गेल्या शुक्रवारच्या अंकात किरण शेलार यांनी व्यक्तीची ऐहिक कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनशास्त्र व्यक्तीच्या प्रेरणांचा कसा विचार करते, याची चर्चा केली होती. आपला मुद्दा स्पष्ट करीत असताना व्यक्तीच्या प्रेरणांचा प्रारंभबिंदू मूलभूत गरजा यापासून सुरक्षितता, सामाजिक ओळख, सामाजिक सन्मान व स्वत्त्वाची ओळख अशी मास्लोच्या पिरॅमिडची ओळखही करून दिली होती. आपल्या लेखाच्या शेवटी त्यांनी जिथे मास्लोचा पिरॅमिड संपतो तिथून भारतीय तत्त्वज्ञानाचा उलटा पिरॅमिड सुरू होतो, असे विधान केले होते. हे विधान समाजशास्त्राचा पायाभूत विचार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
व्यक्ती व समाज यांच्या परस्परसंबंधांचा विचार करण्याच्या दृष्टीने या दोन्हींचे परस्पर संबंध कसे असावेत याची चिकित्सा करणारे विविध विचारप्रवाह आहेत. ग्रीक परंपरेत लोकशाहीची संकल्पना विकसित झाली. ती होत असताना व्यक्तिस्वातंत्र्य व समाजहित यांच्या परस्परसंबंधाबाबत बरेच विवेचनही करण्यात आले आहे. जर व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य दिले गेले, तर ते सामाजिक हिताला बाधक ठरू शकते. यासाठी एकच उदाहरण द्यायचे असेल, तर आर्थिक प्रेरणेला मुक्त स्वातंत्र्य दिले, तर त्यातून आर्थिक शोषणाला मान्यता मिळते, पण आर्थिक समानतेसाठी आर्थिक स्वातंत्र्यावर बंदी घातली, तर त्यातून काय घडते याचा अनुभव कम्युनिस्ट राजवटीत रशिया व चीन यांनी घेतला आहे. मुक्त व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे मूठभर सक्षमलोकांना अत्याचार करण्याची दिलेली खुली संधी ठरते, तर सक्षमलोकांच्या कार्यक्षमतेवर आणलेली बंधने ही समाजाची प्रगती रोखण्यास कारणीभूत ठरतात. आरक्षणाच्या निमित्ताने आपल्याकडे चाललेल्या चर्चेचे स्वरूप असेच काहीसे असते. त्यामुळे समाजहिताला बाधक ठरणार नाही एवढेच व्यक्तिस्वातंत्र्य देणे आवश्यक ठरते. यादृष्टीनेच कायद्याची योजना केलेली असते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कृतीच्या स्वातंत्र्याची सीमारेषा कायद्याने आखून दिलेली असते. त्यामुळे घर कसे बांधावे, यापासून रस्त्यावर कसे चालावे इथपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कायदे रोज आपल्याला भेटत असतात. वास्तविक पाहता, हे कायदे समाजाच्या हिताच्या दृष्टीने म्हणजे सर्व व्यक्तींच्या सुखासाठीच केलेले असले तरी त्यांचे पालन करत असताना प्रत्येक व्यक्तीलाच आपल्या स्वातंत्र्यावर बंधने आल्याचा मानसिक जाच वाटत असतो. जेव्हा असे कायदे राज्यकर्त्यांच्या किंवा विशिष्ट वर्गाच्या हितासाठी बनतात, तेव्हा ते लोकांच्या असंतोषाला कारणीभूत ठरतात. त्यातूनच ‘संस्था विरुद्ध व्यक्ती’ असा संघर्ष उभा राहतो. मानवी हक्कांच्या चळवळींचा उगमयातूनच झालेला आहे. राज्यसंस्थेचे अधिकार हे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणारे अधिकार आहेत. पोलीस, लष्कर या संस्था शासनाच्या दमनसंस्था आहेत, असे या चळवळीने गृहित धरले आहे. समाजात राष्ट्रहिताची भावना चेतवून हितसंबंधी लोक या दमनसंस्थांच्या हाती पाशवी शक्ती देतात, असा त्यांचा दावा असतो. मध्ययुगीन काळात ‘धर्म’ या अफूच्या गोळीच्या साहय्याने धर्मसत्ता समाज आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असे, तसाच प्रकार ‘राष्ट्रवादा’च्या नावे राज्यकर्ते करतात व समाजातील शोषक वर्ग त्याला पाठिंबा देतो, असे मार्क्सवादी विवेचन असते. त्यामुळे मानवी हक्कांची चळवळ कळत-नकळत राष्ट्रवादाच्या भावनेच्या विरोधात कामकरते. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य व सामाजिक हित यांच्यात परस्पर समन्वय कसा घडवायचा, हा मोठा कूट प्रश्र्न आधुनिक समाजव्यवस्थेत आहे.
