राष्ट्र टिकायचे असेल, ते त्याच्या अक्षुण्ण भौगोलिक सीमांसह विकसित होत राहायचे असेल, तर त्यासाठी एका धगधगीत रसप्रवाहाची आवश्यकता असते. ज्वालामुखीप्रमाणे हा रसप्रवाह सतत प्रवाही आणि तेजस्वी असावा लागतो. ज्वालामुखीप्रमाणेच जेव्हा तो थिजतो, तेव्हा त्यातून अभेद्य सह्याद्रीच साकारावा लागतो. केवळ राष्ट्रीय एकात्मतेची गाणी गाऊन हे होऊ शकत नाही. त्यासाठी सतत जागृती करणारी मूल्ये निर्माण व्हावी लागतात. शिवछत्रपतींचे जीवितकार्य हे याच ठोस प्रक्रियेचे प्रतीक आहे. राष्ट्रीयत्वाविषयी शिवछत्रपतींचे कुठलेही स्पष्ट भाष्य उपलब्ध नसले तरी त्यांनी आपल्या अल्प आयुष्यात जे उभे केले, तेच हिंदुस्तानचे राष्ट्रीयत्व मानावे लागेल.
राष्ट्र म्हणजे काय? त्याचे राष्ट्रीयत्व कोणते? ते भौगोलिक सीमांशी निगडित आहे की, त्या भूमीत जन्मलेल्या व्यक्तिसमूहांच्या सांस्कृतिक संचिताशी? का हे राष्ट्रीयत्व साकारते त्या राष्ट्राने अनुभवलेल्या प्रसंगातून आणि त्यातून साकारल्या गेलेल्या इतिहासातून? राष्ट्रीयत्वाविषयीचे विचार हे असे कॅलिडोस्कोपप्रमाणे असतात. जसा आपण तो फिरवू तसे ते जाणवत राहतात आणि दरवेळी नव्या नक्षीचा अनुभव देतात. विचारवंत, साहित्यिक, धुरिणी, राष्ट्रपुरुष वर उल्लेखलेल्या मुद्द्यांवर चर्चा नक्कीच घडवून आणू शकतात. एखाद्याच्या विचारविश्वातून वर उल्लेखित प्रश्नांबाबत प्रकाशाचा एखादा किरणही नक्कीच सापडू शकतो. मात्र, वैचारिक मंथनाच्या पलीकडे जाऊन राष्ट्र टिकायचे असेल, ते त्याच्या अक्षुण्ण भौगोलिक सीमांसह विकसित होत राहायचे असेल, तर त्यासाठी एका धगधगीत रसप्रवाहाची आवश्यकता असते. ज्वालामुखीप्रमाणे हा रसप्रवाह सतत प्रवाही आणि तेजस्वी असावा लागतो. ज्वालामुखीप्रमाणेच जेव्हा तो थिजतो, तेव्हा त्यातून अभेद्य सह्याद्रीच साकारावा लागतो. केवळ राष्ट्रीय एकात्मतेची गाणी गाऊन हे होऊ शकत नाही. त्यासाठी सतत जागृती करणारी मूल्ये निर्माण व्हावी लागतात. शिवछत्रपतींचे जीवितकार्य हे याच ठोस प्रक्रियेचे प्रतीक आहे. राष्ट्रीयत्वाविषयी शिवछत्रपतींचे कुठलेही स्पष्ट भाष्य उपलब्ध नसले तरी त्यांनी आपल्या अल्प आयुष्यात जे उभे केले, तेच हिंदुस्तानचे राष्ट्रीयत्व मानावे लागेल. पराक्रम, स्वधर्माचा अभिमान, चातुर्य व गुणात्मक विस्ताराची आक्रमक प्रक्रिया ही शिवछत्रपतींच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये मानावी लागतील. हीच वैशिष्ट्ये गेल्या कित्येक पिढ्यांना एकत्वाची अनुभूती प्राप्त करण्यासाठी साहाय्यभूत ठरत आहेत.
