निसर्गप्रेरित स्थापत्त्य
१८७८ साली बार्सिलोनाच्या आर्किटेक्चरच्या दीक्षांत समोराहात तिथल्या संचालकांनी एका विद्यार्थ्याला पदवी देताना जरा उसासा भरला आणि म्हणाले ‘देव जाणे आम्ही ही पदवी कुणाला देतोय एका वेड्याला की, अलौकिक बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला वेळच सांगेल.‘ आणि बार्सिलोनात फिरताना आम्हाला त्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या प्रतिभावान कलाकार आर्किटेक्चर वास्तू बघताना वेड लागलं. अँटोनियो गाऊडीचे बार्सिलोना!
अँटोनियो गाऊडीने बार्सिलोना शहराचं रूपांतर आर्ट गॅलरीत करून टाकलं. प्रत्येक ठिकाणी त्यांची वेगळी छाप उमटवली. Sustainable Architecture जेव्हा विषयही नव्हता तेव्हा त्यांनी अशा अफलातून कल्पनेतून साकारलेले लॅम्प पोस्ट अपार्टमेंट्स चर्च पार्क, वसाहती आजही जाणकारांना प्रभावीत करतात. निसर्ग आपल्याला निव्वळ सौंदर्य आनंदच नव्हे, तर शानही देतो, असं त्यांना उमजलं आणि ते त्यांनी प्रत्यक्षात आणलंही..
त्या काळात त्यांनी बांधलेल्या अनेक वास्तू काळाच्या बर्याच पुढे होत्या. त्यामुळे त्यांना फारसं डोक्यावर घेतलं नाही. बर्यापैकी टीका पण झाली. त्याचबरोबर काही नामवंत लोकांनी राजाश्रय दिला आणि त्यांच्याकडून उत्तोमोत्तम वास्तू घडल्या. त्यांच्या वास्तूंमध्ये निसर्ग स्थापत्यात उपयुक्तेत अध्यात्मिक आणि सौंदर्य सर्व रूपात दिसतो.
काळाने आणि स्थापत्त्य शैलींनी घातलेल्या सर्व सीमा त्यांनी ओलांडल्या त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. Originality is returning to the origin. origin म्हणजे अर्थातच निसर्ग गाऊडीने बांधलेल्या १८ इमारतींपैकी १२ बार्सिलोनात आहे आणि त्यातत्या सात वास्तुंना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे.
आम्ही त्यातल्या काही आत जाऊन बघितल्या काही बाहेरूनच बघितल्या आणि काही बघायला जाऊन तिकीट न मिळाल्यामुळे परतावे लागले. पण जे काही बघितले त्याने डोळ्यांचे आणि मनाचे पारणे फिटले गाऊडीला टीकाकार होते, पण चाहतेही होते. एक मोठे उद्योगपती ग्युएल त्यापैकी एक पॅरिसच्या एका प्रदर्शनात गाऊडीने केलेल्या एका लहानशा स्टॉलची मांडणी बघून त्यांनी स्पेनला येऊन गाऊडीना भेटायचे ठरवले. त्यांची मैत्री जुळली पुढे गाऊडींनी ग्युएलसाठी त्यांच्या मुलांसाठी सासर्यांसाठी अनेक अप्रतिम वास्तू साकारल्या ज्यापैकी अनेक वास्तूंची युनेस्कोनेही नोंद केली.
ग्युएल यांचे घर महाल Ramblas रस्त्यावर जाताना आम्हाला रोज दिसायचं, पण बाहेर लागलेली रांग बघून आम्ही आत जाणं जरा टाळायचो. तिसर्या दिवशी मात्र ठरवलं बघुयाच. ग्युएलचा पार्क बघता आला नाही. घर तरी बघूया.
ग्युएल आणि गाऊडी दोघेही सृजनशील होतेच गाऊडीने ग्युएलना नेमकं काय हवंय. त्यांचे कुटुंब, त्यांची मुलं, त्यांच्या आवडी त्यांचे घोडे, असा सगळा विचार करून बांधलेले हे सुंदर घर बघताना आम्ही ऑडिओ गाईड घेतल्यामुळे सगळ्या गोष्टी समजावून घेता आल्या.
