विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २५

    15-Jul-2017   
Total Views | 28

 


अवंती : “अन्न-वस्त्र-निवारा... आपण दोघी आणि म्हणी” मेधाकाकू, गेले काही दिवस आपण दोघी, या प्राथमिक गरजांमधल्या फक्त “अन्न” या एका ज्ञानशाखेवरच अभ्यास करतोय...!! एकदम सही है, मेधाकाकू...! आता हळूहळू मला मराठी भाषेच्या या खजिन्याची व्यापकता जाणवायला लागली आहे...!!

मेधाकाकू : येस, मला जाणवते आहे, तुझी उत्सुकता आणि नवे काही शिकण्याची नैसर्गिक गरज... अवंती, हे फार छान आहे आणि पुढील कारकीर्दीला फार फायदेशीर ठरणार आहे. आज एक गम्मत आणल्ये आपल्या अभ्यास गप्पांमधे. माझ्या तरुण वयात, सत्तर-ऐंशीच्या दशकात सिनेमातला एखादा नायक तिकीट बारीवर जोरात गर्दी खेचयाचा आणि मग अशा यशस्वी नायकाला घेऊन, एखाद्या वर्षी ५ / ६ सिनेमा एकदम यायचे तसेच आज, उत्तम पाचक असलेल आपल्या आहारातला आवडता नायक. “ताक”.... याची प्रमुख भूमिका असलेले. याच्या गुणवत्तेवर, याला चिकटलेल्या दंतकथा आणि लोकश्रुतींवर बेतलेले बरेचसे वाकप्रचार आणलेत मी आज...!!

जिचे घरी ताक तिचे वरतें नाक.

असे बघ अवंती, ४०/५० वर्षांपूर्वीपर्यंत घरा-घरांमधे फ्रीझ आलेले नव्हते, अशा काळांत दूध - दुभत्याने स्वयंपाकघरातले जाळीदार फडताळ भरलेलं असलं की ते संपन्न कुटुंबाचे घर म्हणून ओळखले जायचे. अशा संपन्न घरातील कामाचा उरक असलेल्या दक्ष गृहिणी, दुधापासून दही-ताक आणि त्यापासून लोणी-तूप बनवत असत. मोठ्या आकाराच्या एकत्र कुटुंब व्यवस्थेत असा दूध-दह्याचा राबता असे आणि म्हणून गृहिणीला फार अभिमान वाटत असे. अशा टेंचात वावरणार्‍या गृहिणीचे वर्णन, या स्वभावोक्ती अर्थालंकाराने नटलेल्या वाकप्रचारात केले आहे. 

अवंती : आहा.. आहा.. मेधाकाकू, काय सही आहे तुझा आजचा नायक... “ताक”...!!     

मेधाकाकू :  आता गम्मत बघ, ताकाने रंगवलेला  यशस्वी नायक आपण पहिला वरच्या वाकप्रचारात...!!...आता त्याचा सहनायक  कसा झालाय ते पाहूया...!!

    

गाडगे धूऊन कढी करणारा

पुन्हा एकदा स्वभावोक्ती आणि अतिशयोक्ति अलंकारात रंगवलेला हा वाकप्रचार, एका कंजूस आणि लोभी माणसाचे चित्र रंगवतोय. समाजात नेमाने दिसणारी ही एक मानवी प्रवृती, ज्याचे नेमके वर्णन करताना हा वाकप्रचार नर्म विनोदाची पेरणी सुद्धा करतोय. वापरलेले गाडगे धुवून ताकाची कढी बनवणारा हा कंजूस, स्वार्थी महाभाग खिशाला एक पैशाचीही तोशीष देणार नाहीये...!!        

 

अवंती : अगं मेधाकाकू.. “चाबूक” आयटेम आहे... आपले “ताक”...!! या एका शब्दातून काय काय गमती-जमती निर्माण झाल्या आहेत. या म्हणी आणि हे वाकप्रचार म्हणजे एकही शब्द न बोलता खूप काही शिकवणारे गुरु आहेत आपले. आज आपल्या ताकाला झक्कास पैकी आले+मीठ+कोथिंबीर लाऊन, तू बाकी मसाला ताक आणल्येस आपल्या गप्पा चविष्ट बनवण्यासाठी...!!        

मेधाकाकू : एकदम सही अवंती. काय धृष्टांत दिलायस... वा. आता तुला दोन जुन्या सिनेमांची गम्मत सांगते आणि त्या सोबत बघूया दूध आणि ताक यांची मजेशीर तूलना...!!

 

ताक ते ताक दूध ते दूध.

