प्रेम म्हटले की एक सुंदर असे गुलाबी चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहते. त्यामध्ये एक सुंदर जोडपं असतं, कदाचित निसर्ग असतो, गुलाबी फुले आणि बरेच काही.. ही झाली प्रेमाची एक टिपीकल संकल्पना. मात्र खरंच प्रेम म्हणजे केवळ सुंदर दिसणं आणि सुंदर असणंच असतं का?... उत्तर आहे... नाही !!.. प्रेम बघून करता येत नाही ते केवळ अनुभवता येते.. हे दाखवण्यात आले आहे या लघुपटात.. "प्रेम म्हणजे अनुभूतीचे एक काव्य आहे..." (Love is the poetry of senses" असा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.
एक मुलगा.. रोज बसस्टॉप वर एका मुलीला बघत असतो. आधी केवळ त्याची नजर तिच्यावर जाते, मग हळू हळू बोलण्याचा प्रयत्न, मग हातात हात घेणं.. तिलाही त्याच्याबद्दल सारख्याच भावना असतात. मात्र तरी ती एक पाऊल मागे घेते.. का घेते? हे जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा.. सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेल्या वेगळ्या प्रेमाचे चित्रीकरण या लघुपटात आहे. कमी संवाद मात्र अतिशय बोलका लघुपट..
नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या लघुपटाची खासियत म्हणजे यामधील गाणे "नैना मिले.." कथानकाला समर्पक आणि सुंदर भावना प्रकट करणारे हे गाणे चाहत्यांना नक्कीच वेड लावणार. शॉर्ट फिल्म स्टूडियोतर्फे प्रदर्शित आणि रोहित शुक्रे दिग्दर्शित या लघुपटातील कलाकार नवीन आहेत, मात्र त्यांचा अभिनय नैसर्गिक आहे. लघुपटातील गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे श्रीधर नागराज यांनी तर गीतलेखन केले आहे अखिल राज चौधरी यांनी. हे गाणं आणि हा लघुपट एकदा तरी आवर्जून बघावा,..
- निहारिका पोळ