तळघरात घोड्यांचा पागा आहे. त्यांची खाण्या-पिण्याची, धुण्याची उत्तम सोय केली गेली. हेच घोडे तळ मजल्यावरून बाहेर पडताना त्यांचा टापांचा त्रास होऊ नये म्हणून लाकडी टाईल्स वापरल्या आहेत.
या घराला बाहेरच्या बाजूला लोखंडाचा भरपूर वापर केला आहे. आणि लोखंडाचा जाडजूड पत्रा अगदी सहजतेने वाकवून घडवून पानं, फुलं, ‘ड्रॅगन’ सुशोभित करतात. हाच दारावरची जाळी अशी आहे की, आतून बाहेरचं दिसतं पण बाहेरून आतलं अजिबात नाही. घराचे दालनं, मुलांच्या खोल्या, रियाजची खोली, प्रार्थनाघर सगळंच बघण्यासारखं. ग्युएल संगीतप्रेमी असल्यामुळे घरात Acoustics साठी अभ्यासपूर्ण रचना केली होती. आजही इथे संगीताचे कार्यक्रम होऊ शकतात.
पण या घराचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब याच्या छतावर आहे. घरात थंडीत उब राहावी म्हणून ठिकठिकाणी फायर प्लेस होत्या. त्यांच्या चिमण्या गच्चीवर आहे. प्रत्येक चिमणीची घडण वेगळी. सिरामिकचे तुकडे वापरून अनेक घाटांच्या रंगाच्या चिमण्या अत्यंत आकर्षक दिसतात. त्यांची रंगसंगती त्यांची चकाकी आज एवढ्या वर्षांनीही तेवढीच आहे हे विशेष.
गाऊडी धार्मिक आणि अध्यात्मिक वृत्तीचे होते. कासा बाटिलो म्हणजे बाटिलो या उद्योगपतीचं घर, त्यांनी बांधलं बाहेरून बघताना कलाकृती वाटते. त्याच्या बाल्कन्या गोलाकार वेगळ्या वाटतात, पण आमच्या गाईडने जेव्हा एक एक घटक समजावून सांगितला तेव्हा संपूर्ण कथा पुढे आली. प्राचीनकाळी एका ‘ड्रॅगन’ने मारलेले लोक त्याच ढाळलेले अश्रू आणि रक्ताचे थेंब मांडीची हाड हे सगळे बिल्डिंगवर दिसू लागले. संताचा ड्रॅगनवरचा विजय साजरा केला जातो. गाऊडीवर सर्वात मोठा प्रभाव निसर्गाचा होता. बालपण टारागोंना या निसर्गसंपन्न परिसरात गेलं. त्यात त्यांना संधीवात होता. त्यामुळे बालपणी घराभोवती संगळं हळूवारपणे करत निसर्ग निरीक्षण करत दिवस गेले. त्यातून त्याने खूप सार्या गोष्टी टिपून ठेवल्या. दुसरा प्रभाव त्यांच्या कला पार्श्वभूमीचा होता. त्यांचे वडील आणि आजोबा बॉईलर्स बनविण्याच्या व्यवसायात होते. त्यामुळे तांब्याचे पत्रे ठोकून ठोकून त्यातून आकार घडवायचे. त्यांनी कलाकृतींमध्ये धातूपासून घडविलेल्या वस्तूंचा भरपूर वापर दिसतो. निसर्गातून त्यांनी हे शिकलं की, निसर्गातच कुठेच सरळ रेघा नसतात आणि निसर्गात सुंदर भूमिती दडलेली आहे. त्यांच्या बर्याच कलाकृतीमध्ये बायोमिमीक्री दिसते. धातूच्या वर्कशॉपमध्ये त्यांना कळले की, कोणत्याही सपाट पत्र्याला हव्या त्या थ्रीडी आकारात घडविता येते. शिक्षण घेत असताना अनेक व्यवसायातल्या लोकांकडे Drangushtsman म्हणून काम केलं असल्यामुळे सिरॅमिक काच, लाकूड प्लास्टर या माध्यमांना कसं वापरता येईल याची चांगली जाण होती. एखादी वस्तू कामाची असूनही कलात्मक कशी दिसू शकते हे त्यांना सुरुवातीलाच कळलेलं होतं. त्यांची कल्पकता बघून लोक आवाक होत असे. भिंतींच्या ऐवजी खांब आणि सरळ सोट उभ्या खांबाच्या जागी तिरके खांब, कमानी, गोलाकार छतं, बेलदार व्हॉल्ट्स अशी त्यांच्या बांधकामाची खासियत. त्यांची नुसती कलाकारीच नव्हती, तर अभ्यासपूर्ण भूमिती असल्यामुळे कुठेच टेकू किंवा आधारासाठी भिंती उभाराव्या लागत नसे. त्यांच्या मते कोणतीही कलाकृती सुंदर असायला त्यातले घटक आकारमान, रंग त्याच्या परिस्थितीच्या सुसंगतीत असावे.

