माणुसकीचा ' विजय '

    27-Jul-2017   
Total Views | 7
 
 

 
शिवसृष्टी... कुर्ल्यातील एक प्रामुख्याने मराठी मध्यमवर्गीयांची वसाहत. वन रूम किचन असलेल्या १३१ खोल्यांची चाळवजा इमारत. मराठमोळ्या मध्यमवर्गीय संस्कृतीत येथील मुले वाढली. चाळ संस्कृतीप्रमाणे येथील दरवाजे सगळ्यांसाठी उघडे असत. शेजारच्यांचा नातेवाईक हा सगळ्या चाळीचा नातेवाईक असे. एखादी काकू हातात वाण सामानाची पिशवी घेऊन जात असेल, तर चाळीतला कोणताही मुलगा ती पिशवी काकूंना घरपोच करी. मुलं एकत्र येऊन क्रिकेट, लगोर्‍या, गोट्या, भोवरा, पतंग असे खेळ खेळायचे. क्रिकेटमध्ये ज्याची बॅट त्याला दोनदा आऊट माफ असायचं. चाळीतल्या एखाद्याच्या घरी शुभकार्य असेल तर ते सगळ्या चाळीचं शुभकार्य असायचं. याउलट एखाद्या घरावर काही संकट आलं, तर संपूर्ण चाळ एकत्र येऊन ते संकट दूर करत असे. लहान मुलांवर मोठ्यांचं लक्ष असे. असं एकंदर माणुसकीचं वातावरण होतं. याच माणुसकीच्या वातावरणात बाबूसिंग पवार राहायला आले.
 
 
बाबूसिंग पवार मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्रीचे. अत्यंत हलाखीची परिस्थिती त्यांनी अनुभवली. घरच्या शेतात भाजी पिकवून, ती भाजी बाजारात विकून त्यांनी आपलं बीए, एमएचं शिक्षण पूर्ण केलं. एमपीएससीची सरळसेवा परीक्षा दिली आणि सरकारी नोकरीत रुजू झाले. दरम्यान बाबूसिंग यांना ४ मुले झाली. ३ मुली आणि १ मुलगा. बाबूसिंगच्या चारही मुलांचं बालपण याच चाळवजा इमारतीत गेलं. खेळासोबतच इथली मुलं शिक्षणातसुद्धा पारंगत होती. डॉक्टर होणं म्हणजे यशाचं एव्हरेस्टच होतं जणू. विजय ज्या माळ्यावर राहायचा, त्या माळ्यावर तब्बल ७ मुलं डॉक्टर झाली. बाबूसिंग पवारांनी आपल्या मुलांनादेखील उत्तम शिक्षण दिलं. एक मुलगी डॉक्टर, दुसरी मुलगी शिक्षिका तर तिसरी फार्मासिस्ट झाली. मुलगा विजय अभियांत्रिकीकडे वळला. व्हीजेटीआय या संस्थेतून तो सिव्हिल इंजिनिअर झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कंत्राट असलेल्या एका संस्थेत विजयला इंटर्नशिपची संधी मिळाली. इंटर्नशिप करत असताना विजयने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ही परीक्षा विजय पास झाला. त्याची थेट रवानगी लघुउद्योग विकास महामंडळात प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून झाली. वयाने लहान, संगणकाचं उत्तम ज्ञान, इंग्रजी आणि मराठी भाषेवरचं प्रभुत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनमिळाऊ स्वभाव यामुळे तो सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत झाला. अगदी काही आयएएस अधिकारीसुद्धा याला अपवाद नव्हते. दरम्यान विजयचं धनश्रीसोबत लग्न झालं. धनश्री व्यवसायाने डॉक्टर. सगळं कसं नीट चाललं होतं. त्याचवेळी एका उच्च अधिकार्‍याने विजयला सांगितलं की, ’’तुझं टॅलेण्ट तू या शासकीय सेवेत काही वर्षे घालविल्यानंतर त्याचा लाभ काहीच लोकांना होईल, पण जर तू तुझं टॅलेंट व्यवसायासाठी वापरशील तर त्याचा फायदा अगणित लोकांना होईल. उद्योजक म्हणून तू स्वत: घडशीलच सोबतच हजारो लोकांना रोजगार देशील, जे खूप महत्त्वाचं आहे.’’ मोठ्या बंधु समान असलेल्या त्या अधिकार्‍याचं म्हणणं विजयला मनोमन पटलं होतं. मात्र, नोकरी सोडायचं धाडस होत नव्हतं. मुलगा सिद्धेश अवघ्या सहा महिन्यांचा झाला होता. घरच्यांनी देखील नोकरी सोडू नकोस, असं सांगितलं होतं. मात्र, पत्नी धनश्री विजयच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. ’’तू घराची काळजी करू नकोस, मी आहे,’’ अशा शब्दांत तिने विजयला विश्वास दिला आणि तीन वर्षे शासकीय सेवेत घालविल्यानंतर विजयने नोकरी सोडली.
 
