पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद

    15-Aug-2017   
Total Views | 1
 

 
 
पंडितजींनी मांडलेले विचार हा पूर्णपणे भारतीय परिस्थितीचा वेध घेणारा भारताच्या मातीशी जोडलेला विचार होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय-आर्थिक विचारांचा धागा हा महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्याशीच जोडलेला राहिला नाही, तर त्याचे सूत्र महाभारतापर्यंत मागे गेले. आपल्या राष्ट्रवादाची मांडणी करण्यास पंडित उपाध्याय यांनी महाभारतातील ’विदुर नीती’चा विस्ताराने वापर केला. चाणक्य-चंद्रगुप्त आणि शंकराचार्य हे तर त्यांच्या चिंतनाचे विषय होतेच. त्यामुळे पाच साडेपाच हजार वर्षांच्या इतिहासातून विकसित झालेला राष्ट्रवाद त्यांनी मांडला. पंडितजींचा हा राष्ट्रवाद संघर्षावर, आक्रमणावर किंवा शस्त्रांवर आधारित नव्हता, तर त्यांचा राष्ट्रवाद हा सांस्कृतिक समन्वय, सहनशीलता आणि समरसतेवर आधारित होता.
 
भारताच्या संदर्भात राष्ट्रवादाची चर्चा गेली काही दशके खूप मोठ्या प्रमाणावर झाली. मुळात राष्ट्रवाद म्हणजे काय? भारतामध्ये या शब्दाची ओळख कधी झाली? भारत हे राष्ट्र आहे का? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरे देताना, ‘भारत हे एक राष्ट्र कधीच नव्हते, त्यामुळे भारताला ’राष्ट्रवाद’ ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन आहे व ब्रिटिशांनी ती आपल्याला दिली,’ अशी मांडणी या काळात सातत्याने केली गेली. भारत हा अनेक जाती-जमातींमध्ये विभागला गेलेला प्रदेश आहे. या जाती-जमातींची राज्ये वेगवेगळी आहेत. त्यामुळे तो ’एक देश, एक राष्ट्र’ या आधुनिक संकल्पनेत बसत नाही. ब्रिटिशांनी भारतावर कब्जा केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी एककेंद्री राज्यव्यवस्था प्रस्थापित केली, आधुनिक प्रशासन प्रणाली आणली व त्यानंतर भारत हा ’एक देश, एक राष्ट्र’ बनला, अशी ढोबळ मांडणी या काळात केली जाऊ लागली. या मांडणीची सुरुवात अर्थातच इंग्रज इतिहासकारांनी केली आणि नंतर मार्क्सवादी विचारांनी प्रभावित झालेल्या स्थानिक मंडळींनी तिचा विस्तार केला. गेली जवळजवळ १०० वर्षे हीच मांडणी एकतर्फी पद्धतीने आपल्यासमोर येत राहिली. ही मांडणी इंग्रजांच्या सोयीची व फायद्याची होती. त्यांच्या सत्तेला आव्हान देणारे स्वातंत्र्य आंदोलन उभे राहू नये, या एकमेव हेतूने त्यांनी हा बुद्धीभेद चालू केला होता, परंतु प्रथम लोकमान्य टिळक व नंतर महात्मा गांधी यांनी केलेल्या वैचारिक मांडणीमुळे इंग्रजांच्या या डावपेचांना यश मिळू शकले नाही. इंग्रजी राज्याच्या विरुद्ध या देशात उभे राहिलेले स्वातंत्र्य आंदोलन, अगदी १८५७चे स्वातंत्र्ययुद्धदेखील - हे विशुद्ध राष्ट्रवादी आंदोलनच होते. इंग्रज भारतात येण्याच्या आधीपासून भारत हा ’एक देश, एक राष्ट्र’ होताच. म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध संपूर्ण देशात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे राहिले व त्याला जाती- जमाती, भाषा यांचा अडथळा आला नाही. आपल्या कुटील डावपेचांच्या माध्यमातून केवळ मुस्लीमसमाजामध्ये वेगळेपणाच्या भावनेची बीजे पेरण्यात इंग्रजांना यश मिळाले. त्यातून द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत पुढे आला व १९४७ मध्ये स्वातंत्र्य देताना धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करण्यात इंग्रजांना यश आले. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारताच्या राष्ट्रवादाची चर्चा सुरू झाली.
 