समाजकारण असो वा राजकारण, शिवछत्रपतींचे स्मरण केल्याशिवाय मराठी मुलुखातच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही पुढे जाता येत नाही. आलमगीर बादशहाच्या समोर दरबारात आपल्या करारी बाण्याचे दर्शन घडविण्याचा प्रसंग असो, शाहिस्तेखानाची बोटे छाटून पसार होण्याचा प्रसंग असो, मिठाईच्या पेटार्यातून निघून जाणे असो आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे अफझलखानाचा वध असो. या सार्या प्रसंगात शिवछत्रपतींनी स्वत:चा जीव धोक्यात घालूनच स्वत:ला आणि स्वराज्याला पुढे नेले. या रसरसलेल्या कर्तृत्वाने केवळ कवी, शाहीर, इतिहासकारांनाच प्रेरणा दिली नाही, तर नेते, लढवय्ये, राजकारणी यांनाही सचेतन ठेवले. स्वातंत्र्यांच्या लढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्यांना ज्या ऐतिहासिक महापुरुषांच्या नावाने जागर करावा लागला ते शिवछत्रपतीच होते, हे विसरून चालणार नाही.
मूळ प्रश्न येतो तो म्हणजे जेमतेमदोन जिल्ह्यांपुरता राज्य प्रभाव असलेल्या शिवछत्रपतींना अखंड हिंदुस्तानचे राजकारण करण्याची प्रेरणा कशी काय देता आली? त्यांच्या हयातीत जे शक्य झाले नाही, ते राजकारण त्यांच्यापासून प्रेरणा घेत नंतरच्या काळात महाराष्ट्रानेच का व कसे साध्य केले? यासाठी त्यांनी रूजविलेली मूल्ये कोणती होती? अब्दालीचे आक्रमण झाल्यानंतर पुण्याहून उत्तरेकडे जायला निघण्याची वृत्ती सदाशिवराव भाऊंमध्ये कशी निर्माण झाली, याचे कारण शोधताना शिवछत्रपतींच्याही थोडे नव्हे, तर बरेचसे मागे जावे लागेल. सातवाहन ते यादव हा पहिला कालखंड आणि त्यानंतर आलेला मुस्लीमआक्रमकांचा बहामनी कालखंड. सातवाहन ते यादव हा कालखंड समृद्धीचा आणि गौरवशाली अस्तित्वाच्या मूल्यांची निर्मिती करणारा मानावा लागेल. यातले दोन प्रमुख आधार म्हणजे रामायण व महाभारतासारखे राष्ट्रीय ग्रंथ. भौगोलिक विस्ताराच्या सीमारेषांपलीकडे जाऊन सांस्कृतिक संस्काराचे एक मोठे कार्य या दोन ग्रंथांनी केले. यातून लोकसंस्कृती तर घडलीच, पण अखंड हिंदुस्तानचे एकजिनसी स्वरूपही पाहायला व अनुभवायला मिळाले. महाराष्ट्राला हे दोन्ही ग्रंथ चांगलेच अवगत होते. ‘शिवबा ते शिवछत्रपती’ या प्रवासात या दोन्ही ग्रंथांनी महत्त्वाची भूमिका निभावली, हे मानायला हरकत नसावी. जिजाबाईंचे शिवछत्रपतींच्या आयुष्यातले सर्वात मोठे योगदान म्हणजे या ग्रंथांच्या आधारावर त्यांनी लहानग्या शिवाजीवर केलेले संस्कार. विपरीत परिस्थितीची जाणीव त्यांनी शिवाजींना करून दिली. मराठी रियासत खंड १ पृष्ठ १३७ वर रियासतकार सरदेसाई लिहितात, ’’रामायण व महाभारत हे दोन राष्ट्रीय स्फूर्तीचे थोर ग्रंथ मुलांकडून ऐकविण्याचा प्रघात त्यावेळी विशेष होता. तद्नुसार त्या ग्रंथातील कथा शिवाजी मोठ्या आवडीने ऐकत असे आणि त्यासाठी चिंचवड, देहू, आळंदी इत्यादी ठिकाणी देवदर्शनास जाऊन कथा-पुराणे ऐकण्याचा नाद त्यास फार होता.’’ या सार्यातून जे मानसिक सामर्थ्य शिवछत्रपतींमध्ये निर्माण झाले, त्याचाच उपयोग त्यांना पुढील कार्यात झाला.
