पालकांच्या सवयी आणि संस्कारांचे प्रतिबिंब मुलांमध्ये, त्यांच्या वर्तणुकीत प्रामुख्याने दिसून येते. त्यामुळे लहानपणापासूनच पालकांची वागणूक आणि एकूणच जीवनशैली आरोग्यदायी असेल, तर मुलांवरही त्याचे सकारात्मक परिणामनिश्चितच होतात. जंक फूड, टीव्ही-मोबाईलचे व्यसन जर मुलांमध्ये प्रकर्षाने जाणवत असेल, तर त्यासाठी पालकांनी अंगीकारलेल्या सवयी, आवडी-निवडीही काही अंशी कारणीभूत ठरतात. तेव्हा, आगामी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पालकांनी केवळ मुलांचे लाड-हट्ट न पुरवता त्यांच्या सवयी बदलण्यासाठी, त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी स्वत:पासून सुरु करावी, कारण पालक हेचि आद्यगुरु...
गुरुपौर्णिमा काही दिवसांवरच येऊन ठेपलीय. शाळेतील शिक्षकांना फूल देणे आणि कला क्षेत्रापुरते या तिथीला मान राहिला आहे, महत्त्व राहिले आहे. प्राचीन काळी गुरुगृही राहून, ज्ञान संपादन केले जाई. १४ ते २५ वर्षे इतक्या कालावधीसाठी गुरुकुलात राहावे लागे. गुरू आदेश आणि गुरू आज्ञा असल्याशिवाय कोणते कार्य केले जात नसे, पण हल्लीचे चित्र फार बदललेय. हा बदल अचानक घडून आलेला नाही. काळानुरूप मनुष्याच्या गरजांप्रमाणे हे बदल घडत गेलेत.
हल्ली इवल्याशा दीड-दोन वर्षांच्या मुलांना प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये घातले जाते. पाच-सहा वर्षांचा होईस्तोवर एखादा क्लास सुरू होतो. आपले पाल्य अभ्यासाबरोबरच अन्य क्षेत्रातही अव्वल यावे, ही मनोमन असलेली पालकांची सुप्त इच्छा जाणून घेऊन नवनवीन ’क्लासेस’ ही बोकाळले आहेत. या चढाओढीच्या, चुरशीच्या काळात प्रत्येक मूल तितके शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असेल, असे नाही.
एक सात वर्षांची छकुली तिच्या आजीबरोबर दवाखान्यात आली. डोक्यात उवा-लिखा वारंवार होतात म्हणून आजी औषधोपचार काय करावेत, हे विचारू लागली. तिची दिनचर्या ऐकून मीच थक्क झाले. रोज सकाळी २ तास अभ्यासाचा क्लास (ट्यूशन), मग दुपारी शाळा आणि शाळेतून आल्यावर पोहण्याचा क्लास. शाळेला शनिवार-रविवार सुट्टी असते. त्या दिवसांमध्ये नृत्याचा क्लास, विशेष पद्धतीने गणिते सोडविण्याचा क्लास आणि भाषेचा क्लास! आणि सर्व क्लासेसचा गृहपाठ! (शाळेत भरपूर लिहावे लागते आणि ते पूर्ण न झाल्यास शिक्षा म्हणून दुप्पट गृहपाठही करावा लागतो!) माझे गुरू वैद्य विनय वेलणकर सर म्हणतात, ’’मुलांना बकरीप्रमाणे सवयी लावू नका. थोडे इथे चरणे, थोडे तिथे खाणे. भूक असो वा नसो म्हणजेच आवड रुची, त्यात निपुणता येण्यासाठी आवश्यक आहे. सगळ्यातच जर घातले, तर बकरीप्रमाणे सगळ्यातले थोडे थोडे वेचले जाईल.’’ इंग्रजीत म्हण आहेच ना, Jack of All and Master of None!
प्रत्येक पालकाने थोडा विचार करावा-मला सामान्य व्यक्ती जर घडवायची असेल तर सगळे थोडे-थोडे करावे. पण, उत्तम कामगिरी जर एखाद्या क्षेत्रात करायची असेल, तर सगळीकडे तोंड मारून कसे चालेल? एखादा क्रीडा प्रकार, कला किंवा भाषा जर पाल्याला आवडत असेल, रुची असेल तर त्यासाठीचे विशेष मार्गदर्शन अवश्य द्यावे. पण, सर्व अगदी कोवळ्या वयातच करायला लावू नये. वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत शरीराची आणि मेंदूची वाढ होतच असते. लहानपणी अधिक चालणे, लिहिणे, वजन पाठीवर घेणे यामुळे हाडांवर, स्नायूंवर अतिरिक्त भार पडतो, ताण येतो. हे टाळावे. मैदानी खेळ, भातुकली, समवयस्क मुलांबरोबर बागेत मनसोक्त बागडणे, हे महत्त्वाचे आहे. याने केवळ शारीरिक क्षमताच वाढते, असे नाही, तर इतरांशी मिळून मिसळून (ऍडजेस्ट) होण्याचीही सवय लागते. बागेत झोपाळ्यावर आपली पाळी येईपर्यंत थांबणे, क्रिकेट किंवा पकडा-पकडी खेळताना सांघिक एकत्रिकरण, आपलेपणा निर्माण होतो. घराघरातून माणसांची आणि विशेषत: लहानग्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे आपल्या वयातील मुलांबरोबर सुसंवाद, खेळणे-भांडणे हे होतच नाही. ‘क्लासेस’ मध्ये शाळेमध्ये चुरस लागते. कोण पहिला आला आणि माझ्यापेक्षा किती गुण जास्त मिळाले, हे कोवळ्या वयात वाटणे चुकीचे आहे. कारण, या वयात अपयश पचविता येत नाही. एवढी मुलांची मानसिक वाढ झालेली नसते. त्यातच ‘तू वीक आहेस,’ ’ढ आहेस,’ असे जर त्यांच्या मनावर बिंबविले गेले, तर त्यातून स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होतो आणि हा न्यूनगंड पुढील आयुष्यातील प्रगतीला घातक ठरू शकतो.
