दिवसेंदिवस आपल्यासमोर पर्याववरणाविषयी समस्या उभ्या राहतायेत. एक समस्या पूर्णपणे संपतही नाही की लगेच नवीन उद्भवते. यामध्ये जल प्रदूषण, वायू प्रदूषण, समुद्री जीवांचे हाल अशा अनेक समस्या आहेत. मात्र या सर्व समस्यांमागचे सगळ्यात मोठे कारण आहे 'पॉलिथीन'चा वापर. आणि हीच बाब लक्षात घेवून छत्तीसगढच्या रायपूर येथील शुभांगी आपटे यांनी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. पॉलिथीनच्या वापराला नकार देत त्यांनी रायपुर येथे कापडी पिशव्या वाटप सुरु केले आहे. तसेच त्यांनी सर्व नागरिकांना प्लास्टिक पिशवीच्या जागी कापडी पिशव्या वापरण्यचे आवाहन केले आहे.
महा एमटीबीनी त्यांच्या सोबत संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, " गेल्या तीन वर्षांपासून मी हे कार्य करत आहे. तीन वर्षांआधी टी.व्ही. वरील बातम्या बघताना एक बातमी आली, एका गाईचा ७ किलो प्लास्टिक खाल्याने मृत्यु. मनाला हळहळ झाली. मग लक्षात आले आपण अशक्य प्रमाणात प्लास्टिकचा वापर करत आहोत." "यामुळे नाले चोक होत आहेत, प्रदूषणात वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात तर करता येणार नाही मात्र आपल्या परीने जे शक्य होईल ते सर्व मी करण्याचा प्रयत्न करेन. असा निश्चय मी केला आणि या कार्याला सुरुवात झाली." अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.
आज शुभांगी आपटे यांनी २८ हजारांहून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे.
रायपुर येथून सुरु झालेला हा प्रवास आता इतर ठिकाणी देखील पोहचावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. या कार्याची सुरुवात कुठून झाली हा प्रश्न विचारता त्या म्हणाल्या की, " या कार्याची सुरुवात मी शाळेतून केली. मी ठरवले की, विविध शाळांमध्ये जावून या कापडी पिशव्यांचा वाटप करता येईल. कारण मुले कुठली पण गोष्ट लवकर स्वीकारतात. त्यांना आपण जे संस्कार देऊ ते ती ग्रहण करतील. आणि म्हणूनच या मोठ्या कार्याची सुरुवात शाळांमधून झाली."
विविध कार्यक्रमांमधून पिशव्या वाटप :
आता हे कार्य खूप मोठे झाले आहे. मी आजही विविध शाळांमधून, छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून पिशव्या वाटते. महिलांच्या संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमात सर्व महिलांना वाण देण्यासाठी मी या पिशव्या दिल्या. शाळांमधून मुलांना या पिशव्या देण्यात येतात. रायपुर येथील एक संस्था गेल्या दिवाळीत प्लास्टिकच्या पिशव्यांमधून २१०० दिवे वाटणार होती, मी त्यांना माझ्या कामाबद्दल सांगितले तर त्यांनी प्रतिसाद देत कापडी पिशव्यांमधून दिवे वाटप केले. असंही त्यांनी सांगितले.
यामुळे ४ महिलांना रोजगार :
"सुरुवातीला मी अनेक शिंपी आणि टेलर्सडे गेले. काहींनी चांगला प्रतिसाद दिला तर काहींनी नाकारले. मात्र एका महिलेने यामध्ये मला साथ देण्यास होकार दिला. आणि आम्ही दोघींनी मिळून हे शिवण कार्य सुरु केले. हळू हळू शिंप्यांकडे उरलेले कापड मिळू लागले. पडद्यांच्या दुकानांमधून "सँपल" असलेल्या पडद्यांचे चांगले कापड मिळू लागले. त्यामुळे विनामूल्य कापड मिळण्याची सोय झाली. आणि त्या खर्चात मी चार महिलांना शिवण काम करण्यास सांगितले. यामुळे या चारही महिलांना रोजगार मिळाला आणि मला समाधान." अशा भावना शुभांगी आपटे यांनी व्यक्त केल्या.
पिशवी कधीही रिकामी नसते :
शुभांगी आपटे ज्या पिशव्या वाटतात, त्या पूर्णपणे नि:शुल्क असतात. या पिशव्यांसाठी त्या कोणतेही शुल्क आकारत नाहीत. मात्र एक त्या कटाक्षाने पाळतात, ते म्हणजे पिशवी वाटप करत असताना त्यांची पिशवी कधीच रिकामी नसते. लहान मुलांना पिशव्या देताना त्यामध्ये बिस्किटाचा पुडा, महिलांना पिशव्या देताना त्यामध्ये एखादं टिकलीचं पाकीट हमखास असतं.
बहिणीचे अनुकरण करत आता मध्यप्रदेशातही पिशवी वाटप :
शुभांगी आपटे यांची लहान बहीण नीरजा बोधनकर यांनी देखील आपल्या मोठ्या बहिणीचे अनुकरण करत आता पिशवी वाटप करण्याचे कार्य सुरु केले आहे. सुरुवातीला त्यांनी १०० पिशव्या तयार करुन घेतल्या आहेत. आता त्या जबलपूर येथे या पिशव्यांचे वाटप करणार आहेत.
एकूणच हा सर्व उपक्रम पाहता, पर्यावरणासाठी छोट्या प्रमाणातही काही केले तरी त्याने मोठा बदल घडू शकतो हे लक्षात येते. शुभांगी आपटे यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हे कार्य भारताच्या अनेक नागरिकांना पर्यावरणासाठी काहीतरी चांगले करण्याचे प्रोत्साहन नक्कीच देईल.