मराठी राज्यकर्त्यांना भारताच्या व्यापक राष्ट्रीयत्वाची पूर्ण कल्पना होतीच आणि ते भारताला अखंड राष्ट्रही मानत होते. यात सवतेसुभे व राज्ये होेतीच, नाही असे मुळीच नाही. पण त्यापलीकडे राष्ट्राचे सांस्कृतिक अस्तित्व आहे, अशीच सगळ्यांची भावना होती. हाच धागा शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वात सापडतो. यातून निर्माण झालेला विवेक महाराजांना दिशादर्शक ठरला. ‘देअर फायनेस्ट अवर’ या पुस्तकात चर्चिलचे उद्गार दिले आहेत. त्यात तो म्हणतो- ’’The only Guide to a man is his conscience; the only shield to his memory is the rectitude and sincerity of his actions. It is very imprudent to walk through life without this shield, because we are so often mocked by the failure of our hopes and the upsetting of our calculations; but with this shield however the fate may play, we march always in the rank of the honoured.' शिवछत्रपतींचे आयुष्य हे अशाच नाट्यमय घटनांनी भरलेले आहे. सरदार घराणी, त्यांचा आपापल्या जहागिरी वाचविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी चाललेला लाचार खटाटोप, या सार्या पार्श्र्वभूमीवर शिवछत्रपती वेगळे उठून दिसतात ते त्यांनी स्वीकारलेल्या मूल्यांमुळेच! दिवंगत डावे विचारवंत गोविंदराव पानसरे ’शिवाजी कोण होता?’ या आपल्या पुस्तकात सुरुवातीलाच शिवछत्रपतींना ‘सामंतशाही व्यवस्थेतून आलेले’ म्हणतात. छत्रपतींचे वडील जहागीरदार असले तरी शिवछत्रपतींचे विवेचन इतक्या तोकड्या विशेषणाने करता येत नाही. त्याचे कारण त्यांनी स्वीकारलेली मूल्ये. चर्चिल जसे म्हणतो तसा त्यांनी स्वीकारलेला विवेक आणि त्यातून त्यांना सापडलेले स्वराज्याचे ध्येय.
१६४७ नंतरचा मराठेशाहीचा उदय हा शिवछत्रपतींमुळेच झालेला. यासाठी पुन्हा थोडे मागे जावेच लागेल. सातवाहन ते यादव म्हणजेच इ. पू. २३५ ते इ.स. १३१८ हा जो काही समृद्ध काळ आहे, तो याच सांस्कृतिक एकात्मभावनेचे भरणपोषण करणारा आहे. सातवाहनाला ’मरहट्ट सम्राट’ संबोधल्याचे दाखलेही सापडतात. आपण अखिल भारतीय राजकारण करू शकतो, या आत्मविश्र्वासाचा धागा इथे का मानू नये? मात्र, त्यानंतर आलेला इ. सन १३१८ ते १६४७ हा काळ मुस्लीमआक्रमकांनी इथे लादलेल्या राज्यव्यवस्थेचा आहे. स्वधर्माच्या विरोधातील परकियांचे राज्य म्हणून शिवछत्रपतींनी हा उभा दावा आयुष्यभर मांडला. लहानसे राज्य असलेले शिवछत्रपती व स्वत:ला आलमदुनियेचा सम्राट म्हणविणारा आलमगीर बादशहा औरंगजेब हा संघर्ष डाव्या इतिहासकारांना सत्ता व भौगोलिक संघर्ष वाटतो. मात्र, ते तसे नाही. डेनिस किंकेड हा ब्रिटिश लेखक शिवछत्रपतींच्या संघर्षाला ‘द ग्रँड रिबेल’ म्हणतो. या ‘ग्रँड रिबेल’ची प्रेरणा हा इथला, या मातीतला राष्ट्रीयत्वाचा धागा आहे. हा उठाव परकीय आक्रमकांच्या विरोधातला आहे. जुलमी व आपली नसलेली राजसत्ता झुगारून देण्याचा आहे. त्याला स्वधर्माचे अधिष्ठान आहे. शिवछत्रपतींचे वेगळेपण म्हणजे जातीपातीच्या वर उठून स्वराज्य आणि स्वधर्म यासाठी त्यांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र आणले. आपल्यातला वन्ही इतरांमध्येही पसरवला. शिवछत्रपतींनी आपली कर्तव्यनिष्ठा आपल्या सहकार्यांनाही दिली. