खरं सांगायचं तर आजचा हा लघुपट त्याच्या नावाप्रमाणेच अगदी वेगळा आहे. नावावरुन लक्षातच येणार नाही असा हा लघुपट आहे. नाव आहे "२.३" आणि गोष्ट आहे नावाप्रमाणेच एका वेगळ्या नात्याची. हे नातं काय आहे ते या लघुपटातूनच बघा.. कारण आधी सांगितलं तर या लघुपटाची मजाच जाईल. या नात्यात अपेक्षित प्रेम, रोमांस, भांडणं काहीच नाही... उलग आहे तर स्पष्ट आणि खरं बोलणं.. तुम्हीच बघा या लघुपटात की हे नातं कोणतं.
एक मुलगी आहे, फूड ब्लॉग लिहिणारी, २५ हजार फॉलेअर्स असणारी, आपल्या कामाप्रती अगदी प्रामाणिक असणारी. आणि एक मुलगा आहे ज्याचे स्वत:चे एक रेस्टॉरेंट आहे. उत्तम आणि चविष्ट पदार्थ असणारं रेस्टॉरेंट. ती मुलगी या रेस्टॉरेंटला रिव्ह्यू करायला येते. आणि प्रत्येक पदार्थाला ५ पैकी २.३ मार्क देते. मुलाला वाटतं, खाद्य पदार्थांमध्ये अशी काय कमी आहे, ज्यामुळे इतके कमी मार्क..? आणि त्यावरुन त्यांची वादावादी सुरु होते, आणि अखेर हळू हळू या नात्यातील गंमत उलगडते. हे नातं ना "तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना." असं आहे. पुढे काय होतं? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकानीच एकदा तरी अनुभवलेली ही गंमत नक्की बघा..
या लघुपटाला यूट्यूब वर ३ लाख ३८ हजार व्ह्यूज आहेत. देवांशू भदौरिया यांनी प्रदर्शित केलेला आणि अंकुर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट आवर्जून बघा...
रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.