व्यवस्थापनशास्त्राचे समृद्ध प्रवाह

    06-Jul-2017   
Total Views | 9
 

 
 
’गाजर दाखविणे’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. गाढवाच्या पाठीवर एक गाजर बांधलेली काठी घेऊन बसायचे. गाजर मिळेल, या अपेक्षेने ते गाढव चालत राहाते आणि पाठीवर बसलेल्याचा कार्यभाग उरकतो. मास्लोने या विचार करण्याच्या पद्धतीलाच फाटा दिला. त्याने एक वेगळाच आयाम मांडला. ’मास्लोचा पिरॅमिड’ म्हणून तो ओळखला जातो.
 
’चाकाचा शोध’ हा मानवी उत्क्रांतीमधील महत्त्वाचा टप्पा. मात्र, तो तिथेच थांबला नाही. चाकांची जागा जनित्रांनी घेतली आणि गतीचा प्रवास निरनिराळ्या प्रकारच्या यंत्रातून अधिकच गतिमान झाला. कृषी संस्कृतीतून यंत्र संस्कृतीकडे आणि यंत्र संस्कृतीतून व्यवस्थापकीय कामकाजाच्या स्वरूपात येऊन आज मानवी समाज स्थिरावला आहे. पुढचा सगळा प्रवास माहितीच्या देवाणघेवाणीचा व तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराचा असेल, हे सांगण्यासाठी द्रष्टा असण्याची गरज नाही. आपल्यावर येऊन थडकणार्‍या नव्या नव्या माहितीच्या प्रवाहावर आपण आरूढ होतो की वाहत जातो, हे ज्याला त्यालाच ठरवावे लागेल. यातला व्यवस्थापनशास्त्राचा वाटा मात्र कुणालाही नाकारता येणार नाही. २५० वर्षांपूर्वी प्रचलनात आलेल्या चिनी अबॅकसच्या मणीपाटीपासून ते आज जवळजवळ सगळ्याच कार्यालयात वापरल्या जाणार्‍या मायक्रोसॉफ्टच्या एक्सेल प्रणालीपर्यंत व्यवस्थापनाची अनेक संसाधने या प्रवासात विकसित झाली. संसाधने विकसित होत असली तरी त्यामागच्या मानवी आकांक्षा आणि दिशा देणार्‍या प्रयत्नांची जागा मात्र कुणालाही अद्याप पटकावता आलेली नाही. सातत्याने विकसित होणारे तंत्रज्ञान मानवी रोजगारासाठी घातक आहे, अशी भीती अनेकदा सामाजिक संशोधकांकडून व विचारवंतांकडून व्यक्त केली जात असते. मुंबईतल्या कापड गिरण्यांमध्ये एकेकाळी हजारो कामगार काम करीत होते. आज या परिसरातल्या गिरण्यांची जागा निरनिराळ्या कार्यालयांनी घेतली आणि त्याजागी लाखो लोक रोजगार मिळवून काम करायला लागले. यातून रोजगार हरविण्याच्या भीती किंवा शंकेचे निरसन नक्कीच करता येत नाही. पण, मनुष्यबळ आणि त्याचे व्यवस्थापन यांनी आपली कूस बदलत्या काळानुसार कशी बदलली, त्याचे जिवंत उदाहरण इथे पाहायला मिळते. वाढत्या औद्योगिकरणाची गरज म्हणून व्यवस्थापनशास्त्राचा उदय झाला. त्याआधी आपापल्या स्तरावर व्यवस्थापनाचे कौशल्य जोपासले जात होतेच, पण त्याचे प्रमाणीकरण करण्याचे काम सर्वप्रथम फ्रेड्रिक टेलर याने केले. ‘द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट’ हे फ्रेड्रिक टेलरचे सर्वात पहिले पुस्तक. १९११ साली लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात टेलरने औद्योगिक संस्कृतीत क्षमता वृद्धिंगत करण्याची साधने विशद केली. २००१ साली विसाव्या शतकातले व्यवस्थापन शास्त्रातले सर्वात प्रभावी पुस्तक म्हणून हे पुस्तक नावाजले गेले. गंमत म्हणजे, फ्रेड्रिक टेलर हा शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर होता. कारखान्यांच्या उभारणीतली यंत्रे व मनुष्यबळाचा अत्यंत प्रभावी उपयोग कसा करून घेता येईल, याचा विचार तो सातत्याने करीत होता. पुलंचे ’असा मी असामी’ हे गाजलेले पुस्तक. त्याचे नाटकही झाले. पुलंच्या धोंडोपंताचे ’हापिसात’ काम करणे आणि नंतर उच्च मध्यमवर्गीय होत जाणे हा याच अव्याहतपणे चालत आलेल्या एका प्रक्रियेचा भाग मानावा लागेल. 
 
