‘सुंभ’ जळाला तरी...

    22-Jun-2017   
Total Views | 3

 
 
शिवचरित्राचे पर्यायी लिखाण करणार्‍यांसोबतच पवार परवा पुण्यात बसले होते. अफजलखान, शाहिस्तेखान यांचीही वेगळ्या प्रकारची चरित्रे या मंडळींनी निर्माण केली आहेत. त्यांच्या चरित्रकथनांचे प्रयोगही पुण्यात होत असतात. ’’महाराष्ट्राच्या गावखेड्यात उभ्या असलेल्या पुरातन मंदिरातल्या प्राचीन मूर्त्या ज्या भग्नावस्थेत आजही पाहायला मिळतात, त्या इस्लामी आक्रमकांनी तोडल्या नसून त्यांनी हाती घेतलेले ते मंदिर जीर्णोद्धाराचे अपुरे काम आहे,’’ असे देखील पवार उद्या सांगू शकतात.
 
नव्वदीच्या दशकात रामजन्मभूमी आंदोलन सर्वदूर पसरले होते. जातीभेद विसरून सगळा हिंदू समाज या आंदोलनात सहभागी झाला होता. हे सामाजिक अभिसरण घडत असताना पवारांच्या तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात एक घोषणा गाजत होती, ‘’दलित-मुस्लीम भाई-भाई, हिंदू कौम कहॉंसे आई?’’ आता ही घोषणा कोणी दिली ? का दिली ? कुणाच्या सांगण्यावरून दिली ? याचा शोध स्वत:ला पुरोगामित्वाचे ठेकेदार म्हणविणार्‍यांनी नक्कीच घ्यावा. पवारांचे अफजलखाना विषयीचे परवाचे विधान याच जातीयवादी विषारी राजकारणाचा एक भाग आहे. पुरागामित्वाचे कातडे पांघरून आणि आपल्या भाटांकडून सतत सुसंस्कृत असण्याचे प्रमाणपत्र मिळविणार्‍या पवारांनी हे ‘सोशल इंजिनिअरिंग’ जोरदार केले. सकल समाज महाराष्ट्र म्हणून एकत्र येण्याकरिता प्रयत्न करण्यापेक्षा जातीय टक्केवारीत तो विभागून ठेवायचा. एक संघ समाज हाताळायची क्षमता नसली की, मग हे तुकड्यातले लाचार म्होरके सांभाळत बसायचे, हे पवारांचे राजकारण. मायावतींनी एकेकाळी उत्तर प्रदेशात जातींचे सोशल इंजिनिअरिंग यशस्वीरित्या केल्याचे सांगितले जाते. अत्यंत धूर्तपणे मायावतींनी आपल्या जुन्या घोषणा बदलून ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा-विष्णू-महेश है’ अशी बदलून घेतली आणि उत्तर प्रदेशात राजकीय यश संपादन केले. मायावतींचे हे राजकारण तत्कालीन होते आणि त्याचे त्यांना तसेच तत्कालीन यशही मिळाले. जे यश मायावतींना उत्तर प्रदेशात मिळाले, तसे यश पवारांना महाराष्ट्रात स्वत:चा पक्ष काढल्यावर कधीच मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अंध भक्तांचा हा ‘जाणता राजा’ जाणता-अजाणता असेच गलिच्छ राजकारण करीत राहिला. ज्या मंडळींच्या मांडीला मांडी लावून पवारांनी कालचे उद्गार काढलेत, त्या सगळ्या मंडळींनी जातीच्या आधारावर महाराष्ट्र तोडण्याची घाऊक कंत्राटे मिळविली होती. कधी दादोजी कोंडदेव, कधी जन्मोत्सव तर कधी आणखी काही. कर्नाटकातल्या वीरगळांमध्ये जी शिवाजी महाराजांची शिल्पे आहेत, त्यात त्यांच्यासोबत एक कुत्रा आहे. पण या गलिच्छ लोकांनी त्या इमानी वाघ्या कुत्र्यालासुद्धा आपल्या हीन राजकारणात ओढले आणि दादोजींनंतर वाघ्या कुत्र्यावरून राजकारण करून मराठा समाजातील तरुणांची माथी भडकविण्याची कामे केली. महापुरुषांना फक्त स्वत:च्या जातीची लेबले लावण्याची विकृती सर्वच समाजात आहे. असे लोक सर्वच जातीत आहेत. त्यांना भावनिकदृष्ट्या चिथावले की, ‘एक विरुद्ध दुसरा’ असा संघर्ष उभा करणे आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजून घेणे सोपे असते. याला दोन्ही बाजूची मंडळी बळी पडतात आणि जातीय राजकारण करणार्‍यांचे चांगभले होते. 
 