इंग्रज व मार्क्सवादी बुद्धिवंत अनेक राष्ट्रांच्या समूहाचा सिद्धांत हिरीरीने मांडत होते. तरी त्याच काळात भारत हा एक राष्ट्र असलेला देश आहे, असा विचार लोकमान्य टिळकांपासून मांडला जात होता. हा देश म्हणजे अनेक राष्ट्रांचा समूह नसून अनेक राज्यांचा समूह आहे. पाश्चात्त्यांना माहीत असलेल्या एककेंद्री सत्ताव्यवस्थेने जोडलेली नसली तरी ही विविध राज्ये एका संस्कृतीने जोडलेली आहेत व ही संस्कृती काही हजार वर्षे अस्तित्वात असून या सर्व काळात ही संस्कृती एकाच भूभागाशी जोडलेली आहे, त्यामुळे एका सांस्कृतिक राष्ट्रवादाने जोडलेला हा देश एकसंघ राष्ट्र आहे, अशी ढोबळ मांडणी या विचारांची करता येईल.
 
खरे तर एक अखंड भूप्रदेश व त्या भूप्रदेशात विकसित झालेली संस्कृती याच्या आधारानेच ’राष्ट्र’ बनत असते. याच निकषाच्या आधाराने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ’हिंदूराष्ट्रा’ची व्याख्या केली व भारत हे हिंदूराष्ट्र असल्याची भूमिका घेतली.१९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील जवळपास अशी भूमिका घेतली. मात्र, सावरकरांचा राष्ट्रवाद हा प्रामुख्याने धर्मावर आधारित ’राजकीय राष्ट्रवाद’ होता, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वीकारलेला राष्ट्रवाद हा ’सांस्कृतिक राष्ट्रवाद’ होता. या ’सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या आधारावरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य उभे राहिले व या संघ विचारांच्या पायावर १९५१ नंतर भारतीय जनसंघ-भारतीय जनता पक्ष व अन्य अनेक संघटना उभ्या राहिल्या. स्वतंत्र भारताच्या राजकीय अवकाशात जनसंघ-भाजपने या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आधारावर आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली. जनसंघाची स्थापना व उभारणी यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी या राष्ट्रवादी भूमिकेची मांडणी विस्ताराने केली.
 
 पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाची उभारणी करताना प्रचारक, तत्त्वचिंतक, संघटक व राजकीय नेता या चारही भूमिका एकाच वेळी परिणामकारक रीतीने बजावल्या. कॉंग्रेस व साम्यवादी-समाजवादी विचारांपासून पूर्ण वेगळा विचार मांडणारा राजकीय पक्ष ही जनसंघाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी दीनदयाळजींनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. साम्यवाद-समाजवाद आणि त्याचा प्रतिवादी असलेली भांडवलशाही या सर्व विचारात भारताच्या बाहेरून आलेले विचार होते. कॉंग्रेससकट देशातले अन्य सर्व राजकीय पक्ष यापैकी कोणत्यातरी विचारांच्या आधारे उभे राहत होते. या देशाच्या परिस्थितीचा विचार करून मांडलेला, ज्याला खर्‍या अर्थाने ’स्वदेशी’ म्हणता येईल, असा विचारप्रवाह लोकमान्य टिळक व नंतर महात्मा गांधींचा होता. पण, कॉंग्रेसने त्या विचारप्रवाहाला सोडचिठ्ठी दिली व रशियन साम्यवादाच्या छायेतल्या समाजवादाची कास धरली. देशातले साम्यवादी पक्ष तर उघडपणे रशियावर चीनचे पाईक होते, तर ’स्वतंत्र पार्टी’सारखे काही पक्ष अमेरिकन धर्तीवर भांडवलशाहीचा पुरस्कार करत होते. पण, निखळ भारतीय मातीतून जन्मलेले व भारतीय परिस्थितीशी जोडलेले विचार कुणीच मांडत नव्हता. या पार्श्वभूमीवर जनसंघ व पंडित दीनदयाळ उपाध्याय उभे राहिले. पंडितजींनी मांडलेले विचार हा पूर्णपणे भारतीय परिस्थितीचा वेध घेणारा भारताच्या मातीशी जोडलेला विचार होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय-आर्थिक विचारांचा धागा हा महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्याशीच जोडलेला राहिला नाही, तर त्याचे सूत्र महाभारतापर्यंत मागे गेले. आपल्या राष्ट्रवादाची मांडणी करण्यास पंडित उपाध्याय यांनी महाभारतातील ’विदुर नीती’चा विस्ताराने वापर केला. चाणक्य-चंद्रगुप्त आणि शंकराचार्य हे तर त्यांच्या चिंतनाचे विषय होतेच. त्यामुळे पाच साडेपाच हजार वर्षांच्या इतिहासातून विकसित झालेला राष्ट्रवाद त्यांनी मांडला. पंडितजींचा हा राष्ट्रवाद संघर्षावर, आक्रमणावर किंवा शस्त्रांवर आधारित नव्हता, तर त्यांचा राष्ट्रवाद हा संास्कृतिक समन्वय, सहनशीलता आणि समरसतेवर आधारित होता. पंडितजी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून पुढे आले, त्या रा.स्व.संघाचा विचारसुद्धा याच धाटणीचा होता.
 

