सूर्याचे पाणी देता का ? 

Total Views |


मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रातील नागरिकांपेक्षा सूर्या धरणाच्या पाण्याचे महत्त्व आणखी कोणाला कळणार ? पालिकेच्या स्थापनेपासून, तसंच त्यापूर्वीपासून या क्षेत्राची पाण्यासाठी सुरू असलेली रड आजही कायम आहे. मीरा-भाईंदर क्षेत्राला २४ तास पाण्याची स्वप्न दाखविणार्‍या सूर्या धरण पाणी योजनेचे भूमिपूजन ३० जूनच्या आत करण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे पाणी योजना येत्या दोन ते अडीच वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षादेखील केली जात आहे. मात्र, सूर्या धरण क्षेत्रातील स्थानिकांकडून होणारा विरोध आणि या मार्गांमधील अन्य अडथळे पाहता हे स्वप्न लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

शहरासाठी मंजूर झालेल्या ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीच्या बर्‍याच वर्षांपूर्वी सूर्या धरण पाणी योजना सुरू होणे आवश्यक होते. मात्र, रखडलेल्या आणि उदासीन कारभारामुळे ही योजना कागदी घोडे नाचवल्यासारखीच राहिली.आता मीरा - भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक दीड दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सर्वाच पक्षांकडून आश्‍वासनांचा पाऊस पडणे साहजिकच आहे. मात्र, केवळ आश्‍वासने न देता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित हे काम कधी पूर्ण होणार याकडे सामान्यजन चातकासारखे पाहत आहेत.

शासनाने या धरणातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी १०० दशलक्ष लिटर पाणी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे धरण शहरापासून शे-सव्वाशे किलोमीटर लांब असल्याने त्यासाठी एक हजार कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित होता.त्यामुळे ही योजना खाजगी आणि सार्वजनिक सहभागातून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कंत्राटदाराकडून या योजनेचे पाणी १८ ते  २० रुपये या चढ्या दराने मिळणार असल्यामुळे या योजनेवर चहूबाजूंनी टीका करण्यात आली.अशातच स्टेम प्राधिकरणाकडून सात रुपये दराने पाणीपुरवठा होत असताना या योजनेचे पाणी चढ्या दराने का? असा सवालदेखील सर्वच स्तरातून उठला होता.

मात्र, राज्य सरकारनेच हा प्रस्ताव फेटळल्यानंतर तो पुढे केंद्राकडे जाण्याचा प्रश्‍नच उद्भवला नाही. यानंतरही योजना बारगळून कोणी आम्हाला सूर्याचे पाणी देईल का? असाच प्रश्‍न समोर दत्त बनून उभा ठाकला. त्यानंतर या योजनेत एमएमआरडीने हात घातल्यामुळे पुन्हा या योजनेला नवसंजीवनी मिळते की काय, असेही वाटू लागले होते.

 

स्थानिकांचा विरोध

सूर्या धरणाचे पाणी स्थानिकांना सोडून मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पालिका क्षेत्राला देण्यासाठी स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. डहाणू तालुक्यातील शेतकर्‍यांना सोडून अन्य ठिकाणी पाणी वळते करण्याचा घाट का? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात जलवाहिन्यांचे जाळे पसरविण्यासाठी या योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाला मोठी मशक्कत करावी लागणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीवरून स्थानिकांचा विरोध लवकर मावळण्याच्याही आशा पाण्यातच विरघळून जाणार असल्याचेच चित्र तयार झाले आहे.

सध्या मीरा-भाईंदर क्षेत्राला मिळणार्‍या ७५ दशलक्ष लिटर पाण्यामुळे येथील नागरिकांची तहान जेमतेम तीन ते चार वर्षांसाठीच भागणार आहे. मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्याला मिळणारी पसंती पाहता सध्या मिळणारे पाणीही या क्षेत्रासाठी तोेकडेच पडणार आहे, यात काही शंका नाही. मात्र, कासवगतीने सुरू असलेली ही योजना येत्या काळात लवकर पूर्ण झाली नाही, तर या दोन्ही क्षेत्रांमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. वसई-विरार पालिका पाणीपुरवठ्याबाबत पूर्वीपासून उदासीन आहे. या क्षेत्रात पाहिले तर नळाला पालिकेकडून येणार्‍या पाण्यापेक्षा डोंगर फोडून टँकरने अशुद्ध पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून वसई-विरार आणि मीरा-भाईंदरसारख्या क्षेत्रांमध्ये पाण्याच्या नव्या जोडण्या देण्याचे प्रमाणच मुळी नगण्य आहे. मात्र, उदासीन पालिकांना आता तरी हातपाय हलवावेसे वाटतील तर नवल!

सूर्या योजनेसाठी नेमलेल्या निवृत्त अधिकार्‍यांनीही आपल्या कामाचा वेग वाढवल्यास ही योजना लवकरच पूर्ण होऊन या क्षेत्राची तहान भागवली जाऊ शकते. सूर्या धरण पाणीपुरवठा योजनेत पाठपुराव्याची कमतरता असल्याचे मोठ्या प्रमाणात जाणवते. मीरा-भाईंदर क्षेत्राला देण्यात आलेल्या ७५ दशलक्ष लिटर पाण्यासाठी ज्याप्रकारे पाठपुरावा करण्यात आला, त्याप्रमाणे या योजनेसाठी करण्यात आला असता तर आज ही योजना बारगळली नसती. एमएमआरडीएने २०१२ साली ही योजना आपल्या हाती घेतली. पण त्यानंतरही संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे ही योजना अहवाल सादर करण्यापलीकडे पोहोचली नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ३० जूनच्या आत भूमिपूजनाची वेळ आली असली तरी आवश्यक परवानग्या अद्याप मिळालेल्या नाही. त्यामुळे ही योजना कधी आणि केव्हा पूर्ण होईल, हा यक्षप्रश्न आहे.

- जयदीप दाभोलकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.