ऋतू पवारची आई

    20-Jul-2017   
Total Views | 22


 

अरुणा पवार हे नाव सगळ्यांनाच माहीत असावं, अशी गरज नाही. विनोद पवारांची पत्नी आणि ऋतू पवारची आई, हा त्यांचा एवढाच परिचय पुरेसा असला तरी तो तिथेच संपत नाही. खरं तर तो तिथूनच सुरू होतो आणि स्वत:चं वेगळं अवकाश निर्माण करतो. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत स्वभाव आणि दिसण्यातही निष्पाप असणारी ही बाई काल तिच्याच लाडक्या घरातून आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेली. बारीक चणीची, नीटनेटकी, नेहमी प्रसन्न असणारी ऋतूची आई. खरं तर हे तिचं जायचं वय मुळीच नव्हतं. तिचं जाणं कॅन्सरने ठरवलं असलं तरी ठिकाण आणि वेळ मात्र तिने ठरविली. कॅन्सरच्या पहिल्या फेर्‍यातून ऋतूची आई सहीसलामत सुटली, याचा आनंद तिच्या जवळच्या सगळ्यांनीच साजरा केला होता. तिची जगण्याची जिद्द एवढी होती की, केमोच्या जाचाने केस गेले तरी चेहर्‍यावरचे निष्पाप भाव मात्र देहाची कुडी निष्प्राण झाली तरी कायमहोते. ‘साजरं करणं’ म्हणजे काय ते ऋतूूच्या आईला विचारावं. म्हटलं तर ती फक्त गृहिणी. विणकाम, भरतकाम, अवांतर वाचन, त्यातून आलेली परिपक्वता, या सगळ्यातून तिने तिचं व्यक्तिमत्व समृद्ध केलं होतं. स्वयंपाकावर तर बाईंची हुकूमतच होती. सामिषापासून ते सोवळ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत हातखंडा. माशाचा मोक्ष तर विचारायलाच नको. मसाले ही तर खासियतच! कितीतरी नव्या नवर्‍या ऋतूच्या आईकडे त्यासाठी ठिय्या देऊन बसलेल्या असायच्या. विनोद पवारांची ’ऍड फिज’ ही नावाजलेली इव्हेंट कंपनी. नट-नट्या, गायक, लेखक या सगळ्यांशी उत्तमसंबंध असलेला हा माणूस. पण झगमगाटात पत्नी म्हणून ऋतूच्या आईने कधीही वाटा मागितला नाही आणि मिरवलाही नाही. कॅन्सरच्या पहिल्या भेटीत टाटामध्ये भेटायला गेलो, तर बाई क्रोशाच्या सुया घेऊन काहीतरी विणत बसली होती. काय तर तिथल्या बाल विभागातल्या मुलांसाठी स्वेटर, रूमाल, टोपरी आणि काही ना काही. आपण मरणाच्या उंबरठ्याला स्पर्श केला आहे आणि हा भयंकर आजार आपल्याला कलाकलाने गिळणार आहे याची पूर्ण कल्पना असतानाही स्वत:चं दुखणं बाजूला ठेऊन ऋतूची आई त्या मुलांसाठी आनंद विणायला बसली. बराच काळ चाललेल्या तिच्या उपचारादरम्यान टाटामधील कॅन्सरच्या दोन-तीन डॉक्टरांनासुद्धा त्यांच्या टेबलावर ठेवायला क्रोशाचे रूमाल मिळाले.

ऋतूच्या आईला हा एकच मुलगा, पण गावभरच्या पोरांचे तिने पोटभर लाड केले. न कळायला लागलेल्या आमच्या दिवट्यालाही कधीतरी कळायला लागेल, तेव्हा ‘हे ऋतूच्या आईने तुझ्यासाठी घेतलं होतं,’ असं सांगावं लागेल. अशा कितीतरी लहानग्यांसाठी तिने भरूभरून केलं. मागे एकदा तिला कसलेतरी खेळण्यातले विदूषक हवे होते. मी म्हटलं, ’’आता कोण मुलं विदूषक पाहातात?’’ तर त्यावर तिचं म्हणणं, ’’तू आण. आपण दिले की, कळतील ना मुलांना.’’ बरं, हे सगळं करताना त्यात कुठलाही हिशोब कधीही केलेला नसायचा. हा निरागसपणा इतका टोकाचा की, हिला कुणीतरी फसवलं तर... अशी आपल्यालाच भीती वाटायची. यावर तिचं एक तत्त्वज्ञान होतं. ती म्हणायची,’’असू दे रे, माणसं अशीच असतात. आपण तरी काय कमी असतो का?’’ त्यातल्या ’काय’ वर जोर द्यायची तिची एक खास लकब होती.