 
ब्रिटिशांनी व नंतर डाव्या मंडळींनी भारतातल्या वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळे राष्ट्र बनवण्याचा खटाटोप केला. आफ्रिकेतील टोळ्यांप्रमाणे भारतातील वेगवेगळे समूहदेखील अतिमागास व पृथक होते आणि त्यामुळे तो प्रत्येक छोटामोठा समूह हा स्वतंत्र राष्ट्र होते, अशी चमत्कारिक मांडणी या लोकांनी सातत्याने केली. खरेतर ही मांडणी पूर्णपणे अनैतिहासिक होती. रामायण काळापासून ’भारतवर्ष’ या नावाने ओळखला जाणारा हा देश एक अखंड राष्ट्र होता, याचे सर्व प्रकारचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वेळप्रसंगी त्या पुराव्यांची मोडतोड करून भारताची एकता नाकारण्याचा प्रयोग सातत्याने केला गेला. पंडितजींनी या सर्व प्रयत्नांमधला पोकळपणा दाखवून दिला आणि कितीही विविधता असली, वरकरणी विरोधाभास असला तरी या विशाल देशाची संस्कृती एकच आणि या संस्कृतीच्या माध्यमातून या देशातून राष्ट्रीयत्व तयार झाले आहे. तीच सांस्कृतिक एकता, भारतीय राष्ट्रवादाचा पाया आहे, हे त्यांनी दाखवून दिले. जनसंघाची उभारणी करताना पंडितजी हाच वैचारिक आधार स्वीकारतात व त्याला राजनैतिक रूप देण्याचा प्रयत्न करतात. जनसंघाच्या स्थापनेपासून त्यांनी जी विविध आंदोलने हाती घेऊन तडीस नेली, त्यातून देखील हा मुद्दा अधोरेखित केला गेला. १९५१ ते १९६८ या काळात जनसंघाने हाती घेतलेली बहुतेक सर्व मोठी आंदोलने ही भारताच्या राष्ट्रीय एकतेसंबंधित आंदोलने होती. जनसंघाची स्थापना झाल्यावर काश्मीर आंदोलन हाती घेतले गेले. ’एक देश मे दो विधान, दो निशान, दो कमान नही चलेंगे’ ही घोषणा देऊन काश्मीरच्या भारताबरोबरच्या एकीकरणासाठी आग्रह धरणारे आंदोलन जनसंघाने हाती घेतले. जनसंघ त्यावेळी बाल्यावस्थेत होता. त्याची ताकद नगण्य होती. तरीसुद्धा त्या आंदोलनाची दखल कॉंग्रेसला घ्यावी लागली. दुर्दैवाने त्या आंदोलनात जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बळी गेला. पण, काश्मीरचे भारताबरोबरचे एकीकरण मार्गी लागले. काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवू पाहणारे ३७० कलम बाकी राहिले तरी काश्मीरचा वेगळा ध्वज, वेगळी राज्यघटना वगैरे ’वेगळेपण’ नाहीसे झाले व काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे प्रस्थापित झाले. त्याच पद्धतीने, पंडितजींनी जनसंघाच्या माध्यमातून गोवा दादरा-नगर हवेली, दीव-दमण, पॉंडिचेरी या भारतीय प्रदेशाच्या मुक्ततेसाठी सर्व प्रकारची आंदोलने केली व त्या आंदोलनामुळे हे प्रदेश फ्रेंच किंवा पोर्तुगीज आक्रमकांच्या ताब्यातून मुक्त झाले व भारतीय संघराज्यात जोडले गेले. जनसंघाच्या आंदोलनामुळे यापैकी काही ठिकाणी पोलीस कारवाई करणे नेहरूंच्या सरकारला भाग पडले. १९६५ मधल्या देशविरोधी कच्छ कराराला हाणून पाडण्यासाठी जनसंघाने उग्र आंदोलन केले. जनसंघाने आसाममध्येसुद्धा हीच भूमिका घेतली. तत्कालीन पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) घुसखोरांचे लोंढे आसाममध्ये येत आहेत व त्यापासून देशाच्या पूर्वोेत्तर सीमेला धोका आहे, हे जनसंघाने १९६१ मध्येच दाखवून दिले. पूर्वोत्तर भारतामध्ये पाकिस्तानी घुसखोरीबरोबरच ख्रिश्चन मिशनर्‍यांनी चालवलेल्या कारवायांवरसुद्धा जनसंघाने आक्षेप घेतला होता. गेल्या ५० वर्षांत पूर्वोत्तर भारतात निर्माण झालेली परिस्थिती बघितल्यानंतर दीनदयाळजी व जनसंघ किती बरोबर होते, हे लक्षात येते.
 
