जुनी गोष्ट आहे, जेंव्हा TV वर फक्त ‘दूरदर्शन’ लागत असे. ते सुद्धा केवळ संध्याकाळी ६ ते रात्री ११. तेव्हा खास महिलांसाठी ‘सुंदर माझे घर’ हे कार्यक्रम येत असे. त्या काळाच्या पद्धती प्रमाणे, आम्ही लहान मुले संध्याकाळी घराबाहेर खेळत असल्याने मला हा कार्यक्रम पाहिलेला फारसा आठवत नाही. पण माझी आई, मावशी, काकू हा कार्यक्रम मनोभावे पहात असत.
‘सुंदर माझे घर’ या कार्यक्रमात – आपले घर नीट नेटके, टापटीप, स्वच्छ, सुबक, देखणे, सुंदर इत्यादी कसे ठेवावे, या विषयी मौल्यवान सल्ले मिळत असत. ‘गृहशोभिका’, ‘गृहिणी’ छाप मासिके सुद्धा या ज्ञानात भर घालत असत. अशी मासिके केवळ आपापली घरे शोभिवंत ठेवण्यासाठीच समर्पित केली असावीत.
स्वत:चे घर सुंदर ठेवण्यासाठी अवलंबलेली सर्वात सोपी, सामान्य पद्धत म्हणजे, घरातला कचरा घराबाहेर टाकणे! गल्लीतून येतांना नाक मुठीत धरून यायला लागलं तरी हरकत नाही, पण ‘आमचं घर पहा! कसं स्वच्छ आहे की नाही!’
‘माझ्या घराची सीमा हेच माझे जग’ हा संकुचित विचार क्रमाक्रमाने सोसायटी, चाळ, गल्ली, पेठ, गाव, शहर, देश स्वत:ला लावून घेतात. आमचा परिसर कसा ‘स्वच्छ, सुंदर’! त्या पायी पलीकडच्या नाक्यावर कचऱ्याचा ढीग पडून राहतो तर, राहिनात का! त्या पायी हवेचे प्रदूषण होउन कधी न कधी ती हवा आमच्या फुफुसात जाईल तर जाईनात का! जमिनीतील पाण्याचे प्रदूषण होऊन कधीतरी ते आमच्या पोटात जाईल तर जाईनात का!
आपल्या गावातली घाण नदीत, समुद्रात, शेजारच्या गावात किंवा समुद्राच्या पलीकडल्या ‘गरीब’ देशात टाकून दिल्यावर, आमचं गाव, शहर, देश कसा स्वच्छ आणि सुंदर म्हणून मिरवतो! मग त्यापायी दुसऱ्या गावातील / देशातील / नदी - समुद्रातील जीवांचे काही का होईना!
आता तर म्हणे अंतरिक्षात सुद्धा मानवाने कचरा केला आहे! हा कचरा पृथ्वीच्या कक्षे बरोबर सूर्याभोवती फिरत असतो. एखाद्या दिवशी अंतरिक्ष स्वच्छता मोहीम हाती घ्यायला लागली तर नवल नाही!
या सगळ्याचे मूळ ‘सुंदर माझे घर’ मधील ‘माझेपणा’ च्या संकुचित व्याख्येत आहे. मी राहतो ती जागा स्वच्छ – सुंदर असून भागत नाही. स्वत:च्या आरोग्यासाठी घराभोवतालचा परिसर स्वच्छ हवा. आपण ग्रहण करतो ते हवा, पाणी, अन्न स्वच्छ हवे. त्यासाठी ‘सुंदर माझे जग’ हाच दृष्टीकोन हवा. मग आपोआपच घरातला कचरा घरात, गल्लीतला कचरा गल्लीत आणि गावातला कचरा गावात जिरवला जाईल! ज्या योगे प्रत्येक जीवाला स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ अन्न मिळेल!
‘सुंदर माझे घर’ पासून ‘सुंदर माझे जग’ या प्रवासाची सुरवात स्वत:पासून, स्वत:च्या घरापासून होते.
- दिपाली पाटवदकर