अवंती : मेधाकाकू... आता घरात श्री गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू झाल्ये कारण या वर्षी आदित्यने सजावटीची जबाबदारी घेतल्ये आणि कागदाच्या लगद्यापासून सुरेख गणेश मूर्ती तयार सुद्धा झाली.. पण माझ्या मनात आज वेगळाच प्रश्न आहे आणि तू उत्तर नक्कीच देशील मला. खात्री आहे माझी... माझा प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत या लोकश्रुतीमधून, समाज आणि व्यक्तीच्या उत्तम गुणवत्ता मी समजून घेतल्या, तशाचप्रकारे वैगुण्याचे वर्णनसुद्धा केले गेले असेलच ना या लोकसाहित्यात, म्हणी आणि वाकप्रचारात...!!
मेधाकाकू : अरे वा, अवंती... आज इरादा एकदम पक्का दिसतोय स्वारीचा. अगदी वेळेवर प्रश्न विचारलायस आज कारण आपल्या आहार – अन्न या विषय संदर्भातल्या अभ्यासाचा आजचा शेवटचा दिवस. आणि आज आपण नेमक्या याच प्रकारच्या वैगुण्याचे वर्णन करणार्या लोकसाहित्याचा अभ्यास करूया...! मी इथे अवगुण किंवा दुर्गुण असा शब्दप्रयोग करत नाहीये हे लक्षात घे कारण या वर्णनात मानसिक अथवा वागणुकीतील वैगुण्याचा संदर्भ जास्त आहे आणि अशा वैगुण्यावर सुधारणेसाठी आवश्यक आणि योग्य उपचारही करता येतात. इथे एक गोष्ट लक्षात येते की पारंपारिक सार्वजनिक कार्यक्रमात दिसणार्या अशा प्रवृत्ती नेमकेपणे ओळखून त्यांना आपल्या पूर्वजांनी अशा म्हणींच्या माध्यमातून छान दृष्टान्त दिले.
बाबू जेवले पत्तर पालथे
अवंती : या म्हणीत उल्लेख केलेली ही एक नित्य नेमाने अनुभवता येणारी प्रवृत्ती. हे आहे स्वकेंद्री अथवा स्वार्थी व्यक्तीचे वर्णन. यातील ‘पत्तर’ म्हणजे पत्रावळी. सामन्यात: पंगतीत जेवण वाढायला अशा पत्रावळींचा वापर पूर्वापार होत आला आहे. इथे जेवणे, ही वैयक्तिक गरज आही आणि पत्रावळीचा उल्लेख आलाय कारण हा माणूस पंगतीत जेवायला बसला आहे. यातला ‘बाबू’ हा स्वार्थी – स्वकेंद्री माणूस, जो पंगतीच्या व्यवस्थेचा मान राखत नाही आणि मग आपले जेवण झाले की पत्रावळ पालथी घालून ठेवायची अशी याची रीत आहे. कारण फक्त ‘माझे झाले की झाले’ अशी याची प्रवृत्ती...!! समाज जीवनाचे फायदे यांना हवे असतात, मात्र जबाबदार्यांची जाणीवही नसते अशा महाभागांना. फक्त चार मोजक्या शब्दात या प्रवृत्तीवर केलेली ही टिप्पणी म्हणजे स्वभावोक्ती या अर्थालंकाराचा नमूना...!! शब्दांच्या, अर्थाच्या किंवा शब्द आणि अर्थ या दोहोंच्या कोणत्या ना कोणत्या चमत्कृतीखेरीज अलंकार अस्तित्वात येऊ शकत नाहीत, हे दिसून येईल. तथापि शब्दांची वा अर्थाची कोणतीही विशेष चमत्कृती नसताना अलंकारत्व पावणारा ‘स्वभावोक्ती’ हा अलंकार आहे. आपल्या मावळत्या उपराष्ट्रपतीनी केलेले निरोपाचे भाषण आणि ह्या म्हणीत काही साम्य दिसेल तुला कदाचित... पण ठीक आहे तरीही आपला भारत देश चालूच रहातो, थांबत नाही कधीच...!!
अवंती : अरेच्या. मेधाकाकू... अगं तुला खरेच सांगते... मी पंगतीत बसून जेवण्याचा अनुभव फक्त एकदाच घेतलाय. आणि आज तू फारच गमतीदार वर्णन करत्येस या पंगतीचे...!!
मेधाकाकू : हो तर... आता अशीच एक जेवणाच्या पंगतीत अनुभवता येणारी दुसरी प्रवृत्ती.
मोलाचा भात आखडता हात, फुकाची कढी धाऊन धाऊन वाढी
मात्र हा आहे केटरर+ आचारी+ वाढपी अशा अनेक भूमिकामधे एकाचवेळी असलेला लग्नसराईत जेवण बनवणारा कंत्राटदार, पक्का व्यवहारी आणि कंजूस माणूस. याचे जेवण वाढायचे तंत्र असे की भात आणि पक्वान्न वाढताना. हा पटपट पुढे जात राहतो आणि महागडे आणि लोकांना आवडणारे पदार्थ आणि पक्वान्ने कमीत कमी वाढतो. या उलट कढीसारखा तोंडी लावण्याचा पदार्थ सगळ्यांना वाढत सुटतो. वाढप करताना केलेली अशी बचत, हाच त्याचा जास्तीच्या कमाईचा मार्ग असतो. अशी कंजूस, ‘मापात पाप’ करणारी माणसे आपल्याला पदोपदी भेटत असतात. बाह्यतः निंदा आणि आतून स्तुती अथवा ह्याच्या उलट असे आर्थवाही वर्णन करणारा हा व्याजस्तुति अलंकार...!
अवंती : एकदम सही... मेधाकाकू... मस्त – मस्त. आता याचा अनुभव लवकरच आपल्याला गणेशोत्सवातील मंडपात आरती झाल्यावर प्रसाद वाटणार्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मिळेलच...!!
मेधाकाकू : आता या अन्न-आहार आख्यानातील अंतिम टप्प्यावर एक छानसा चिमटा काढणारा वाकप्रचार बघ... काय सांगतोय ते...!!
शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी पुरत नाही
अवंती : या वाकप्रचारातला मुद्दा आणि दिलेला सल्ला, समजायला फारच सहज सोपा. म्हणून हा अर्थान्तरन्यास अलंकार. पहिल्या विधानाच्या समर्थनार्थ लगेच दुसरे उदाहरण. वाचन+ मनन+ चिंतन अशी मेहनत आणि अभ्यास न करता वरवर वाचलेले काही पाठ करून कोणालाही परीक्षेत यश मिळत नाही. ते अगदी घरून निघताना बांधून दिलेल्या शिदोरी सारखेच जणू. प्रवासात फार तर दोन दिवस पुरवठ्याला येणारी ही शिदोरी. आपल्या हुशार पूर्वजांनी रोजच्या वापरतल्या या वस्तूंच्या उदाहरणातून किती छान सल्ले दिले आहेत… अभ्यासाला पर्याय नाही, पोपटपंचीने यश मिळत नाही. तेंव्हा, मुलांनो अभ्यासाचे महत्व ओळखा...!!
अवंती : मेधाकाकू आहार आख्यान फार रूचीपूर्ण... चवदार झालाय. आता वाट पहात्ये पुढच्या विषयाची...!!
- अरुण फडके