मातीची, पितळेची आणि कसली कसली भांडी शोधणं, हा ऋतूच्या आईचा लाडका छंद होता. जाण्यापूर्वी आपली सगळी भांडी समोर मांडून तिने डोळे भरून पाहिली. त्यातल्या प्रत्येक भांड्यावर तिचा जीव होता. या कढईत इतका वेळ शिजवलं की अशी चव लागते आणि तितका वेळ शिजवलं की तशी चव लागते... अनुभवातून आलेलं हे शहाणपण मोकळ्या हाताने वाढताना मोकळं होत राहायचं. लोक येत राहायचे आणि ऋतूची आई वाढत राहायची. भांडी गोळा करता करता बहुदा तिला अन्नपूर्णेचे अक्षय पात्र मिळाले होते. घरदार, भांडीकुंडी, मुलं, माणसं आणि खिडकीतल्या झाडं-वेलींवरसुद्धा ऋतूच्या आईचा प्रेमळ वेढा पडलेला असायचा आणि तो मोडावा, असं कुणालाही कधीही वाटलं नाही. पण तो वेढा नियतीनेच मोडला. आता हे बापलेकच पोरके झालेले नाहीत, तर नात्यागोत्यातली, आप्तेष्टांतली कितीतरी माणसं पोरकी झाली आहेत.

कॅन्सरचा दुसरा फेरा गंभीर आहे, याची जाणीव तिलाही झाली होती. तिच्या स्वभावानुसार तिने लढाई पुन्हा सुरूही केली होती. पण मग कॅन्सरपेक्षा केमोचाच त्रास व्हायला लागला. या आजारातून बाहेर पडता येत नाही, हे जाणवल्यावर माऊलीने धीराचं उदात्त दर्शन घडवायला सुरुवात केली. जोगेश्वरी ते परळचा सतत प्रवास. निरनिराळ्या चाचण्या, त्यासाठी टोचाव्या लागणार्‍या सुया, प्रचंड थकवा या सगळ्याला तिने शेवटचे काही दिवस सरळ नकार दिला आणि तिचं लाडकं घर गाठलं. आजारपणात ज्यांनी जे जे केलं, त्यांना मोकळ्या हाताने भरभरून दिलं आणि मगच अंथरूणाच्या आधाराने जेमतेमकाही दिवस पाहिले. बोधामृत पाजून माणसं जोडायला निघालेले खुळे लोक महापुरुषांचे उद्गार सांगून लोक जोडू पाहातात, पण माणसं जोडणार्‍या बावनकशी व्यक्ती या ऋतूच्या आईसारख्या अस्सल असतात. स्वत:च्याच स्वत्वाचे सत्व राखणारी. कितीही वाटलं तरी आता तिच्यासाठी कुणीही काहीही करू शकणार नव्हतं. मग कुणी तिची पत्रिका ज्योतिषाला नेऊन दाखविली. गोपी कुकडेंसारख्या मोठ्या कलाकाराने तिच्यासाठी खास चित्रं काढली, भेटीगाठी घेऊन धीर देणारे होतेच. तिचं सामान्यपण हे इतकं असामान्य होतं. या सगळ्याकडे ती अत्यंत कृतार्थपणे गोड हसून पाहायची. प्रतिभासंपन्न कवयित्री अरुणा ढेरे यांनी ऋतू पवारच्या आईवर ती गेल्यानंतर कविता केली ती अशी-

मुठीत आनंदाच्या बिया घेऊनच आली होती ती,
तिनं त्या मुठी भरभरून उधळल्या...
काहींची झाडं झाली, काहींची माणसं!
आता माणसं गातील तिची गाणी, सांगतील गोष्टी, त्यांच्या श्वासात तिनं पेरलेला आनंद असेल.
आणि झाडं वार्‍याकडे देतील तिने न उधळलेल्या बिया, तिच्या स्वप्नांच्या, जिवलग इच्छांच्या...
अगदी तिच्याच...त्याही रुजतील कुठेतरी.
कुणास ठाऊक, त्यांची कसली रोपं होतील, कशा पानांची, कशा फुलांची, कशा फळांची...
पण त्या फुलात पुन्हा पराग असतील आणि फळात बिया! म्हणजे पुन्हा तीच! पुन्हा तीच!

 

-किरण शेलार

९५९४९६९६३७

 

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121