सामान्यतः वयाच्या तिसर्या-चौथ्या वर्षापासून ‘शू’ ही संवेदना समजू लागते आणि त्यावर नियंत्रण येते. काही वेळेस सात वर्षांपर्यंत गादीत ‘शू’ होते. प्रत्येक मूल भिन्न असते. त्यामुळे बहिणीने लवकर नियंत्रण मिळविले आणि मुलाने नाही, याची काळजी करू नयेे. तेव्हा, आजच्या भागात यासंबंधींची सविस्तर माहिती जाणून घेऊया...
’’अहो डॉक्टर, अक्षयचं काहीतरी करा. संपूर्ण सुट्टीत आम्हाला कुठेच जाता आलं नाही याच्या ‘शू’ त्रासामुळे!’’ चि. अक्षयची आई वैतागून मला सांगत होती. अक्षय हा जान्हवीचा मुलगा आहे. त्याला एक मोठी बहीण आहे. अक्षयची आई सांगत होती की, ताईने दुसर्या वर्षीच अंथरुणात ‘शू’ करणे थांबविले आणि हा पाच वर्षांचा घोडा होऊनही अजून बिछान्यात दररोज ‘शू’ करतो.
झोपेत रात्री ‘शू’ होणे याला आयुर्वेदात ‘नक्तमूत्रता’ असे म्हणतात. मुलं जन्माला आल्यानंतरही त्याच्या काही अवयवांचा विकास होत असतो. तान्हुल्याचं यावर नियंत्रण नसते. दिवसातून ते १०-१२ वेळा ‘शू’ करतं. जसजसं वय वाढू लागतं ‘शू’वर नियंत्रण येऊ लागतं. मोठ्यांमध्ये दिवसातून चार-पाच वेळा (Average) मूत्रप्रवृत्तीची संवेदना होते. जन्माला आल्यावर जसा टाळू हळूहळू भरतो, तशी मेंदूतील सर्व केंद्रे (Centers ) विकसित होतात. मूल हळूहळू रांगू लागते, बसू लागते, चालू लागते, बोलू लागते. तसेच शी आणि ‘शू’ची संवेदना त्याला समजू लागते. यातही अनुवंशिकता आढळते. आई-वडिलांमध्ये त्यांच्या लहानपणी झोपेत ‘शू’ होण्याची सवय असल्यास मुलांमध्ये ती सवय येण्याची शक्यता १/२ किंवा १/३ असते. मुलींपेक्षा मुलांमध्ये अंथरुणात शू करण्याची सवय अधिक आढळते. सामान्यतः वयाच्या तिसर्या-चौथ्या वर्षापासून ‘शू’ ही संवेदना समजू लागते आणि त्यावर नियंत्रण येते. काही वेळेस सात वर्षांपर्यंत गादीत ‘शू’ होते. प्रत्येक मूल भिन्न असते. त्यामुळे बहिणीने लवकर नियंत्रण मिळविले आणि मुलाने नाही, याची काळजी करू नये. ‘शू’ लागली असता मुलांमध्ये यातील एखादे लक्षण निश्चित आढळते. पाय क्रॉस करून उभे राहणे, जागीच उभे राहून चुळबुळ करणे, चेहर्यावर ताण दिसणे, ‘शू’ची जागा हाताने धरून ठेवणे, आहे तिथेच पटकन बसणे असे काही दिसल्यास मुलाला पटकन ‘शू’ करण्यास न्यावे.
काही मुले अंधाराला घाबरतात. झुरळ-पालीला घाबरतात. त्यामुळे ‘शू’ची संवेदना कळूनही ती उठत नाहीत. अशा वेळेस मंद प्रकाशाचा दिवा चालू ठेवावा. मुलांची भीती घालविण्याचा प्रयत्न करावा. ओरडून, धमकावून, शिक्षा करून किंवा घृणा करून ‘शू’ वर नियंत्रण येत नाही. मुलांना आधार (भावनिक आणि शाब्दिक) द्यावा लागतो. वेळोवेळी समजवावे लागते. त्यांना धीर द्यावा लागतो.
