संगीत नाटकाची कीर्तीमान शिलेदार

    16-Aug-2017   
Total Views |
 

 
 
आपल्यातील कला जोपासण्यासाठी मेहनतीबरोबरच त्या कलेमध्ये माहीर असलेल्या ’गुरू’ची साथ मिळाली, तर मग यशाचा मार्ग काहीसा सुकर होऊन जातो. कीर्ती शिलेदार यांचाही जीवनप्रवास काहीसा असाच... कीर्ती शिलेदार या मराठी गायक-अभिनेत्री आहेत. संगीत नाटकांतील गायनाकरिता त्या खासकरुन ओळखल्या जातात. मराठी अभिनेते जयरामशिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी जयमाला यांच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांचा आज जन्मदिवस. भारताच्या प्रमुख शहरांमध्ये यांनी जवळपास साडेचार हजांराहून अधिक मैफिली गाजविल्या आहेत. विदेशातील त्यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिलीही तितक्याच संस्मरणीय... आपल्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. पुणे विद्यापीठातून त्यांनी साहित्य शाखेची पदवी संपादित केली, तसेच शास्त्रीय संगीताचे उच्चशिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडून घेतले. ‘संगीत कान्होपात्रा’सह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचविला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्णयुगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेल्या गीतांना रसिकाप्रेमींनी विशेष दाद दिली. संगीत नाटक हेच त्यांच्या आईवडिलांचा श्र्वास आणि ध्यास होता. आपल्या आईवडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा ५० हून अधिक वर्षे अविरतपणे केली.
 
अण्णाभाऊ किर्लोस्करांनी सुरू केलेल्या संगीत नाटकाला मधल्या काळात उतरती कळा लागली. त्यावेळेस जयराम शिलेदार यांचा जीव मात्र संगीत रंगभूमीवरच घुटमळत होता. जयमाला यांची साथ मिळताच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली आणि संगीत रंगभूमीच्या उतरत्या काळात त्यांनी आपलं अवघं आयुष्य संगीत रंगभूमीसाठी समर्पित केलं. जयराम व जयमाला यांनी संगीत रंगभूमीसाठी केलेला संघर्ष कीर्ती यांनी लहानपणापासून याचि देही याचि डोळा अनुभवल्याने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य याच कलेसाठी देण्याचा वज्रनिर्धार केला. रंगभूमीवर प्रत्येक भूमिका साकरताना त्यांनी त्या भूमिकेचा खोलवर अभ्यास केला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर, तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रमझाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ‘स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.
 
कीर्ती शिलेदार यांना २०१४ सालचा महाराष्ट्र सरकारचा ‘अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कीर्ती शिलेदार यांनी अनेक नाटकांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या. यामध्ये ‘अभोगी’ नाटकामध्ये (गगनगंधा), ‘एकच प्याला’मध्ये (सिंधू), ‘कान्होपात्रा’मध्ये (कान्होपात्रा), ‘द्रौपदी’ (द्रौपदी), ‘भेटता प्रिया’ (महाश्र्वेता) या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत. त्यांना असेच उदंड आयुष्य लाभो, हीच दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा. 
 
- सोनाली रासकर

सोनाली रासकर

समाजशास्त्र, इतिहास घेऊन बी.ए. पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला आहे. फिचर स्टोरी, तसेच  सामाजिक विषयावरील लिखाणाची आवड, गुन्हेगारीशी संबंधित मालिका बघण्यामध्ये रस. सध्या दै. ’मुंबई तरूणभारत’मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121