भारतीय विचार परंपरा या प्रश्र्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. माणसाचा ऐहिक उन्नतीचा प्रवास जसा मूलभूत गरजेपासून स्वत्त्वाची ओळख होण्यापर्यंत होतो, तसा त्याचा आंतरिक प्रवासही होत असतो. या आंतरिक प्रवासाचा विचार आधुनिक समाजशास्त्रात केला जात नाही, कारण हा आंतरिक प्रवास आत्म्याशी निगडित आहे. मुळात शास्त्रीय विचार करणार्याच्या दृष्टीने आत्म्याची संकल्पनाच प्रश्र्नचिन्हांकित आहे; परंतु, या संकल्पनेवर आधारित योगशास्त्रासारख्या ज्या अनेक शाखा विकसित झालेल्या आहेत त्यांच्या वैज्ञानिक चिकित्सा झाल्या आहेत व त्या चिकित्सेतून निघालेले निष्कर्ष प्रसिद्ध झालेले आहेत. अध्यात्मात आंतरिक विकासप्रक्रियेची भरपूर चिकित्सा झाली आहे; परंतु सामाजिक शास्त्रात त्या संकल्पनेचा विचारच झालेला नाही. जर ऐहिक प्रगती होत असताना समाजाचा आंतरिक विकास झाला नाही, तर काय होते याचा प्रत्यय पंजाबमध्ये येत आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाने तिथली स्थिती आपल्या समोर आणली. त्यामुळे केवळ ऐहिक दृष्टीतूनच जर व्यक्तीला स्वत्त्वाची ओळख पटली, तर ती त्या व्यक्तीच्या व समाजाच्या हिताला कारणीभूत ठरेलच असे नाही, किंबहुना विनाशालाच कारणीभूत ठरते, असा अनुभव येतो. त्यामुळे व्यक्तीच्या मूलभूत गरजेपासून आत्मसन्मानापर्यंतचा जो प्रवास आहे, त्याच्या पलीकडे किंवा त्यासह जो आंतरिक प्रवास घडायला हवा त्याची जाणीव व्यक्तीला करून द्यायला हवी.
व्यक्तीचे समाजाशी असलेले ऐहिक संबंध जसे उपयुक्ततावादावर अवलंबून असतात, तसेच त्याच्या आंतरिक विकासाची प्रक्रिया त्याच्या आत्मजाणीवेच्या विकासावर अवलंबून असते. ही आत्मजाणीव जसजशी विकसित होऊ लागते, तसे व्यक्तीचे समाजाशी असलेले संबंध केवळ उपयुक्ततावादावर अवलंबून राहत नाहीत, तर ते जैविक बनतात. पण अवादात्मक संन्यासी वगळता कोणतीही व्यक्ती केवळ झेप घेऊन मानवतावादी बनू शकत नाही. तिची आत्मजाणीव कुटुंब, भाषा, राष्ट्र, मानवता व वैश्र्विक जाणिवा अशी विकसित होते. या विकासक्रमात ‘कुटुंब’ या संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. या संस्थेला कायदेशीर आधार असला तरी कायद्याच्या आधारावर कुटुंब चालत नाही, तर ते आत्मीय जाणीवेच्या आधारे चालते. ज्या समाजव्यवस्थेत व्यक्तिस्वातंत्र्यावर अतिरिक्त भर आहे किंवा कौटुंबिक विचार न करता केवळ व्यक्तिगत विकासालाच प्रधान्य दिले जाते, तिथली समाजव्यवस्था उद्ध्वस्त होते व व्यक्तिगत जीवनही अर्थहीन बनते. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्ममानदर्शनाचा हाच आधार आधार आहे. व्यक्ती, कुटुंब, भाषा, राष्ट्र, मानवता, वैश्र्विक जाणीव हे घटक परस्पर विरोधी नाहीत, तर त्या आंतरिक विकासाचे स्तर आहेत. समाजात वैश्र्विक जाणिवा विकसित झाल्या नाहीत, तर अंतिमतः व्यक्तिगत जीवनही सुखाचे जगता येणार नाही.
कायद्याचे क्षेत्र हे समाजाची बाह्यकृती नियंत्रित करण्याचे असते. त्याकरिता शिक्षेची भीती कामकरते. व्यवस्थापनशास्त्राचे क्षेत्र व्यक्तीला ऐहिकदृष्ट्या अधिकाधिक उपयुक्त बनविण्याचे असते, त्यासाठी त्याच्या प्रेरणेच्या वेगवेगळ्या स्तरावर त्याला मिळणार्या बक्षिसाची योजना केलेली असते. पण व्यक्तीचा आंतरिक विकास भीतीतून किंवा बक्षिसातून घडविता येत नाही, त्याला त्याची प्रचिती द्यावी लागते व तशी त्यालाही यावी लागते. हा अनुभूतीचा भाग आहे. स्वत्त्वाच्या ओळखीपासून आत्मजाणीवेपर्यंतचा हा प्रवास आधुनिक समाजशास्त्राला अनोळखी आहे. या प्रवासात जे सुदृढ सामाजिक संस्थाजीवन बनते, तेच निरोगी आणि चैतन्यदायी सामाजिक जीवनाचा आधार बनते. एकात्ममानवदर्शनावर चर्चा भरपूर झाली आहे. पण त्याचे शास्त्र बनविण्याचे कामअजून कोणी केलेले नाही. त्याची भक्तिपूर्वक पूजा करून देव्हार्यात मांडण्यातच सर्व शक्ती खर्च होत आहे. जेव्हा त्याचे व्यवस्थापनशास्त्राप्रमाणे समाजशास्त्र बनेल, तेव्हाच खरी पर्यायी विचारधारा निर्माण होईल.
डाव्या विचारसरणीने समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाचे स्वरूप व त्यातील परस्पर संबंध स्पष्ट केले, पण त्या विचारसरणीत त्यावर उत्तर नाही. भारतीय विचारसरणीने अशा शोषणाचे शास्त्रीय अभ्यासपूर्ण विश्र्लेषण केले नसले तरी या शोषणावरची उत्तरे त्याच विचारसरणीत मिळू शकतात. त्यामुळे या दोन्ही विचारसरणींच्या समन्वयाची आज गरज आहे.
-दिलीप करंबेळकर