बार्सिलोनाच्या वेशीच्या बाहेर. पार्क ग्युएल हा ग्युएल याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. डोंगरावर वसलेला अगदी निवडक लोकांसाठी एक आलिशान वसाहत. दुर्दैवाने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. या अपूर्ण अवस्थेतही त्याला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.
पार्क ग्युएल बघणं आमच्या नशिबात नव्हतं. बार्सिलोनाच्या प्रत्येक माहिती पत्रकात सुव्हिनियरवर असलेली रंगीत टाईल्सच्या तुकड्यांनी बनविलेली मोठी पाल, हो पाल आम्हाला बघता आली नाही. पण, त्या बाहेरचा परिसर आम्ही बघितला. डोंगर खणून जे दगड निघाले त्यातूनच साकारलेले रस्ते, छत्र्या, मांडव, बसण्याच्या जागा, गुहा. (आणि इथेच अनेक गाणारे नाचणारे ग्रुप येऊन स्वत:ची कला प्रदर्शित करतात)
पार्क ग्युएलमध्ये trencadis तंत्र वापरलं आहे. सिरॅमिक टाईल्सचे तुकडे वापरून साकारलेल्या कलात्मक कलाकृती. जे काही गाऊडीने साकारले ते निव्वळ प्रयोग नव्हते. तर त्यावर भरपूर अभ्यास झालेला असायचा. आयुष्याचे शेवटचे १४ वर्षे सागरिडा फेमिलियात काढले असे म्हणतात. त्यातच त्यांचा वर्कशॉप थाटला होता ज्यात, ड्रॉईंग बोर्ड, रेखाटनं, चित्र, फोटो अगदी बारिक-सारिक गोष्टींचे विस्तारित रुपातले मॉडल. एवढेच काय तर त्यांच्या या खोलीचे छत आणि खिडक्या आणि छत सूर्यप्रकाश आत येण्यासाठी हलवता यायचे. मुळात प्रकाश आणि वायुवीजन यावर त्यांचा प्रचंड भर होता. खिडक्या कुठे आणि कशा असाव्या यावर भरपूर भर.
कोणताही प्रकल्प हाती घेतला की, त्याबद्दलची संपूर्ण अभ्यास करून परिस्थितीची पूर्ण जाणीव करून त्यानुसार प्रकल्पाचे नियोजन करत असे. स्थानिक हवामान, सभोवतालचे वातावरण आणि परिसरात उपलब्ध साधनांचा वापर यावर त्यांचा भर असायचा. गाऊडीने जेव्हा स्वत: डिझायनिंगला सुरुवात केली तेव्हाची प्रचलित आणि लोकप्रिय शैली ‘गोथिक’ होती. गाऊडीने अनेक शैलींचा अभ्यास केला. त्यांच्या बारकाव्यांचे संशोधन केले. त्यातून त्यांना total work of art गाठायचे ध्येय होते. अशात अगदी बारिक सौंदर्य कलाकृती आणि क्लिष्ठ structural balance मध्ये फरक नसेल. नेमक्या या शैलीचा वापर सागरिडा फेल्लियामध्ये करता आला. या कलाकृतीला गाऊहीने सर्वस्व अर्पण केलं. त्यात त्यांनी वैयक्तिक छाप तर दिसतेच, पण स्वतंत्रशैली, कलात्मक विचार आणि प्रयोगशील वृत्तीही उभारून आली आहे.

पण, गंमत म्हणजे सागराडा फेमेलिया या भल्या मोठ्या चर्चच्या निर्मितीच्या सुरुवातीपासून गाऊडी नव्हते आणि शेवटही त्यांनी बघितला नाही. खरं तर शेवट व्हायला अजून तप जाईल. १८८२ साली याचे बांधकाम सुरू झाले आणि पूर्ण व्हायला २०२६ साल उगवेल! निदान २०२६ साली पूर्ण करायचा विचार आहे कारण २०२६ साली गाऊडींची १०० वी पुण्यतिथी असेल.
