गरज आहे भाऊराव पाटलांची !

    17-Aug-2017   
Total Views | 1
 

 
कोपर्डी घटनेनंतरचा पहिला मोर्चा भव्य व पुरेसा राजकीय संदेश देणारा झाल्यानंतर अनेक ठिकाणी अशा मोर्च्याचे आयोजन झाले. अनेक जुन्या संस्थानिकांचे नवे शौकही या निमित्ताने जागे झालेले पाहायला मिळाले. सुदैवाने यातल्या कुणालाही मराठा समाजाने आपला अधिकृत नेता म्हणून मान्यता दिली नाही. एका उत्स्फूर्त भावनेने एकवटलेले जबाबदार कार्यकर्ते हीच मराठा मोर्च्याची खरी ताकद होती, पण यातून नेतृत्व पुढे येताना दिसले नाही आणि नेतृत्व कुणाचे हा प्रश्न अनुत्तरितच राहून गेला.
 
मुंबईत नुकताच मराठा मोर्चा पार पडला. अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनाच्या दृष्टीने परिपूर्ण आणि मोर्च्याच्या दृष्टीने ‘मोर्चा कसा करावा’ याचा वस्तुपाठ निश्चित करणारा हा मोर्चा होता. मोर्चातला महिलांचा सहभाग, त्यांना दिलेली वागणूक या व अशा सुयोग्य संकेतांनी मोर्चा यशस्वी झाला. कुठल्याही प्रकारची टीका करायला कोणताही वाव न ठेवता मराठा मोर्चा पार पडला. राजकारण्यांना दूर ठेवण्याचे धाडसही मोर्चेकर्‍यांनी उत्तमदाखविले. आजकाल ते खूपच कठीण होऊन बसले आहे. कोपर्डी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर हळूहळू मराठा मोर्च्याचे लोण महाराष्ट्रभर पसरले आणि यशस्वीदेखील झाले. ऍट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग हा मुद्दा अनेकांना एकत्र आणणारा ठरला आणि मागण्यांच्या मुद्द्यात बरेच मुद्दे येत गेले. लोकशाहीत बहुसंख्येने एकवटलेला कुठलाही समाज कुठल्याही पक्षातील राजकारण्यांसाठी संधी किंवा संकट असतो. मोर्च्यात सहभागी झालेल्यांची संख्या इतकी मोठी होती. संपूर्ण देशासमोर हे कसे घडते आहे? हा अचंबित करणारा प्रश्न उभा ठाकला. मोर्च्याच्या मागून कुणीतरी राजकारण करते आहे, हा नेहमीचाच संशय इथेही व्यक्त होत राहिला. मोर्च्याच्या नेतृत्वाला चेहरा नव्हता. त्यामुळे अशा चर्चा अधिकच रंगल्या. सगळ्याच राजकीय पक्षातील मराठा कार्यकर्त्यांनी या मोर्च्यात सहभागी होऊन स्वत:ची ‘स्पेस’ तयार करण्याचा प्रयत्न केला, पण मोर्चेकरी इतके सुज्ञ की त्यांनी आपल्या मोर्च्याचा ‘गोविंदा’ होऊ दिला नाही. राणे वगैरेंसारख्या नेत्यांनी ‘नेता निवडला नाही, तर मागण्या कशा मांडणार?’ वगैरे डाव टाकून पाहिले; परंतु तेही काही जमले नाहीत. सगळ्याच जातीत जातीयवादी लोक असतात आणि अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर ते नेहमी एकमेकांसमोर येऊन उभे ठाकतात. यावेळीही ते इथेही पाहायला मिळाले. मुक्तमाध्यमांवर तर लोकांच्या सृजनशक्तीला धुमारेच फुटले होते. असा मोर्चा नेतृत्वाशिवाय कसा उभा केला जाऊ शकतो, या प्रश्नाचे खरे उत्तर हवे असेल तर थोडे मागे जायला हवे. 
 
