वारी म्हणजे भक्ती, वारी म्हणजे विठ्ठल, वारी म्हणजे भजने, वारी म्हणजे भक्तीभावाने ओतप्रोत असलेले असंख्य वारकरी. हे दृश्य आपल्याला महाराष्ट्रात शुक्ल पक्षातील अष्टमीला आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि सप्तमीला तुकाराम महाराजांची पालखी निघाली रे निघाली की बघायाला मिळतं. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर देखील मराठी संस्कृतीला जपणारे अनेक लोक आहेत, आणि याच काळात महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेशातील जबलपूर या शहरात हेच दृश्य बघायला मिळतं. अनेक गोष्टींमुळे जबलपूरकरांची ही वारी खास आहे.
महाराष्ट्राला संतांची एक मोठी संस्कृती लाभली आहे. अनेक लोक कामानिमित्ताने, किंवा इतर कुठल्यातरी कारणाने महाराष्ट्राबाहेर पडले आणि स्थायिक झाले आहे. हे लोक ही संस्कृती आपल्या सोबत घेऊन जातात, आणि ती जपतात देखील. याचे जीवंत उदाहरण जबलपूरकरांच्या वारीत दिसून येतं.
जबलपूरकरांची ही वारी सामाजिक समरसतेचं सुंदर प्रतीक आहे. असे म्हणतात महाराष्ट्राबाहेर जो मराठी माणूस असतो तो केवळ मराठी म्हणून ओळखला जातो, त्याला जात-पात नसते, त्याच्या नावावर कुठलाही शिक्का नसतो.. तो केवळ मराठी असतो. आणि हेच या वारीतही दिसून येतं. जबलपूर आणि त्याच्या आजू बाजूच्या क्षेत्रातून मोठ्या संख्येत मराठी भाषिक एकत्र होतात. यंदाचं या वारीचं तीसरं वर्ष आहे. वारीच्या नियोजनासाठी मराठी जबलपूरकरांनी "वारी महामंडळ" या संस्थेची स्थापना केली आहे. गेली तीन वर्ष ही संस्था शिस्तबद्ध वारीचं आयोजन करते. आणि हा संपूर्ण सोहळा जल्लोषात पार पडतो. यंदा देखील या सोहळ्याची दिमाखात तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या वारीच्या नियोजनानुसार जबलपूरकरांची चक्रीय आरती :
या संपूर्ण सोहळ्यात सर्व मराठी भाषिकांना सहभागी करता यावं यासाठी वारी महामंडळातर्फे, ज्या दिवशी महाराष्ट्रात आळंदीहून तुकोबारायांची पालखी निघते, त्या दिवसापासून जबलपूरला चक्रीय आरतीची सुरुवात करण्यात येते. जबलपूरच्या पवित्र नर्मदा नदीच्या काठावर पहिली चक्रीय आरती संपन्न होते, आणि पुढे आषाढी एकादशी पर्यंत जबलपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रत्येक छोटी मोठी मराठी भाषिक संघटना या चक्रीय आरतीचे आयोजन करते. चक्रीय आरतीचा समारोप शहरातील प्रसिद्ध दत्त मंदिरात होते. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी दत्त मंदिरातूनच शहराच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत वारी निघते. यामध्ये महिला, पुरुष, युवाशक्ती, वृद्ध सगळे अगदी सगळेच उत्साहानी सहभागी होतात. महिलांचे अनेक गट पाऊल भजनं म्हणत विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसून येतात. या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनात जबलपूर मराठी समाजातील युवाशक्तीचा सिंहाचा वाटा असतो. जबलपूरातील सर्व मराठी लोक या १८ दिवसांमध्ये वारीमय झालेले असतात.
"सामाजिक समरसता हे या वारीचे मुख्य उद्येश्य आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील मराठी संस्कृती टिकून रहावी यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत राहू आणि आषाढी वारी देखील त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे." अशी माहिती वारी महामंडळाचे प्रमुख संयोजक संतोष गोडबोले यांनी दिली. जबलपूरकरांनी काढलेलली ही वारी इतर अमराठी समाजांसाठी एक मोठे उदाहरण आहे असेही ते म्हणाले.
या वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, मध्यप्रदेशातील सौंसर या गावाजवळील रामकोना नावाचे एक गाव आहे. हे संपूर्ण गाव वारकऱ्यांचं आहे. आणि जबलपूरच्या वारीत या गावातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या वारीमध्ये एकूण ५ ते ६ हजार मराठी भाषिक लोक सहभागी होवून वारकरी झाल्याचा आनंद घेतात. विठूरायाचे नामस्मरण करत संपूर्ण जगाला एकतेचे सूत्र समजावून सांगतात.

