सजू लागले बाप्पा!

Total Views | 10

 
 
सर्वच भाविक ज्या उत्सवाची अत्यंत आतुरतेने वाट पाहतात, असा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपला लाडका बाप्पाही आता तयार होऊन आपल्या घरी येण्यास सज्ज झाला आहे. असा आपला हा गजानन, विघ्नहर्ता २५ ऑगस्टला येतोय खरा, पण आता त्याच्या आगमनाची अंतिम तयारी सुरु आहे.
 
गणपतीच्या मूर्त्या आता अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रेखीव रंगरंगोटी सुरु असून मूर्तिकार तन-मन-धनाने बाप्पावर आपल्या कलेचा हात फिरवत आहेत. शेवटी, ६४ कलांचा अधिपतीही हाच गणेश आणि या श्रीगणेशाच्या मूर्त्या घडविणारेही त्याच्याच भक्तांचे हात...
 
एकीकडे मूर्तिकारांच्या कलेतून मूर्त्यांना आकर्षक रूप दिलं जातंय, तर दुसरीकडे मंडळांना आणि घराघरातही बाप्पाच्या आगमनाचे भक्तांना वेध लागले आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे दिवसेंदिवस मूर्त्यांची किंमतही वाढली असली तरी एक गोष्ट मात्र अद्याप कमी झालेली नाही आणि ती म्हणजे गणरायाचे स्वागत करण्यासाठी ओसंडून वाहणारा उत्साह... 
 
गणपतीचं कोणतंही रूप अगदी मन मोहवून टाकतं. मग तो बालगणेश असो किंवा साधी गोंडस गणेशाची मूर्ती... मायानगरी मुंबईत जसा बाप्पाच्या आगमनाचा दिवस जवळ येऊ लागला, तसा मूर्तिकारांच्या हातांनीही जोर धरायला सुरुवात केली आहे. आपली पूर्ण मेहनत झोकून दिवसरात्र एक करून मूर्तिकारांनी बाप्पाची वेगवेगळी रूपं साकारायला सुरुवात केली आहे, तसेच दुसरीकडे बाप्पाच्या भक्तांची त्याच्या आगमनाच्या जय्यत तयारीसाठी मंडप, देखाव्यांची लगबगही विशेष लक्ष वेधून घेते. 
 

 
प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार मूर्त्यांची ऑर्डर देण्यात आणि आपल्या नातलगांना, मित्रपरिवाराला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आतूर आहे. लहान मुले असो, मोठी माणसे असो किंवा ज्येष्ठ व्यक्ती असो, सर्वांवर बाप्पाच्या आगमनाचा रंग आता चढू लागला आहे, तर दुसरीकडे मूर्त्यांनाही सजविण्याचे, त्यांना अंतिम रूप देण्याचे काम आता जोर धरू लागले आहे. अनेक मूर्त्या आता बनून तयारही झाल्या आहेत. आता या मूर्त्या आपल्या भक्तांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी मूर्तिकारांच्या हाती आहे.
 
 
अन्य शहरांमधूनही मागणी
मुंबईमध्ये साकारल्या जाणार्‍या मूर्त्यांना केवळ मुंबईतच नव्हे, तर अन्य शहरांतूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मुंबईप्रमाणेच मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, पुणे इतकंच काय तर गोवा, गुजरात या राज्यांमधूनही मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे मूर्तिकार अनंत पांचाळ यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले. दूरवरून येणार्‍या मूर्त्यांमध्ये प्रामुख्याने घरगुती आणि मोठ्या गणपतींची संख्याही यावर्षी तुलनेने वाढली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. 
 
 
महागाईचा फटका
वाढत्या महागाईच्या जाचातून बाप्पांचीही सुटका नाही. यावर्षी कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मूर्त्यांच्या किमतीत तब्बल २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. ’’देवाच्या मूर्त्यांची किंमत करणे आम्हाला आवडत नाही, मात्र मालाची किंमत वाढली, तर नाईलाज म्हणून आम्हाला मूर्त्यांची किंमत वाढवावीच लागते आणि त्याचा फटका भक्तांनाही बसतो. मात्र, असे असूनही वाढती मागणी पाहता भक्तांचा वाढलेला उत्साह आम्हालाही बाप्पाचं नवं रूप साकारायला बळ देतो,’’ असे अनंत पांचाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 

 
खर्च वाढला मात्र नफा कमी...
महागाईमुळे मूर्त्या तयार करण्याचा खर्च वाढला आहे आणि त्या तुलनेने आता त्यातला नफादेखील कमी झाला आहे. त्यामुळे आज अनेक मूर्तिकार केवळ बाप्पाच्या प्रेमापोटी ’ना नफा ना तोटा’ यावर काम करत आहेत. गेल्या वर्षी पीओपीच्या पोत्यांची जी किंमत होती, त्याच्या तुलनेत या वर्षी ती २० ते ३० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती परब यांनी दिली. शाडूच्या मातीचीही किंमत गतवर्षीच्या तुलनेने महागली आहे. मात्र, मातीची जेवढी किंमत वाढली, तेवढी मूर्तीची किंमत वाढविणे शक्य नाही. त्यातच कारखान्यांमध्ये काम करणार्‍या मूर्तिकारांचे पगार देणेही आवश्यक असते, अशात मूर्त्यांची किंमत न वाढवता, उलट आपला नफा कमी करून ’ना नफा ना तोटा’ या तत्वावर गणेश मूर्तिकार नि:स्पृह वृत्तीने काम करत असल्याची भावनिक प्रतिक्रिया अनंत पांचाळ यांनी नोंदवली. 
 
 
इकोफ्रेंडली गणपतींची मागणीही वाढली...
सणाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे याची जाण ठेवत गेल्या काही वर्षांपासून अनेकांनी आपले पाय ’इकोफ्रेंडली गणेश मूर्त्यांकडे वळवले आहेत. शाडूच्या मातीपासून साकारल्या जाणार्‍या मूर्त्यांपासून पर्यावरणाची हानी होत नाही आणि विसर्जनही योग्यरित्या होत असते. त्यामुळे यावर्षीही गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शाडूच्या मूर्त्यांची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे तुलनेने शाडूच्या मूर्त्यांची किंमत जास्त असल्याने आपल्याला हव्या असूनही त्या घेता येत नसल्याची खंतही अनेक भक्तांनी व्यक्त केली. पीओपीच्या मूर्त्यांचे पाण्यात विघटन होत नाही. त्या तुलनेने शाडूच्या मातीच्या मूर्त्यांचे पाण्यात योग्य प्रकारे विसर्जन होते. मात्र, नाईलाजाने आजही अनेक जण कोणत्या ना कोणत्या कारणाने पीओपीच्याच मूर्त्यांना प्राधान्य देताना दिसतात. 
 
 
तेव्हा, यावर्षीचा गणेशोत्सवही पर्यावरणपूरक साजरा करण्याचा संकल्प करुया. केवळ शाडूच्या मूर्ती घेऊन न थांबता ध्वनिप्रदूषण होणार नाही, निर्माल्य विसर्जन समुद्रात करणार नाही याचीही काळजी घेऊया आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करुया...
 
- जयदीप दाभोळकर
 
 

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121