जातीय राजकारण ही भारतीय राजकारणाची अपरिहार्यता होऊन बसली होती, तेव्हा जातींना आपल्या पक्षाच्या बाजूने आणून उभे करण्याचे काम भाजपनेही केले आणि त्याची फळेही मिळविली. महाराष्ट्राच्या राजकारणातला ‘माधव’ फॅक्टर हादेखील असाच प्रयोग होता, मात्र त्यातून गोपीनाथ मुंडेंसारखा ‘लोकनेता’ उभा राहिला. बहुजन समाजातील एक माणूस ‘नेता’ म्हणून पुढे आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक खमके पर्यायी व्यक्तिमत्व उभे राहिले. याउलट पवारांच्या जातीय राजकारणातून पुढे आलेली माणसे आजही आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. पवार जे बोलले, ते मुंब्य्राच्या गल्ल्यांमध्ये गाझा पट्‌ट्या वाचवायला निघालेल्या जितेंद्र आव्हाडांनी यापूर्वीही टीव्ही चॅनेलवर सांगितले आहे. पवार यांनी जे सांगितले त्यातील बरीचशी गरळ त्यांनीच पाळलेल्या राजकीय पिलावळीने आधीच ओकली आहे. खरंतर यांना शिवाजी महाराजही नकोच आहेत. पण सर्वसामान्यांच्या मनावर शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की, यांच्यासारख्या कितीतरी लोकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी त्या शिवगर्जना उत्तुंगच वाटत राहतात. हिंदू अस्मितेचे जाज्ज्वल्य प्रतीक असलेले छत्रपती इतके स्वयंभू आहेत की, यांच्यासारख्या कितीतरी लोकांनी ते कसेही वाकवून पेश करायचे ठरविले तरी मूळ छत्रपती त्यांच्या हिंदू तेजाने तळपतच राहतात. गोविंदराव पानसरेंसारख्या डाव्या विचारवंतांनीही वेगळा शिवाजी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना तो शोषितांसाठी लढणारा वाटतो. महापुरुष ज्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जातात त्या-त्या दृष्टिकोनातून ते मोठेच भासतात, हे त्यांचे वेगळेपण असते. पण जातीय राजकारण करणार्‍यांनी तर कळसच केले. शिवचरित्राचे पर्यायी लिखाण करणार्‍यांसोबतच पवार परवा पुण्यात बसले होते. अफजलखान, शाहिस्तेखान यांचीही वेगळ्या प्रकारची चरित्रे या मंडळींनी निर्माण केली आहेत. त्यांच्या चरित्रकथनांचे प्रयोगही पुण्यात होत असतात. ’’महाराष्ट्राच्या गावखेड्यात उभ्या असलेल्या पुरातन मंदिरातल्या प्राचीन मूर्त्या ज्या भग्नावस्थेत आजही पाहायला मिळतात, त्या इस्लामी आक्रमकांनी तोडल्या नसून त्यांनी हाती घेतलेले ते मंदिर जीर्णोद्धाराचे अपुरे काम आहे,’’ असे देखील पवार उद्या सांगू शकतात. 
 
वस्तुत: रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी जाहीर झाले आणि पवारांचे सगळे राजकारण संपले. तसेही पवार राष्ट्रपती कधीच होणार नव्हतेच, पण त्यांच्या अंध भक्तांना कुणी समजवावे? नरेंद्र मोदींनी भारताच्या राजकारणाचा जो काही पोत बदलला, त्यात असले अनेक सुंभ जळून राख झाले, पण काहींचे पीळ अजून बाकी आहेत. जातीयतेच्या राजकारणापलीकडे जाऊन मोदींनी भारतीयांना विकासाच्या अजेंड्यावर आणून मतदान करायला लावले. लालू, पवार, मुलायम, मायावती ही अशी माणसे आज राजकारणाच्या पटलावरून हळूहळू अस्तंगत होत चालली आहेत. त्यामुळे त्यांची विधाने ऐकताना त्यांची तडफड समजून घेतली पाहिजे.
 
- किरण शेलार

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121