भाजप नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी ह्यांचे नाव मीडियामधून सतत गाजते. सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेले स्वामी हे एक अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जातात. ते एखाद्या केसच्या मागे लागले की त्या केसचा निकाल लागेपर्यंत ते त्या केसचा चिवटपणे पाठपुरावा करत राहतात अशी त्यांची ख्याती आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये जेव्हा देशावर आणीबाणी लादली तेव्हा त्या अनिर्बंध हुकूमशाही विरुद्ध लढणाऱ्या प्रमुख भारतीय नेत्यांपैकी डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे एक होते. आणीबाणी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि काँग्रेसचा दुटप्पीपणा ह्या विषयावर महाएमटीबी ह्या वेब पोर्टलतर्फे मी घेतलेली ही त्यांची खास मुलाखत.
सध्या पारंपारिक मीडियामधून 'असहिष्णुता' ह्या शब्दाचा फार डंगोरा पिटवला जातोय. सध्याच्या सरकारने काहीही केले किंवा देशात कुठलीही गुन्हेगारी घटना घडली की लगेच ही 'मोदींची आणीबाणी आहे' म्हणून आक्रोश करणारे लोक खऱ्या आणीबाणीविषयी बोलायला उत्सुक नसतात. असे का ?
स्वामी - पहिली गोष्ट, कुठलीही गुन्हेगारी स्वरूपाची घटना घडली की हे लोक 'आजची आणीबाणी' असा उल्लेख करतात तेव्हा त्यांना असं म्हणायचंय का की काँग्रेसच्या राजवटीखाली असलेल्या कर्नाटक राज्यात अश्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत नाहीत? समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा अश्या स्वरूपाच्या घटना कधी घडल्याच नाहीत ना? भाजपच्या लोकांचा ह्या गुन्हेगारी घटनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुरावा आहे का? संघ परिवारातल्या लोकांनी हिंसक हल्ले केल्याचे पुरावे आहेत का? कोणाला अटक झालेली आहे का? काँग्रेसवालेच समाजकंटकांना पैसे देऊन असे हल्ले घडवून आणत नसतील कशावरून? एका घटनेची मी स्वतः चौकशी केली. इथे महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. मी टीव्हीवर बघितलं की तथाकथित शेतकरी ट्रकच्या ट्रक केळी रस्त्यावर फेकून देत आहेत. मला आश्चर्य वाटलं, कारण खरा हाडाचा शेतकरी त्याने घाम गाळून पिकवलेलं पीक असं रस्त्यावर फेकून का देईल ? माझ्या चौकशीत असं कळलं की, काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी पैसे देऊन ते ट्रक विकत घेतले होते आणि हे सर्व घडवून आणलं होतं. काही महिन्यांपूर्वी 'चर्चवर हल्ले' अश्या मथळ्याच्या बऱ्याच बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या पण चौकशीअंती असं निष्पन्न झालं की त्यातला प्रत्येक हल्ला हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तिगत कारणामुळे केला गेलेला होता. मागे बहादूरगडमध्ये एका दलित कुटुंबाला जिवंत जाळल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मीडियाने त्या गुन्ह्याला 'दलित विरुद्ध सवर्ण' असे रूप द्यायचा खूप प्रयत्न केला पण त्या दलित कुटुंबातल्या भाऊबंदकीमुळेच हा प्रकार झाला होता हे पुलिस चौकशीतून बाहेर आलं. ज्या दलितांनी स्वतःच्याच नातेवाईकांविरुद्ध हे भीषण कृत्य केलं त्यांना अटक झाली आणि सध्या ते कैदेत आहेत.
एकीकडे काँग्रेसचे नेते देशात असहिष्णूता वाढतेय, लेखकांना, विचारवंतांना बोलू दिले जात नाही असा कांगावा करतात आणि दुसरीकडे त्यांचे नेते हुल्लडबाजी करून एका चित्रपटाचा विरोध करतात. मधुर भांडारकर ह्या दिग्दर्शकाने आपल्या इंदू सरकार ह्या आणिबाणीवरच्या चित्रपटात इंदिरा गांधींचे योग्य चित्रण केले नाही ह्या आरोपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत त्यांच्या पुणे आणि नागपूर इथल्या पत्रकार परिषदा उधळून लावल्या. भांडारकर आणि त्यांच्या पूर्ण टीमला हॉटेलमधल्या खोलीत स्वतःला बंद करून घ्यावं लागलं. म्हणजे एकीकडे काँग्रेसवाले म्हणतात की इंदिरा गांधी फार महान होत्या, लोकशाहीवादी नेत्या होत्या आणि दुसरीकडे ते आणिबाणीवरची साधी एक फिल्म रिलीज होऊ देत नाहीत. त्यांना इतकी भीती कशाची वाटते?
