आज कारगिल विजय दिवस.. भारतीयांसाठी एक अत्यंत गौरवाचा, पराक्रमाची आठवण करुन देणारा हा दिवस. कारगिलचे युद्ध भारताच्या इतिहासातील एक खूप महत्वाची अशी घटना होती. यामुळे भारताने त्याची शक्ती तर दाखवलीच मात्र भारत शांतता जपणारा देश जरी असला तरी भारताच्या सुरक्षेवर गदा आल्यास भारत शक्तीशाली देखील आहे, हे जगाला कळले. मात्र कारगिल म्हटले की मला आठवतात ते म्हणजे माजी पंतप्रधान अटल बहारी वाजपेयी..
खरं तर मी तेव्हा खूप लहान होते. केवळ ५ वर्षांची होते. मात्र मोठी झाल्यानंतर जेव्हा आई वडीलांकडून कारगिल युद्धाबद्दल ऐकले, अनेक ठिकाणी वाचले तेव्हा या बद्दल बरेच काही समजले. मात्र त्याहूनही जास्त मनात ठसणारी घटना म्हणजेच, "हम जंग ना होने देंगे" या अटलजींच्या कवितेवर नटराज क्लासेस या नृत्यसंस्थेची नृत्यनाटिका.. (याच संस्थेत नृत्य शिक्षिका नीरजी बोधनकर यांच्याकडे मी नृत्य शिकण्यास सुरुवात केली.. ती आज तागायत..)
त्यावेळी मला अटलजींची एक नवी ओळख झाली. कारगिल युद्धाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघणारी त्यांची ही कविता माझ्या मनात ठसली. आज कारगिल यु्द्धाचा विजय दिवस साजरा करताना, त्यांची ही कविता राहून राहून माझ्या मनात येत आहे.
युद्धात भारताने विजय नक्कीच मिळवला. मात्र या युद्धात भारताच्या अनेक वीर जवानांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक परिवार उध्वस्त झाले. अनेक लहान मुलांच्या डोक्यावरुन वडीलांचे छत्र हरपले. भारताने ऐतिहासिक विजय मिळवलाच मात्र एक मोठी किंमतही भारताला मोजावी लागली, ती म्हणजे अनेको सैनिकांचे प्राण. युद्ध हे कधीच कुठल्याही देशाच्या हितासाठी नसतेच. मात्र त्यावेळी ते आवश्यक असते. आपल्या वीर सैनिकांच्या पराक्रमामुळे भारताने पाकिस्तान सारख्या दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या देशाला त्याची जागा दाखविली. तरी देखील तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या संवेदनशील मनात युद्धामुळे उध्वस्त झालेल्या परिवारांविषयी करुणा होती.. आणि तीच या कवितेतूनही झळकते.
हम जंग न होने देंगे!
विश्व शांति के हम साधक हैं, जंग न होने देंगे!
कभी न खेतों में फिर खूनी खाद फलेगी,
खलिहानों में नहीं मौत की फसल खिलेगी,
आसमान फिर कभी न अंगारे उगलेगा,
एटम से नागासाकी फिर नहीं जलेगी,
युद्धविहीन विश्व का सपना भंग न होने देंगे।
जंग न होने देंगे...
अटल बिहारी वाजपेयी सुरुवातीपासूनच 'विश्वशांती'चे पुरस्कर्ते होते. वरील ओळींमधून त्यांच्या या भावना नक्कीच दिसून येतात. आपण विश्व शांततेचे साधक आहोत, शेतांमध्ये आता पुन्हा कधीच रक्ताचे खत जाणार नाही, आकाशातून आता पुन्हा कधीच ठिणग्या पडणार नाहीत, जे नागासाकीचं झालं ते इतर कुठल्याच देशाचं आपण होवू देणार नाही.. कारण "हम जंग न होने देंगे.." युद्धात झालेल्या रक्तपातामुळे त्यांचे विषण्ण मन इथे दिसून येत आहे.
हथियारों के ढेरों पर जिनका है डेरा,
मुँह में शांति, बगल में बम, धोखे का फेरा,
कफन बेचने वालों से कह दो चिल्लाकर,
दुनिया जान गई है उनका असली चेहरा,
कामयाब हो उनकी चालें, ढंग न होने देंगे।
जंग न होने देंगे..
