अवंती : मेधाकाकू, अजून त्या ’सीता+गीता’ आणि ‘राम+शाम’ मधून मी बाहेर नाही येऊ शकलेली. काय सही होता कालचा अभ्यास, ‘ताक’ आणि सिनेमाचा नायक एकदम झक्कास.
मेधाकाकू : ओहो अवंती…. फार काळ स्मरणरंजन करणे हे काही फार फायद्याचे नसते. आपल्या अभ्यासासंदर्भात, सिनेमा नायकाचे चपखल उदाहरण दिले तुला त्यापलीकडे मी त्यात रेंगाळले नाही हे लक्षात घे. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या-स्वत:च्या अशा, स्मरणात कायम राहणार्या घटना अनुभव नाती असतातच. मात्र साधारणपणे ते प्रत्येक व्यक्तीच्या मनोधारणा आणि संस्कारांवर अवलंबून असे. नेमका याचाच अभ्यास आपल्या आधीच्या पिढीतील अनेक जाणकारांनी आणि समाज अभ्यासकांनी निश्चितपणे केला आणि आज तो अभ्यास आपल्याला या वाकप्रचारातून लक्षात येतो.!!
जेथे खीर खाल्ली तेथे राख खावी काय
एका रूपकाद्वारे हा वाकप्रचार आपल्या स्मरणातील काही जाणीव-जागृती निर्माण करतो. आधी तुला संगितले, त्याप्रमाणे आपल्याला पूर्वीच्या घटनातून-अनुभवातून काही छान आठवणी असतात, त्यातील महत्वाची, कायम स्मरणात राहणारी भावना कृतज्ञतेची. जिथे अशा आनंद देणार्या व्यक्तींबरोबर “खीर खाल्ली” म्हणजे छान अनुभव घेतला तिथे “राख खायची नसते”, म्हणजे अयोग्य वर्तन करायचे नसते. समाजातील नीतीमत्ता अबाधित राखणारा, प्रत्येकाला दिलेला हा सल्ला...!!
अवंती : मेधाकाकू.. समजलाय तुझा स्मरणरंजनाचा मुद्दा आणि पटलाय सुद्धा. संस्कृतच्या वर्गात धडा शिकवतायत आत्ता ‘गतं न शोच्यमं’ असा तेच काहीसे तुझ्या सांगण्यात आलाय...!!
मेधाकाकू : अरे सही है भिडू... एकदम मस्त. अजूनही आपण आहार आणि अन्न विषयक म्हणींचा अभ्यास करतोय आणि असे अन्न विषयक संदर्भ देणार्या, व्यक्तीच्या किंवा समाजाच्या उत्तम गुणवत्तेचा परिचय देणार्या म्हणी, या मराठी भाषेच्या खजिन्यात खच्चून भरलेल्या आहेत...!!
जेंव्हा येते वेळ तेंव्हा होते गजराचे केळ
आता असे बघ, या म्हणीत केळं हे फळ आणि गाजर ही भाजी, यांच्या गुणवत्तेचा तुलनात्मक संदर्भ देऊन, एखाद्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळातील परिस्थितीचे वर्णन केले आहे. केळ्याचे पोषण मूल्य उत्तम असते आणि म्हणून कुटुंबाला मिळणार्या सकस-चौरस आहाराचे ते रूपक आहे. आर्थिक अडचणीच्या वेळी मात्र गाजर खाऊन म्हणजे सकस-चौरस आहाराची अपेक्षा न करता, जे ताटात पडेल ते गोड मानावे, असा सल्ला ही म्हण आपल्याला देते. या उलट आर्थिक परिस्थिति सुरळीत झाल्यावर पुन्हा गजराचे केळं होते अशी भावना सुद्धा इथे व्यक्त होते.
अवंती : मेधाकाकू... यालाच संस्कृतीचा वारसा असे म्हणतात का ? किती वेगळे आहे हे सगळे...!!