गाऊडीने जेव्हा सागराडा फेमेलिया कॅथिड्रलचं बांधकाम हाती घेतलं तेव्हा त्याने त्याच्यात पूर्णपणे बदल केला. सगळे प्लॅन्स, आराखडा बदलले. एका लहानशा जागेत वर्कशॉप थाटला, शाळा बनविली.
सागराडा फेमेलिया बघायला गेलो. तर त्या दिवशीचे सगळे तिकिट विकले गेले होते. त्याच दिवसांचे नाही, तर दुसर्या दिवशीचेही नशिबाने आम्ही परतणार त्या दिवशीचे तिकीट बुक करता आले. कारण हे न बघता स्पेन सोडता आलंच नसतं. बाहेर मोठ्या रांगेत उभे राहावं लागलं, पण, इथले एक वैशिष्ट्य आहे Crowd Management. कितीही लोक आली तर सगळ्यांना आत घ्यायचे नाही खरं तर या कॅथिड्रलचं सगळं बांधकाम देणगीवरच चालतं. आपण जे तिकिटाचे पैसे देतो ते थेट बांधकामासाठी वापरले जातात. (सगळ्यात जास्त देणगी जपानकडून येते.)
कॅथिड्रलमध्ये शिरायच्या आतच काही तरी अभूतपूर्व बघितले. दाराच्या अलीकडच्या भिंतीवर पानांचे शिल्प आहे आणि त्यावर मधमाशा, किटक, पाली, सरडे अशा प्राण्यांच्या हुबेहूब प्रकार त्याचे असे की, हे कॅथिड्रल बांधताना एवढ्या प्राण्यांना विस्थापित व्हावे लागले असेल, किंबहुना प्राणही गमवावा लागला असेल. त्यांच्या स्मरणार्थ हे!
आत शिरलो तर त्या भव्य बांधकामाकडे बघून डोळेच फिरले. भव्य अती प्राचीन जंगलात शिरलो की, कसे वृक्ष असतात. उंचच-उंच फांद्या पसरलेल्या, तसेच सागरहा फेमेलिया निसर्ग प्रेरित असावं हे पदोपदी जाणवत. हे वृक्षरूपी खांब हे तर आहेच, पण इथली प्रकाश योजनादेखील तशीच. फुलांसारख्या Stain glass windows आणि इथल्या जिन्याचाही आकार निसर्ग प्रेरितच आहे. गाऊडीनेही भव्य वास्तू उभारायला उत्तम टीम उभी केली. त्या काळातले उत्तम आर्किटेक्ट, धातू घडवणारे, मिस्त्री काम करणारे असंख्य लोक कामाला लागले. गाऊडी एकटा जीव असल्यामुळे संपूर्ण वेळ इथेच घालवायचे, बहुदा इथेच झोपायचे पण!
गाऊडीच्या हयातीत सागरीडा फेमेलियाचा एक लहानसा भागच पूर्ण होऊ शकला. स्पॅनिश नागरी युद्धाच्या वेळी इथल्या वर्कशॉप मि. ड्राईंग्सची बरीच नासधूस झाली. तरी पण काम चालूच राहिलं.
गाऊडीची कल्पना प्रत्यक्षात आणणं हे अवघड आहे, पण त्याचं पूर्ण रूप म्हणजे अलौकिक अनुभव देणारी एक अद्वितीय वास्तू आहे. राहणी अगदी साधी, कुठे स्वतःची प्रसिद्धी नाही, एवढेच काय तर स्वतःचे फोटोदेखील काढू द्यायचे नाही. मग झालं काय, तर १९२६ साली सकाळी ते फिरायला गेले असताना त्यांना ट्रामचा धक्का बसला रस्त्यावरच्या लोकांना ते चक्क बेघर-भिकारी वाटले. कुणी तरी त्यांना शासकीय दवाखान्यात नेऊन ठेवले. उपचार वर वरचा झाला. जेव्हा कुणी तरी ओळखलं तेव्हा फार उशीर झाला होता.
- अंजना देवस्थळे