करोडपती पाटील

    14-Jul-2017   
Total Views | 5

 

 

माणूस विचार करतो एक आणि नियती घडविते वेगळंच काही तरी! असा अनुभव आपल्यापैकी बहुतांश जणांना आलेला असेलच. असामान्य काही तरी घडवतील, अशी वाटणारी माणसे पुढे जाऊन फारच खुजी निघतात, तर जे आपल्या खिजगणतीत असतात ते मात्र स्वत:चं विश्व तयार करतात. या दोहोंमध्ये वेगळेपण असतं ते म्हणजे वाट्टेल ते मेहनत घेण्याची तयारी आणि उत्तुंग स्वप्न पाहण्याचा आवाका. आपल्या आजूबाजूला असे अनेकजण तुम्हाला भेटलेदेखील असतील. तोदेखील असाच आपल्या स्वप्नांच्या पाऊलवाटेवरून निराशेपोटी परतणारा एक... त्याचं स्वप्न जास्त मोठं नव्हतं. स्वप्न होतं, पोलीस उपनिरीक्षक होण्याचं. मात्र, तीन वेळा अपयश पदरी पडल्यानंतर त्याने वेगळी वाट धरली आणि त्या वाटेवरून चालत स्वत:चं एक औद्योगिक विश्व निर्माण केलं. अशी ही जिद्द आणि मेहनतीची कथा आहे संदीप पाटील यांची.

 

साने गुरुजींचं अंमळनेर म्हणजे अवघ्या महाराष्ट्रास वंदनीय. अशाच या अंमळनेरमध्ये सुशीला आणि काशीनाथ या पाटील दाम्पत्याच्या पोटी मुलगा जन्मला आला. त्याचं नाव संदीप. काशीनाथ पाटील हे नाशिकच्या गांधीनगरमधील शासकीय मुद्रणसंस्थेत कामगार म्हणून कार्यरत होते. गांधीनगर ही या शासकीय कर्मचार्‍यांची वसाहतच होती. जवळपास तीन ते चार हजार सरकारी कर्मचार्‍यांचं येथे वास्तव्य होतं. संदीपला आणखी दोन भावंडं होती. संदीपच्या आई सुशीला या गांधीनगर परिसरात भाजी विकण्याचा व्यवसाय करीत. संदीप जनता विद्यालयात शिकत होता. शाळा शिकत असताना तो आणि त्याची भावंडं आईला भाजी विकण्यास मदत करीत असे. पुढे २५ वर्षे संदीपच्या आईने भाजीविक्रीचा व्यवसाय केला. मोठा भाऊ पोलीस अधिकारी झाला. दहावीच्या परीक्षेनंतर संदीपने एका टूर कंपनीत तिकीट बॉयची नोकरी केली. महिन्द्रा ऍण्ड महिन्द्रा कंपनीसाठी तिकीट बुकिंगचं काम त्याला करावं लागे. त्यासाठी संदीप सातपूर ते महिन्द्रा कंपनी अशी चार किलोमीटरची पायपीट करायचा. त्यावेळी त्याचं वय होतं अवघं १६ वर्षे. नाशिकच्या केटीएचएम कॉलेजमध्ये संदीपने महाविद्यालयीन शिक्षणासाठी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. तिथे त्याने बीकॉम केले. कॉलेजमध्ये असल्यापासून आर्मीत वा पोलीस दलात जाण्याचं त्यांचं स्वप्नं होतं. त्यासाठी तो एनसीसीमध्ये भर्तीही झाला. अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत तो पोहोचला. ‘बेस्ट कॅडेट’, ‘बेस्ट डिसीप्लिन’, ‘बेस्ट शूटर’ अशी पाच सुवर्णपदके त्याला नाना पाटेकरांच्या हस्ते मिळाली. त्यावेळी नाना पाटेकरांचा सैन्यदलावर आधारलेला ‘प्रहार’ हा चित्रपट आला होता. दरम्यान, कॉलेजमध्ये शिकत असतानाच आपल्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी संदीपने चक्क एका बिअर बारमध्ये कॅप्टनची नोकरी केली. मात्र, आपलं स्वप्नं पूर्ण करायचं तर आपल्याला एमपीएससीची परीक्षा द्यावी लागेल हे त्याच्या मनाने हेरलं. त्याने पोलीस उपनिरीक्षकपदाची पहिली परीक्षा दिली. मात्र, निव्वळ सात मार्काने तो नापास झाला. यानंतर जोमाने तयारी करण्यासाठी तो ‘करिअर कॉम्पिटीशन अकॅडमी’ या संस्थेत गेला. तेथील फी परवडणारी नव्हती म्हणून संचालकांकडे तिथे नोकरी करून शिकण्याची गळ घातली. संचालकांनी त्यास मान्यता दिली. मात्र, सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत अगदी झाडू मारण्यापासून ते पडेल ते काम करण्याची कामं संदीपला करावी लागत असे. १९९३ साली त्याने परत एमपीएससीची परीक्षा दिली आणि एका मार्काने त्याची संधी हुकली. आता आपल्याला वाट बदलायला हवी, असे त्याला वाटले. त्याने महात्मा नगरमधील योगिता एन्टरप्राईजेसमध्ये वेल्डरची नोकरी धरली. तिथे काम करत असतानाच आपण आपला व्यवसाय करावा, असे मनाशी ठरविले. त्यापद्धतीने त्याने मालकालादेखील सांगितले. एके दिवशी एक ग्राहक गॅस कटिंग रिपेअरिंगचे काम घेऊन कंपनीत आला होता. त्यावेळेस चुकून मालकाने ‘‘संदीप, तू हे काम करशील का?’’ असे विचारले. संदीपनेही होकार दिला. त्याने ते काम घरी आणले. घरातील जेवण बनविताना वापरण्यात येणारी सांडशी आणि उलथणे यांचा वापर करून त्याने गॅस कटिंग रिपेअरिंगचं काम करून दिलं. यातून त्याला २२५ रुपयांचा फायदा झाला आणि हाच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंटदेखील ठरला. हळूहळू त्याने अशी छोटी-मोठी वेल्डिंगची कामे घेण्यास सुरुवात केली. दिवसभर औद्योगिक वसाहतीमध्ये फिरायचं, काम मिळवायचं आणि रात्रीचं काम करून ते पूर्ण करून द्यायचं हा जणू शिरस्ताच बनला. आपल्या मदतीसाठी त्याने एक माणूस घेतला. काहीसा वेडसर म्हणता येईल, असा तो माणूस होता. त्याच्या करामतीमुळे संदीपच्या घरच्यांनी त्याला विरोध केला आणि संदीपने त्या वेडसर माणसाला काढून टाकलं. दरम्यान, नाशिकच्या ‘मुंगी ब्रदर्स’चं मोठं काम संदीपला मिळालं होतं. ते जवळपास ६० किलो वजनाचं काम स्वत: संदीप मुंबईला घेऊन आला.

