श्रावणगाणं - एक श्रावणझरा

    28-Jul-2017   
Total Views | 82


कविता – कधी ना कधी प्रत्येकाला जवळची वाटलेली! आणि श्रावणधारा हव्याहव्याशा वाटणाऱ्या. ह्या दोघांचं नातंही अगदी अतूट. तसं तर कवी प्रत्येक ऋतुचं गाणं करू शकतो. मग तो वैशाख वणवा असुदेत नाहीतर शिशिरातली पानगळ.  हा निसर्ग, त्यातले बदल कवी आपल्या सुख दुःखांशी, भावभावनांशी जोडून घेतो आणि मग ती वैश्विक होतात. त्याला माहित असतं ही सुखं आणि दुःख एकामागून एक येणाऱ्या ऋतुंसारखी आहेत. येतील, काही काळ राहतील आणि निघून जातील. आणि मग त्याची अशी एक कवीवृत्ती होऊन जाते. आहे ते, दिसेल त्याचं गाणं होतं. लिहिलं नाही लिहिलं तरी मनातल्या मनात ते वाजत राहतं. आणि श्रावणासारख्या महिन्यात तर ते पोपटी दुलईसारखं अंगावर सुखद लपेटून राहतं.

एकसंध मुसळधार बरसून गेल्यानंतर तो येतो. ते अंधारलेलं आभाळ, ते पाण्याचे लोट, छत्र्या, रेनकोट ह्यांना थोडं दूर सारून अंधारगाभ्यातून कुठेतरी स्वच्छ प्रकाशाची एखादी तिरीप येते. चिखल चिखल झालेली जमीन हिरव्या रानगवताला ओढून घेते. कोंदटलेलं मन भरभरून श्वास घेतं. श्रावण आधीच अनेक प्रसिद्ध कवितांतून, गाण्यांतून व्यक्त झालाय. त्याचं रिमझिमपण, त्याचा उन पावसाचा खेळ, त्याचे हिरवे गालिचे असं खूप काही कवितांमधून येऊन गेलंय. पण कोणाच्या चिमटीतून काय निसटेल आणि ते कोणाला गवसेल हे कधी सांगता येत नाही. माझ्या आजूबाजूला असे खूप मैत्र आहेत ज्यांनी हा श्रावण आपल्या कवितांमधून शोधायचा प्रयत्न केलाय. हो! तो शोधावाच लागतो! पकडवाच लागतो! पाऊस पाऊस म्हणेपर्यंत हातावर पिवळंजर्द उन आलेलं असतं आणि त्या चमकणाऱ्या बिन्दुंकडे बघत भान हरपावं तर ओंजळीतल्या पाण्यात सूर्य बुडून जातो.  

जसं श्रीधर काका म्हणतात,

बरसून बरसून थकला आणि

ऊन मोकळा झाला पाऊस

कसा नभावर कमान तोलत

रंग साजिरा झाला पाऊस

                                                - श्रीधर जहागीरदार

उन असं मोकळं होतं  आणि रंगांची कमान खुलून येते. ही कोवळी हिरवाई कधी विवाहास आतुर यौवना वाटावी आणि सारंगने म्हणावं,  

वसुंधरा हि उपवर व्हावी श्रावण यावा कवेत घ्यावे  

आयुष्याच्या भवसृष्टीने काव्य-सरींनी भिजून जावे.

- सारंग भणगे

आणि तो श्रावणही कसा, तर मुसळधार कोसळ, काळं निळं  गढूळ वातावरण पुसून टाकून आनंदाची पेरणी करणारा, सृजनाची वेल लावणारा. सारंग नंतर कधीतरी लिहितो,  

गर्भार धरा पुटपुटते

आनंदघनाची गाणी,

त्या गढूळ स्वरमेघांना

फुटते श्रावण वाणी.