मेधाकाकू : हं... अवंतीबाई, आज एकदम शिक्षकाच्या मोडमधे शिरलेल्या दिसताय. आता ही पुढची गम्मत ऐक... पुन्हा एकदा इतका वेगळा विषय आणि चपखल दृष्टान्त.
टाका आगळे लिहावे घासा उणे जेवावे
या म्हणीत वेगळा विषय मांडला आहे, थोडासा विरोधाभास निर्माण करणारा. विरोधाभास असा एका बाजूला पहिल्या अर्ध्या भागात लिहिल्यानुसार, स्वत:शीच स्पर्धा करून दररोज प्रगती करावी आणि दुसरीकडे, कुठल्याही गोष्टीत करण्याचे, अपेक्षित मर्यादांचे पालन नक्की करावे. म्हणजे बघ “टांका आगळे लिहावे” म्हणजे रोज लिहिण्याचे हिशेब-दैनंदिनी आणि अन्य लिखाण नियमित करावे आणि रोज चार-सहा वाक्ये जास्तच लिहिण्याचा प्रयत्न करावा असा दैनंदिन प्रगति साधायचा सल्ला आहे. तर पुढच्या अर्ध्या भागात “घासा उणे जेवावे” म्हणजे आहाराची मर्यादा पाळावी, दोन घास कमीच जेवावे. ज्या योगे उत्तम आरोग्य राखता येते. फक्त सहा शब्द मात्र सल्ला लाख मोलाचा.
अवंती : मेधाकाकू... आता मी ‘घासा उणे जेवावे’ हा सल्ला ऐकून ‘शब्दा उणे बोलावे’ असे ठरवलय कारण मी उत्सुकतेने फक्त ऐकत्ये आहे तुझे विषय विस्तार...!!
मेधाकाकू : अवंतीबाई.. हे सगळे ऐकून तुझा साहजिकच समज होईल की या म्हणी आणि वाकप्रचार फक्त सल्ले देतात, पण फक्त तसे नाहीये. अशा अनेक वाकप्रचारात व्यक्तीच्या आणि कधीतरी संपूर्ण समाजाच्या गुणवत्तेचे कौतुकही केलेले दिसते...!!
डोंगरचे अवळे सागरचे मीठ
हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या चैत्र महिन्यात, म्हणजे साधारण मार्च–एप्रिल मधे सुगीचा काळं असल्याने आपल्या प्रत्येक घरात, काही लगबग सुरू असायची. पन्नास-सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट सांगत्ये मी. वर्षभराच्या बेगमीचे पापड-कुर्डया-चिकवडया किंवा हळकुंड कुटून हळद, मिरच्या कुटून तिखट आणि लोणची बनवण्याचा कार्यक्रम नेमाने होत असे. शेजार-पाजारच्या महिला एकत्र जमून एकमेकींना मदत करत असत. नवविवाहितेचा उत्साह बघून एखादी शेजारीण कौतुकाने म्हणे बघा बाई हिची मेहनत निगुतीने हिने सगळे साहित्य कसे न विसरता जमविले आहे माहेरची शिकवण छानच आहे. अगदी “डोंगरचे अवळे सागरचे मीठ”, जमा केलाय जणू हिने.
अवंती : मेधाकाकू... आता तुझी श्रावण महिन्यातली होणारी लगबग मला दिसते आहे. तिकडे माझी आई आणि आजी आणि इथे तू... सोमवार-मंगळवार - शनिवार छान उत्साहाने साजरे करताय. आणि माझी आणि सर्व मुलांची त्यामुळे चंगळ झाल्ये श्रावण महिन्यात नेमके बनणारे पदार्थ चाखण्यात. आजच बघना, नागपंचमी निमित्त आईने तांदूळाच्या रव्याची मस्त खांडवी बनवल्ये. म्हणून आता पळंते मी, तोंडाला पाणी सुटले आहे आणि हो तू पण चल... आजीने तुलाही हाक मारल्ये...!!
- अरुण फडके