मेधाकाकू : अवंती, काल आपण समर्थांचा एक श्लोक पाहिला. आपल्या म्हणींच्या अभ्यासाचा थोडासा संदर्भ या श्लोकाच्या माध्यमातून घेतला. आता दासबोधातील पाचव्या दशकातील सहाव्या समासातील बाराव्या श्लोकात समर्थ रामदास, “पाहावे आपणासि आपण” ही संकल्पना अधिकच स्पष्ट करतात. ते म्हणतात,
महांवाक्य उपदेश सार I परी घेतला पाहिजे विचार I
त्याच्या जपें अंधकार I न फिटे भ्रांतीचा I
ठीक आहे, कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलय आणि आपण त्याचा जप करत राहिलो म्हणजे आपल्याला त्याचे ज्ञान प्राप्त झाले अशा भ्रमात राहू नका. असा निव्वळ जप करून कधी ज्ञान प्राप्त होत नसते. जे वाचाल - ऐकाल, त्याचा शास्त्रशुद्ध विचार करा. गुरुकडून मार्गदर्शन घ्या. तरच ज्ञान प्राप्ती होईल.
अवंती : येस, माझ्या गुरु, मेधाकाकू तुला नमस्कार.!! मी गम्मत करत नाहीये काकू. ही गोडी तुझ्यामुळेच लागली. हे सगळे समजून घेणे तुझ्यामुळेच शक्य झालयं, मला..!! आणि आता मराठी भाषालंकार आणि अर्थालंकारांची नव्याने होणारी ओळख...!! झक्कास... सही है... काकू...!! काल आजी आपल्या अभ्यासाची चौकशी करत होती आणि तिच्या बालपणी ऐकलेले दोन वाकप्रचार पटकन सांगितलेन् तिने.
उपास केला आणि दोन रुपये फराळाला
उपासामागे पारणे आणि पारण्यामागे उपास
मेधाकाकू : अरे वा... अवंती, मी सुद्धा आज प्रथमच ऐकले हे वाकप्रचार... मस्तच...!! उपास केला आणि दोन रुपये फराळाला.
ही संधी छान आहे. आपण दोघी आता एक काम करूया. याच्या भावार्थाचा मागोवा घेऊया. आपण आजीच्या बालपणीच्या काळात, चाकरमान्या - नोकारदार व्यक्तीचा मासिक पगार ५०/६० रुपये होता त्याकाळात जाऊया. अवंती असे बघ, इतका पगार म्हणजे दिवसाला २ रुपये असे उत्पन्न आणि उपास करणारा असा काही चेपून फराळ घेतो की, त्याचाच खर्च २ रुपये, हा तर व्यस्त प्रमाणातला न परवडणारा खर्च. इकडे म्हणायचे आज माझा उपास म्हणजे काहीही आहार न घेणे. मात्र उपासाच्या बहाण्याने बदाम-काजू-फळे असा आहार घ्यायचा. उपास म्हणजे आहार नियंत्रण अर्थात संयमाचे आचरण...!! पण या धारणेचा अतिरेक म्हणजेच हा वाकप्रचार अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती आणि आनंद मिळूनही, असमाधानी असल्याचा देखावा करणे. हा वाकप्रचार म्हणजे, पर्यायोक्ती या अर्थालंकाराचे उत्तम उदाहरण. यामध्ये, एखादी गोष्ट सरळ अर्थाने न सांगता, थोडेसे खिजवून आडवळणाने सांगितली जाते.
अवंती : आहा... माझा विश्वासच बसत नाहीये तू सांगतायेस त्यावर म्हणजे आजीच्या लहानपणी दिवसाची मिळकत फक्त दोन रुपये...!!
