परिचय करून देण्यासाठी.. निर्जीव अंगण सजीव आहे असे समजून ते सजीवांप्रमाणे त्या घराविषयी आपल्याशी बोलते आहे असे वर्णन करणारा हा चेतनागुणोक्ती अलंकार...!!
अवंती : एकदम सही है मेधाकाकू, माला आठवण झाली त्या मोठ्या बिल्डरच्या जाहिरातीतल्या कॅच लाईन शीर्षकाची. अगदी आधुनिक जाहिरातीत शोभून दिसेल असे हे मोटो स्क्रोल असे म्हणायला हरकत नाही... मेधाकाकू...!!
मेधाकाकू : अरे वा, अवंती... आता तर तू स्वत:च विषयाची व्याप्ती वाढवायला लागलीस की...!! मला, तुझे त्या विषयाचा असा सतत उलट-सुलट विचार करत राहणे फार आवडते, बघ. आता हा एक फार मजेशीर वाकप्रचार, बघ काही लक्षात येते का ते ?
आगी वाचून कड नाही माये वाचून रड नाही
एक लक्षात घे की आता आजचे सगळे वाकप्रचार आणि म्हणी निवारा म्हणजे ‘घर’ या विषयाच्या संदर्भातच आहेत... बघ प्रयत्न करून. काही उमजते का ते..!
अवंती : अरेच्या... मेधाकाकू... तू मलाच लावलेस कामाला आज. चल ओके... मीही प्रयत्न नक्की करते आज. ओहो... मला म्हायत्ये... ‘कड’ म्हणजे काय ते. अगं, गेल्या महिन्यातच आजीने मला कढी करायला शिकवली होती. त्यावेळी कढी उतू जायला लागली की त्याला ‘कड येणे’ असे म्हणतात असे आजीने समजावले होते. सही आठवले मला... बरोबर आहे ना काकू. ? ओहो... आता पहिल्या वाक्यात ‘आगीवचून कड नाही’ मध्ये ‘आग’ म्हणजे त्या काळातील स्वयंपाकघरातील शेगडी असावी. असे मला वाटतय. अरेच्या... हो अगदी खरे आहे मेधाकाकू अगं, असे बघ, शेगडीवर म्हणजे निखार्यावर ठेवलेल्या भांड्यातील पदार्थ गरम होतात आणि त्यांना कड येते. हे अगदी तीन शब्दात समजले मला. मस्त मस्त मस्त. मेधाकाकू... आता तूच पूर्ण करना याचे पुढचे मथितार्थ विश्लेषण...!!
मेधाकाकू : आज प्रयत्न केलास आणि यशस्वी झालीस बघ, अवंती. आता लक्षात आले असेल. वाचलेले-ऐकलेले-पाहिलेले सगळे काही. असा अर्थबोध करून घेताना आपल्याला वापरत येते. जसे स्मरणात राहिलेले आजीचे ‘कढी करायला शिकवणे’ तू वापरलेस. संशोधनाचा पाया असाच घातला जातो आपल्या तरुण वयात. तर यातले पुढचे अर्धे वाक्य आहे ‘माये वाचून रड नाही’… घर म्हणजे कुटुंब व्यवस्था आलीच... त्या घरात, जिथे शेगडीतील निखर्याची धग आहे ज्याने अन्न शिजते आणि शरीरिक भूक भागवली जाते. तशीच इथे आई-आजीच्या मायेची सौम्य ऊब आहे जी प्रेमाने कुटुंबाचा प्रतिपाळ करते, जी मुलांची ‘रड’ म्हणजे तीव्र भावनांना फुंकर घालून समजूत काढते, जी भावनिक आरोग्य उत्तम सांभाळते. जेंव्हा आई-आजीची अशी माया, कुटुंबातील मुलांना मिळते तेंव्हाच मुले हक्काने ‘रड’ म्हणजे आपली गाऱ्हाणी मोठ्यांकडे करू शकतात. तर स्वयंपाकघरातील प्रखर अग्नीचे वास्तव आणि प्रेमाची सौम्य ऊब. अशा दोन्हीचे महत्व, म्हणजेच घर आणि कुटुंब व्यवस्थेचे महत्व अगदी सहजपणे या वाकप्रचारात, काही शतकांपासून सांगितले गेले आहे. या वाक्यातील कल्पना म्हणजे घर-कुटुंब व्यवस्थेचे महत्व चढत्या क्रमाने मांडून ती कल्पना उत्कर्षापर्यन्त नेणारा हा ‘सार’ अलंकारात नटलेला वाकप्रचार. हा वाकप्रचार ‘अनुमान’ अलंकारातही समाविष्ट करता येईल कारण ‘आग आणि कड’ तसेच ‘माया आणि रड’ या दोन गोष्टींच्या एकत्रित संदर्भाने घर विषयक काही अनुमान काढता येते. आणि आता या सगळ्याला अगदी संयुक्तिक असा दुसरा वाकप्रचार.
आपले घर बारा कोसावरून दिसते
अवंती : अरे वा, मेधाकाकू... घर आपले घर, माझे घर... आता या सगळ्याचा खरा अर्थ जाणवलाय मला आणि ‘घर’ या जागेचे, या संज्ञेचे आपल्या जीवनातले महत्व किती आहे ते समजतय.
मेधाकाकू : होय अवंती... छान वाटतय मला. तुझी समजून घेण्याची तयारी बघून आणि तुझी योग्य समजूत बघून. आता वरच्या वाकप्रचाराविषयी.
आपले घर बारा कोसावरून दिसते
याचा शब्दार्थ सहज उलगडण्यासारखा आहे. मात्र याचा भावार्थ इतकाच समजून घे की, प्रत्येकाला घराची ओढ असतेच आणि मुले शाळेतून – बाबा+आई कामावरून – सैनिक सीमेवरून घरी परत येतात तेंव्हा, घरच्या वाटेवर असताना प्रत्यक्ष दिसत नसले तरी घराची ओढ विलक्षण असते... कारण तिथे कोणीतरी आपली उत्सुकतेने वाट पहाट असते याची प्रत्येकाला जाणीव असते. स्वभावोक्ती अलंकारामध्ये निर्जीव वस्तूचे यथार्थ वर्णन अपेक्षित असते. कुठल्याही कविकल्पनेचा आधार नसतानाही घराचे साधे परंतु वास्तव असे कमालीचे प्रत्ययकारी वर्णन या वाकप्रचारात केले आहे, म्हणूनच हा स्वभावोक्ती अलंकार...!!
अवंती : मेधाकाकू... अगदी रडू आलय मला. तुझे शेवटचे वाक्य ऐकून. मी नाही पुढे काही बोलू शकणार आज...!!
- अरुण फडके
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..