बंदरं ही शहराला आर्थिक सुबत्ता आणतात आणि शहरातले लोकसंख्या शास्त्र ही बदलतात. त्याच अनुषंगाने स्पेनच्या शहराचा इतिहास व वर्तमान बदलाणार्या ‘सेबिया’ आणि ‘बर्सिलोना’ या दोन बंदराबद्दल जाणून घेऊया.
बंदरांमुळे शहरांना आर्थिक सुबत्ता तर येतेच त्याचबरोबर शहरातले demographicsही बदलतात. देशोदेशींचे जहाजं, माणसं, वस्तू, पदार्थ, ऐवज पैसा सगळे काही येतं.
स्पेनची अशीच दोन शहरं, त्यांचा इतिहास आणि वर्तमान या बंदरांमुळे बदलला. सेबिया (seville) आणि बार्सिलोना. बार्सिलोना भूमध्य सागराच्या किनारी आहे. पण सेबिया तर अटलांटिक महासागरापासून बर्याच अंतरावर आहे. पण इथे नदी आहे, ‘ग्वादऑलक्व्हिर’ नावाची. या नदीच्या बंदरावर दक्षिण अमेरिकेतून आणलेली सगळी संपत्ती उतरायची. त्यातला एक पंचमांश भाग शहराला मिळत गेला. सेबिया हे राजाचे अधिकृत बंदर असल्यामुळे स्पेनमध्येे जे काही आले ते इथे उतरले. सोने-चांदी तर होेतेच पण साखर, कोको, बटाटे, टोमॅटो, अननस, मिरची, व्हॅनिला सगळं सगळं. त्यामुळे इथे भरपूर पैसा. लोकांनी आलिशान बंगले बांधले, वास्तू उभारल्या, हा सुवर्णकाळ फक्त वास्तूंबद्दलच नव्हे तर कला साहित्याचाही होता, त्यालाही राजाश्रय आणि चाहते मिळाले. पेंटर्स, लेखक sculptors, कवी सगळ्यांचे चांगले दिवस आणि उत्तमोत्तम कलाकृत्या बाहेर पडल्या. cervantesचा don quicoteसुचलं ते इथेच, पण इथल्या तुरुंगात!
दोनशे वर्ष सेबियाने भरपूर आनंदात घालवले. पण मग नदीचा र्हास होत गेला. नदी तुंबली, जहाज येणं अवघड होऊ लागलं, त्यातूनच प्लेगची साथ आली, असंख्य लोक गेले. मग cardie नवीन बंदर म्हणून उभं राहिलं आणि सेबियाला अवकळा लागली.
पण, इतिहास भक्कमहोता आणि तो टिकून राहिला. सेबिया शहराचा इतिहास तसा जुनाच आहे. मूर, इस्लामलोकांनी इथे भव्य वास्तू उभारल्या. त्यापैकी इथला अल्कझार, म्हणजे इथला राजवाडा. याची एक विशेष गोष्ट आहे. पुरातन काळापासून आजही वापरात येत असणारा हा सर्वात जुना राजवाडा आहे, जगातला! दहाव्या दशकात मूर राजवटीत बांधलेला. इतिहासातल्या अनेक घडामोडी इथे झाल्या. राणी इसाबेलाने इथेच कोलंबसचे यात्रा वृत्तांत ऐकले. या राजवाड्यात अनेक दालनं आहेत आणि त्यांचे वैशिष्ट्य आहे. कोलंबस तर होताच शिवाय संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येणारा फर्डिनांड मॅगएलान, अमेरिकेचा शोध घेणारा अमेरिगो वेस्पुची या सर्वांचे चर्चासत्र इथल्याच दालनात भरायचे. मूर लोकांचा प्रभाव इथल्या वास्तूमध्ये, कलेत आणि इतर ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो. त्यांनीच इत्रे सिरॅमिक्सची कला आणली, त्यामुळे राजवाड्यात सिरॅमिक्सच्या टाईल्सचा सुंदर वापर केला गेला. हजार वर्ष लोटले तरी त्यांची चमक आणि त्यांचा रंग काही कमी झालेला नाही. रंगाबरोबर सोनेरी चकचकीतपणा घडताना आकाशातल्या तार्यांसारखे भासवते.

शहरातल्या मध्यभागी cathedral of santa maria आहे. पूर्वी हे मुसलमानांचे होते. त्यात बदल करून कॅथेड्रलमध्ये रुपांतर केले. इथे आता एक मोठ्ठे बेल टॉवर आहे, जी मुसलमानांची मिनार होती इस्लामप्रमाणे.मिनारीपेक्षा कोणतीच वास्तू उंच नसावी, क्रिश्चन राजव हिने ती मिनार वाढवली, त्यास आता ’गिराल्डी’ म्हणतात. आम्ही त्या टॉवरवर चढत गेलो आणि त्या उंच टॉवरवरून सेबियाचा संपूर्ण नजारा बघितला. खाली. ते कॅथेड्रल जगातल्या सर्वात मोठ्या कॅथेड्रलपैकी एक. यातच कोलंबसला पुरलेलं आहे. खरंतर कोलंबसला नेमकं कुठे पुरलेलं आहे, हे मोठं गूढच आहे. इथल्या गाड्यांवर, बसेसवर, इमारतींवर एवढंच काय मोर्यांवरच्या झाकणांवर ‘पे ८ वे’ असं लिहिलेलं दिसलं. विचारपूस केली तर लगेचच कळलं, हे या शहराचं ब्रीदवाक्यच आहे. याचा अर्थ ‘सेबियाने मला सोडून दिलं नाही’ ’ऍलफोन्सो x' राजाच्या मुलाने त्याचे राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा इथल्या नागरिकांनी राजाचे रक्षण केले. तेव्हा, राजानेच हे वाक्य शहराला बहाल केले. खरंतर सेबिया कुणालाच सोडत नाही.. कायममनात घर करून राहतं.

