कोणत्याही विषयाचे ’राजकारण’ कसे करायचे आणि मूळ मुद्द्याला बगल देत समोरच्याची नेमकी कोंडी कशी करायची याचे धडे खरंतर शिवसेनेकडून घ्यायला हवे. मग तो कोणताही विषय का असेना. ’मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का?’ या गाण्यातून मुंबई महापालिकेवर रेड एफएमची आरजे मलिष्काने ताशेरे ओढले अन् सेनेला ही बाब इतकी झोंबली की, आता सेना हात धुवून मलिष्काच्या मागे लागली. मलिष्काच्या त्या गाण्यामध्ये कुठेच ‘सेने’चा साधा उल्लेखही नाही, परंतु सेनेचा मात्र पावसाळ्यात मुंबईकरांना सहन कराव्या लागणार्या सर्व त्रासाला आपणच जबाबदार आहोत, असा समज झाला आहे. मग मलिष्काला धडा शिकवायचा अशी डूग धरुन त्यांनी तिला टार्गेट करायला सुरुवात केली. असे असले तरी टीकेची धनी ठरलेल्या मलिष्काने मात्र ही सर्व परिस्थिती शांत डोक्याने हाताळली, याचे विशेष कौतुक करावे लागेल. विरोधकांनी आपल्यावर टीका केली, आरोप केले म्हणून आपण जशास तसे उत्तर न देता निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळायची आणि समोरच्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचे, हे मलिष्काला चांगलेच ठावूक आहे, पण नेहमीच आक्रमक आणि आक्रस्ताळी भूमिका घेण्याची घाई करणार्या सेनेला म्हणावे तरी काय, असा प्रश्न पडतो.
मलिष्काच्या गाण्यामुळे महापालिकेचीच नव्हे, तर मुंबई शहराची जागतिक स्तरावर बदनामी होत आहे, असे सांगून मलिष्काच्या विरोधात ५०० कोटी रुपयांचा दावा महानगरपालिकेने दाखल करावा, अशी मागणी सेनेने आयुक्तांना एका पत्राद्वारे केली, तर बुधवारी पालिकेच्या अधिकार्यांना तपासणीदरम्यान मलिष्काच्या आईच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या, याप्रकरणी तिला नोटीसही बजावली आहे. आता उद्या दिवस उजाडल्यानंतर मलिष्कावर कोणता नवा आरोप करायचा, याचा तपशील सेनेने करून ठेवला असल्यास आश्चर्य वाटायला नको. सेनेला जर खरंच मलिष्काला उत्तर द्यायचे असेल तर शब्दांनी वार करण्यापेक्षा त्यांनी रस्त्यावरचे खड्डे, नालेसफाई चोखपणे ‘करून दाखवावी.’ मलिष्का ही मुंबईची नागरिक आहे. व्यक्तिस्वातंत्र्यानुसार एखाद्या समस्येविषयी आवाज उठविण्याचा तिला संपूर्ण अधिकार असल्याचे सांगत भाजपसह विरोधकांनीही मलिष्काला पाठिंबा दर्शवला आहे. आता अर्थातच पुढे काही दिवस तरी किमान हा विषय राजकारणाच्या आखाड्यात रंगणार एवढं मात्र निश्चित! त्यामुळे या वादावादीत मुंबईकरांच्या हाती काय लागते, तेच पाहायचे!
- सोनाली रासकर