- सारंग भणगे

अशी श्रावणवाणी फुटली की शब्दांचं चित्र होतं. निसर्ग एकीकडे आपलं चित्र रेखाटत असतो आणि कवी त्या चित्राचं गाणं करतो. निसर्ग आणि कवी असा अदलाबदलीचा खेळ खेळतच राहतात. जसं दीप्ती लिहिते,

आषाढ सरी माळुन

आली दिव्यांची अवस

सोबतीला श्रावणाची

कोवळीशी आरास

पोपटी गवतावर

थेंब थेंब चमकती

सात रंग अलवार

डोंगरमाथी सजती

 

आणि तिलाही श्रावण सृजनाचा निरोप घेऊन येणारा दूतच वाटतो. मग ती म्हणते,

अवचितच बरसे मेघ चमके विजेची रेघ

सृष्टीचा हिरवा साज मनाला भुरळ पाडी

घुमतो हा घन वारा भिजवती जलधारा

सृजनाचा तो निरोप हलके श्रावण धाडी

- दीप्ती जोशी कुलकर्णी

हे सृजनरंग  असं शब्दांमधून रसरसून वाहायला लागतात.  श्रावण आणि सण, श्रावण आणि संयम ह्यांच्याप्रमानेच श्रावण आणि कविता ह्याचं हे असं अतूट नातं!  ते लपाछपीचं आहे. कधी उन कधी पावसाचं नातं. ही लपाछपी असेल तरच शब्दांच्या ओळी आणि ओळींच्या कविता होतात. नाहीतर वैशाखाचा असतो तो सुन्न करणारा वणवा आणि आषाढातल्या असतात त्या रोजच्याच हमखास येणाऱ्या कंटाळा आणणाऱ्या सरी. कधी उन कधी पाउस मात्र नवनिर्मितीला प्रोत्साहित करतो.  जसं विनायक म्हणतो,

‘कवितेला असं लागतच काय?’

हिरवं पान ..

हिरवं देठ..

अन भावुक सखीची गळा भेट..

थोड़ा पाउस

थोडंस उन ..

अन तिचा कटाक्ष हसून ..

फुललेलं फुल..

खुलणारी कळीं..

अन तिच्या गालावरची खळीं..

 - विनायक उजळंबे

बस्स ! थोडा पाऊस थोडसं उन हे प्रत्येकाची कविता व्यापून उरतं. लिहिली तरी, नाही लिहिली तरी.  मग हा पाउस, हा श्रावण असं चित्र काढता काढता आपल्या मनापर्यंत येऊन पोहोचतो. आपली सुखं दुःख त्यामध्ये अलवार गुंफली जातात. आषाढातल्या मिट्ट अंधारात पडणाऱ्या पावसावर उन्हाचा कवडसा पडतो आणि मग सातरंगांची कमान आपल्याही नकळत दिसते. मनातला  उन पावसाचा खेळ निसर्गाच्या खेळाबरोबर मिसळून जातो आणि कवितांचं इंद्रधनू अजूनच गडद व्हायला लागतं. जसं अलकनंदा काकू लिहितात,

 

नुस्ता डोकावून गेला पाऊस जाता-जाता
जसं विरून गेलं स्वप्न पाहता-पाहता

थांबला असता जरा वेळ तर
बहरलं असतं एखादं झाड
फुलून आला असता कोणता तरी कोपरा
खिडकी जवळ बसून निदान घोटा-घोटाने रिचवला असता हुंदका

नुस्ता डोकावून गेला पाऊस जाता -जाता
जसा निघून गेला कोणी मित्र जवळ बसता - बसता

 - अलकनंदा साने

असा तर प्रत्येकाचा पाऊस हा खूप आपापला आणि वेगळा असतो. त्यामध्ये भिजणं हे देखील आपापलं. कवीला कधी तीरावर राहून वाहतं पाणी अनुभवावसं वाटेल तर कधी चिंब भिजण्याचं तो समर्थन करेल. कधी भिजता येत नाही ह्याचं त्याला वैषम्य वाटेल. असंच कधीतरी वैशाली लिहून जाते,    

इतक्यात पावसाची देऊ कशी हमी मी

झाले अजूनसुद्धा पुरती न मोसमी मी...!

ऋतू येतात जातात तेवढं खात्रीशीर काही नाही कवयित्रीकडे. तिनं पावसाची हमी कशी द्यावी? अजून ती तितकीशी मोसमी नाही. 

आयुष्य हे प्रवाही बोलावते मला पण 

काठावरी मनाच्या असतेच संयमी मी

ही समोरून खूप अफाट नदी वाहतीये पण ती मात्र अजून काठावरच आहे. इतकंच नाही तर संयमाने आहे. ना त्या प्रवाहात वाहून जाणं शक्य ना दूर. काठावर राहून आपपर भाव जपण्याशिवाय पर्याय नाही.