पत्नीची साथ, बचत खात्यात असलेले १५ हजार रुपये आणि जिद्द एवढंच भांडवल हाती असलेला २९ वर्षांचा विजय कोणता व्यवसाय करायचा हा विचार करत कट्‌ट्यावर बसला होता. त्याचवेळी त्याला पत्रा रंगविणारा एक पेंटर दिसला. घर रंगवायला काहीच भांडवल लागत नाही. जे काही पैसे लागतात ते समोरच्याकडून घ्यायचे असतात. मग हाच व्यवसाय केला तर.... आणि इंजिनिअर असलेल्या या माजी सरकारी अधिकार्‍याने पेंटरचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरु केल्यानंतर त्याच्या मदतीला आली ती शिवसृष्टी. लहानपणापासूनचे असलेले मित्र, मित्रांचे नातेवाईक, विजयचे नातेवाईक यांनी विजयला इंटिरिअर पेंटिंगच्या ऑर्डर्स दिल्या. त्याचवेळी एका मित्राने विद्याविहार येथील एका मोठ्या व्यावसायिक इमारतीचं कामविजयला मिळवून दिलं. विजयने काही दिवसांत हे कामपूर्ण केलं. या कामासोबत अवघ्या एका वर्षांतच विजयने उलाढाल केली तब्बल अडीच कोटी रुपयांची. वर्ष होतं २०१०. विजयकडे ऑफिस नव्हतं. सेकंडहँड घेतलेल्या गाडीत त्याने लाकडी फळ्यांचा रकाना तयार केला होता. यामध्ये एखाद्या ऑफिससाठी लागणार्‍या फायली, स्टेशनरी असं सर्व सामान असायचं. पेंटिंग करण्यासाठी येणार्‍या कामगारांची हजेरी, त्यांचा पगार ही सगळी कामे तो एका हॉटेलच्या टेबलवर बसून करायचा. यानंतर हळूहळू कामाचा पसारा वाढतंच गेला. अवघ्या तीन वर्षांत विजयच्या या पेंटिंग कंपनीने १० कोटी रुपयांची उलाढाल केली. कंपनीचा पसारा वाढल्याने विजयने घाटकोपरला १५० चौरस फुटांचं एक ऑफिस भाड्याने घेतलं. आता जमिनीत गुंतवणूक करावी, या उद्देशाने एक जागा पाहण्यास विजय शहापूरला गेला. विजयचे वडील बाबूसिंग पवार प्रामाणिक अधिकारी म्हणून सर्वांना माहीत होते. अनेकांना त्यांनी मदत केली होती. कसल्याही फळाची अपेक्षा न करता निःस्वार्थीपणे जमेल तशी सर्वांना मदत करायची, असा त्यांचा स्वभाव. हेच गुडविल विजयच्या कामी आले. नेमके ते जमीन मालक विजयच्या वडिलांचे मित्र निघाले. त्यांनी विजयला संबंधित सात कोटी रुपये बाजारभाव असलेली जागा सहा कोटी रुपयांना देण्याचे कबूल केले. विजयने ही रक्कमसहा भागांमध्ये दीड वर्षात देण्याची परवानगी मागितली. त्याला त्या जमीनमालकांनी परवानगी दिली. गमतीचा भाग म्हणजे कोटींचा व्यवहार करण्याचा मनसुबा असणार्‍या विजयच्या बचतखात्यात त्यावेळेस होते अवघे एक लाख रुपये. पहिला एक कोटी रुपयांचा हप्ता द्यायचा होता. एका मित्राच्या वडिलांनी निव्वळ विजयवरच्या विश्वासापोटी त्यास २५ लाख रुपयांचा चेक दिला. अन्य मित्रांनी देखील मदत केली. असे करता करता ८० लाख रुपये जमा झाले. आणखी २० लाख रुपयांची आवश्यकता होती. यावेळी तिन्ही बहिणींच्या नवर्‍यांनी मदत केली. अक्षरश: प्रोव्हिडंट फंडामधले पैसे आणून दिले आणि एक कोटी रुपयांचा पहिला चेक दिलेल्या वेळेनुसार विजयने त्या घरमालकांना दिला. या जमिनीवर पहिला प्रोजेक्ट ओऍसिस इस्टेट विजयच्या मिराडोर कंपनीने काही दिवसांत उभारला. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर विजयने मागे वळून पाहिलेच नाही. ओऍसिस इस्टेटनंतर अवनी, उत्सव, प्रांगण असे एकेक प्रकल्प सुरू झाले. गेल्या तीन वर्षांत विजयच्या कंपनीने ५०० बंगलो, फ्लॅट्सची विक्री केली आहे. अवघ्या तीन कर्मचार्‍यांनिशी सुरू झालेल्या मिराडोर कंपनीकडे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. येत्या पाच वर्षांत १० हजार फ्लॅट्सचे हस्तांतरण आणि ७०० कोटी रुपयांवरची उलाढाल हे विजय पवारांच्या मिराडोर कंपनीचं उद्दिष्ट आहे. कंपनीची शेअर बाजारात देखील लवकर नोंदणी होणार आहे. ही नोंद झाल्यानंतर कंपनीची उलाढाल दोन हजार कोटी रुपयांची होईल, असा विजय पवारांचा विश्वास आहे.
 