व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन मानवी संघटनांचे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने औपचारिक जाळे उभे करण्याचे श्रेय आधुनिक व्यवस्थापन शास्त्रालाच द्यावे लागेल. व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून विचार करणार्‍या या रचनेचे फार सुंदर वर्णन ज्येष्ठ विचारवंत मे. पु. रेगे करतात. ते म्हणतात, ’’मानवी व्यक्तीची स्वयंभू प्रतिष्ठा, तिचे स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता खास करून आधुनिक संस्कृतीत उदयाला आलेले मूल्य आहे. प्राचीन ग्रीक किंवा भारतीय नैतिक विचारात या मूल्यांचा काही सुगावा लागू शकेल, काही पदचिन्हे आढळू शकतील. पण, त्याची स्पष्ट आणि स्थिर ओळख आधुनिक संस्कृतीतच झाली. आधुनिक नैतिक-सामाजिक विचारात या मूल्यांचे स्थान केवळ अंतिमनाही तर मूलभूत आहे.’’
 
स्वधर्माची विविध रूपे व कर्तव्ये भारतीय नीतीशास्त्र नक्कीच सांगते. पिताधर्म, पुत्रधर्म, राजधर्म, प्रजाधर्म ही त्याचीच प्रतिके. मात्र, आधुनिक व्यवस्थापनशास्त्र कर्तव्याची अत्यंत नेमकी व्याख्या करून व्यक्तीला संस्थेच्या ध्येयधोरणांच्या दिशेने चाललेल्या सुसंगत प्रवासाचे चालकत्व प्रदान करते. नेमकेपणे निर्माण केले जाणारे ‘जेडी’ (जॉब डिस्क्रिप्शन) हे त्याचेच लक्षण मानावे लागेल. हा प्रवास अव्याहतपणे चालतच आला आहे. व्यवस्थापनशास्त्र समृद्ध करणारे अनेक तज्ज्ञ या प्रवाहात डुबक्या मारतच आहेत व नवे नवे मोती शोधून काढत आहेत. ‘द सेव्हन हॅबिट्‌स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ सांगणारा स्टिफन कोवी किंवा ‘इफेक्टिह एक्झिक्युटिव्ह’ सांगणारा पीटर ड्रकर. नित्यपाठाप्रमाणे पीटर ड्रकर यांचे ’डेली ड्रकर’ हे पुस्तकही उपलब्ध आहे. ३६५ दिवसांचा न चुकता धडे घेण्याचा रतीबच इथे मिळतो.
 
व्यवस्थापनशास्त्राचा एक महत्त्वाचा स्वभाव म्हणजे नित्य नूतन होत राहणे. योगायोगाने म्हणा किंवा अन्य कुठल्याही कारणाने वर उल्लेखलेली तिन्ही नावे अमेरिकन आहेत. जग आपल्या अधिपत्याखाली ठेवण्याची अमेरिकन महत्त्वाकांक्षा आणि तिचे व्यवस्थापन कुठून येते, हे आपल्याला यातून नक्कीच कळू शकेल. या सगळ्या व्यवस्थापनशास्त्राला नवा आयाम देण्याचे कामकरणार्‍या अब्राहम मास्लो या पुन्हा अमेरिकनच असलेल्या मानसशास्त्रज्ञाचा उल्लेख टाळून चालणार नाही. ’गाजर दाखविणे’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. गाढवाच्या पाठीवर एक गाजर बांधलेली काठी घेऊन बसायचे. गाजर मिळेल, या अपेक्षेने ते गाढव चालत राहाते आणि पाठीवर बसलेल्याचा कार्यभाग उरकतो. मास्लोने या विचार करण्याच्या पद्धतीलाच फाटा दिला. त्याने एक वेगळाच आयाम मांडला. ’मास्लोचा पिरॅमिड’ म्हणून तो ओळखला जातो. व्यक्तीचा विचार करताना ती कुठच्या पायरीवर आहे, ते ओळखल्याशिवाय तिचा विचार करता येत नाही. व्यक्तीच्या मूलभूत गरजा, व्यक्तीच्या भावनिक गरजा, व्यक्तीच्या सामाजिक व मानसिक गरजा मास्लोने उत्तम विशद केल्या आहेत. मात्र, मास्लोचा पिरॅमिड जिथे संपतो तिथून भारतीय तत्त्वज्ञानाचा उलटा पिरॅमिड पुन्हा सुरू होऊ शकतो. व्यष्टी ते समष्टी असा हा प्रवास व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने रोचक ठरू शकेल. आधुनिक व्यवस्थापनशास्त्राची दृष्टी या उलट्या पिरॅमिडकडे कधी पडते हे पाहणे, हेच सध्या आपल्या हातात आहे.
 
 
- किरण शेलार

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121