सोसूनही झळा ह्या निःशब्द रोज असते

करतेच श्रावणाची माझ्यात बेगमी मी

 - वैशाली शेंबेकर मोडक

श्रावण, ज्याचा त्याचा वेगळा! सुखात असताना दुःख म्हणजे श्रावण तर दुःखात असताना सुखाची तिरीप म्हणजेही श्रावणच. अशी बेगमी करून ठेवावी लागते. वैशाखातल्या झळा सोसण्यासाठी! सर्वांनाच!

उन्हामध्ये कुणी माखून जाऊ शकत नाही. असं उध्वस्त होता येत नाही. बेचिराख होता येत नाही. वेळोवेळी सावरावं लागतं, सांभाळावं लागतं. पण कसं? तर तीरावर राहून. स्थितप्रज्ञ वृत्तीने. आणि आनंदात? अं.. म्हणजे पावसात? किंवा आठवणीत? मन पोक्त झालं की मनसोक्त भिजताही येत नाही. मनामध्ये कितीही समर्पणाची भावना निर्माण झाली तरी, किती आठवणी आल्या तरी, पाऊस कितीही वेल्हाळ असला तरी. मग रणजीत लिहून जातो,

रिमझिम रिमझिम पाउसधारा मनात माझ्या रुजती

खळखळते ओहोळ पाहुनी तरंग नकळत उठती

तुझी नि माझी बालपणीची कागदहोडी ओली

तसाच पाउस, तसेच पाणी, पण मी तीरावरती 

- रणजीत पराडकर

उन पाउस आपल्याला असंच अव्याहत भेटत राहतात. ना वैशाख वणवा सोसला जात ना आषाढातल्या अव्याहत धारा. पण श्रावण हसून स्वीकारला जातो. त्याचा सौम्यपणा त्याला देखणं करतो. आणि त्यातूनही देखणं असतं त्याचं अनपेक्षितपण. अचानक दारी साजण यावा तितकं अनपेक्षित सुख. तो तरी कुठे हमखास येतो. कधी येईल कधी न येईल. कधी असा असतो, कधी तसा. ऑस्कर वाइल्डने म्हटलंय ‘Essence of Love is Uncertainty’ ही अनिश्चितता घेऊन श्रावण येतो. म्हणून जास्त हवाहवासा वाटतो. मग लिहिलं जातं,

मी चिंब चिंब होताना

तो उन्हें पांघरी भगवी.

मी रिक्त रिक्त होताना

तो इंद्रधनु सतरंगी.

मी ओथंबून जाताना

तो निर्जल एकल कान्हा.

मी निःसंगी अनुरागी

तो स्पर्शातुरसा पावा.

मी व्यक्त व्यक्त होताना

तो निर्मोही घननीळा.

मी सावरताना सारे

तो व्याकुळ काजळकाळा.

हा लपाछपीचा श्रावण

अन अदमासातील अर्थ

लपण्यातील मधु अनुबंध

कळण्यात न जावे व्यर्थ.  

तो रिमझिम रिमझिम येतो

तनमनात श्रावण झरतो.

अदमास किती लावावे

पाऊस जीवाला छळतो.

 

कविता अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या रीतीने सामोऱ्या येतात. श्रावण असा कवीच्या अंतरंगातल्या भावनांना एक अनमोल रूपक देऊन जातो! केवळ धरा प्रतीक्षेत नाही तर तोही आतूर होऊन आभाळाची वाट सोडून येतोय. तिच्या देहावर बरसून मृद्गंधी अत्तराने आसमंत भरून गेलाय. श्रावणातल्या इंद्रधनुष्यात आणखी एक रंग भरला जातोय.  कवीच्या अंतरंगाचा. तो काजळकाळा असावा. शृंगाराचा, प्रतीक्षेचा!  जसं नचिकेत लिहितो,

दाटते आभाळ त्याच्या स्वागताला

गाठते क्षितिजावरी त्या पावसाला

साजणीला भेटण्या आतूर झाला

वाट आभाळातली सोडून आला

थेंब ओघळले तिच्या देहावरी अन्

गंध मोहरता नवा मातीस आला

सातही रंगांमध्ये पाऊस मनभर!

