आपल्या १३ वर्षांच्या लेकीचं वजन वाढत असल्याची चिंता त्या पालकांना सतावू लागली अन् त्यांनी थेट डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्या १३ वर्षांच्या मुलीची तपासणी केली आणि त्यातून एक भयाण सत्य बाहेर आलं. ती १३ वर्षाची मुलगी २७ आठवड्यांची गरोदर होती... बाप रे! खरंच किती धक्कादायक आहे हे सगळं. महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईमध्ये अलीकडेच घडलेल्या या प्रकरणामध्ये वडिलांसोबत काम करणार्या व्यक्तीने त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत त्या पालकांना काहीच कल्पना नव्हती. खरंतर आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुखद क्षण असतो, पण वयाच्या अवघ्या तेराव्या-पंधराव्या वर्षी मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्याची अतिशय गंभीर आहे.
आयुष्याच्या एका टप्प्यावर बेसावधपणे पाऊल चुकीचे पडते आणि मग एक निरागस, निष्पाप जीव जन्म घेतो... पण बरेचदा हे जीव जन्मापूर्वीच संपवले जातात आणि जन्माला आले तरी त्यांच्या आगमनाने आयुष्याचा गुंता अधिकच वाढतो. मुलाचा बाप तर नंतर तोंडही दाखवत नसला तरी याचा सामना मुलींना, तिच्या कुटुंबीयांना करावा लागतो. समाजात मान खाली घालून वावरण्याची त्यांच्यावर नामुष्की ओढवते. समाजाच्या अनेक प्रश्नांना पालकांना उत्तरे द्यावी लागतात. आपल्या मुलीला संस्कार देण्यामध्ये आपण कुठे कमी पडलो, हा एकच प्रश्न त्या आई-वडिलांना सतावू लागतो. काही मुली तर आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये, यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, तर काहींचे शिक्षण थांबवले जाते. मुलगी अगदीच १७ - १८ व्या वर्षातली असेल, तर थेट तिचे लग्न लावून दिले जाते. त्यामुळे अनेक घटनांमध्ये मुलींना लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींची फसवणूक केली जाते आणि जे व्हायला नको तेच नेमके घडते. पण स्वेच्छेने निर्माण झालेले शरीरसंबध त्या क्षणापुरतेच सुखाचे वाटत असले तरी ती एक धोक्याची घंटा असते. त्या मुला-मुलींचे अज्ञान किंवा व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल असलेल्या त्यांच्या भन्नाट कल्पनांमुळे आपण नक्की काय करत आहोत, याचे भान त्यांना राहात नाही आणि ज्या वेळेस गर्भ राहण्याइतपत वेळ येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तेव्हा, वयात येणार्या मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी सजग राहणे, आपल्या पाल्याशी संवाद साधणे आणि त्यांना अशा गोष्टांची पूर्वकल्पना देऊन वेळीच जागरुक करणे गरजेचे आहे.
'कच्चा लिंबू!'
तरुणपणाच्या रस्त्यावरचं
पहिल ठिकाण नाक्याचं,
सोळावं वरीस धोक्याचं...’
साठीच्या दशकातलं सुलोचना चव्हाण यांनी एका मराठी चित्रपटासाठी गायलेले हे गाणे अतिशय लोकप्रिय झालं. परंतु, अलीकडे अल्पवयीन मुला-मुलींच्या संदर्भात घडणार्या या घटना पाहाता आता वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षीच या धोक्याच्या वळणाचा विचार करावा लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडेच १५ वर्षांखालील गर्भपातांच्या संख्येत १२० टक्क्यांनी वाढ झाल्याची बाब माहिती अधिकाराद्वारे उघड झाले आहे. २०१३-१४ मध्ये एकूण ३० हजार महिलांचे गर्भपात झाले होते. यामध्ये १५ वर्षांच्या १२० मुलींचा समावेश होता, तर १६ ते १९ या वयोगटातील ९०० मुलींचा समावेश होता. असुरक्षित शरीरसंबंधांचे सध्या शहरातील युवक-युवतींमध्ये पेव फुटले असून, त्यामुळे गर्भ राहण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध गर्भपात केंद्रांवर गर्भपाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ग्रामीण भाग वगळता मुंबई तसेच इतर राज्यातील मुख्य शहरांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. परंतु, तरीही अल्पवयीन मुलींमध्ये गर्भपाताचा आकडा मात्र फुगत चालला आहे. मागील काही वर्षांत काही डॉक्टरांनी अवैधरित्या स्वत:चे गर्भपात केंद्र उघडून अवैधरित्या गर्भपात केल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील अधिकृत गर्भपात केंद्रात झालेल्या गर्भपाताची आकडेवारी जरी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात अधिकृत आणि अनधिकृत गर्भपात केंद्रांत होणार्या गर्भपाताबाबत जाणून घेतले, तर ही आकडेवारी तिप्पट आढळून येईल, यात शंकाच नाही. अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दुकानदारांना औषध देण्यास बंदी घातली असतानाही गर्भपातावरील गोळ्या सहज उपलब्ध होत आहेत. त्यावरही काही निर्बंध घालणे गरजेचे आहे. याशिवाय अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार हेही गर्भपात होण्यास कारणीभूत ठरतात. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे जसे आवश्यक आहे, तसेच सुजाण पालकांनीदेखील आपल्या पौगंडावस्थेतील मुलांच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे, याकडे लक्ष द्यायला हवे. खरंतर चांगलं आणि वाईट काय याची व्याख्या त्यांना या वयामध्ये उमजत नाही, पण पालक आणि एकूणच समाजाने या ’कच्च्या लिंबूं’चे मार्गदर्शक झाल्यास त्यांची वाट चुकणार हे नक्की!
- सोनाली रासकर