(पूर्वार्ध)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांचा उद्या, दि. ५ जून रोजी स्मृतिदिन. त्यानिमित्ताने श्रीगुरुजींचे जीवनपट उलगडणारा प्रा. श्याम अत्रे यांचा प्रस्तुत लेख दोन भागात प्रकाशित करत आहोत. आज लेखाच्या पूर्वार्धात श्रीगुरुजींची कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपण, त्यांची शैक्षणिक अभिरुची, संघाशी, डॉ. हेडगेवारांशी आलेला त्यांचा संबंध आणि त्यानंतर सरसंघचालकपदापर्यंतचा एकूणच रंजक प्रवास याचा आढावा घेतला आहे. उद्या, सोमवार, दि. ५ जूनच्या अंकातील लेखाच्या उत्तरार्धात गांधीहत्येनंतर संघावर लादलेली बंदी, श्रीगुरुजींना व हजारो स्वयंसेवकांना भोगावा लागलेला तुरुंगवास व त्यातून तावून-सुलाखून निघालेले श्रीगुरुजींचे नेतृत्व, सामाजिक न्यायाविषयी श्रीगुरुजींची आग्रही भूमिका याचा सविस्तर विचार मांडला आहे. तेव्हा, श्रीगुरुजींच्या व्रतस्थ, राष्ट्रसमर्पित जीवनकार्याचे, त्यांच्या कालसुसंगत विचारांचे स्मरण व अनुकरण हीच श्रीगुरुजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा प. पू. श्रीगुरुजी यांचा जन्म १९ फेब्रुवारी, १९०६ रोजी नागपूर येथे झाला. श्रीगुरुजींचे वडील सदाशिवराव हे ‘भाऊजी’ तर आई लक्ष्मीबाई ‘ताई’ या नावाने परिचित होते. भाऊजी हे हाडाचे शिक्षक होते, तर ताई या शिकलेल्या व सुसंस्कृत गृहिणी होत्या. या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या नऊ अपत्यांपैकी एकटा माधवच दीर्घायुषी ठरला. घरात गुरुजींना ‘मधू’ या लाडक्या नावाने संबोधले जाई. तत्कालीन मध्य प्रांतात शिक्षकी पेशात असणार्या भाऊजींच्या वारंवार बदल्या होत. त्यामुळे गुरुजींचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी झाले. चौथीच्या परीक्षेत ते नर्मदा विभागात पहिले आले व त्यांनी शिष्यवृत्तीही पटकाविली. त्यानंतर शैक्षणिक जीवनात त्यांनी पहिला वर्ग कधीही सोडला नाही. नवव्या वर्षी त्यांचा व्रतबंध झाला. त्या दिवसापासून त्यांची नित्य संध्या व सूर्यनमस्कार ही उपासना आयुष्यात कधीही चुकली नाही. चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण झाले. आपल्या शालेय जीवनात त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांत प्राविण्य मिळविले. अनेक वक्तृत्त्व स्पर्धांतून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याचीही नोंद आहे. गुरुजींची स्मरणशक्ती अतिशय तीव्र व तरल होती व ते एकपाठी होते. प्रथमपासूनच त्यांना वाचनाची आवड होती. संघकार्यात असताना या सर्व गुणवत्तेचा त्यांच्या व्यापक जनसंपर्कात व विविध स्तरांवरील भाषणे व बैठकांत सतत प्रत्यय येत राहिला. मॅट्रिकनंतर गुरुजींनी हिस्लॉप महाविद्यालयातून इंटरसायन्सचे शिक्षण पूर्ण केले. प्राणिशास्त्र हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी सुवर्णपदक मात्र त्यांनी इंग्रजी या विषयात मिळविले. पुढे बनारस हिंदू विश्व विद्यालयातून त्यांनी प्राणिशास्त्र या विषयात बी. एस्सी. (१९२६) आणि एम. एस्सी. (१९२८) या पदव्या संपादन केल्या. आपल्या दीड तपाच्या शिक्षण साधनेत त्यांनी अनेक पदके, पारितोषिके विविध स्पर्धांतून मिळविली. अनेक शिष्यवृत्त्या मिळवून त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
