सदिच्छा आणि व्यवस्थापन

    27-Jul-2017   
Total Views | 1

 


 

’जग अधिक चांगलं झालं पाहिजे,’ अशी सदिच्छा असणार्‍या लोकांची संख्या ’जगाला बुडवूनच आपण मोठं झालं पाहिजे,’ असे म्हणणार्‍या लोकांपेक्षा अधिक असते, पण तरीही बर्‍याचवेळा सज्जनांपेक्षा कारस्थानी लोकच जगात अधिक यशस्वी झालेले दिसतात. याचे कारण, यशस्वी व्हायचे असेल तर कारस्थानी लोकांना आपल्या कार्यक्षमता पूर्णपणे वापराव्या लागतात, पण अनेक सज्जनांना असे वाटते की, आपण सज्जन आहोत म्हणूनच आपल्याला यश मिळाले पाहिजे. परंतु, हेतूंचा यशस्वितेशी संबंध नसतो. मात्र, कोणत्या हेतूने यश मिळाले आहे याचा ती व्यक्ती, संस्था किंवा समाज यांच्यावर होणार्‍या परिणामांशी संबंध असतो. हिंदू तत्त्वज्ञानानुसार तामसी हेतूतून मिळालेले यश हे यश मिळविणारी संस्था किंवा व्यक्ती आणि समाज या दोन्हींचाही विनाश करणारे असते. रजोगुणातून मिळालेले यश हे समाजाला अंशतः हितकारक असले तरी ते यश ज्याला मिळते त्याला अंतिमतः अहितकारक असते. सत्वगुणातून मिळणार्‍या यशाला वेळ लागतो. पण ते यश समाज व मिळवणार्‍याला दोघांनाही हितकारक असते. पण त्यासाठी ज्यांच्यापाशी सदिच्छा आहे, त्यांना व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी होण्याचे मार्ग शिकून घ्यावे लागतात. हे मार्ग हेतूनिरपेक्ष असतात. जसे आगीला हात लागल्यावर हात लावणारी व्यक्ती कशी आहे, याचा आग विचार करीत नाही. तसेच जे धोरणात्मक विचार अधिक कार्यक्षमतेने करू शकतात, तेच जीवन संघर्षात विजयी होतात. कृष्णाने ’संभवामि युगे युगे’ म्हणून हिंदू समाजाचे फार मोठे नुकसान करून ठेवले आहे. त्यामुळे साधूंची आपण आपल्या बळावर विजयी झाले पाहिजे, अशी इच्छाशक्तीच अनेक पिढ्या नष्ट होऊन गेली होती. तो वारसा अजूनही कायम ठेवणारे लोक आपणाला क्षणोक्षणी भेटत असतात.

वास्तविक पाहाता, कृष्ण हाही आपल्या जीवनात केवळ आपल्या सज्जनतेवर भरवसा ठेऊन वागलेला नाही. त्याने पांडवांचे समर्थन केले, कारण पांडवांकडे युधिष्ठिरासारखा न्याय्यबुद्धी असलेला नेता असला तरी त्यामागे अर्जुन व भीमयांचे सामर्थ्य उभे होते. पांडव वनवासात गेले तरी तेथे नवनवी शस्त्रे मिळविण्याची त्यांची साधना सुरू होती. महाभारतातील पांडवांचे यश हे कृष्णाचे धोरणात्मक यश, युधिष्ठिराची न्याय्यबुद्धी व अर्जुन आणि भीमाचे शौर्य यांच्या युतीतून मिळालेले होते. या तीन गोष्टी जोवर एकत्र येत नाहीत, तोवर केवळ सज्जनपणावर व्यावहारिक यश मिळत नाही. या एकत्र येण्याबरोबरच सांघिक हितासाठी प्रत्येकाने आपापला अहंकार बाजूला ठेवला हेही महत्त्वाचे होते. ’न धरी शस्त्र करी मी’ म्हणून युद्धात उतरलेल्या कृष्णाने भीष्म आटोपेनासे झाल्यावर हाती शस्त्र घेतले. कधीही असत्य भाषण न करणार्‍या युधिष्ठिराने ’अश्वत्थामा मेला, नरो वा कुंजरोवा’ म्हणून आपल्या गुरूच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे असत्य भाषण केले, कोणत्याही योद्ध्याशी समोरासमोर लढण्यालाच क्षत्रिय धर्म मानणार्‍या अर्जुनाने शिखंडीच्या आडून भीष्माचार्यांना पराभूत केले आणि विरथ असलेल्या कर्णाला युद्धात ठार मारले. उत्तम व्यवस्थापन शास्त्रात या सर्व घटकांचा समावेश होतो, पण आपणाला महाभारताचा उपयोग इथल्या आयुष्यात यशस्वी होण्याचे शास्त्र शिकण्यापेक्षा स्वर्गात पुण्य मिळविण्याकरिता करायचा असल्याने शोकांतिका झाली आहे.