विजय पवारांच्या पत्नी डॉ. धनश्री पवार मिराडोर फाऊंडेशन ही संस्था चालवितात ही संस्था ऑटिझमग्रस्त मुले, कुपोषित मुले आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करते. शहापूर येथील आदिवासी पाड्यातील मुलांसाठी ही संस्था शैक्षणिक आणि आरोग्य स्तरावर मोठ्या प्रमाणावर कार्य करते. शून्यातून सुरुवात करून आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पाहणार्‍या विजय पवारांना त्यांच्या व्यावसायिक यशाचं रहस्य विचारलं असता ते एकाच शब्दांत उत्तर देतात. ते म्हणजे माणुसकी. ‘मी घरं बांधतो, मी संस्था चालवतो,’ या सगळ्यांचा अंतिमउद्देश एकच माणुसकी. माणुसकी जिवंत ठेवणारी चाळ संस्कृती मला आधुनिक स्वरूपात मी बांधलेल्या घरांच्या माध्यमातून नव्या पिढीला द्यायची आहे. बहिणाबाईंच्या ’पेर्ते व्हा’ कवितेप्रमाणे माणुसकी पेरायची बस्स. सर्वसामान्य कुटुंबातील एक इंजिनिअर मुलगा ते १०० कोटींची उलाढाल असलेला यशस्वी बांधकामव्यावसायिक व्हाया शासकीय अधिकारी हा विजय पवारांचा प्रवास थक्क करणारा आहे.
 
- प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

लेखक ‘युक्ती मीडिया कन्स्लटन्सी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून २०१० साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी संज्ञापन व पत्रकारिता विषयात मास्टर्स केले आहे. ते ‘डिक्की’चे सदस्य असून उद्योग, उद्योजकता यांचा गाढा अभ्यास व त्यासंबंधी लिखाणात त्यांचा हातखंडा आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121