
ऑगस्ट महिना उजाडला, मात्र मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या निकालाची अजूनही चातकासारखी वाट पाहत आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी ऑनलाईन पेपर तपासणीचा घाट घातला खरा, पण उलट विद्यार्थ्यांचा निकालरूपी सर्व्हरच हँग झाला. मुंबई विद्यापीठात म्हणा परीक्षा, पेपर, नियुक्ती संबंधी घोळ काही नवे नाहीत. यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या आडनावांना ट्रान्सलेट करून ’पतंगेचं’ भाषांतर ’काईट’ करून ते उडवण्याचा कारनामा याच विद्यापीठाने केला होता. या सर्व बाबी हास्यास्पद असल्या तरी त्या कैकपटीने चिंताजनक आहेत. विद्यापीठ हे विद्येचे माहेरघर, पण आज याच विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा मांडलाय. निकाल वेळेवर न लागल्याने विद्यार्थी, पालकांची ओरड सुरू झाली आणि राज्यपालांनीही त्यानंतर कुलगुरूंची कानउघडणी केली. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत ३१ जुलैपर्यंत निकाल लागतील, याची ग्वाही दिली. मात्र, एकंदरीत परिस्थिती पाहता, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत निकाल दोन दिवस उशिरा लागला तरी बेहत्तर म्हणत त्यांनाही माघार घ्यावी लागली. उत्तरपत्रिका स्कॅन करण्यापासून त्या संगणकावरच तपासणे, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकादेखील संगणकावरच तयार करण्यासाठीची यंत्रणा यापूर्वीच तयार ठेवणे आवश्यक होते. मात्र, प्राध्यापकांना त्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. पण तरीही ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल लावू, अशी शेकी मिरवत कुलगुरूंनी निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
अगदी कमी कालावधीत लाखो उत्तरपत्रिका तपासून त्याच्या गुणपत्रिका तयार करण्याचे अशक्य असे कामप्राध्यापकांवर सोपविण्यात आले होते. ३१ जुलैची डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरलेल्या विद्यापीठाने ५ ऑगस्टची नवी डेडलाईन जारी केली. त्यापूर्वी विद्यापीठाने १५३ विभागांचे निकाल जाहीर केले खरे, पण अजूनही ३२४ परीक्षांचे निकाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. विद्यापीठाच्या गलथान कारभाराला कंटाळून विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख नीरज हातेकरांनीदेखील स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे फेसबुकवरुन जाहीर केले. एप्रिल महिन्यात संपलेल्या परीक्षांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने लावण्याचा निर्णय मे महिन्यात घेण्यात आला खरा, पण विद्यापीठाचा हा पहिला प्रयोग नियोजनशून्य कारभारामुळे मात्र चांगलाच आपटला. तेव्हा, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हेच परीक्षेत खरं तर नापास झाले आहेत.
राजकीय हस्तक्षेप नको
विद्यापीठाच्या निकालाच्या सावळ्या गोंधळाची जबाबदारी कुलगुरू म्हणून डॉ. देशमुख यांच्यावर येत असली तरीही परीक्षा विभाग आणि अन्य घटकांचीही जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर राजकीय क्षेत्रातील लोकांची नियुक्ती केली, तर राजकारणाचे राजीनामा नाट्य त्यातही होणे आणि पालक, विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करण्यासारखे प्रकार घडतच राहणार. कालानुरूप विद्यापीठांचे कायदे बदलण्यात आले, अधिकार मंडळांच्या रचनादेखील बदलल्या, पण अजूनही त्यातील राजकीय हस्तक्षेप कमी झालेला नाही.
विद्यापीठामधील पीएच.डी.साठी करण्यात येणारे संशोधन हे किती निकृष्ट दर्जाचे असू शकते, याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमधून प्रकाशझोतात आली आहेत. केंद्र सरकारनेे जाहीर केलेल्या क्रमवारीतूनही याची प्रचिती येते. देशात उच्च शिक्षणाच्या प्रमुख शंभर संस्थांमध्येही राज्यातील अगदी मोजक्याच संस्था यादीमध्ये स्थान पटकावू शकल्या. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांच्या कामगिरीवर आपसूकच प्रश्न निर्माण होते. गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन पेपर तपासणीपूर्वी त्या यंत्रणेची तयारी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुंबई विद्यापीठाने तडकाफडकी निर्णय घेत आपली प्रतिमा मलिन करत आपल्या पायावरच धोंडा घालून घेतला. अंतिमवर्षाच्या निकालांवर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते याची विद्यापीठाला तसूभरही जाण नसणे ही कीव आणणारी बाब आहे आणि हीच परिस्थिती कायमराहणार असेल, तर अशा व्यक्तीलाही संबंधित पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही.
अंतिम वर्षाच्या निकालानंतर हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी देशातील अन्य ठिकाणी किंवा परदेशातही जात असतात. विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे आज त्यांच्याही पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. एखाद वेळेस पैसा भरून काढता येईल, परंतु विद्यार्थ्यांचा वाया जाणारा वेळ विद्यापीठ कसा भरून काढणार? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. मुंबई विद्यापीठ देशातील सर्वांत जुन्या विद्यापीठांमध्ये गणले जाते. मात्र, या कारभारामुळे त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे आणि ती धुळीस मिळवणार्यांनीही आपली नैतिक जबाबदारी कबूल करुन स्वत: त्या जबाबदारीतून मुक्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान आगामी काळात तरी कुलगुरुंच्या नियुक्तीच्या निकषांचे सक्तीने पालन करुन अशा भोंगळ कारभाराची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.
- जयदीप दाभोळकर