संभाजी महाराजांची औरंगजेबाकडून हत्या झाल्यानंतर मराठ्यांनी केलेल्या संघर्षाकडे पाहावे लागेल. कुठलाही नेता नसताना २५ वर्षे मराठे औरंगजेबाशी उभा दावा मांडून लढत होते. यामुळे मराठ्यांच्यात निर्माण झालेल्या नेतृत्वगुणांचा ‘मोघलमुक्त भारत’ करण्यात कसा उपयोग झाला त्याचे पुरेपूर वर्णन सेतूमाधवराव पगडींनी ’मराठे आणि औरंगजेब’ या पुस्तकात करून ठेवले आहे. गौरवशाली इतिहास प्रेरणा देत असतोच, नाही असे नाही, पण आता बदलत्या काळानुसार या इतिहासातले संदर्भ लावून पाहायला हवे. आरक्षणाची मागणी मराठा समाजातर्फे केली जात आहे. आरक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे सापडतील, असे म्हणणे योग्य नाही. आरक्षण मागणे सोपे आहे आणि त्यातून राजकीय वातावरण ढवळून काढणे अधिकच सोपे. समाजाच्या ज्या वंचित घटकांवर पिढ्यान्‌पिढ्या अन्याय झाला, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आरक्षणाची रचना अस्तित्वात आली. आरक्षणाची रचना अस्तित्वात आणण्यासाठी शाहू महाराजांनी सर्वप्रथमप्रयत्न केले. त्यांची यामागची सामाजिक भूमिका नेमकी काय होती, हे समजून घ्यावे लागेल. जे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले, त्यांच्या पुढच्या पिढीने उत्कर्ष साधला. आरक्षण लाभूनही त्याचा पुरेसा लाभ घेऊ न शकलेला मोठा वर्ग व अनुसूचित जातींना शिक्षण व नोकर्‍या आरक्षण मिळाल्यामुळे आपल्या संधी हुकतात, असे मानणारा अजून एक वर्ग निर्माण झाला आहे. परस्परांकडे तिरस्काराने पाहणारे एकाच समाजातले निरनिराळे गट ही आजची स्थिती यातून निर्माण झाली आहे. आरक्षण देऊन त्याचे श्रेय मिळविण्यासाठी काहीही करू शकणार्‍या राजकारण्यांना मराठ्यांना आजतागायत आरक्षण का देता आलेले नाही, याचा विचार करायला नको का? 
 
कोपर्डीच्या निमित्ताने निघालेला पहिला मोर्चा भव्य व पुरेसा राजकीय संदेश देणारा झाल्यानंतर अनेक ठिकाणी अशा मोर्च्यांचे आयोजन झाले. अनेक जुन्या संस्थानिकांचे नवे शौकही या निमित्ताने जागे झालेले पाहायला मिळाले. सुदैवाने यातल्या कुणालाही मराठा समाजाने आपला अधिकृत नेता म्हणून मान्यता दिली नाही. एका उत्स्फूर्त भावनेने एकवटलेले जबाबदार कार्यकर्ते हीच मराठा मोर्च्याची खरी ताकद होती, पण यातून नेतृत्व पुढे येताना दिसले नाही आणि ‘नेतृत्व कुणाचे?’ हा प्रश्न अनुत्तरितच राहून गेला. प्रस्थापित राजकीय नेतृत्व नाकारण्याचा पहिला टप्पा मराठा मोर्च्याने यशस्वीरित्या नाकारला असला तरी दुसर्‍या टप्प्यात जे सामाजिक नेतृत्व या मोर्च्याच्या निमित्ताने पुढे यायला हवे होते, तसे येताना दिसले नाही. सामाजिक नेतृत्वाशिवाय परिवर्तनाच्या चळवळी पुढे जाऊच शकत नाही. पश्चिममहाराष्ट्रात मराठा मोर्च्याने मोठे वातावरण निर्माण केले. खुद्द सातार्‍याला भव्य असा मोर्चा झाला. ज्या सातार्‍यात सर्वात प्रभावी मोर्चा झाला, त्याच सातारा जिल्ह्यात कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या अस्सल शिक्षणमहर्षींनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षणाची परंपरा सुरू केली. वसतिगृहे काढली, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केल्या. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आजही भल्या मोठ्या विस्ताराने सातार्‍यात उभा आहे. छत्रपती शाहूंच्या विचारांनी प्रेरित होऊन भाऊरावांनी हे कामसुरू केले. मराठा पतपेढ्यांच्या जीवावर भरपूर सत्ता उपभोगलेले अनेक प्रस्थापित मराठा पुढारी आज पश्चिममहाराष्ट्रात आहेत. यातील बहुसंख्य पुढार्‍यांची शिक्षणे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातनूच झाली. यात काही शिक्षणसम्राटही आहेत. गंमत म्हणजे, कर्मवीर स्वत: मराठा समाजातून नव्हते. मात्र, त्यांनी केलेल्या या शैक्षणिक कार्याचा सर्वाधिक लाभ मराठा समाजालाच झाला. आजही शिक्षण, रोजगार, कृषिक्षेत्रासमोरचे प्रश्न हे मराठा समाजासमोरचे मोठे प्रश्न आहेत. सर्वच समाजाला सतावणार्‍या या प्रश्नापासून मराठा समाज स्वत:ला दूर ठेऊ शकत नाही. प्रस्थापित राजकारणी या प्रश्नांची उत्तरे शोधून देतील, असा विचार करणेच सपशेल चुकीचे आहे. दक्षिणेत पेरियार इ. व्ही. रामस्वामींनीही अशाच आशयाचे काम केले. मराठा समाजातूनच जोपर्यंत अशा बिगर राजकीय-सामाजिक नेतृत्वांचा उदय होत नाही, तोपर्यंत मराठ्यांसमोरचेच काय, पण बाकी समाजासमोरचे प्रश्नही सुटणार नाहीत. 
 
- किरण शेलार
 
 

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121