ही कविता आजच्या काळासाठी देखील किती समर्पक आहे नाही.. पाकिस्तानची वाढती कारस्थाने, दहशतवादाला पाठींबा देऊनही पाकिस्तानचा दुटप्पीपणा, सतत होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, कदाचित आजचे हे स्वरूप अटल बिहारी वाजपेयींना त्यावेळी माहीत नसेल, पण आजच्या परिस्थितीतही या ओळी चपखल बसतात. आज पाकिस्तानचा देखील शस्त्रांवर "डेरा" आहे, आणि दहशतवादाच्या माध्यमातून तो जगाला दिसून पण येत आहे. "आम्ही दहशतवादाला पाठींबा देत नाही." असे पाकिस्तानने किती का ओरडून सांगितले तरी देखील आज त्यावर कुणाला तरी विश्वास बसेल का? त्यामुळे आता जगाला त्यांचा "खरा चेहरा" दिसून येत आहे... त्यांचे हे षढयंत्र आजही यशस्वी होवू न देणे आपले प्रमुख लक्ष्य आहे. हीच वाजपेयींच्या या कवितेला खरी मानवंदना ठरेल...
हमें चाहिए शांति, जिंदगी हमको प्यारी,
हमें चाहिए शांति, सृजन की है तैयारी,
हमने छेड़ी जंग भूख से, बीमारी से,
आगे आकर हाथ बटाए दुनिया सारी।
हरी-भरी धरती को खूनी रंग न लेने देंगे
जंग न होने देंगे।
युद्ध झाले.. ते संपले.. इतर नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर आले.. मात्र ज्यांनी आपला वीर मुलगा गमावला त्यांचं काय? ज्यांनी आपले वडील गमावले त्यांचे काय? ज्या नवविवाहितेचा नवरा येतो असे सांगून कधी न परतण्यासाठी गेला तिचे काय? या सगळ्यांना काय हवे आहे? तर उत्तर एकच आहे संपूर्ण जगात शांतता... त्या काळाप्रमाणे आजही आपल्यासमोर गरीबी, बेरोजगारी, अनेक समस्या आहेत, भारत सरकारच्या स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि अनेक योजनांच्या माध्यमातून आज आपण प्रगती पथावर आहोत. जीएसटी सारखे विधेयक आज आले आहे, त्यामुळे आजची परिस्थिती त्या काळापेक्षा नक्कीच खूप सुस्थितीत आहे. मात्र दहशतवाद ही समस्या आजही खूप मोठी आहे, त्यासाठी लढणेही आवश्यक आहे. कदाचित त्यानंतरच जगात अशी शांतता येईल, जी कधीच भंग होणार नाही....
भारत-पाकिस्तान पड़ोसी, साथ-साथ रहना है,
प्यार करें या वार करें, दोनों को ही सहना है,
तीन बार लड़ चुके लड़ाई, कितना महँगा सौदा,
रूसी बम हो या अमेरिकी, खून एक बहना है।
जो हम पर गुजरी, बच्चों के संग न होने देंगे।
जंग न होने देंगे।
अटल बिहारी वाजपेयी यांच्या इच्छा, आकांक्षा किती निर्मळ होत्या हे या ओळींमधून दिसून येत आहे. तसेच केवळ भावनिक न होता, त्यांनी या भावना खूप "प्रॅक्टिकली" मांडल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये कितीही तणाव असला तरी भौगोलिक दृष्ट्या त्यांना नेहमीच एकमेकांच्या शेजारीच रहायचे आहे. आपल्याला आपला शेजारी आवडला नाही तर आपण घर बदलू शकतो मात्र भारत पाकिस्तानचे तसे नाही ना.. तीनदा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले.. रक्त दोन्ही कडून वाहिले.. तरी देखील आज पाकिस्तान शहाणा झाला नाही. आजही त्यांची कारस्थाने, दहशतवादी हल्ले सुरुच आहेत. याला धडा शिकवणे, त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणे देखील गरजेचे आहेच...
आज या वयात देखील वाजपेयी कदाचित हे सगळं बघत असताना मनातल्या मनात तोच विचार करत असतील की, "जे आपल्या सोबत झाले ते आपल्या पुढच्या पीढी सोबत होवू नये.." त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली, युवा पीढीची आहे..
अटलजींच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचा असेल, विश्वशांतता जपायची असेल, निर्माण करायची असेल तर त्यासाठी आपसातील मतभेत संपविणे सगळ्यात महत्वाचे आहे. जातीय भांडणे, राजकीय लढाया या सगळ्या पलीकडे एक भारत आहे, ज्याचे स्वप्न वाजपेयींनी बघितले आहे. ते पूर्ण करायचे असेल तर केवळ "पाकिस्तानने माझ्या वडीलांना नाही मारलं यु्द्धाने मारलं" हे म्हणून चालणार नाही. अटल बिहारी वाजपेयी देखील युद्धाच्या बाजूने नव्हते, आपल्या पैकी कुणीच नाहीये.. मात्र योग्य त्यावेळी चोख प्रत्यूत्तर देणे देखील गरजेचे असते. ते दिल्यानंतर कदाचित "जंग विरहीत जग" आपल्याला दिसेल...
अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी एक पाऊल पुढे आपल्याला टाकणं आवश्यक आहे, हो ना...
- निहारिका पोळ