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी या आणि अशा कितीतरी साध्या माणसांनी पराक्रमाची शर्थ केली. शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी स्वत:चे रक्त शिंपले. ग्रीकांचा उदय ही जगाच्या राजकारणातली एक लक्षवेधी घटना. मात्र, ज्यावेळी त्यांचा उदय झाला त्यावेळी ग्रीक भूमीच्या आसपासच्या प्रदेशात अन्य जमातीचे लोक राहतच होते. मात्र, ग्रीक म्हणून आपण काही निराळे आहोत, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि पुढचा इतिहास घडला. या अस्मितेचे जागरण झाल्यानेच पुढचा कर्तृत्वशाली ग्रीक कालखंड सुरू झाला. शिवछत्रपतींनी निर्माण केलेली प्रेरणा ही अशीच आहे. ही प्रेरणा इतकी जबरदस्त होती की, प्रत्यक्ष शिवछत्रपतींनंतरही कितीतरी वर्षे मराठे औरंगजेबाशी संघर्ष करीतच होते. शिवछत्रपतींच्या निधनानंतरही तितक्याच निकराने मराठे औरंगजेबाशी लढले. शिवछत्रपतींच्या राज्याचा युवराज कोकणात पकडला गेला, परंतु यानंतरही मराठे लढतच होते. ‘मराठे आणि औरंगजेब’ या सेतुमाधवराव पगडींनी संपादित केलेल्या पुस्तकात (पृष्ठ ८) ते म्हणतात- ‘‘संभाजीराजांच्या वधामुळे मराठे काही काळ दिङ्मूढ झाले. त्यांचे बळ पूर्णपणे मोडले, असा जो औरंगजेबाचा समज होता तो चुकीचा ठरला. मोगल सैन्याची रसद तोडणे, वाटा बंद करणे, लहानसहान मोगल तुकड्यांवर हल्ले करणे इत्यादी गनिमी काव्याची युद्धे मराठे लढत होते. विजापूर, औरंगाबाद, बुर्हाणपूर हा राजमार्ग सुरक्षित राखण्यासाठी मोगलांना राव दलपत बुंदेला आणि इतर सरदार यांना त्या मार्गावरील प्रबळ सैन्यासहित फिरत ठेवावे लागले.’’ इ. सन १६८९ ते १६९१ मधील या धामधुमीचा तपशील आपल्याला राव दलपतचा चिटणीस भीमसेन सक्सेना याने लिहिलेल्या ’तारीखे दिल्कुशा’ या फारसी आत्मचरित्रात आढळतो. मोगलांनी या सुमारास पन्हाळगड, राजगड, साल्हेर, रामसेज इत्यादी किल्ले ताब्यात घेतले, पण मराठ्यांनी वर्ष-दोन वर्षांच्या आत पन्हाळगड, राजगड, सिंहगड हे किल्ले जिंकून घेतले. राजा नसताना त्याचे सैन्य लढल्याचे उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच नाही. महाराष्ट्रातील अठरापगड जातींनी एकत्र येऊन जो काही कडवट प्रतिकार केला, त्यामुळे औरंगजेबाची भीतीच उत्तर व दक्षिण हिंदुस्तानातून नाहीशी झाली. कर्नाटकातील बिदनूर येथे राजाराममहाराज आश्रयाला थांबले होते. मोगलांच्या मर्जीविरुद्ध तिथल्या लोकांनी त्यांना आश्रय दिला. अष्टपुत्रे नावाच्या मूळ कानडी कुटुंबाने मदत केली. नंतर हे घराणे राजारामांसोबतच वाईला येऊन स्थिर झाले. कलाशिक्षक म्हणून देशात पहिल्यांदा पीएचडी मिळविणारे वाईचे डॉ. सुरेश अष्टपुत्रे त्याच वंशातले.
