पूजा आजीला भेटायला आली, ती अगदी दु:खी दिसत होती.
नीला आजीने तिला पाहताच काळजीने विचारले, “पूजा, काय झालं ग? लहान तोंड करून बसलीस ते?”
“आजी, दुसऱ्या round मध्ये पण नेहाला हव्या त्या कॉलेजला प्रवेश मिळाला नाही ग! तिलाच भेटून आले, फार नाराज झाली आहे ती. तिच्या आई-बाबांनी तिला परोपरीने सांगितलं, पुढच्या round मध्ये मिळेल प्रवेश, आणि नाही तिथे मिळाली तर दुसरीकडे घेऊ. पण ती कुणाचं काहीचं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही. मी पण तिची समजूत घालून आले, पण मलाच इतके वाईट वाटत आहे.”, बोलता बोलता पूजाचे डोळे भरून आले.
“अग वेडाबाई! आता तर तुझीच समजूत घालायची वेळ आली की! पूजा, कित्येक जणांना तर एखादे यश मिळाले तर आपण काय मोठा तीर मारलाय अशा धुंदीत असतात. अगदी हवेतच जगतात म्हण! आणि तसेच तुझ्या मैत्रीणीसारखे काही जण एखाद्या अपयशाने अगदी कोलमडून जातात. समोर आलेला दुसरा पर्याय मनापासून स्वीकारत नाहीत. आणि मिळालेल्या संधीचे सोने करायचे सोडून दु:ख करत बसतात.”, नीला आजी म्हणाली.
“हंम! मला कळत होत हे सगळं, पण तिच्याशी बोलतांना हे विसरून मला पण तिच्या सारखेच वाईट वाटायला लागले! आजी, ज्ञानेश्वरांनी या विषयी काय सांगितले आहे?”, पूजाने विचारले.
“माऊली म्हणतात, माणसाने जसे यशाने हुरळून जाऊ नये तसेच अपयशाने खचूनही जाऊ नये. मुळात मनात कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता, लाभाची अपेक्षा न ठेवता कर्म केले तर सुख दु:खाची बाधा होत नाही. आता अर्जुन तर युद्धासाठी उभा होता, त्याला भगवान म्हणतात, या रणात तू एक तर जिंकशील किंवा मारला जाशील, पण त्याची चिंता अगोदरच का करावी? आपण आपले काम करावे आणि मग जे काही बरे वाईट परिणाम प्राप्त होतील ते सहन करावेत.
- दीपाली पाटवदकर