स्वामी - आणीबाणी जर देशासाठी इतकी चांगली होती असं आजच्या काँगेसवाल्यांना वाटतंय तर ते स्वतः का नाही एखादा आणीबाणीचा गुणगान करणारा सिनेमा बनवत? काढा सिनेमा आणि द्या पटवून लोकांना की इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून देशासाठी केव्हढं महान कृत्य केलं. कोण अडवतोय तुम्हाला? आणीबाणीवर जर जनता इतकी खुश होती तर १९७७ मध्ये काँग्रेसचा सार्वत्रिक निवडणुकीत इतका दणदणीत पराभव झाला असता का? ही शुद्ध दादागिरी आहे. पण काँग्रेसचा हा दुटप्पीपणा नेहमीचाच आहे. केरळमध्ये संघ कार्यकर्त्यांवर इतके हिंसक हल्ले होतात कम्युनिस्टांकडून, काँग्रेसने कधीतरी आवाज उठवलाय का ह्याविरुद्ध? उलट त्यांनी कायम संघाला बदनाम करण्याचेच प्रयत्न केले. गांधी हत्येच्या प्रकरणात संघाला मुद्दाम गोवलं गेलं. काय झालं त्याचं पुढे. एकतरी आरोप सिद्ध झाला का?
आजकाल काही वेब पब्लिकेशन्स अशी आहेत की जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल त्या सनसनाटी बातम्या देतात आणि वर देशात असहिष्णुता वाढली आहे असा कांगावा करतात. एका अश्या पब्लिकेशनने भारताचे सैन्यप्रमुख बिपीन रावत ह्यांची तुलना जालियाँवाला बागच्या भीषण हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या जनरल डायरशी केली होती आणि असल्या बातम्या प्रसिद्ध करून देखील हेच लोक आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असा खोटा कांगावा करत असतात.
स्वामी - ह्या असल्या पब्लिकेशन्सना असं लिहिण्यासाठी पैसे मिळतात. त्यांच्या धंद्याचा भाग आहे तो. पण किती लोक हे असले लेख वाचतात आणि त्यांची विश्वासार्हता काय आहे? ह्या असल्या पोटार्थी मीडियावाल्यांना जास्त भाव देण्यात अर्थ नाही. मला असे बरेच लोक ट्विटरवर सापडतात, त्यांचे कधी पाच फॉलोवर, कधी दहा, कधी शून्य फॉलोवर्स असतात. पैश्यासाठी असे काहीतरी लिहीणाऱ्या लोकांना जास्त भाव देऊ नये. मी तर सरळ ब्लॉक करतो.
तुम्ही एखाद्या प्रकरणाच्या मागे लागलात की त्या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करता, मग त्याला कितीही वर्षे लागू देत, मार्गात कितीही अडचणी असू देत. हे सगळं कसं करता ?
स्वामी - (हसून) माझ्या स्वभावातच ती चिकाटी आहे. एखाद्या कामात मी हात घातला की ते काम पूर्ण होईपर्यंत मी माझे प्रयत्न सोडत नाही. मी ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात जरूर ते सगळे प्रयत्न केले आहेत अशी जोपर्यंत माझी खात्री होत नाही तोपर्यंत मी ते करत राहतो, आणि अशी खात्री पटवण्याचा माझ्याकडे एकाच मार्ग असतो, तो म्हणजे मला हवे असलेले रिझल्ट मिळवणे. तसा मी फार हट्टी आहे. जयललिताच्या प्रकरणाचा मी २२ वर्षे पाठपुरावा केला आणि शेवटी ती जेलमध्ये गेलीच.
आणीबाणीचे चटके तुम्ही प्रत्यक्ष सोसलेत. त्या अनुभवांबद्दल काही सांगाल का ?