पुढे प्राणिशास्त्रातील प्रगत संशोधनासाठी गुरुजींनी मद्रास येथील मत्स्य महाविद्यालयात प्रवेश मिळविला व आपले संशोधन कार्य सुरू केले. तेथे डी. एस्सी. ही या क्षेत्रातील सर्वोच्च पदवी त्यांना मिळवायची होती. पण याच सुमारास भाऊजी सेवानिवृत्त झाले आणि आर्थिक अडचणींमुळे दोन वर्षांच्या संशोधनानंतर गुरुजींना नागपुरास परत यावे लागले. अर्थार्जनाची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळविली. प्राणिशास्त्र हा जरी त्यांच्या अध्यापनाचा मुख्य विषय असला तरी ते बी. ए. ला इंग्रजी व राज्यशास्त्र हे विषयही तन्मयतेने शिकवीत. एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून शैक्षणिक जगतात ते लवकरच मान्यता पावले. तेथेच त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘गुरुजी’ ही उपाधी प्रदान केली. हे नामाभिधान पुढे अवघ्या हिंदू समाजाचे व राष्ट्राचे गुरू झालेल्या गोळवलकरांना चिकटले ते कायमचेच! पुढे नागपूरला परत आल्यानंतर गुरुजींनी वकिलीचा अभ्यास केला, सनद मिळविली व प्रा. गोळवलकर हे काही काळ गोळवलकर वकीलही झाले.
श्रीगुरुजींच्या अध्ययन-अध्यापन कालखंडातील अन्य काही वैशिष्ट्यांची दखल घेतली पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे मर्म समजणार नाही. या काळात त्यांचे विविध विषयांवरील वाचन सुरू होते. अभ्यासक्रमाच्या चौकटीत ते कधीच रमले नाहीत. शास्त्रीय विषयांपासून ललितकलांपर्यंत आणि धर्मशास्त्रापासून पाककलेपर्यंत प्रत्येक विषयाचे त्यांना अफाट कुतूहल होते. त्यामुळे वाचनाच्या माध्यमातून त्यांची ज्ञानसाधना आयुष्यभर चालू होती. त्यांना डॉक्टर व्हायचे होते, पण आर्थिक ओढग्रस्तीमुळे पात्रता असूनही त्यांना वैद्यकीय शिक्षण घेता आले नाही. पण त्यांनी ऍलोपथी, होमिओपथी, आयुर्वेद, निसर्गोपचार या वैद्यकीय शाखांचा सखोल अभ्यास केला होता. भूगोल, खगोल, ज्योतिर्विद्या यांच्यात त्यांना रस होता. स्थापत्यशास्त्र, भूस्तरशास्त्र, युद्धशास्त्र व गूढ विद्या यांचाही त्यांचा व्यासंग दांडगा होता. साहित्य, संगीत, शिल्प, नाट्य, चित्रकला, क्रीडा, व्यायाम अशा अनेक विषयांचे ते मर्मज्ञ जाणकार होते. वेद, उपनिषदे, शास्त्रे, पुराणे इतिहास यांचा अभ्यास गुरुजींनी केला होता. अनेक देशी व विदेशी तत्त्ववेत्त्यांचे, दार्शनिकांचे ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यातील अनेक उतारे व संदर्भ त्यांना मुखोद्गत होते. बायबल व कुराणाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. एका बैठकीत बायबलसंबंधी विषय निघाला, तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘उपनिषदांचा अभ्यास असला, तरच बायबलमधील काही विसंगत वाटणार्या संकल्पनांची संगती लावता येते; अन्यथा केवळ पाश्चात्त्य विचारसरणीच्या आधारे ती लावता येत नाही.’’ उपनिषदे व बायबल यांचा तौलनिक अभ्यास असल्याशिवाय असा अभिप्राय देता येणार नाही.
श्रीगुरुजींनी पं. सावळाराम यांच्याकडून बासरीवादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले होते. ते सतार उत्तम वाजवीत. त्यांना गायनाचे उत्तम अंग होते. नागपुरातील रामकृष्ण मठाचे प्रमुख अमिताभ महाराज यांनी गुरुजींच्या गायनीकलेची मनापासून प्रशंसा केली आहे. क्रीडेच्या क्षेत्रात हॉकी, टेनिस व मल्लखांब हे त्यांचे आवडते प्रकार होते व त्यात त्यांनी प्रभुत्वही मिळविले होते. गुरुजी पाकशास्त्रात पारंगत होते. सामान्यपणे सुगरणीलाही जो पदार्थ आव्हान देणारा वाटतो तो म्हणजे पुरणाची पोळी! गुरुजी पुरणाची पोळी करण्यात पारंगत होते.