हल्ली अडीच ते तीन वर्षांची मुलं प्ले-ग्रुप किंवा नर्सरीमध्ये जातात. त्यातील निम्म्या मुलांमध्ये ‘शू’ वर नियंत्रण संपूर्णत: आलेले नसते. तान्हुले आधी दिवस-रात्र ‘शू’ जागच्या जागी करते. हळूहळू ते मोठे झाले की, दिवसाची ‘शू’ कळू लागते, सांगू लागते. काही वेळेस पालकांनाच दर दोन ते तीन तासांनी ‘शू’ साठी टॉयलेटमध्ये न्यावे लागते. ही जागा ‘शू’ करण्यासाठी आहे, हे मनावर बिंबवले की मूल नंतर ‘शू’ लागली की टॉयलेटच्या दाराशी जाऊन उभे राहते. पण, मुलांना जर बरीच वर्षे डायपर घातले, तर हे टॉयलेट ट्रेनिंगमध्येे बाधा निर्माण करू शकते. बर्याच घरांमधून अगदी मोठ्या मुलांमध्येही (सहा-सात वर्षाच्या मुलांमध्ये) रात्री डायपर घालनू झोपायची पद्धत आहे. पण, ही मुले मुली ‘शू’ कधी करतात हे पालकांना कळत नाही आणि मुलालाही ओलावा न जाणवल्यामुळे नियंत्रण येत नाही.
चॉकलेट, शीतपेये, कॅफिन इत्यादीच्या अति सेवनामुळे ही ‘शू’ अधिक होते. मुलांना ट्रेनिंगदेताना संध्याकाळनंतर जास्त द्रवाहार देऊ नये, तो टाळावा आणि झोपायला जाण्यापूर्वी ‘शू’ ला आवर्जून घेऊन जावे. मध्यरात्री पालकांनी मुलाला ‘शू’ ला न चुकता घेऊन जावे. असे नियमित केल्याने, ही सवय अंगवळणी पडते, शरीराला नियंत्रण मिळविण्यात मदत होते. हा सर्व टॉयलेट ट्रेनिंगचाच भाग आहे.
काही वेळेस आजारपणानंतर खूप थकवा आल्यास रात्री अंथरुणात ‘शू’ होणे पुन: सुरू होते किंवा urinary tract infection असल्यास झोपेत ‘शू’ (क्वचित) होऊ शकते. पण, हे तात्पुरते आहे, कायमस्वरूपी नाही. थकवा भरून आला, इन्फेक्शनवर औषध घेतल्यावर त्यावर नियंत्रण येते. काही वेळेस स्वप्नात भयानक काही बघितले तर ‘शू’ होऊ शकते. या गोष्टी अनियमित असतात. पण काही वेळेस मनावर दडपण आल्यास, भीती बसल्यास (जसे शाळेत) वारंवार कोणी ओरडणे, घरातील आईवडिलांची भांडणे, नवीन शाळा, घरात छोटा पाहुणा येणे किंवा Physical / emotional /Sexual abuse इ अंथरूणात ‘शू’ करणे पुन्हा सुरू होऊ शकते. यावर वेळीच उपाय करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण शोधून त्या कारणावर मात करणे हे समुपदेशनानेच उत्तम होते. आईवडिलांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे.
काही वेळेस जंतामुळे अंथरूणात ‘शू’ होण्यास पुन्हा सुरुवात होते. अशा वेळेस गुदभागी आणि योनीभागी तीव्र कंड/खाज येते. यासाठी औषधी चिकित्सा गरजेची असते. मुलांच्या मानसिकतेवर ही ‘शू’ अवलंबून असते. खूप हट्टी, चिडका, तापट किंवा खूप घाबरट अशक्त असल्यास ‘शू’ वर नियंत्रण उशिरा येते. हल्ली अजून एक प्रकार बघावयास मिळतो. मुलांना ‘शू’ ची संवेदना कळते, त्याची तीव्रताही कळते, पण टीव्हीवर आवडीची कार्टून मालिका सुरू असल्यास ‘शू’ ‘शी’ थोपवून धरतात. असे केल्याने पोटात मुरडा येतो. तीव्र वेदना होऊ शकते. काही वेळेस मलबद्धतेमुळेही वारंवार ‘शू’ होणे किंवा अनियंत्रित ‘शू’ होणे होऊ शकते.
