“नीलाज्जी, एक गोष्ट सांग ना!”, पियू आजीच्या मांडीवर बसून म्हणाली.
“एका राजाची गोष्ट सांगू?”, नीला आजीने नातीला कुरवाळत विचारले.
“हो! सांग की!”, पियू आनंदाने म्हणाली.
“खूप खूप वर्षांपूर्वी कोसल देशात एक राजा होता. त्याचे नाव होते भगीरथ. भगीरथाच्या वंशात पुढे रघु नावाचा राजा झाला. याच्या नावावरून या कुळाला ‘रघुकुल’ असेही म्हणत. रामाचा जन्म झाला.
“भगीरथाने स्वर्गात असलेली गंगा नदी पृथ्वीवर आणायचा पण केला. त्याकरिता कामगारांची मोठी मोठी कुमक घेऊन तो हिमालयात गेला. गंगा नदीचा प्रवाह आपल्या राज्यात वळवण्यासाठी त्यांनी फार फार कष्ट उपसले. अतिवृष्टी, हिमपात, वादळे इत्यादीने वारंवार अपयश आले. पण भगीरथाने हार मानली नाही. आपल्या प्रयत्नात जराही कसूर केली नाही. उलट अधिक जोमाने उभे राहून आपले प्रयत्न सुरु ठेवले.
“त्याचे persistent efforts, ही एक प्रकारे त्याची तपश्चर्याच होती. आजही कोणी एखाद्या ध्येयासाठी अफाट कष्ट घेतले तर त्याला ‘भगीरथी प्रयत्न’ असे म्हणतात. आजही जनमानसात भगीरथाचे प्रयत्न आदर्श आहेत.
“मागचे काही वर्ष नदीच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना एक पुरस्कार देण्यात येतो. नदी म्हणजे अगदी लहानसा ओढा असेल, ब्रह्मपुत्रा सारखी महानदी असेल किंवा हिमनदी म्हणजे glacier सुद्धा असेल! या पुरस्काराचे नाव देखील ‘भगीरथ प्रयास सम्मान’ आहे. किंवा तेलंगणाच्या शुद्ध पाणी पुरवठा योजनेचे नावही ‘भगीरथ mission’ आहे.”, निलाज्जी सांगत होती.
“अग, आज्जी! पण त्या भगीरथाचे पुढे काय झाले?”, पियुने विचारले.
“ते राहिलेच की! भगीरथाला शेवटी यश मिळालेच. गंगेचा प्रवाह त्याला हवा होता तसा त्याने आपल्या राज्यात वळवून घेतला आणि राज्यातील पाण्याची गरज भागवली. त्याने गंगेला लेकी सारखे अंगाखांद्यावर खेळवले, म्हणून गंगेला ‘भागीरथी’ असे देखील म्हणतात.
“कितीही कठीण प्रश्न समोर उभे ठाकले तरी भगीरथ आपल्या निश्चयापासून ढळला नाही. या बद्दल ज्ञानोबा माऊली काय म्हणतात ते ऐक -
वाहुनी अपुली आण | धरी जो अंतःकरण |
निश्चया साचपण | जयाचेनि || १२.१५२ ||
जो स्वत:चीच शपथ वाहून निश्चय करतो आणि स्वत:च्या निश्चयाने मन ताब्यात ठेवतो, असा योगी मला फार आवडतो! आणिक काय सांगू तुला, अशा योग्यामुळे निश्चयाला खरेपण येते! अर्जुना, असा निश्चयी योगी निरंतर माझ्या हृदयात राहतो!”
- दिपाली पाटवदकर