इतक्या परस्परविरोधी ज्ञानशाखांचा इतका सखोल अभ्यास करणे गुरुजींना कसे काय शक्य झाले? कोणताही विषय पाठ्यपुस्तकापुरता वा वरवर न पाहता, तो मुळापासून पाहावा व त्या विषयावरील अद्ययावत ग्रंथ वाचून प्रत्येक विषय आत्मसात करावा, असा त्यांचा परिपाठ होता, त्यात वरील प्रश्नाचे उत्तर सापडते. शिवाय मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्तीची तरलता यामुळे ते एकपाठी होते. जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची त्यांची दृष्टी व सर्व ज्ञानशाखांबद्दलचे प्रचंड कुतूहल आणि संशोधनात्मक वृत्ती यामुळे कोणत्याही विषयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करावा, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या अफाट वाचनासंबंधी एक हकिकत प्रसिद्ध आहे. बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे ग्रंथालय अतिशय संपन्न होते. पं. मदनमोहन मालवीयांनी देशभर प्रवास करून अनमोल ग्रंथांचा खजिना या ग्रंथालयात आणला होता. ‘‘या ग्रंथालयातील प्रत्येक विषयाचे महत्त्वाचे असे प्रत्येक पुस्तक श्रीगुरुजींनी आपल्या अध्ययन व अध्यापन काळात वाचले होते,’’ अशी नोंद तत्कालीन ग्रंथपालांनी आपल्या आठवणीत करून ठेवली आहे. ‘‘या काळात आपण हजारो ग्रंथ नक्कीच वाचले असतील,’’ असा उल्लेख गुरुजींनी पुढे एका बैठकीतही केला होता. त्यांच्या या व्यासंगाचे प्रत्यंतर अनेक विद्वान पंडितांना त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत आले आहे. संघकार्यातील अनेक बैठकांतून, बौद्धिकातून व प्रकट भाषणांतून त्यांच्या या व्यासंगाची अनुभूती श्रोत्यांना मिळत असे.
श्रीगुरुजींची खरी व परिपूर्ण ओळख होण्यासाठी आजच्या युवापिढीला त्यांच्या जीवनाचे हे विविध पैलू माहीत असणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या अभ्यासातून त्यांची प्रखर विज्ञाननिष्ठा सिद्ध झाली होती. संशोधनातून प्रयोगशीलता व तार्किकता विकसित झाली होती. विविध ज्ञान शाखांच्या अभ्यासातून त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुश्रुत झाले होते. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, वाङ्मय यांच्या चिंतनामुळे विज्ञानापलीकडे असणार्या अध्यात्माची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली होती.विविध कला व क्रीडा यांच्या आवडीतून व अभ्यासातून त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्त्र झाले होते. विविध भाषांवर प्रभुत्व मिळविल्यामुळे त्यांच्याजवळ विलक्षण संवाद कौशल्य होते. चहुबाजूंनी मिळविलेल्या या अफाट गुणवत्तेचा विस्तार व विकास गुरुजींच्या जीवनाच्या अंतापर्यंत होताना दिसतो. त्यांच्या कर्तृत्वाची व नेतृत्वगुणांची चिकित्सा करताना ज्या विविधांगी ज्ञानसाधनेच्या भक्कम पायावर त्यांचे जीवनशिल्प उभे आहे, त्यांचे यथायोग्य आकलन होणे आवश्यक आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे वर्णन लोकमान्य टिळकांनी ‘सर्वज्ञः स हि माधवः|’ असे केले आहे. श्रीगुरुजींच्या सव्यसाची व्यक्तिमत्त्वालाही हे वर्णन चपखलपणे लागू होते. योगायोगाने ते दोघेही ‘माधव’च होते. गुरुजींच्या ज्ञानसाधनेचा हा लखलखीत आलेख पाहिला म्हणजे आठवण होते ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी व उग्र ज्ञानसाधनेची. वयाच्या तिशीपर्यंतच दोघांनीही आपल्या ज्ञानसंपन्नतेच्या आधारावर आपल्या जीवनाचा पाया भक्कमपणे घातला होता. वर्तमानकाळात जीवनाच्या सर्वच क्षेत्रात नेतृत्वाचे खुजेपण अनुभवायला येत असताना, न्या. रानडे, डॉ. आंबेडकर वा श्रीगुरुजी यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या उंचीचे महत्त्व अधिकच स्पष्टपणे मनात ठसते.