 

कुर्ल्याच्या बैलबाजार परिसरातून बसने जात असताना त्याने एका दुकानावर गॅस कटिंग मशीनचं चित्र पाहिलं. या पठ्‌ठ्याने ते मशीनचं चित्र पाहून ३०-३५ किलोमीटर वेगाने धावणार्‍या बसमधून उडी मारली. धावत तो त्या दुकानात गेला. दुकानाचे मालक अल्ताफ भाईंना त्याने आपली हकिकत सांगितली. अल्ताफभाईंनी ते काम दुसर्‍या दिवशी सोमवारी घेऊन येण्यास सांगितले. तिथेच संदीपची सुधीरसोबत ओळख झाली. ते कामपूर्ण करून संदीप नाशिकला परतला. १७ हजार रुपये खर्च झालेल्या त्या कामातून संदीपला ५५ हजार रुपये मिळाले. यानंतर संदीपचा आलेख उंचावत राहिला. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या औष्णिक प्रकल्पाच्या शाफ्टचे अत्यंत अवघड काम संदीप पाटील यांच्या दुर्गेश एंटरप्राईजेसने केले होते. यासाठी तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी पाटील यांची पाठ थोपटली होती. पुढे चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील पाण्याच्या शुद्धीकरणाचे असेच अवघड काम देखील त्यांच्या कंपनीनेच पूर्ण केले होते.

 

एकेकाळी ३०० रुपये पगार घेणारा हा तरुण आज जवळपास दहा कोटी रुपये उलाढाल असणार्‍या कंपनीचा मालक आहे. यावर्षी ही उलाढाल १२ कोटींकडे जाईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. वेल्डिंगमधील सर्व प्रकारची कामे ते करतात. विशेषत: जे काम कोणीच करू शकत नाही अशीच अवघड स्वरूपाची कामे ते करतात. त्याचप्रमाणे ‘अडॉर’सारख्या नामांकित दहा कंपन्यांचे वितरक म्हणूनदेखील ते कार्यरत आहे. ‘स्कील इंडिया’ अंतर्गत या क्षेत्रातील जगभरातील अत्याधुनिक साधने भारतातील पॉलिटेक्निक व आयटीआय कॉलेजेसना देण्याचा संदीप पाटील यांचा मानस आहे. सप्टेंबरमध्ये जर्मनी येथे होणार्‍या वेल्डिंग उत्पादन क्षेत्रातील एका मोठ्या प्रदर्शनास ते भेट देणार असून तेथील सर्वोत्तम तंत्रज्ञान ते भारतात घेऊन येणार आहेत.

 

संदीप पाटील यांचा हा प्रवास तरुणांसाठी विशेषत: स्पर्धात्मक परीक्षेत अयशस्वी झाल्यामुळे निराश होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जास्त प्रेरणादायी आहे. बीकॉम, एलएलबी असे पारंपरिक शिक्षण असणारे, अभियांत्रिकीचा कसलाही गंध नसणारे संदीप पाटील आज मशीनच्या जगात मुशाफिरी करत आहेत. कोणताही व्यवसाय करण्यासाठी त्या क्षेत्रातील पदवी नसली तरी चालेल, पण तुमच्या ठायी चिकाटी आणि जिद्द असलीच पाहिजे हाच संदेश जणू संदीप पाटील यांचा उद्योजकीय प्रवास देतो.

 

- प्रमोद सावंत

 

 

 

 

 

प्रमोद सावंत

लेखक ‘युक्ती मीडिया कन्स्लटन्सी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून २०१० साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी संज्ञापन व पत्रकारिता विषयात मास्टर्स केले आहे. ते ‘डिक्की’चे सदस्य असून उद्योग, उद्योजकता यांचा गाढा अभ्यास व त्यासंबंधी लिखाणात त्यांचा हातखंडा आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा
पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121