बार्सिलोना
सेव्हिया आम्हाला सोडवत नव्हतं, त्याच्या ऐतिहासिक वृक्षांनी झाकलेल्या शल्यांनी आम्हाला शहराच्या प्रेमातच पाडलं. बार्सिलोना काय, मुंबईसारखं मोठं शहरं आहे, तिच धकाधक, तिच गर्दी असणार असा विचार म्हणा किंवा पूर्वग्रह म्हणा घेऊन आम्ही इथे उतरलो.
आमचं हॉस्टेल जुन्या शहरापासून बरंच लांब असल्याने आम्ही ‘बेडेलोना’ या परिसरात राहिलो. त्यामुळे पर्यटक असूनही स्थानिक होतो. रोज सकाळी उठून आवरून, नास्ता बनवून, लोकल, मेट्रो पकडून प्रवास करून फिरायला निघायचं, असा दिनक्रम असायचा. संध्याकाळी परत येताना दुसर्या दिवशीसाठी बाजारहाट करावा लागायचा. यामुळे बार्सिलोना वेगळ्या नजरेतून बघता आली.
बार्सिलोना भरपूर विस्तारलेलं शहर आहे. फक्त पायी-पायी भटकंती करणे अशक्य होतं. आम्ही इथली hop on hop off bus घेतली. दुसरं काय काय बघावं याची जुजबी माहिती घेण्यासाठी free walking tour घेतली. यात मुख्य ठिकाणं बाहेरूनच दाखविले गेले, पण, कुठे कसं पोचायचं, प्रवास कसा करायचा याची माहिती मिळाली. आमचा गाईड स्पेनचा नसून अर्जेंटिनाचा होता! बार्सिलोना रोमन लोकांनी दोन हजारांहून जास्त वर्षांपूर्वी बसविलं. दोन नद्यांची सुपीक जमीन आणि मुबलक पाणी, भूमध्य सागराचा किनारा, सदैव उत्तम हवामान मोठं शहर वसवायला पूरक होतं. कॉटेलोनियाची राजधानी. इथून साम्राज्य इटली-ग्रीसपर्यंत पसरलं. पुढे औद्योगिक क्रांतीमुळे झालेली भरभराट आणि शहराच्या जुन्या भिंती फोडून झालेली प्रगती. १९९२ साली ऑलिम्पिक्स इथे झाले. त्यानिमित्ताने झालेलं ग्लोबल रूपांतर. या प्रवासाच्या सगळ्या खुणा व्यवस्थित जपून नव्या-जुन्याचा मिलाप आहे. बार्सिलोनाला नैसर्गिक बंदर नसल्यामुळे फार पूर्वीपासून बंदरं बांधावी लागली. रोमकाळात इथून इतर वस्तूंबरोबर दगड निर्यात व्हायचा. त्यानंतर मोठ्या इंडस्ट्रीज इथे उभ्या राहिल्या. खरं तर समुद्रकिनारा असा फारसा दिसायचा नाही. शहराच्या आणि समुद्राच्या मधून हायवे जायचा. १९९२ ची संधी साधून संपूर्ण रूपांतर केलं, कायापालटच झाला या परिसराची. जो हायवे होता तो हलविला, उद्योगधंदे दुसरीकडे नेले, काही ठिकाणी वाळू ओतून समुद्रकिनारे बनविले. la rambla हा रस्ता समुद्रात वाढविला. आणि या समुद्रालगतच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्तमोत्तम सोईसुविधा उभ्या केल्या. imac, shopping, aquarium, मेरिटाईम म्युझियम. सूर्य प्रकाशाला वंचित असणारे युरोपचे पर्यटक तर इथे येतातच, शिवाय सायकलवर फिरणार्यांचीही इथे उत्तम सोय आहे. समुद्र किनार्यावर बसण्याची, पिकनिक करण्याची उत्तम सोय असल्यामुळे आमचा वेळ कसा गेला कळलंच नाही. बार्सिलोनात फिरायला आम्ही hop on hop off बस घेतली. उघड्या छताची दुमजली संपूर्ण शहरात फिरणारी बस काही थांब्यांवर थांबते, कोणत्याही थांब्यावर उतरून त्याच्या आसपासचे ठिकाणं बघून परत येऊन त्याच ठिकाणी बस धरायची, अशा असंख्य बस फिरत असल्यामुळे फार वेळ वाट बघावी लागत नाही. शिवाय नेमकं किती वेळात पुढली बस येईल हे लगेच कळतं. आम्ही दोन दिवस वेगवेगळ्या भागांत फिरणार्या बस घेतल्या आणि बसच्या छतावर बसून का होईना, संपूर्ण बार्सिलोना पालथं घातलं. या बसमध्ये कॉमेंट्री असते. त्यामुळे आपण नेमके कुठे आहोत, त्या परिसराबद्दलची माहिती, काय बघण्यासारखं आहे हे सगळे आपल्याला हव्या त्या आंतरराष्ट्रीय भाषेत ऐकता येतं. भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे हिंदीतही कॉमेंट्री असते.
पण आम्ही खरं बार्सिलोना बघितलं ते इथल्या मेट्रोतून रोज प्रवास करताना. कामावर जाणारे, शाळेत जाणारी मुलं, नातवंडांना सांभाळणारे आजी-आजोबा लोकलमध्ये कुत्री घेऊन सहज प्रवास करणारे लोक, स्थानिक लोकांनी आम्हाला तिकिट काढून देण्यापासून प्लॅटफॉर्मवर सोडविण्यापासून बॅग सांभाळण्या इथपर्यंतच्या सूचना दिल्या.