***
श्रीगुरुजींच्या जीवनाला अध्यात्माची बैठक होती. मौंजीबंधन झाल्यापासून दररोज संध्यावंदन व सूर्यनमस्कार यांचे व्रत त्यांनी घेतले. पुढे रा. स्व. संघाशी संबंध आल्यानंतर त्याला दैनंदिन प्रार्थनेची जोड मिळाली. ‘‘संध्येतील गायत्रीमंत्रामुळे व सूर्यनमस्काराच्या बलोपासनेमुळे आपणास फार मोठे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ्य लाभलेले आहे,’’ असा उल्लेख पुढे त्यांनी एका कार्यक्रमात केल्याची नोंद आहे.वेळ मिळेल तेव्हा ध्यानधारणा, वाचन-मनन-चिंतन यात ते आपला वेळ व्यतीत करीत आणि तेसुद्धा कोणताही बडेजाव न माजवता. १९३१ साली त्यांचा नागपुरातील रामकृष्ण आश्रमाशी संबंध आला. या केंद्रात आणि तत्पूर्वी बनारस हिंदू विश्वविद्यालयात त्यांनी रामकृष्ण व विवेकानंदांचे समग्र वाङ्मय वाचून काढले होते. त्याचा खोल ठसा त्यांच्या जीवनावर उमटलेला दिसतो. त्यांना अध्यात्माची ओढ लागली ती या ग्रंथांच्या अभ्यासामुळे. त्यातूनच हिमालयात जाऊन तपश्चर्या करावी, असेही विचार त्यांच्या मनात घोळू लागले. भाऊजी व ताई यांना स्वाभाविकपणेच असे वाटत असे की, आपल्या सुविद्य व कर्तबगार मुलाने लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. पण गुरुजींनी अविवाहित राहण्याचा आपला निश्चय घरी सांगून टाकला आणि त्यांच्या माता-पित्यांच्या आशेवर पाणी पडले. मात्र, त्यांचा हा निर्णय गुरुजींच्या आध्यात्मिक जीवनधारणेशी सुसंगतच होता.
बनारसहून नागपूरला परतल्यानंतर गुरुजींचा रामकृष्ण आश्रमाशी व अमिताभ महाराजांशी संपर्क वाढला. बनारस येथे असतानाच गुरुजी संघाच्या संपर्कात आले होते. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी संघ संपर्कात आलेल्या अनेक तरुणांना शिक्षण व संघकार्य या दुहेरी हेतूने देशाच्या विविध भागांत पाठविले होते. त्या योजनेतून भैय्याजी दाणी हे बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षणासाठी दाखल झाले. तेथे त्यांचा गुरुजींशी संबंध आला व त्यांच्या माध्यमातून ते संघाकडे ओढले गेले, (१९३१) एवढेच नव्हे, तर बनारसमध्ये प्राध्यापक म्हणून असेपर्यंत तेथील संघचालक म्हणूनही त्यांनी दायित्व सांभाळले. पुढे गुरुजी नागपूरला परतल्यानंतर डॉ. हेडगेवारांनी प्रयत्नपूर्वक त्यांच्याशी संपर्क वाढविला व संघाच्या विविध जबाबदार्या मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपविल्या. एकीकडे रामकृष्ण मठ आणि दुसरीकडे रा. स्व. संघ या दोन्ही संस्थांमध्ये ते सारखेच रस घेत होते. स्वामी विवेकानंदांनी समाजाला युग धर्म सांगितला, तर डॉ. हेडगेवारांनी हा युगधर्म प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी संघमंत्र व शाखातंत्राचा संघटन मार्ग सांगितला. या दोन्ही विचारधारांचा अपूर्व मिलाफ गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात झालेला दिसतो. मात्र, याच काळात गुरुजी एका द्वंद्वालाही सामोरे जात होते. त्यांच्या जीवनात अध्यात्माची ओढ वाढलेली दिसते. हिमालयाची गिरिशिखरे त्यांना खुणावू लागली होती. संन्यासमार्गाचे आकर्षण वाढले होते. यासंदर्भात त्यांची चर्चा केवळ रामकृष्ण मठातील अमिताभ महाराजांशी होत असे. त्यांच्या सल्ल्यानुसार व त्यांनी दिलेले ओळखपत्र घेऊन गुरुजी १९३६ साली जुलै महिन्यात एकेदिवशी अचानक घरातून नाहीसे झाले व कलकत्त्याला येऊन पोहोचले. घर सोडण्यापूर्वी एका स्नेह्या मार्फत त्यांनी एक पत्र भाऊजींना पाठविले होते. दुर्दैवाने ते पत्र आज उपलब्ध नाही, पण ते पत्र म्हणजे गुरुजींच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर त्यांनी स्वतः लिहिलेले भाष्यच असले पाहिजे.