आम्ही गेलो तेव्हा इथे जॅकॅरंडा फुललेला होता. जांभळे ढग जणू आणि खाली जांभळ्या पायघड्या आणि कण्हेर एवढी डवरलेली की शोधून एकही पान सापडणार नाही. एक गंमत विचारू? जगातल्या कोणत्या शहरात सर्वात जास्त संत्र्यांची झाडे आहेत? शहरात-शहराच्या परिसरात नव्हे सोव्हियात संत्र्याची झाडं सगळीकडे दिसतात. बागांमध्ये तर असतातच पण रस्त्याच्या कडेलादेखील संत्र्यांची झाडं छान डौलात, गच्च संत्र्यांनी भरलेली असतात. अल्कझारच्या आत एक संत्र्याची बाग आहे आणि त्या बागेला पाणी पोहोचवायचे सुंदर पाट बनवलेले आहे. मुळात संत्रं हे एक देखणं झाडं, पाणी आणि हवामान योग्य असल्यास सदाहरित टवटवीत, तुकतुकीत सुगंधी पाने. लहान गल्ल्यांमध्ये पण संत्री लावलेली आहे. सेबियाच्या Bitter orangesचा जॅमजगभर पसरतो. एवढे संत्र्याचे वृक्ष आले कसे याची एक गोष्ट आहे. या राजाची राणी ही मूळ फ्रान्सची. तिला आल्प्सच्या हिमवर्षाची भारी आठवण येत असे. मग राजाने युक्ती केली.संत्र्याची झाडं लावली. वसंतात ती फुलं फुलून झाडं बर्फाच्छादित दिसायची आणि त्यांच्या पांढर्या सुगंधित पाकळ्या हिमवर्षासारख्या गळायच्या!! इस्लामची छाप केवळ वास्तूंवरच नाही तर इथल्या गाण्यावरही दिसते. याच गाण्यांवर, टाळ्यांवर आणि गिटारच्या Flemenco सुरावर नाच आधारित आहे. अनेक ठिकाणी त्याचे कार्यक्रम चालतात. काही वेळा रस्त्याचा कडेला काही कलाकार नृत्य करतानाही दिसतात.

अजून एक प्रथा जी स्पेनच्या इतर ठिकाणी बंद झाली पण इथे टिकून राहिली ती म्हणजे ’बुल फायटिंग.’ उन्हाळ्यात अजूनही बैल सोडून, मॅटॅडोर्न्सशी झुंज देतात. यावर टीका होऊनही मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि स्थानिक हा खेळ बघण्यास जातात. आम्ही मात्र ते स्टेडियम बाहेरूनच बघणे पसंत केले.
स्पॅनिश लोकांना जशी "Siesta'' म्हणजे दुपारची झोप आवडली आहे तशीच संध्याकाळची "Paseo''. संध्याकाळी हे लोक घराबाहेर निवांत फिरायला निघतात, फिरणे, मित्रांना भेटणे, बाहेर खाणे-सांगरिया पिणे हा त्यांचा छंद. सेबियाचे लोक ‘प्लाझा दे एस्पाना’ या भव्य इमारतीच्या प्रांगणात येतात, तिथल्या कालव्यात नौकाविहार करतात. एकंदर आनंदी माणसंच ही. आधुनिक सेबियाचे अर्थकारण पर्यटनावर चालतं आणि शेतीवर. इथली माती अत्यंत सुपीक आहे. तर्हेतर्हेची फळं विशेषतः संत्री आणि ऑलिव्हच्या मोठ्या बागा, फुलशेती इथली महत्त्वाची पिके. तशाच मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्मिती होते, जैवविज्ञानावर आधारित कंपन्या इथे आलेल्या आहे. एयरबसचे युरोपचे हेडक्वार्टर इथेच आहे. आधुनिकतेबरोबरच पूर्वीची संपदा इथे जपून ठेवल्यामुळे सेबिया एक अत्यंत देखणं शहर झालं आहे. सेबिया अत्यंत देखणं, टुमदार, निवांत शहर आहे. बागा, सगळीकडे फुलांचे ताटवे, नखशिखांत फुलांनी नटलेली झाडं सगळं एखाद्या परिकथेसारखं भास तं. सेबियाचे लोक सेबिलियानो स्वतःला अत्यंत भाग्यशाली समजतात. खरंतर त्यांना त्यांच्या शहराचं एवढं प्रेम आहे की ते इतर कुठे जायचा विचारही करत नाही. ते स्वतःला सर्वप्रथम सेबियाचे मग अँडलूसिया (त्यांचे राज्य) आणि मग स्पेनचे नागरिक मानतात बार्सिलोना, माद्रिदशी त्यांचे काही देणं-घेणं नाही! युरोप, पोर्तुगालहून आलेले अनेक तरुण आम्हाला भेटले, ज्यांचे सेबियावर तेवढेच प्रेम बसले आहे. एवढ्या सुंदर शहरात राहिल्यानंतर मुंबईसारखं धकाधकीचं बार्सिलोना कसं आवडेल, अशा विचारातच आम्ही बार्सिलोनात दाखल झालो.
(क्रमश:)
- अंजना देवस्थळे