स्वामी - उघडपणे आणीबाणीविरुद्ध लढणारा मी एकटाच होतो कारण बाकी सगळ्या प्रमुख नेत्यांना, संघ कार्यकर्त्यांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकलं होतं. सामान्य जनतेला देशात काय घडतंय ते कळूच दिलं जात नव्हतं, कारण वर्तमानपत्रांवर कडक निर्बंध होते आणि रेडियो तर सरकारच्याच हातात होता. जयप्रकाश नारायणजींची इच्छा होती की मी देशाबाहेर जावं आणि तिथून व्हॉइस ऑफ अमेरिका किंवा बीबीसी सारख्या विदेशी वृत्तसंस्थामधून देशात खरोखरी काय घडतंय ते जनतेपर्यंत पोचवावं. माझ्या अटकेचं वॉरंट निघालं होतं. तरीही मी देशाबाहेर गेलो आणि लंडन आणि अमेरिकेतल्या काही शहरांमध्ये स्वयंसेवकांच्या मदतीने आम्ही आणिबाणीविरुद्ध चळवळ सुरु केली. मी हार्वर्ड विद्यापीठात अध्यापन केलेलं असल्यामुळे अमेरिकन लोकांना आणीबाणीत काय चाललंय हे पटवून देणं मला सोपं गेलं. मी दुसरी गोष्ट केली ती म्हणजे भारतात परत येऊन इंदिरा गांधींच्या वर्चस्वाला धक्का दिला. कुणालाही न कळून देता मी भारतात परत आलो, संसदेतही गेलो, तिथे भाषणही केलं आणि मुख्य म्हणजे इंदिराबाईंच्या नाकावर टिच्चून अमेरिकेत परत गेलो. तेव्हा इंदिराबाईंना जाणवलं की देशावर त्यांची पकड राहिली नाहीये, आणि त्यांनी निवडणूक जाहीर केल्या आणि त्यात आम्ही जिंकलो.
स्वतंत्र भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेलं सगळ्यात मोठं गंडांतर म्हणजे इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी होती. तेव्हाच्या हुकूमशाहीबद्दल थोडं बोलाल का ?
स्वामी - अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर नव्हतंच, मला आठवतंय, एका आंतरराष्ट्रीय परिषदेत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी येऊन आणिबाणीविरुद्ध पत्रके वाटायचा प्रयत्न केला तेव्हा संजय गांधी ह्यांच्या मर्जीतल्या काँग्रेस नेत्या अंबिका सोनी तिथे होत्या. त्यांनी 'इसको पकडो', 'उसको पकडो' असे हुकूम द्यायला सुरवात केली तेव्हा त्यांना तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने विचारलं, 'हे हुकूम तुम्ही कुठल्या अधिकाराने देऊ शकता? तुम्ही पोलीस आहात का?' त्यावर त्यांनी त्याच्याकडे बोट करून म्हटलं, 'इसको भी पकडो', आणि खरोखरच त्या पत्रकाराने १८ महिने तुरुंगवास भोगला, ट्रायलशिवाय, केवळ अंबिका सोनींना प्रश्न विचारायचा गुन्हा केल्याबद्दल.
परिस्थिती इतकी वाईट होती ?
स्वामी - हे तर काहीच नाही. संजय गांधींनी जाहीर केलं की एका दिवसात वीस लोकांची नसबंदी करवून घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला अँबेसेडर गाडी बक्षीस म्हणून मिळेल. एका पोलीस अधिकाऱ्याने लगेच आदेश दिले आणि शेजारच्या मोहल्ल्यातून वीस लोकांना पकडून आणलं, म्हातारे, आजारी, दहा-बारा वर्षांची मुलं, कुणीही त्यांच्या तडाख्यातून सुटले नाहीत. अत्यंत अस्वच्छ वातावरणात त्यांच्यावर बळजबरीने नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला गाडी मिळालेली बघून दुसऱ्या अधिकाऱ्यांनी गाड्या पाठवून आणखी लोकांना पकडून आणलं आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या. असे कितीतरी अत्याचार आणीबाणीत रोज व्हायचे.
अडवाणींनी म्हटलं होतं की आणीबाणीत सरकारने पत्रकारांना वाकायला सांगितलं होतं तर ते रांगू लागले. अर्थात ह्याला रामनाथ गोएन्काजींसारखे काही सन्माननीय अपवाद होते, पण तेव्हाच्या ह्या हुकूमशाहीबद्दल आजकालचे पत्रकार काहीच बोलत नाहीत, पण सध्या देशात काही खुट्ट घडलं तरी ही 'अघोषित आणीबाणी' आहे असा विखारी प्रचार केला जातोय. असं का ?
स्वामी - ते दुसरं काय करू शकतात मला सांगा? ते देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बद्दल बोलू शकत नाहीत. ते राज्यकारभाराबद्दल बोलू शकत नाहीत. तीन वर्षात ते भ्रष्टाचाराची एकही केस बाहेर काढू शकलेले नाहीत. राज्य निवडणूकांमध्येही सतत भाजपची सरशी होतेय. मग ते करणार तरी काय? मग अश्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात, जेणेकरून जगात भारताची बदनामी होईल. पण ह्या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही.
- शेफाली वैद्य