कलकत्त्यातील रामकृष्ण मठात त्यावेळी विवेकानंदांचे गुरुबंधू असलेले स्वामी अखंडानंद अध्यक्ष होते व त्यांचा मुक्काम सारगाछी येथील मठात होता. गुरुजी तेथे जाऊन पोहोचले व स्वामी अखंडानंदांचे दर्शन घेऊन ते स्वामीजींच्या सेवेत रममाण झाले. इतके उच्चविद्याविभूषित असूनही गुरुजींनी सामान्य सेवेकर्याप्रमाणे स्वामीजींची मनोभावे सेवा केली. सात-आठ महिन्यांच्या अखंड आणि अबोल सेवेनंतर अखंडानंदांनी त्यांच्यावर अनुग्रह केला. १३ जानेवारी, १९३७ रोजी त्यांनी गुरुजींना दीक्षा दिली. पुढे काही दिवसांनीच म्हणजे २४ जानेवारी, १९३७ रोजी स्वामीजींनी शक्तिपात योगाद्वारे आपल्यातील दैवी शक्ती गुरुजींना प्रदान केली व त्यांना अमोघ आशीर्वाद दिले. दोघेही गुरु-शिष्य प्रसन्न चित्त होते. या काळात गुरुजींचे केस व दाढीमिश्या वाढल्या होत्या. त्यांचे विरागी व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसत होते. स्वामीजी गुरुजींना म्हणाले, ‘‘तुला हे केस फार शोभून दिसतात. तेव्हा तू ते कधीही काढू नकोस.’’ स्वामीजींची इच्छा प्रमाण मानून गुरुजींनी त्याचे आजन्म पालन केले. स्वामीजींच्या सहवासात असताना हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची तीव्र इच्छा गुरुजींच्या मनात उफाळून आली. त्यांची व स्वामीजींची या विषयावर दीर्घकाळ चर्चा झाली. मात्र, स्वामीजींनी त्यांना या निश्चयापासून परावृत्त केले. ‘‘स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असणार्या दरिद्री नारायणाची सेवा करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे व ते कार्य तुझी वाट पाहत आहे,’’ असे त्यांनी गुरुजींना परोपरीने बजावले. डॉ. हेडगेवारांनी स्थापन केलेल्या संघाचे कार्य हेच स्वामीजींना अभिप्रेत होते. स्वामीजींच्या उपदेशानुसार संन्यास घेण्याचा मोह सोडून श्रीगुरुजी समाजाच्या व राष्ट्राच्या सेवेत संघाच्या माध्यमातून कसे रुजू झाले, त्याची पूर्वपीठिका ही अशी आहे.