यशस्वी व्यवस्थापनशास्त्राचा पहिला महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे, आपल्या कामाच्या प्राथमिकता ठरविणे. कारस्थानी लोकांना याचा विचार करावा लागत नाही, याचे कारण आपल्याला काय साधायचे आहे, याची त्यांना स्पष्टता असल्याने त्यांच्या मनात संदिग्धता नसते. याउलट सज्जन लोकांना सर्वच जगाचे भले करायचे असल्याने आणि असे भले करण्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्याने आपल्या कुवतीचा अंदाज न घेता ते अनेक कामांना एकाचवेळी हात घालतात आणि त्यातच फसून जातात. आपल्यासोबत काम करणार्‍या माणसांची कुवत, आपल्या हाती असणार्‍या साधनांच्या मर्यादा यांचा ते कधीच विचार करीत नाहीत. आजच्या जगात एकट्याच्या बळावर कोणतेही काम यशस्वी होत नाही, त्यासाठी मानसिकता निर्माण करावी लागते आणि त्यासाठी संयम, समूह भावनेने काम करणारे सहकारी, कार्यक्षम साधने व अचूक वेळ या सर्वांचा मेळ घालावा लागतो. याकरिता प्रथम प्रशासनावर पकड निर्माण व्हावी लागते व आपल्या नेतृत्वाबाबत आपल्या सहकार्‍यांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो, याचाही त्यांना विसर पडतो. त्यामुळे माणसे चांगली, हेतू चांगला, योजना चांगली, पण हाती अपयश अशी परिस्थिती निर्माण होते.

हे व्हायचे नसेल तर अशा घडणार्‍या प्रकारांची चिकित्सा करणे गरजेचे असते. अनेक वेळा अशा घडलेल्या घटनांबाबत व्यावसायिक चिकित्सा करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवून त्याच्या डोक्यावर अपयशाचे खापर फोडले जाते. किंबहुना, व्यावहारिक जगातील संघर्षाबद्दल अनभिज्ञ असल्याने अशी व्यक्तीच बळीचा बकरा बनून लोकांसमोर येते. जे कारस्थानी लोक आहेत त्यांना व्यावहारिक डावपेचांचे अंगभूत ज्ञान असल्याने त्यांना माणसे, परिस्थिती कशी हाताळायची याचे कौशल्य असते. कारण, तोच त्यांच्या जीवनाचा आधार असतो, परंतु आपल्याला जगाचे भले करायचे असल्याने त्याला सर्व लोक सहकार्यच करतील, अशी त्यांची भाबडी समजूत असते. जे मतलबी लोक असतात तेच प्रथम पुढे पुढे करतात, याची त्यांना कल्पना नसते. जे त्यांना खरे मदत करू इच्छितात ते मागेच वाट पाहात थांबलेले असतात. जे मतलबी असतात त्यांची भाषा एवढी मोहक असते, त्यांचे वागणे इतके विनम्र आणि लाघवी असते व घोळका करून वाट पाहण्याची त्यांची एवढी तयारी असते की, त्यांना खरोखर मदत करण्याची ज्यांची तयारी आहे ते वाट पाहूनच थकून जातात. जे मतलबी आहेत त्यांना सत्तस्थानाभोवती गर्दी करणे व त्यातून मिळेल तो लाभ घेणे एवढेच काम असते. मात्र, ज्यांना खरोखर काही चांगले काम करायचे असते ते आपल्या नेहमीच्या आयुष्यात काही ना काही काम करीतच असल्याने ते आपापल्या कामात मग्न राहातात. जेव्हा चांगल्या हेतूने प्रेरित झालेली, पण मतलबी माणसांनी घेरलेली व्यक्ती जेव्हा अपयशी होते, तेव्हा त्यांच्या दृष्टीने तोही मत्सरी आनंदाचा विषय ठरतो. १९७७ साली जनता पक्षाची सत्ता आली. त्यावेळी जे मंत्रिमंडळ सत्तेवर आले त्याची गुणवत्ता भारताच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या पहिल्या मंत्रिमंडळाशी तुलना करण्यासारखी आहे, असे वर्णन अनेक वृत्तपत्रांनी केले होते. परंतु, आपल्यापुढची पहिली प्राथमिकता लोकांची कामे करून त्यांचा विश्वास मिळविण्याची आहे, हा विचार बाजूला ठेऊन प्रत्येकाने आपापली प्राथमिकता निश्चित केली. त्याचा परिणाम जनता पक्षाच्या विघटनात झाला आणि सर्वच भांडणार्‍या नेत्यांना विजनवासात जावे लागले. सत्तास्थानी आल्यानंतर पहिली प्राथमिकता ही सत्तेची ताकद आणि मर्यादा समजून घेणे, आपल्या समोरील प्रश्नांची प्राथमिकता लावणे, त्या प्रश्नाला सक्षमपणे तोंड देऊ शकेल, अशी टीम उभी करणे व आकर्षक घोषणांच्या मागे न जाता आपण आपल्या बळावर परिवर्तन करू शकतो, असा त्या टीममध्ये विश्वास निर्माण करणे या टप्प्यातूनच प्रत्येकाला जावे लागते. उत्तम व यशस्वी व्यवस्थापन ही एक वेगळी साधना आहे. स्वस्त लोकप्रियतेच्या मागे न जाता पण आपल्या डोळ्यासमोरच्या उद्दिष्टाचा विसर पडू न देता क्रमाक्रमाने पण पक्क्या यशाच्या पायरीवर नेणारी. डोळ्यासमोरच्या भव्य स्वप्नाचा विसर पडू न देता वास्तवाचे भान ठेवणारी. शिवाजी महाराजांच्या पोवाड्यापेक्षा त्यांच्या यशस्वी व्यवस्थापनेचे मर्म जरी जाणून घेतले तरी सज्जन माणसांच्या व्यावहारिक अपयशांच्या शोकांतिका कमी होतील. अशी माणसे जेव्हा अयशस्वी होतात तेव्हा केवळ त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास कमी होतो असे नाही, तर चांगली माणसे जगात काही चांगले करू शकतात यावरचाच विश्वास कमी झालेला असतो.

 

- दिलीप करंबेळकर

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121