स्वातंत्र्याची सत्तरी...

Total Views | 5
 

 
 
भारतीय स्वातंत्र्याने सत्तरी गाठली आणि ७१ व्या वर्षांत पदार्पण केले. असे असताना आज आपला खंडप्राय देश एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचला आहे. देशाच्या लोकसंख्येनेही ७० वर्षांत अब्जावधींचा पल्लाही गाठला. अशातच या अब्जावधी लोकांना किमान एक दिवस तरी राष्ट्रगान सक्तीचे करावं लागणं, यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं !! एक राष्ट्र म्हणून आपण कोणत्या आवर्तनातून जात आहोत, याची प्रचिती याकडे पाहून आपल्याला नक्कीच येऊ शकते. गेली ७० वर्षे अनेक आव्हाने आपल्या समोर ‘आ’ वासून उभी आहेत आणि ७१ व्या वर्षांत पदार्पण करताना या आव्हानांचा आपल्याला नक्कीच विचार करावा लागणार आहे.
 
आव्हानं तर यापुढेही कायम राहतील. पण आपण आपल्या देशप्रेमाबद्दल आत्मचिंतन करावे लागण्याइतके पोखरले गेलो आहोत का ? जगाला भारतीयांचे कौतुक आहेच, पण आपल्याच देशातील लोकांना आपल्या अस्तित्वाचा किती अभिमान आहे, हा यक्ष प्रश्न आहे. जर आपल्याच अस्तित्वाचा आपल्याला अभिमान असता, तर आज ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत किंवा स्वातंत्र्यदिनाचे सोहळे यावरून विकृत राजकारण रंगले नसते.
 
गेल्या काही काळात या गोष्टींचा अभिमान आणि स्वातंत्र्यासाठी आपले वर्चस्व पणाला लावणारी पिढीच लोप पावत चालली आहे. अनेकांची आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि त्यातच लोकांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ याचे प्रमुख कारण म्हणता येईल. आपण २१व्या शतकात पदार्पण केले खरे, पण खर्‍या अर्थाने गौरवशाली इतिहास लाभलेल्या भारताच्या त्याच इतिहासाची आठवण करून देणे आज काळाची गरज बनली आहे. ‘राष्ट्र’ नावाची संकल्पना नव्याने आणि अगदी जोमाने नव्या पिढीच्या मनी रुजवायची असेल, तर देशाचा वारसा, इतिहास सांगणे अगत्याचे आहे. देशाच्या एकसंध बांधणीसाठी ही संकल्पना मनमनांत संवर्धित करणे ही काळाची गरज आहे. आज भारताला बहुधार्मिकता, बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा वारसा लाभला आहे. अनेक आव्हानांचा सामना करत आज भारत समर्थपणे एक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, पण आज आपण एका धर्माचे, जातीचे म्हणून नाही, तर एक ‘भारतीय’ म्हणून म्हणून आपले अस्तित्व टिकवणे तितकेच गरजेचे झाले आहे.
 
 
 
अस्ताच्या दिशेने वाटचाल नको...
 
देशाचा वारसा सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रप्रेम उदयास येते. वारसा माहीत असेल, तर एखादे राष्ट्र आपल्या पायावर अगदी भक्कमपणे उभे राहू शकते. मात्र, तसे नव्हते म्हणूनच सोव्हिएत युनियनसारख्या बलाढ्य राष्ट्राचाही अस्त झाला. युगोस्लाव्हियासारख्या देशाची आज पुसट रेषाही दिसेनाशी झाली. आपल्या देशातही आज राजकारण अगदी खालच्या पातळीला गेले आहे. राष्ट्रगीताला विरोध आणि त्याचेही राजकारण करण्याइतकी आपल्या राजकारण्यांची मानसिक पातळी घसरली आहे. अशा गोष्टींना विरोध करून किंवा हे आपल्या धर्माच्या विरोधात आहे, असे सांगून हे राजकारणी मानसिक रोग्याच्या भूमिकेतून देशाला अस्ताच्या दिशेने नेऊ लागले आहेत. याला वेळीच वेसण घालायची असेल, तर तरुण पिढीच्या मनी देशाविषयी आदर आणि आपुलकी निर्माण करणे आवश्यक आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जगातील अनेक राष्ट्रांनी एकाधिकारशाही, लष्करशाहीच्या दिशेने कूच केली; परंतु भारताने मात्र समर्थपणे वाटचाल करत लोकशाहीचा मार्ग अंगीकारला. आज त्याच लोकशाहीचा फायदा म्हणून नाही, तर आपल्याला मिळालेली देणगी समजून एकसंध राहण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारची आपात्कालीन परिस्थिती उद्भवली की, आपल्याला सरकारची आठवण येते. त्यावेळी सरकार म्हणजे जणू देशच अशी भावना उराशी बाळगत त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. मात्र, जेव्हा त्याची परतफेड करण्याची वेळ असते त्यावेळी अनेकांकडून शून्य प्रतिसाद मिळतो. काश्मीरमध्ये आलेल्या महापुरातून जनतेला वाचविण्यासाठी लष्कराची आठवण झाली. त्यावेळी ते लष्कर देशाचे होते; परंतु दहशतवादी कारवाया करताना सेनेने एखाद्याला कंठस्नान घातले, तर तेच वाचलेले प्राण वाचविणार्‍याच्या जीवावर उठतात. याला नक्कीच देशद्रोह म्हटले तरी कोणाला राग येऊ नये, किंबहुना त्या रागाची पर्वाही करू नये. आज अशाप्रकारचे कृत्य करणार्‍यांना पोसले जात आहे. राजकारणाची घसलेली पातळी किंवा गरजेपेक्षा जास्त मिळालेले स्वातंत्र्य यासाठी कारणीभूत आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. राष्ट्राविषी असलेली आत्मीयता वाढवून देशासमोर उभ्या ठाकलेल्या परकीय आणि देशांतर्गत समस्यांवर तोडगा निघू शकतो. पुन्हा एकदा सात दशके मागे जाऊन त्यावेळी देशाच्या एकसंघतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची आठवण करून देऊन सर्वांच्या मनी देशप्रेम रुजवले पाहिजे. यापुढे अस्ताच्या दिशेने नाही, तर एकसंध म्हणून देश उदयास आणण्याचा संकल्प मनाशी बाळगला पाहिजे.
 
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121