शक्तिप्रदान समारंभानंतर लवकरच स्वामी अखंडानंदांचे निधन झाले आणि गुरुजी नागपुरात परतले. ते डॉ. हेडगेवारांच्या निकट सान्निध्यात आले. तेथपासून ते डॉक्टरांच्या निधनापर्यंत गुरुजींचा संघ विचारविश्वात व संघटनेत झालेला प्रवास थक्क करून टाकणारा आहे. येथे एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. डॉक्टरांनी १०-१२ किशोरवयीन मुलांच्या साहय्याने संघाची १९२५ साली स्थापना केली व त्यांची कार्यकर्ता म्हणून जडणघडण केली. बाळासाहेब देवरस या चमूत होते व त्या अर्थाने ते ‘संघ प्रोडक्ट’ होते. मात्र, या अर्थाने श्रीगुरुजी ‘संघ प्रोडक्ट’ नव्हते. कारण, गुरुजी संघाच्या प्रथम संपर्कात आले तेव्हा त्यांनी वयाची पंचविशी ओलांडली होती आणि संस्कारक्षम वयही ओलांडले होते. याच काळात डॉक्टरांनी गुरुजींवर संघाच्या विविध जबाबदार्या टाकून त्यांचे नेतृत्वगुण पारखून घेतले होते. संघशिक्षावर्गाचे सर्वाधिकारी, कलकत्त्याला प्रचारक व पुढे संघाचे सरकार्यवाह म्हणून नियुक्ती या घटना याच काळात घडलेल्या दिसतात. याच काळात त्यांनी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे केलेल्या भाषणाचा भावानुवाद केला. बाबाराव सावरकरांनी लिहिलेल्या ‘राष्ट्रमीमांसा’ या पुस्तकाचा अनुवाद केला व त्याला विवेचक प्रस्तावना लिहिली.
‘आम्ही कोण’ या ग्रंथाच्या लेखनाची प्रेरणा त्यांना याच काळात मिळाली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची झालेली भेट याच कालखंडातील. सिंदी (महाराष्ट्र) येथे प्रमुख संघ कार्यकर्त्यांची दहा दिवसांची जी प्रदीर्घ चिंतन बैठक डॉक्टरांच्या उपस्थितीत झाली तिचे नेतृत्व डॉक्टरजींच्या मार्गदर्शनाखाली गुरुजींनी केले. या काळात गुरुजी वैचारिकदृष्ट्या व संघटनात्मकदृष्ट्या अधिकाधिक परिपक्व होत गेलेले दिसतात. हा त्यांचा प्रवास डॉक्टर डोळ्यात तेल घालून पाहत होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या पश्चात श्रीगुरुजींनी सरसंघचालकपदाची धुरा सांभाळावी, अशी योजना करून ठेवली. २१ जून, १९४० रोजी डॉक्टरजींचे निधन झाले. डॉक्टरांनी केलेल्या योजनेनुसार त्यांच्या पश्चात म्हणजे ३ जुलै, १९४० रोजी गुरुजींनी सरसंघचालकपदाची सूत्रे हाती घेतली.
विज्ञाननिष्ठा, तत्त्वज्ञान व अध्यात्मदृष्टी यांचा अपूर्व संगम असलेल्या श्रीगुरुजींची सरसंघचालकपदी नियुक्ती करून डॉक्टरांनी आपल्या अचूक निवडशक्तीचा व दूरदृष्टीचा प्रत्यय आणून दिला. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवीत श्रीगुरुजींनी पुढे ३३ वर्षे म्हणजे जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत (५ जून, १९७३) ही जबाबदारी मनोभावे व समर्थपणे पार पाडली. सरसंघचालकपदाचे दायित्व स्वीकारण्यापूर्वी गुरुजींच्या सव्यसाची व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली याचा हा थोडक्यात आढावा आहे.