हल्ली सर्वांना मुलं हुशार आणि दिसायला सुंदर हवी असतात. पण, याचबरोबर शरीराने स्वस्थ आणि मनाने खंबीर असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती भिन्न असते. आपले ठसे जसे इतर कुणाशीच मॅच होत नाहीत, तसेच स्वभाव आणि व्यक्तिमत्वातही भिन्नता असते. विचार करण्याची प्रक्रिया वेगळी असते. मग एकाच तराजूत सगळ्यांना का मोजावे? बरेचदा शाळकरी मुलांमध्येही परीक्षेचा ताण इतका असतो की, परीक्षा जवळ आली की, ते आजारीच पडतात. तो ताण ते सहन करू शकत नाहीत. असे होऊ नये, मनावरील दडपण इतके मोठे नसावे की, त्याचा शरीरावर आणि आपल्या दैनंदिन जीवनावर परिणामव्हावा आणि बालपणात तर ते कदापि येऊ नये.
यासाठी लहान मुलांना बालविश्र्वात थोडा वेळ तरी राहू द्यावे. एका प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापिका सांगत होत्या, ’’जर लहान मुलांना झाडे लाल आणि आकाश हिरवे रंगवायचे असेल, तर तेही करू द्या. त्यांची कल्पनाशक्ती अफाट आहे. ती लहान वयातच नियमांमध्ये जखडून ठेवू नका आणि याच्या विपरीत चांगले काही केले तर त्याचा आनंद पैशामध्ये मोजू नका. महागडी खेळणी आणि मोबाईल गेम्स देऊ नका. दरवेळेस मॉलमध्येच वाढदिवस साजरा करणे, धूमधडाक्यात सेलिब्रेट करणे टाळावे, कारण असे जर वारंवार केले जात असेल, तर मुलांच्या मनावर हेच बिंबविले जाते. ही पद्धत बरोबर आहे.’’
मानसिक स्थिरता येण्यासाठी पालकांनी पाल्यांचे सगळेच हट्ट पुरवू नयेत. आर्थिक प्रलोभने तर देऊच नये. पाठीवर शाबासकी, त्यांच्या आनंदात सामील होणे आणि दुःखात बरोबर असणे, त्यांची सपोर्ट सिस्टिमबनणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पालक म्हणून पाल्याची फक्त आर्थिक जबाबदारी पार पाडणे पुरेसे नाही. कारण मोबाईलचे, टीव्हीचे व्यसन हे एकटेपणातूच लागते. घरी कोणी नाही किंवा असल्यास आपल्याच विश्वात रममाण होणारी वडीलधारी व्यक्ती घरात असून नसल्यासारखीच आहे आणि टी.व्ही., मोबाईल, इंटरनेटचे दुष्परिणामआपण ऐकतो, बघतो आणि वाचतो आहोतच. बरं ते कार्यक्र्रमही लहानगे बघतात. त्यातून नट-नटीची वेशभूषा, मालिकेचा विषय हे सर्व त्या वयाला साजेसे नसते. पण ते बघून बघून समज येऊ लागते आणि नट-नट्यांप्रमाणेच राहणे वागणे, त्यांचे अनुकरण करणे, असे लहान वयातच सुरू होते. असे असल्यास स्वतःची विचारशक्ती, कल्पनाशक्ती नको त्या विषयात वाहत जाऊ शकते, असे होऊ नये.
आहारातूनही पोषक मूल्ये नीट जाणे महत्त्वाचे आहे. काय खावे, कोणी खावे हे प्रकृती (Body Consistency) आणि ऋतुनुरूप ठरवावे. उदा. उन्हाळ्यात तिळगूळ, गुळाची पोळी टाळावी. लहानपणी, पावसाळ्यात सर्दी वारंवार होत असल्यास थंड दूध, दही, फळे खाऊ नयेत. मूल चिडकी, तापट असल्यास चमचमीत मसालेदार आणि लोणची टाळावीत. मूल आळशी असेल, झोपाळू असेल, त्याची पचनक्रिया मंद असल्यास मधाचे पदार्थ आणि शिळे अन्न त्यास देऊ नये. म्हणजेच जडणघडण होेण्याच्या कालावधीत पूरक वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेत ताप आणि व्यायामयांची सवय वयानुरूप लावावीच लागते. रोप मोठे होते, ते बीजापासून. तसेच सवयी (चांगल्या-वाईट) यांचे जतन किंवा टाळणे हेदेखील हळूहळू, अभ्यासपूर्णच करावे लागते.
बाळाचे पहिले गुरू हे त्याचे पालकच असतात. त्यामुळे प्राथमिक जडणघडण याची जबाबदारी सर्वस्वी त्यांचीच आहे, हे विसरून चालणार नाही. तेव्हा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उत्तम गुरू होण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकाने करूया...