रोज सकाळी आम्ही उठून La Ramblas या रस्त्यावर पोहोचायचो. बार्सिलोनाचा हा सर्वात प्रसिद्ध रस्ता, जो थेट समुद्र किनार्यापासून मैलभर लांब आहे. याची खासियत अशी की, या रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला दुकाने, खाण्यासाठी छोटे हॉटेल्स, जिवंत पुतळे, चित्रकार खूप चहल-पहल या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरायला अंतर जरी एका मैलाच असलं तरी दिवस जाऊ शकतो. कारण त्याच्यावर माहोलच तसा असतो. सगळे पर्यटक इथे येतात आणि बार्सिलोनाच्या आठवणींच्या वस्तू खरेदी करतात. La Ramblas च्या catalunga च्या टोकाला Bouqueria आहे हे इथलं मार्केट काही विकत न घेणारेदेखील इथे भरपूर वेळ घालवू शकतात. या बाजारात खाण्या-पिण्याच्या पदार्थांची एवढी विविधता असते की, डोळेच काय, नाकही तृप्त होते. विविध रंगाच्या ताज्या भाज्या, रसरशित भाज्या, फळ, तसेच मांसाचे प्रकार तर्हेतर्हेच्या वाईनस, इथे केशर विकत घेतलं. स्पेनचं मांचा, केशर जगप्रसिद्ध आहे. पण इथे सर्वात जास्त दिसतात ते माशांचे प्रकार, साध्या माशांसारखे मासेच नव्हे, तर झिंगे, रुक्विड, ऑक्टोपसचे असंख्य तर्हा रंगाचे आकारांचे एवढे मासे कधीच बघितले नव्हते. एवढी खरेदी करू, असं वाटलंच नव्हतं. बाजाराच्या बाहेर परत दुसरी खरेदी आणि Ramblas वर मांडलेल्या टेबलवर बसून भरपूर ताव मारला.
रोमन संस्कृतीच्या खुणाच नव्हे, तर वास्तूही अजून उभ्या आहेत. Gothic quarters च्या फेरीत रोमन कालीन इमारतींची सैर केली. त्या चिंचोळ्या गल्यांमध्ये आजही त्या काळातील समृद्धी जाणवते. कॅटलस साम्राज्याच्या असंख्य भव्य इमारती अजूनही धडधाकट उभ्या आहेत. यातूनच कुठे तरी अलगतावादाचे ध्वज दिसतात. बार्सिलोना पूर्वीच्या कॅटलस साम्राज्याची राजधानी. इथले लोक स्वतःला स्पॅनिशपेक्षा कॅटॅलियन म्हणतात त्यांची भाषा पण वेगळी! त्यांना त्यांचं वेगळं राष्ट्र हवंय. असो.
असंख्य म्युझियम, कॅथेड्रल आधीच बघितल्यामुळे आम्ही ते न बघण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही नामांकित वास्तू आतून बघता आल्या नाहीत.
बार्सिलोना विमानतळावरून शहराकडे जाताना आम्हाला डावीकडे कबरी असलेला डोंगर दिसला. ड्रायव्हरने ते ‘मॉंटजुई’ असल्याचे सांगितले. ज्यू लोकांचा डोंगर! पूर्वी या डोंगरावर जंगल होतं. आता भरपूर हिरवळ आहे आणि असंख्य आलिशान इमारती आणि स्टेडियम १९९२ साली ऑलिम्पिक्स झाले. इथल्या १९२९ साली बांधलेल्या स्टेडियमची दुरुस्ती केली. इथेच उद्घाटन आणि सांगता समारोह पार पडला. ऑलिम्पिक्ससाठी बांधलेले अनेक स्टेडियम्स इथे आहेत.
Mount juice हून आम्ही गेलो ते खेळाचेच एक भव्य ‘Camp nou’ स्टेडियम बघायला हे FC Barcelona या फुटबॉल टीमच मैदान ७० हजार प्रेक्षक बसू शकतील एवढं मोठं. इथे जरी सामना नसला तरी बघण्यासारखं खूप आहे. फुटबॉलचे म्युझियमच आहे. हे बघण्यासाठी भली मोठ्ठी रक्कम मोजावी लागते, ती वेगळी गोष्ट आहे, पण, एकदा आत शिरलं की, एक अतिशय उत्तम तर्हेने मांडलेल्या म्युझियमला भेट दिल्याचा आनंद मिळतो. शिवाय फुटबॉल क्रेझी नेशनचे हेच देऊळ का असावं, हे देखील कळलं. इथलं गवतसुद्धा विकत नेतात चाहते. ज्या गवतावर मेस्सी खेळला त्या गवताचा तुकडा!
आधुनिक बार्सिलोनादेखील देखणं आहे. २१ व्या शतकात उभारलेल्या इमारतीही नाविन्यपूर्ण आहे. फ्रेंच आर्किटेक्ट जीन नोडवेलने साकारलेलं ऑगबार टाॅवर आधुनिक स्थापत्त्याचे अफलातून नमुना आहे. इमारतीबरोबर अनेक शिल्प हे शहराची ओळख झालेले आहे.
एवढं सगळं आहे बार्सिलोनात, पण बार्सिलोनाची खरी ओळख आहे ती गाऊडीमुळे. गाऊडी हा इथला प्रसिद्ध आर्किटेक्ट. त्याची कल्पनाशक्ती एवढी वेगळी होती की, त्यांनी बांधलेल्या इमारती एक से एक आहेत. त्यांच्याविषयी पुढल्या भागात..
(क्रमश:)
- अंजना देवस्थळे