काजळाचा रंग माझ्या श्रावणाला!

 

- नचिकेत जोशी

कवितांमधून असा श्रावण व्यक्त होत राहतो. तो रखरख नाही, वैतागवाडी नाही, बोचरा नाही, तापदायकही नाही.   ज्यामधून जागच येऊ नये असं वाटावं असं ऋतूंना पडलेलं स्वप्न म्हणजे हा श्रावण!  ह्या कवितेत शार्दुल म्हणतो तसं हा काळ एक वाहता ओहोळ झालाय. ह्या भारावलेल्या वातावरणात, काळात सखीचा हात हातात आहे. आणि कागदी नावा अलगद सरकत राहाव्यात तसे ह्या कालौघात दोघे  वाहत तरंगत निघालेत.

 

प्रणयभरात बरसून झाल्यावर  - तापलेल्या मातीवर थेंब पडल्यावर मनातली नक्की कोणती लपवलेली भावना व्यक्त होते जिच्या  सुगंधाने आसमंत व्यापून जातो! असा मनातला मृद्गंध श्रावणात मोकळा मोकळा होतो. प्रणयातला असा लटका ‘नाही’ असुदेत किंवा खोल मनाशी लपवून ठेवलेले काही गोड झरे असुदेत, मनातले असे श्रावण शोधावे लागतात आणि इतर सगळ्या ऋतुंसाठीची बेगमी म्हणून वाहावेही लागतात. हे सत्य असतात की आभास माहित नाही. पण मनातला असा श्रावणझरा सापडला की झराच होऊन जाणं, किंबहुना श्रावणच होऊन जाणं हे खरं कवितांमधलं तत्त्व म्हणजे कवित्व! श्रावण आणि कवी आपल्याला अंतर्यामीचे झरे शोधायला अशी दृष्टी देतात.  

 

ही शार्दुलची एक नितांतसुंदर कविता. ह्या कवितेसारख्या अनेक कविता उनपावसासारख्याच कधी चिमटीत येतात आणि कधी निसटून जातात. त्यांच्या अर्थापर्यंत पोहोचेपर्यंत वेगळा अर्थ गवसतो. वाचता वाचता  मग आपणच कविता होऊन जातो, श्रावण होऊन जातो.

घन घनन घनन घन गरजत घन गगनात

सन सनन सनन सन अचपल पवन वहात

टप टप टप टप नभ सरसावित शतबाहू

झर झर झर भिजवी धरती प्रणयभरात 

 

बघ मंद मंद मृद्गंध सखे दरवळतो

उठतो कळतो श्वासांतुन मग विरघळतो

नाही नाही ची फोलच सारी ग्वाही

लपविला मनीचा भाव जगी परिमळतो 

 

मनसोक्त झेलती झाडे पाउसधारा

भर ओसरती उतरे सैलावे वारा

फांद्यांवर पक्षी चिंब शांत ध्यानस्थ

पानापानांचा लटका त्यांस निवारा 

 

अलवार गुंफला हात असूदे हाती

शांत मुग्ध सृष्टी जडावली सांगाती

ओहळ काळाचा मने कागदी होड्या

वाहती सोबती डुलती पुढती जाती

 

हे असेल जरि का स्वप्न, असूदे ! पाहू...

या क्षणात पाउस पाउस होउन राहू

रखरखो लाख वैशाख काळजी नाही

अंतरी झिरपले श्रावण शोधू, वाहू 

- शार्दुल व्यास

 

 

लेखातील  सर्व कविता कवी कवयित्रींच्या पूर्वपरवानगीने....

 - विभावरी बिडवे

विभावरी बिडवे

बी. ए. (मानसशास्त्र), एल एल. बी. पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतर विषयक वकिली सुमंत्र सेंटर ह्या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत. कोथरूड, पुणे येथील वस्त्यांमध्ये सदर संस्थेतर्फे उपचारात्मक अभ्यासिका चालविल्या जातात. पूर्वी दिव्य मराठी मध्ये थोडे कायदेविषयक व इतर लिखाण. इतरत्र स्फुट लेखन.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121