***
आपल्या ३३ वर्षांच्या सरसंघचालकपदाच्या कारकिर्दीत गुरुजी प्रतिवर्षी दोनदा संपूर्ण भारताचा संघटनात्मक दौरा करीत. ‘आगगाडीचा डबा हेच माझे घर’ असे ते म्हणत ते याच अर्थाने की, त्यांचा बहुतांश वेळ प्रवासात जाई. देशाच्या कानाकोपर्यात संघकार्याचा विस्तार व्हावा, संघमंत्र व शाखातंत्र जनमानसात रुजावे, यासाठी त्यांनी आयुषयभर धडपड केली. संघशाखा हे कार्यकर्ता निर्मितीचे, कार्यासाठी लागणार्या मानवी ऊर्जा निर्मितीचे केंद्र बनावे, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. कै. प्रा. यशवंतराव केळकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व संघप्रचारक. त्यांच्याच शब्दात सांगायचे, तर शाखातंत्र म्हणजे Finished Productअशा गुणवत्तेच्या कार्यकर्ता निर्मितीची बिनभिंतीची कार्यशाळा आहे. तेथून Factory defect असलेले कार्यकर्ते निर्माण होणे संघाला व समाजालाही परवडणारे नाही. गुरुजी हे परिपूर्णतेचा आग्रह धरणारे व वेळेविषयी काटेकोर असणारे संघाचे शीर्षस्थ नेते होते. आपण सगळे अपूर्णांक आहोत, पण आपला प्रवास पूर्णांकाच्या दिशेने झाला पाहिजे. यासाठी शाखातंत्राचा आग्रह. त्यांच्या या वैचारिक मुशीतून हजारो कार्यकर्त्यांची फळी संघ व संघ परिवारात तयार होऊ शकली. विविध स्तरावर कार्य करणार्या स्वयंसेवकांच्या बैठका, शिबिरे, संघ शिक्षा वर्ग, गाठीभेटी यांच्या माध्यमातून लक्षावधी स्वयंसेवकांशी गुरुजींनी सतत संपर्क ठेवला. त्यांची स्मरणशक्ती अतिशय तरल होती. एकदा संपर्कात आलेल्या स्वयंसेवकाला तो दहा वर्षांनंतर भेटला तरी ते नावा निशीवार ओळखत व त्याची आस्थेने चौकशी करीत. त्यांच्या स्मरणशक्तीबद्दल एक किस्सा प्रसिद्ध आहे. पहिल्या संघबंदीच्या काळात गुरुजी सुमारे दीड वर्ष कारावासात होते. ‘तेथे तुमचा वेळ कसा जात असे?’ असे त्यांना एकदा विचारले असता ते म्हणाले, ‘‘कारागृहातही माझा देशभर प्रवास सुरू असे. एकेक गाव, शहर डोळ्यासमोर आणून तेथील स्वयंसेवकांशी मी स्मरणपूर्वक संवाद करीत असे. अशा प्रवासात व संवादात किती वेळ जाई, हे लक्षात येत नसे. कारागृहात राहूनही देशभरातल्या सर्व स्वयंसेवकांशी माझा संवाद होता. संपर्क होता.’’ गुरुजींची संघातील गुंतवणूक किती मोठी होती हेच यावरून सिद्ध होते. संवाद, संपर्क, स्नेह, आत्मीयता यातून त्यांनी माणसे संघाशी जोडली. कार्यकर्त्यांची जडणघडण केली. ‘Man making is a pre-condition of Nation-building' हे संघटनाशास्त्राचे सूत्र त्यांनी प्रत्यक्षात आणले. त्यामुळेच समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हिंदू जीवनदृष्टी घेऊन संघटनात्मक, रचनात्मक व सेवाभावी कार्याचे डोंगर उभे करणारे कार्यकर्ते व संस्थाजीवन ते उभे करू शकले.
दररोजची तासाभराची शाखा. या शाखेतून संघ भावना (Team Spirit) विकसित होते. व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे घासले जातात. मातृभूमीविषयी भक्तिभाव व समाजाविषयी आत्मीयता यांचे संस्कार स्वयंसेवकांच्या मनावर होत राहतात. खेळ, व्यायाम, योग, बौद्धिके, चर्चा, प्रार्थना याद्वारे कार्यकर्त्यांची जडणघडण होत असते. या तासाभरात ‘Chi-selling out the unessential' ही शिल्पशास्त्रातील प्रक्रिया सातत्याने होत राहते. जातीउपजातींच्या जन्मजात उतरंडीतून समाजमनात रुजलेली सामाजिक विषमता आणि उच्च-नीचतेची भावना आणि हिंदू समाजाला कलंकभूत असणारा स्पृश्यास्पृश्यतेचा घृणास्पद व्यवहार यांचा निचरा होतो. समरसतायुक्त व तुच्छतामुक्त समाजजीवन संघटित करण्यासाठी शाखातंत्र हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले प्रभावी माध्यम आहे. संघटनाशास्त्राचा तो एक अपूर्व व यशस्वी प्रयोग आहे. या प्रयोगाचे परिपूर्णत्व सिद्ध करण्यात गुरुजींच्या चिंतनाचा व व्यवहाराचा मोठा वाटा आहे.