यावर नियंत्रण मिळविण्यासाठी खालील उपाय करावेत-
संध्याकाळनंतर आहारातील द्रव भाग कमी असावा, झोपताना पाणी पिणे टाळावे, खूप गोड खायची सवय असल्यास अधूनमधून जंतुघ्न चिकित्सा करावी, आहारातून शेवग्याच्या शेंगा (जंतुघ्न असल्यामुळे) आणि ओवा द्यावा. झोपण्यापूर्वी आवर्जून ‘शू’ करण्यास न्यावे. १२-२, मध्यरात्री बहुतांशी गाढ झोपेत ‘शू’ची संवेदना लहान मुलांना कळत नाही, तेव्हा पालकांनी त्यांना उठवून न्यावे. ज्यूस आणि शीतपेये संध्याकाळनंतर देऊ नयेत. काही वेळेस मोठ्या मुलांमध्येही ‘शू’ होणे थांबलेले नसते. बर्याचदा ते लठ्ठ असतात आणि हट्टी असतात. झोपेत घोरणे आणि बारा महिने वातानुकूलित खोलीत झोपणे अशा गोष्टी यांच्यात आढळतात. असे असल्यास केवळ औषधी चिकित्सा उपयोगी नाही, त्याचबरोबर समुपदेशनही गरजेचे आहे. त्यांच्या दिनक्रमात बदल घडवून आणणे अतिशय गरजेचे आहे.
लहानग्यांमध्ये हळूहळू ‘शू’ वर नियंत्रण येते आणि वार्धक्यात हळूहळू ते नियंत्रण सुटते. जसे बाल्यावस्थेत मेंदूतील विविध केंद्र विकसनशील स्थितीत असतात, त्याच्या विपरीत वृद्धापकाळी एक-एक केंद्र हळूहळू आपले काम मंदगतीने करू लागते.
सुरुवात होताच आधी तपासून घ्यावे. कारण मधुमेहाने अतिरिक्त रक्तशर्करा असतेवेळी मूत्रप्रवृत्तीवरचे नियंत्रण थोडे कमी होते. काही विशिष्ट अवयवांच्या (जसे वृक्क व मूत्राशय) कार्यात बिघाड असल्यास काही पेशी व नसांमधील बिघाडामुळे हे मूत्रप्रवृत्तीवरचे नियंत्रण कमी होऊ शकते. पण हे नियंत्रण केवळ रात्रीच्या मूत्रप्रवृृत्तीवर परिणाम करत नाही, तर दिवस-रात्र दोन्ही प्रहरी नियंत्रणात तफावत जाणवते. काही जंतूसंसर्ग असतेवेळी जसे मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग, हे नियंत्रण खालावते. लहान मुलांमध्ये डायपरची सवय सोडावी लागते, तर वयानुरूप येणार्या बदलांमुळे होणार्या Incontinence मध्ये डायपरचा वापर सुरू करायची वेळ येते. बर्याचदा गुदभागी आणि ओटीपोटाशी असलेल्या स्नायूच्या व्यायामाचा फायदा होतो. स्नायूंमधील बळकटी टिकविण्याचे काम pelvic floor exercisesहे ने होते. हा व्यायाम गुदभाग, योनीभाग आत ओढून घेतल्यावर करावा. (वर खेचून घेणे) थोडा वेळ हीच स्थिती धरून हळूहळू पुनः पूर्ववत व्हावे. याने मूत्रप्रवृत्तीवरचे नियंत्रण टिकविण्यास मदत होते
काही वेळेस काही रक्त चाचण्या व सोनोग्राफी-एक्स रे करणे गरजेचे असते, पण तज्ज्ञांंच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व ठरवावे आणि करावे.
- वैद्य कीर्ती देव