वारीच्या या काळात अनेक लोकांना अनेक अनुभव आले आहेत. आणि हे सर्वच अनुभव अत्यंत बोलके आहेत. दरवर्षी नेमाने वारीच्या नियोजनात उत्साहानी सहभागी होणारे मनीष नाजवाले सांगतात, "जबलपूरकर मराठी भाषिकांचा इतिहास पेशवे काळाइतका जुना आहे. आणि आजही जबलपूरात मोठ्या संख्येत मराठी भाषिक आहेत. मात्र असंघटित असल्यामुळे ते सहज एकत्र नजरेस पडत नाहीत. या सर्व मराठी भाषिक लोकांना, जात-पातीच्या पलिकडे जाऊन संघटित करण्याचा प्रयत्न म्हणजे वारी. जबलपूर शहरात जवळ जवळ ३७ मराठी भाषी संघटना कार्यरत आहेत, आणि आपापल्या क्षेत्रात ते उत्तम कार्यक्रम सादर करतात, मात्र एकत्र येवून काहीतरी मोठं करता येवू शकतं, हे वारीनं दाखवलं आहे. विठ्ठलभक्तीच्या प्रेमाने हे सर्व मराठी जबलपूरकर तीन वर्षांआधी एकत्र आले. आणि आता ती इथली परंपराच झाली आहे. यामध्ये शहरातील प्रख्यात इंजीनिअर्स, डॉक्टर्स, आणि सर्व क्षेत्रातील मराठी लोक सहभागी होतात."

जबलपूरातील प्रसिद्ध नृत्यशिक्षिका नीरजा बोधनकर सांगतात, "जबलपूरला इतकं सुंदर विठ्ठलाचं देऊळ आहे, हेच अनेकांना माहीत नव्हतं. मात्र वारीच्या निमित्ताने इतिहासाचा वारसा लाभलेलं हे देऊळ बघून त्या सावळ्या विठुरायाचं दर्शन घेऊन पुन्हा इतिहासात गेल्या सारखं वाटलं. मी गेले तीनही वर्ष वारीत सहभागी होत आहे. रस्त्यावर शेकडो महिलांसोबत पाऊल भजन म्हणत जात असताना कुठेही असुरक्षिततेची भावना नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व जाती-पातींच्या पलिकडे जाऊन वारीने खऱ्या अर्थाने मराठी समाजाला एकत्र केलं."
असं म्हणतात वारीच्या दरम्यान विठूराया कुठल्या न कुठल्या रूपात येऊन दर्शन देऊनच जातो, असाच काहीसा अनुभव तेजश्री नाजवाले यांना आला. त्या सांगतात, "वारीचं ते पहिलं वर्ष होतं. मी वारीचं स्वागत करण्यासाठी घरातून निघतंच होते. रस्त्यात तोफखानेवाले काका काकू भेटले. काकूंना तर मी गाडीवर बसवलं मात्र काकांचा प्रश्न होता. ते कसे जाणार, तितक्यात एक काका गाडीवरुन आले ते म्हणाले चला मी सोडतो, गजबजलेल्या रस्त्याने दत्त मंदिरात पोहोचायला किमान अर्धा तास तरी लागतो, मात्र ते अंतर आम्ही ७-८ मिनिटात पूर्ण केलं. आणि आम्ही पोहोचलो. आम्हाला सोडल्यावर ते गाडीवरचे काका निघून गेले. आणि परत दिसलेच नाही. विठूरायांच्या रुपात ते आमची मदत करण्यासाठी आले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्या काकांच्या रुपात विठूरायाचं दर्शन झालं."

"जबलपुर हे जणु मिनी इंडियाच आहे भारतातील सर्व जाती आणि भाषेतील लोक इथे वसतात आणि आपापल्या संस्कृती प्रमाणे आपले सण साजरे करतात. या सगळ्यांना एकत्र आणते ती वारी. भक्तिभावात ओतप्रोत ,लयबद्ध नाम गजर कारित ही वारी मायमराठी ला जपून मराठी संस्कृती आणि त्याची शिस्त याची ओळख इतर समाजाला देत श्री दत्तमंदिर ते विठ्ठल राखुमाई मंदिरापर्यन्त असते. वारीत जणु साक्षात पंढरपुरच जबलपुरात अवतरते." अशा भावना अजय भालेराव यांनी व्यक्त केल्या. तर गृहिणी नीला सर्वटे यांनी देखील आपल्या पहिल्या वारीचे अनुभव सांगत "विखुरलेल्या समाजाला एक केल्यामुळे आपण देवाच्या आणखी जवळ गेलो आहोत," अशा भावना व्यक्त केल्या.
या सगळ्यांचे अनुभव आणि जबलपूरकरांच्या वारीची भव्यता बघता एक लक्षात येतं, महाराष्ट्रात तर मराठी संस्कृती जपलीच जाते, मात्र महाराष्ट्राबाहेर ही संस्कृती जपणं खूप अवघड आहे, आणि वर्षानुवर्षे ते कार्य जबलपूरकर करत आहे. विठूरायांच्या प्रेमाने एकत्र आलेले हे जबलपूरकर मराठी भाषिक लोक संपूर्ण जगातील मराठी भाषिक लोकांसाठी समरसतेचं एक जीवंत उदाहरण आहेत..
- निहारिका पोळ