पुढे पगडी लिहितात ते अधिकच रोमांचकारक आहे. मराठ्यांची सैन्ये संभाजीराजांच्या वधामुळे मोडली अगर उधळली गेली नव्हती. घोरपडे, जाधव इत्यादींच्या पंधरा-पंधरा, वीस-वीस हजार सैन्याचा खाफीखानाने उल्लेख केला आहे. तो म्हणतो, ‘‘या दोघा सरदारांमुळे बादशाही सेनापतींवर कमालीचे आणि भयंकर आघात झाले. मराठे सरदार रामराजाच्यातर्फे देशभर उच्छाद करीत फिरत होते. बादशाही फौजांच्या भोवती ते शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन घिरट्या घालीत होते. त्यांचे धाडस आणि उच्छादही वाढला आणि त्यांनी इतकी तडफ दाखविली की, त्याचा तपशील लिहिणे लेखणीला शक्य नाही.’’ शिवछत्रपतींची प्रेरणा ही अशीच महाराष्ट्राला झपाटत राहिली. २५ वर्षांच्या मराठा-मोगल संघर्षात ‘मोगलमुक्त भारता’ची सुरुवात महाराष्ट्राने करून टाकली होती. महाराष्ट्राचे धाडस पाहून देशातील अन्य भागातल्या लोकांनीही असेच धाडस करायला सुरुवात केली. धर्मवेड्या औरंगजेबाच्या डोळ्यादेखत त्याने उभे केलेले इस्लामी साम्राज्य मराठ्यांनी पुरते हादरवून टाकले. गणोजी शिर्के वगैरेे मोठ्या मराठा राजघराण्यातले लोक या काळात औरंगजेबाला मिळाले होते. परंतु, शिवछत्रपतींची प्रेरणा सर्वसामान्य मराठ्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. एका बाजूला खुद्द बादशाह, त्याची मुले, नातवंडे, लाडके नातेवाईक, तब्येतीने पोसलेले सरदार आणि दुसर्या बाजूला मराठ्यांकडे नेता असा कुणी नव्हताच. त्यामुळे स्वत:च्या कल्पकतेने, शौर्याने व आत्मविश्र्वासाने ही मंडळी लढत होती आणि मोगलांना आपल्या भूमीवरून आक्रसून जायला लावत होती. यामुळे मराठा सैन्याला अखिल भारतीय आवाका आलाच. पण, त्याचबरोबर स्वतंत्र असे नेतृत्वगुणही त्यांच्या ठायी निर्माण झाले. औरंगजेबाने मराठ्यांच्या या लढ्याचा इतका धसका घेतला की, तो शेवटी महाराष्ट्रातच मरण पावला. प्रसिद्ध बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाचे चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे. १२ हा आकडा औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत शुभ होता. त्याने आपल्या मृत्युपत्रात आपल्या शहजाद्यांना बाराच सूचना दिल्या. त्यातली बारावी सूचना म्हणजे, ‘‘माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजरकैदेतून पळाला आणि परिणामी माझ्या जीवनाच्या अखेरीपावेतो मला मराठ्यांशी जीवनमरणाचा कसा लढा द्यावा लागला, हे आपण जाणताच.’’ शिवछत्रपतींची प्रेरणा ही अशी होती. या प्रेरणेने मराठ्यांना शिवछत्रपतींच्या पश्चातही आपले स्वराज्य राखण्यासाठी उद्युक्त केले. हा सारा इतिहास हाच खरा भारताच्या विक्रमी वृत्तीचा इतिहास आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांपर्यंत ही प्रेरणा अखंड वाहत राहिली. मात्र, महाराष्ट्राचा हा जाज्वल्य इतिहास धर्मांध इस्लामी सत्तेच्या कट्टर विरोधातला असल्याने दडवला गेला. कुठल्या कुठल्या राज्यक्रांत्या केवळ मुसलमानांच्या मतपेढ्या दुखवायला नको म्हणून शिकवल्या गेल्या. राष्ट्र आकारास यायचे असेल आणि त्याची वाटचाल सातत्याने देदीप्यमान भविष्याकडे व्हायची असेल, तर शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या या अनोख्या आणि पराक्रमी राष्ट्रीयत्वाला पर्याय नाही.