नोटाबंदीनंतर नव्या नोटा चलनात आल्या. त्यामुळे बर्याचशा प्रमाणात बनावट नोटांना आळा बसला होता. मात्र, मधल्या कालावधीत काही समाज कंटकांकडून बनावट नोटा चलनात आणल्या गेल्या. यावरच मात करण्यासाठी आणि बनावट नोटा ओळखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक खास ऍप बाजारात आणले आहे. सध्या हे ऍप ऍन्ड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टीम आधारित मोबाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. याच ‘ऍप’ची थोडक्यात माहिती आज करुन घेऊया...
बनावट नोटा ओळखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘आयएनआर फेक नोट चेक गाईड’ हे ‘ऍप’ तयार केले आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’ आणि ऍपल ऍप स्टोअरवर हे ऍप मोफत डाऊनलोड करता येणार आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतर आजपर्यंत तब्बल ११.२३ कोटी रुपयांच्या चलनातील बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. ‘नॅशनल क्राईम रेकॉड्र्स ब्युरो’ने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एक लाख, ५७ हजार, ७९७ बनावट नोटा सरकारी यंत्रणांनी पकडल्या आहेत. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील २९ राज्यांमध्ये बनावट नोटा पकडल्याची माहिती राज्यसभेत दिली होती. यानंतर त्यांनी याचदरम्यान रिझर्व्ह बँकेने बनावट नोटा ओळखण्यासाठी तयार केलेल्या ‘आयएनआर फेक नोट चेक गाईड’ या ‘ऍप’चे अनावरणदेखील केले. या ‘ऍप’मध्ये दोन हजार आणि ५००च्या नव्या नोटांमधील फिचर्सची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवी ५०० ची नोट ही जुन्या ५०० च्या नोटेपेक्षा पूर्णत: वेगळी आहे, तर दोन हजारच्या नव्या नोटेमध्ये १७ नवे फिचर्स देण्यात आले आहे. नवे फिचर्स आणि ‘आयएनआर फेक नोट चेक गाईड’ या ‘ऍप’च्या मदतीने आपल्याला बँकेत न जाताही आपली नोट खरी आहे किंवा बनावट हे कळू शकणार आहे. या नव्या ‘ऍप’मध्ये या नोटांवर असलेल्या सर्व सिक्युरिटी फिचर्सबाबत माहिती देण्यात आली आहे.
दोन हजारच्या नव्या नोटांवरील काही फिचर्स पुढीलप्रमाणे-
१. प्रकाशाच्या विरुद्ध नोट धरल्यानंतरही ‘२०००’ हा आकडा सुस्पष्ट दिसू शकतो.
२. ४५ अंशाच्या कोनातही नोट धरल्यानंतर लपलेला ‘२०००’ हा आकडा आपल्याला पाहता येऊ शकतो.
३. महात्मा गांधींच्या छापील फोटोच्या डाव्या बाजूला देवनागरी लिपीमध्ये ‘२०००’ हा आकडा छापील असेल.
४. नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधी यांचे छापील चित्र आहे.
५. अतिसूक्ष्म पद्धतीने ‘आरबीआय’ आणि ‘२०००’ छापील असेल.
६. नोटेच्या उजव्या बाजूला एक सिक्युरिटी थ्रेड देण्यात आली आहे. नोट थोडी तिरपी केल्यास त्याचा रंग निळा-हिरवा असा दिसतो.
७. नोटेच्या थोड्या उजव्या बाजूला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची सही, पैसे देण्याचे वचन नमूद केले आहे.
८. उजवीकडील महात्मा गांधी यांच्या छापील चित्रावर ‘२०००’चा वॉटरमार्क देण्यात आला आहे.
९. नोटांवर छापलेल्या सीरियल नंबरचा आकार छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजेच चढत्या क्रमाने छापण्यात आला आहे.
१०. नंबरच्या वरील बाजूस ‘२०००’ हा आकडा छापील आहे. तो निळ्या आणि हिरव्या रंगात दिसेल.
११. नोटेच्या खालच्या बाजूस उजवीकडे अशोक स्तंभाचे चिन्ह दर्शविण्यात आले आहे.
१२. नोट छापण्याचे वर्ष त्या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे.
१३. ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा लोगो ब्रीदवाक्यासह छापण्यात आला आहे.
१४. अशोक स्तंभाच्या वरील बाजूला आयताकृती भागात ‘२०००’ असे नमूद करण्यात आले आहे.
१५. नोटेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सात रेषा खेचण्यात आल्या आहेत.
१६. नोटांवर निरनिराळ्या भाषांमध्ये नोटेचे मूल्य थोडे मध्यभागी छापील आहे.
१७. नोटेच्या मागील बाजूस मंगळयानाचे चित्रदेखील छापण्यात आले आहे.
हे ऍप कसे वापराल ?
‘आयएनआर फेक नोट चेक गाईड’ हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर ५०० आणि दोन हजारच्या नोटेचे चित्र आपल्या स्क्रीनवर दिसणार आहे. आपल्याकडे असलेली ५०० किंवा दोन हजारपैकी कोणती नोट आपल्याला तपासायची आहे ते पाहून ५०० किंवा दोन हजारच्या नोटेवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर क्रमाक्रमाने नोटांच्या खरेपणाची ओळख पटवणार्या पायर्या आणि माहिती त्यावर दाखविली जाईल आणि त्यानुसार आपल्याला नोटा तपासाव्या लागणार आहेत. जर त्यातील कोणतेही मानक आपल्या नोटेवर नसेल, तर ती नोट बनावट असल्याचे समजावे.
- जयदीप दाभोळकर