रविवारी दुपारी निवांत चहा पितांना, प्रकाश मामा म्हणाला, "आज मी एक TED Talk पाहत होतो. त्या मध्ये एक भारतीय गृहस्थ आपले शेतीविषयी अनुभव सांगायला आले होते. अगदी साधे, लहान खेड्यात राहणारे होते. ते आता काय बोलतील असा विचार मनात चालू असतांनाच, त्यांनी सुरवात केली, "इंग्रजी ही काही माझी मातृभाषा नाही. पण माझे शेतीचे अनुभव तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी, आणि तुम्हाला सुद्धा त्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी मी इंग्रजीतून बोलायचं प्रयत्न करत आहे. माझी तुम्हा सर्वांनां अशी विनंती आहे की, माझे बोलणे ऐकतांना, तुम्ही तुमच्या डोक्यातील सतत grammar दुरुस्त करणारी प्रणाली बंद करा! मगच मी काय बोलतोय ते समजून माझ्या शेतकी प्रयोगातील निष्कर्षांचा तुम्हाला फायदा घेता येईल.
"आणि खरंच त्यांचं पुढचे भाषण मनात किंतु न आणता ऐकल्यामुळे त्यांना जे सांगायचे होते ते मला लक्षपूर्वक ऐकता आले. समजले. आणि आपणही शेतीत असा प्रयोग करून पाहावा असे वाटले."
"दादा, तुला सांगते, परवा एका meeting मध्ये माझा सहकारी त्याचा आठवड्याचा अहवाल सांगत होता. इतकं बोर करत होता, तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा, तीच तीच वाक्य दोन दोनदा, मध्ये मध्ये उं उं करत, शब्दांसाठी चाचपडत बोलत होता. meeting संपल्यावर माझ्या लक्षात आले, हा मुलगा तर त्याच्या परीने उत्तम प्रयत्न करत होता. आमच्या पर्यंत त्याचे विचार पोचवण्याचा प्रयास करत होता. आणि मी त्याचे बोलणे ऐकण्या पेक्षा कसे बोलतोय यातच अडकले होते! दोष त्याच्या बोलण्यात नसून माझ्या ऐकण्यात होता. आणि त्यामुळे meeting मध्ये त्याने सांगितलेले महत्वाचे मुद्दे माझ्या पदरात पडले नव्हते.", प्रतिभा म्हणाली.
"खरय प्रतिभा, आपण भाषेत अडकून बसतो आणि मुद्दा बाजूलाच राहतो. आई, ज्ञानेश्वर या बद्दल काही सांगतात का?", प्रकाशने नीला आजीला विचारले.
नीला आजी हसून म्हणाल्या, "माउलींचा प्रश्न वेगळाच आहे! ज्ञानोबांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी अतिशय सुंदर आहे, रसाळ आहे. काय सांगू तुला अद्भुत आहे! त्यांनी योजलेले शब्द, उपमा, दृष्टांत इतके मधुर आहेत, की ऐकणारा त्या गोडव्यात बुडून जातो! आणि मग त्या मधली गीता शिकायची राहूनच जाते!
"यासाठी ज्ञानेश्वर म्हणतात - शब्दांचे प्रयोजन केवळ अर्थ पोचवण्यासाठी आहे. त्यामुळे बोल रूपी साल टाकून सांगण्यातला अर्थ घ्या. माझ्या सांगण्यातील शब्दांचे साल काढून, अर्थाशी म्हणजे ब्रह्माशी तद्रूप व्हा. आणि सुखाने सुखाचा अनुभव घ्या!
आहाच बोलाची वालीफ फेडिजे ।
आणि ब्रह्मचिया अंगा घडिजे ।
मग सुखेसी सुरवाडीजे ।
सुखाची माजी ।। ६.२५ ।।