योग्य-अयोग्य किंवा सत्य-असत्य, अशा विवेकधर्मी भावना आणि धारणांची तूलाना करताना अनेकदा या स्वभावोक्ती अर्थालंकाराने सजलेल्या वाकप्रचाराच उल्लेख केला जातो. लोकश्रुतिप्रमाणे, दूधामधे सर्वाधिक पोषण मूल्य आहेत तर दुसर्‍या बाजूला दुधाचेच वंशज “ताक” मात्र त्याच्या योग्यतेचे मानले जात नाही. प्रत्यक्षात दोन्ही वस्तूंना आपापले उत्तम गुणधर्म आहेतच, तरीही समाजात दोन भाऊ किंवा दोन बहिणी यांची विनाकारण तुलना केली जाते. आता असेच दोन जुळे भाऊ ‘राम आणि शाम’ आणि दोन जुळ्या बहिणी ‘सीता आणि गीता’. असेच वेगळे स्वभावधर्म आणि गुणवत्ता असलेल्या हिन्दी सिनेमातल्या या दोन लोकप्रिय जुळ्या भावंडांच्या जोड्या, पस्तीस वर्षांपूर्वी तिकीट बारीवर खूपच गाजल्या होत्या आणि शेवटी क्लायमॅक्स किंवा कळसाध्याय क्षणांमधे, या जुळ्या भावंडांच्या दोन्ही जोड्या किती छान आहेत त्याचा मनोरंजक अनुभव प्रेक्षकांना मिळाला होता. त्यांची आज आठवण झाली... हा वाकप्रचार वाचून...!!      

 

अवंती : अरेच्या... म्हणजे मेधाकाकू... तुलाही ते सिनेमा अजूनही आठवतायत तर.. मस्त आहे...हे. आम्ही मुले विनाकारण गृहीत धरतो की सगळी मोठी माणसे अरसिक असतात आणि त्यांनी बहुतेक आमच्यासारखी गम्मत-मस्ती, त्यांच्या लहानपणी केलेली नसते.. आता मी माझी समजूत नक्की सुधारून घेत्ये... अगदी आजच... आत्ताच...!!

मेधाकाकू : ओके-ओके--कूल-कूल...अवंती, हे आवडलाय मला. आता मात्र या वाकप्रचारात आपल्या नायकाला. पूर्णपणे खलनायकाचा दर्जा प्राप्त झालेला दिसतोय. या ताकाला दूर कसे ठेवायचे... का ठेवायचे ते बघूया...!!           

    

ताक नाशी भाजी घर नाशी शेजी.  

अवंती... माझ्या लहानपणी आमच्या घरात फ्रीझ नव्हता. त्याकाळात, दूध, दही, ताक, लोणी आणि अन्य नाशिवंत पदार्थ, मुंग्या-झुरळे-पाली यांना प्रवेश मिळू नये एका अशा जाळीच्या कपाटात ठेवले जायचे. यालाच  फडताळ म्हणत असत. घरातली चतुर गृहिणी, ताक आणि दूध मात्र कपाटात एकमेकान पासून दूर ठेवायची याचे कारण ताकाचा एक गुणधर्म. ताक, दुधाच्या संपर्कात आले की दूध नासते हे आपल्याला माहीत आहेच. म्हणूनच दुधाचे दही बनवण्यासाठी दही किंवा ताकाचे अर्धा चमचा विरजण लावले जाते. फडताळात शेजारी ठेवलेल्या अशाच ताकाच्या करामतीने त्या गृहिणीच्या स्वयंपाकातली भाजी एकदा बिघडली असावी. या चतुर गृहिणीने हा अनुभव, धृष्टांत म्हणून आपल्या लेकीला सावधानतेचा  आणि व्यवहार  चातूर्याचा सल्ला  देताना वापरला असावा. शेजारधर्माचे पालन करयाच हवे, मात्र आपल्या घराच्या आनंदाला, कुटुंब संस्कृतीला बिघडवेल असे उपद्रवी शेजारी मात्र चार हात दूर ठेवायचे असा सल्ला हा भ्रांतिमान अलंकारयुक्त वाकप्रचार तरुण पिढीला देत आलाय...!!

अवंती : आजचा सिनेमॅटिक अनुभव जबरदस्त... मेधाकाकू. पकडून ठेवणारे कथानक आणि लोकप्रिय नायक. एकदम यशस्वी फॉर्म्युला. झक्कासे... आवडलाय आजचा अभ्यास...!! 

 

- अरुण फडके

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.

अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत

मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

लोकसभेत १२ तासांबून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता. Waqf Board misuse of ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121