मेधाकाकू : हो अवंती, ऐंशी-शंभर पूर्वीचा तो काळ होता खरा तसा...!! आता आजीचा हा दुसरा वाकप्रचार... उपासामागे पारणे आणि पारण्यामागे उपास. आता वरच्या सारखेच यात सुद्धा पडद्याआडून, विवेक - संयम अशा वैयक्तिक गुणवत्ता जपणे, त्याचे संवर्धन करणे का आवश्यक आहे त्याचा दिलेला सल्ला आहे. याचा मथितार्थ असा उपास केला की भूक लागते आणि पारणे फेडताना, म्हणजे उपास सोडताना आपण जास्तच जेवतो आणि मग अपचन होऊन पुन्हा उपास करण्याची वेळ येते. असे न संपणारे चक्र थांबायला हवे, त्यासाठी आहारावर संयम हवा आणि अपेक्षा आणि समजुतीचा विवेक हवा. ससंदेह या अर्थालंकाराचे उदाहरण याचे कारण श्रोत्याला आणि वाचकाला, यात उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होतो.
अवंती : हं... मेधाकाकू... आलंय लक्षात. हे शेवटचे वाक्य कोणाला उद्देशून आहे ते...! गेल्या वर्षीची कांदेनवमी आणि कांदाभजी मी नाही विसरणार कधी...!!
मेधाकाकू : अगदी जोरात लागलाय बाण, बहुतेक असे दिसताय. असो पण मुद्दा आणि भावना पोहोचल्या असतीलच. आता वर जसे गुणवत्ता जोपासणीचा सल्ला देणारे वाकप्रचार पहिले, तसेच व्यक्तीच्या विविध मनोवृत्तींवर टिप्पणी करणारे, माणसाने कसे असू नये, ते चार-सहा शब्दात सांगणारे वाकप्रचार आहेत आपल्या भाषेच्या खजिन्यात.
खायाप्यायास मी लढायास कुबडा भाई.
यातल्या शब्दार्थामध्येच, मुद्दा काय आहे ते आपल्याला कोणीही न सांगता पटकन समजते. ही आहे स्वार्थी माणसाची मनोवृत्ती. फायदा घेण्यासाठी पुढे आणि जबाबदारी आली की मागे. यातील कुबडा भाई हे हाताखालच्या, वरकाम करणार्या व्यक्तीचे रूपक आहे. हे आहे स्वभावोक्ती आणि अर्थान्तरन्यास या दोन भाषा अर्थालंकारांचे यथार्थ उदाहरण. स्वभावोक्ती अलंकारात एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट स्वभावधर्माचे वर्णन केलेले असते. अर्थान्तरन्यास या अलंकारात, वाक्यातील पहिल्या विधानाच्या समर्थनार्थ, वाक्याच्या नेमके विशेष उदाहरण दिले जाते आणि पहिल्या विधांनाच्या पुष्ट्यर्थ एक प्रकारे सिद्धान्त मांडला जातो.
अवंती : गुरु मेधाकाकू तुला प्रणाम...!! किती मस्त चाललंय आपले भाषा अलंकार संशोधन आणि अभ्यास. आता आजचा हा शेवटचा वाकप्रचार. आजचा गोड धडा...!!
गूळ नाही पण गूळशी वाचा तर पाहिजे.
मेधाकाकू : वा...अवंती, या अभ्यासात तुझी प्रगति अशी होते आहे की अलीकडे तुझे बोलणे सुद्धा छान वाटतयं ऐकायला. हेच संवाद कौशल्य. ओके, आजचा शेवट गोड करूया.. पुन्हा एकदा योग्य, चांगल्या गुणवत्तेची अपेक्षा, या वाकप्रचारात व्यक्त होते आहे. ’गूळ नाही’ ही संज्ञा, व्यक्तीच्या परिस्थितीचे रूपक आहे. तुम्ही गरीब असा अथवा अशिक्षित तरुण असा अथवा वयस्कर शहरातले असा की खेड्यातले तुमच्याकडे यातले काही नसले तरीही तुमच्याकडे संवाद कौशल्य, म्हणजे ‘गुळची वाचा’ म्हणजे गोड भाषा आणि स्नेहभाव व्यक्त करणारे योग्य शब्द असयलाच हवे. यामुळेच तुम्ही दुसर्याशी संवाद करून, प्रगती करू शकता...!!
- अरुण फडके