‘आयफोन’चे एक दशक

Total Views |

 

तब्बल दहा वर्षांपूर्वी ‘अॅपल’ने आपला पहिला ‘आयफोन’ बाजारात दाखल केला. अगदी कमी कालावधीत ‘आयफोन’ लोकांच्या पसंतीस उतरेल याची कल्पना कोणीही केली नव्हती. आज ‘अॅपल’चा ‘आयफोन’ अनेकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे आणि ‘अॅपल’ ही कंपनी आज एक मोठी आणि प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये गणली जात आहे. अशाच या ‘अॅपल’च्या दहा वर्षांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. 

ब्रायन मर्चंट या लेखकाने ‘द वन डिव्हाईस : द सिक्रेट हिस्ट्री ऑफ आयफोन’ हे ‘आयफोन’ वर आधारित पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात ‘अॅपल’ मधील कामांचा अगदी सूक्ष्म अभ्यास करून वस्तुस्थिती मांडण्याचा मर्चंट यांनी प्रयत्न केला आहे. ‘अॅपल’च्या उत्पादनांसाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाच्या निवडीपासून उत्पादन तयार करण्यापर्यंत आणि ते बाजारात उतरविण्यापर्यंतची प्रत्येक माहिती या पुस्तकातून जगासमोर मांडण्यात आली आहे. आजपर्यंत ‘अॅपल’च्या या माहितीपासून जग फार दूर होते. यापूर्वी ज्या बाबींची चर्चा झाली त्यातली एक म्हणजे ‘आयफोन’मध्ये असणारा मल्टी टच. चर्चा अशी होती की, मल्टीटच टेक्नॉलॉजीचा शोध ‘अॅपल’ने स्वत: लावला नाही. ‘अॅपल’चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या मनात अगदी लॉन्च पूर्वी एक विचार आला होता आणि तो असा की, ‘आयफोन’चा स्क्रीन हा काचेऐवजी प्लास्टिकचा असावा. २०१२ ते २०१६ दरम्यान, ब्रायन हप्पी हे ‘अॅपल’ मध्ये इंडस्ट्रीयल डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आयफोन’ पूर्वी कंपनीने फ्लिप फोनचे प्रोटोटाईप बनविले असल्याचे ब्रायन मर्चंट यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. तसेच ‘अॅपल’ अनेक प्रकारच्या फ्लिप फोन्सवर संशोधन करत होती, मात्र त्यानंतरच सेल फोनचा विचार मनात आला आणि ‘आयओन’ची निर्मिती करण्यात आली.

‘आयफोन’चा पहिला ‘इंटरफेस’ हा फोटोशॉपमध्ये तयार करण्यात आला. याबाबत आज फारच कमी जणांना माहिती आहे. १९९५ ते २०१६ या कालावधीत कार्यरत असलेले ‘अॅपल’चे डिझाईन डायरेक्टर इमरान चौधरी आणि त्यांचा सहकारी बेस ऑडिंग यांनी फोनचा पहिला ‘इंटरफेस’ तयार केला. बेसिक अॅडोब सॉफ्टवेअरचा वापर करून तयार केलेला हा उत्तम ‘इंटरफेस’असल्याचे ‘इंटरफेस’च्या डिझाईनच्या वाढलेल्या लोकप्रियतेवरूनच पुढील कालावधीत दिसून आले. ‘अॅपल’ने या प्रोजेक्टसाठी एक हजार इंजिनिअर्सची टीम तयार केली होती. त्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीमध्ये नियुक्त करण्यात आले होते. कंपनीने या प्रोजेक्टला प्रोजेक्ट ‘पर्पल-२’ असे नाव दिले होते. याच टीमच्या अथक प्रयत्नांनंतर २९ जून, २००७ रोजी जगातला पहिला ‘आयफोन’ बाजारात उतरविण्यात आला. या टीमने दहा वर्षांपूर्वी ‘आयफोन’चे जे डिझाईन तयार केले होते, तेच आजही म्हणजेच दहा वर्षांनंतरही कायम आहे. २००७ साली पहिल्या लॉन्चनंतरही ‘आयफोन’ने बाजारावर आपली विशिष्ट छाप सोडली होती. एकीकडे ‘नोकिया’ आणि मोटोरोलासारख्या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे ओढण्याच्या प्रयत्नात होत्या, तर दुसरीकडे एरिक्सन, ब्लॅकबेरीसारख्या कंपन्या कॉर्पोरेट ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात व्यस्त होत्या. मात्र, या सगळ्यात दुसर्‍या कंपन्यांबरोर स्पर्धा करण्यापेक्षा ‘अॅपल’ने एक वेगळाच रस्ता निवडला आणि आज ‘अॅपल’ला मिळत असलेल्या प्रतिसादावरून तो अगदी योग्य असल्याचाच दिसत आहे. ‘अ‍ॅपल’ ही टचस्क्रीन मोबाईल बाजारात आणणारी पहिली कंपनी असल्याचा गैरसमज आज अनेकांमध्ये आहे. ‘आयफोन’मध्ये पहिल्यांदा फिजिकल किबोर्ड अथवा नेव्हिगेशन पॅनलचा वापर करण्यात आला होता. मात्र, पहिला टचस्क्रिन मोबाईल एरिक्सन या कंपनीने तयार केला होता आणि तो म्हणजे आर 380.

‘आयफोन’ बाजारात दाखल झाल्यानंतर अनेकांनी त्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलून दाखविल्या होत्या. त्यातलेच एक व्यक्ती म्हणजे मायक्रोसॉफ्टचे तत्कालीन सीईओ स्टीव्ह बालमर. आपण ९९ डॉलर्समध्ये विकत घेऊ शकतो. त्याच्या तुलनेत ‘आयफोन’ हा फार महागडा आहे. त्यामुळे तो बाजारावर कोणत्याही प्रकारची छाप सोडू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, एकंदरित ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता स्टीव्ह बालमर यांचं वक्तव्य चुकीचंच ठरलं आहे. आज अनेक कंपन्या दरवर्षी आपल्या मोबाईलचे अनेक मॉडेल्स बाजारात आणत असतात. २००७ साली पहिल्या ‘आयफोन’नंतर ‘अॅपल’ने दरवर्षी ‘आयफोन’चे एक मॉडेल आणण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे.

 

 

‘आयफोन’ची थोडक्यात वाटचाल

२९ जून, २००७ ‘आयफोन फस्ट जनरेशन’

११ जुलै, २००८ ‘आयफोन 3 जी,’

१९ जून, २००९ ‘आयफोन 3 जीएस’

२४ जून, २०१० ‘आयफोन 4’

१४ ऑक्टोबर, २०११ ‘आयफोन 4 एस’

२१ सप्टेंबर, २०१२ ‘आयफोन 5’

२० सप्टेंबर २०१३ ‘आयफोन 5 सी’ आणि ‘आयफोन 5 एस’

१९ सप्टेंबर, २०१४ ‘आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस’

२५ सप्टेंबर, २०१५ ‘आयफोन 6 एस’ आणि ‘आयफोन 6 एस प्लस’

७ सप्टेंबर, २०१६ ‘आयफोन 7’ आणि ‘आयफोन 7 प्लस’

 

- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.