शाखा हे समाज परिवर्तनाचे केंद्र बनले पाहिजे, सामाजिक न्याय व सुरक्षेचे आश्र्वासक स्थान बनले पाहिजे, अशी त्यांची मांडणी होती. जेथे जेथे संघमंत्र व शाखातंत्र यांचा चैतन्यदायी आविष्कार झाला तेथे असंख्य कार्यकर्त्यांची निर्मिती झाली, असे चित्र देशभर दिसते. जेथे शाखातंत्र ढिले पडले वा कर्मकांडी झाले तेथे समस्या उभ्या राहिल्या. अशा शाखा हे गुरुजींच्या चिंतेचे विषय बनत. म्हणूनच प्रत्येक लहान-मोठ्या बैठकीतून ते शाखांच्या वाढीची व विकासाची आणि स्वयंसेवकांच्या व्यवहाराची बारकाईने व आस्थेने चौकशी करीत. स्वयंसेवकांनी आपल्या पारदर्शी व्यवहाराचा वस्तुपाठ समाजासमोर ठेवला पाहिजे, तरच त्यांचा समाजजीवनावर प्रभाव पडू शकेल, अशी त्यांची मांडणी होती. श्रीगुरुजींचा स्वतःचा संपूर्ण जीवनव्यवहार म्हणजे स्वयंसेवकत्वाचा आदर्श वस्तुपाठ होता. त्यांचे जीवन हा संघटनाशास्त्राचा विकासक्रम होता. म्हणूनच संघावरील पहिल्या बंदीनंतर अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित केल्यानंतरही, त्या विपरीत परिस्थितीत संघ शाखा या साधनाविषयी त्यांची श्रद्धा यत्किंचितही डळमळीत झालेली दिसत नाही.
संघाच्या सिद्धांतांची व कार्यपद्धतीची शास्त्रशुद्ध व व्यावहारिक मांडणी करणारे त्यांचे अनेक बौद्धिक वर्ग व भाषणे प्रसिद्ध आहेत. एखाद्या उपशाखेतील गटनायकांच्या बैठकीपासून ते केंद्रीय स्तरावरील प्रतिनिधी सभेपर्यंत सामूहिक चिंतन, विचारविनिमय व त्यातून निर्णय अशा या प्रक्रियेतून नवनीतासारखा आलेला निर्णय सर्वांना मनःपूर्वक मान्य अशी पद्धती संघकामात रूढ झाली. संघावर एक चालकानुवर्तित्वाचे नकारात्मक आरोप जे करतात त्यांना संघाच्या कार्यपद्धतीची प्राथमिक ओळखही नसते.
हिंदू, हिंदुत्व, हिंदूराष्ट्र, हिंदू संस्कृती या देशाच्या अस्तित्वाशी व भावजीवनाशी निगडित असणार्या संकल्पनांची मांडणी ते जेवढ्या पोटतिडिकेने करीत त्याच पद्धतीने समाजजीवन निर्दोष, सुसंघटित व बलवान व्हावे म्हणून आवश्यक असणार्या संघाच्या कार्यपद्धतीची म्हणजेच शाखातंत्राची सखोल मांडणी करीत. सारांश, संघमंत्र व शाखातंत्र यांच्या माध्यमातून कार्यकर्ता निर्मिती व त्याद्वारे संघटित समाजजीवन व वैभवशाली राष्ट्रजीवन यांची उभारणी याबद्दलची श्रीगुरुजींची आग्रही भूमिका संघाच्या वाढीस व विकासास कारणीभूत ठरली आहे. जेव्हा केव्हा संघटनशास्त्र या विषयाचे विश्वकोषीय ग्रंथलेखन होईल तेव्हा श्रीगुरुजींच्या या विषयातील महत्त्वपूर्ण योगदानाची योग्य ती दखल निश्चित घ्यावी लागेल.
(क्रमश:)
- प्रा. श्याम अत्रे