देशाच्या राष्ट्रवादावर धोका निर्माण करणार्‍या वेगवेगळ्या मुद्‌‌द्यांबाबत पंडितजींनी सातत्याने मांडणी केली. यापैकी प्रमुख विषय होता जातीय दंगलींचा. जातीय दंगली का होतात? याचा बारकाईने अभ्यास करून त्या रोखण्यासाठी काय केले पाहिजे, त्याबद्दल उपाययोजनांची मांडणीसुद्धा पंडितजींनी केली होती. जातीय दंगलीपासून राजकारण वेगळे करावे, हा पंडितजींचा आग्रह होता. पण, जातीय-धार्मिक दंगली व त्याच्या आधाराने निर्माण केलेले भीतीचे वातावरण हाच ज्यांच्या राजकारणाचा पाया होता, त्या कॉंग्रेस व डाव्यांना पंडितजींची भूमिका न मानवणारी होती. कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी सातत्याने दोन हत्यारांचा वापर करून भारतीय समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न केला. धर्म-जात आणि भाषा ही ती दोन हत्यारे होत. डॉ. राममनोहर लोहियांनी या विघटनवादी कारवाईची पूर्ण चिरफाड केली व त्यामागील क्षुद्र राजकारणाचे वास्तव उलगडून दाखवले.(संदर्भ-दोन हत्यारे सत्ताधार्‍यांची: भाषा व जात, लेखक डॉ. राममनोहर लोहिया) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी याच पद्धतीची भूमिका सातत्याने मांडली व राष्ट्रीय एकात्मतेसाठी ’द्विभाष सूत्राचा’ आग्रह धरला.
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला राष्ट्रवाद जनतेच्या मनात देशाबद्दलचा आत्मविश्वास जागवणारा राष्ट्रवाद होता. संपूर्ण देश हा एक समूह, एक अस्तित्व (one entity) असून या एका समूहाची विचार करण्याची पद्धत एक आहे. या समूहाच्या आशा-आकांक्षा एक आहेत. हा समूह एकजीव, एकरस समूह आहे. हे पंडित उपाध्याय यांनी सातत्याने मांडले.
 
’विदुर नीती’मधले एक वचन त्यांच्या एकूण विचारांचा आधार होता,’’ एक्यमफलमं समाज्यस, तद्भावे सदुर्बल:| तस्मात एक्यमप्रशंसन्ती, दृढमराष्ट्रं हितैषीण:।।‘’ याचा अर्थात, एकता हेच समाजाचे बळ आहे. ऐक्य नसलेला समाज दुर्बल होतो म्हणून सामाजिक ऐक्य प्रस्थापित केले पाहिजे, ज्या योगे हितकारी असे दृढ राष्ट्र निर्माण होते. सामाजिक ऐक्य हाच दृढ राष्ट्रवादाचा आधार आहे, हे पंडितजींनी सातत्याने मांडले. त्यांनी मांडलेला आर्थिक विचार देखील याच सूत्राच्या आधारे मांडला होता आणि म्हणून समाजातील सर्वात शेवटची व्यक्ती, सर्वात दुबळा घटक हा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होता. ’विविधतेत एकता, परिवर्तनातील सातत्य’ (Integrity in diversity and continuation in changes) हे त्यांच्या राष्ट्रवादाचे महत्वाचे सूत्र होते. पंडितजींच्या जन्मशताब्धीच्या निमित्ताने त्यांनी मांडलेल्या राष्ट्रवाची अधिक विस्ताराने मांडणी झाली पाहिजे. 
 
- माधव भांडारी

माधव भंडारी

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121