धर्मराजाचा रथ

    02-Jun-2017   
Total Views | 13

 
 
महाभारत हे आयुष्याचा अर्थ शोधणारे महाकाव्य आहे. ते एका बाजूने अत्यंत गहन तत्त्वज्ञानाला स्पर्श करते, तर दुसर्‍या बाजूने त्याचवेळी व्यवहाराच्या मर्यादाही अधोरेखित करते. त्यामुळे गेली शेकडो वर्षे तत्त्वज्ञ आणि साहित्यिक या सर्वांना या महाकाव्याने मोहिनी घातली आहे. यातील अनेक महत्त्वाच्या घटनांपैकी एक महत्त्वाची घटना म्हणजे, धर्मराजाने द्रोणाचार्यांना ’नरो वा कुंजरोवा’ हे उत्तर दिल्यानंतर जमिनीवरून चार बोटे चालणारा रथ जमिनीवर आल्याची. धर्मराज ही पांडवांची विवेक व न्याय बुद्धी. अर्जुनाचे शौर्य व भीमाची शक्ती यांना संयमाने बांधून ठेवणारी. द्रौपदीने धर्मराजावर भ्याडपणाचा आरोप केला तरी तो आरोप शांतपणे ऐकून घेऊन त्याने आपला संयम सोडला नाही. त्यामुळे त्याचा रथ जमिनीवरून चार बोटे धावत असे, अशी कथा आहे. महाभारत युद्धाच्यावेळी द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती झाल्यानंतर त्यांचा वध कसा करायचा, हा पांडवांसमोर प्रश्न होता. त्यांच्या हाती जोवर शस्त्र आहे, तोवर त्यांना मारणे कोणत्याही योद्ध्याला शक्य होणार नाही, त्यामुळे त्यांना शस्त्र खाली ठेवणे भाग पाडण्यासाठी काय करता येईल, यावर पांडवांमध्येे विचार सुरू झाला. द्रोणाचार्यांचे आपल्या पुत्रावर, अश्वत्थाम्यावर अतिशय प्रेम असल्याने त्याच्या मृत्यूची बातमी द्रोणाचार्यांना कळली, तर ते नक्कीच शस्त्रे खाली ठेवतील याची खात्री होती. पण अश्वथाम्याला मारणे सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे पांडवांनी अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला व ‘अश्वत्थामा मेला’ ही बातमी पसरवली. ती द्रोणाचार्यांपर्यंत आली. त्या बातमीचा खरेपणा तपासण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे धर्मराजाला विचारणे. धर्मराजाने उत्तर दिले की, "अश्वत्थामा मेला हे खरे, पण तो माणूसही असेल किंवा हत्तीही.’’ त्यातला उत्तरार्ध हा द्रोणाचार्यांना ऐकू न येणार्‍या आवाजात धर्मराजाना सांगितला. हे ऐकल्यावर द्रोणचार्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली आणि दृष्टद्युम्नाने त्यांचा वध केला. 
 
ही योजना कृष्णाने आखली असल्याने व त्याच्या सल्ल्यावर पांडवांचा विश्वास असल्याने धर्मराजाने आपल्या स्वभावाशी विसंगत अशी ही गोष्ट केली. परंतु, त्यामुळे त्यातून एक तात्विक प्रश्न निर्माण झाला. अधर्मी मार्गाचा उपयोग करून जिंकलेले युद्ध ‘धर्मयुद्ध’ म्हणता येईल का? जर तसे म्हणता येत नसेल, तर कौरव-पांडवांचे युद्ध हे हस्तिनापूरवर कोणी राज्य करायचे एवढ्यापुरतेच मर्यादित राहाते. तशी तर जगाच्या इतिहासात शेकडो युद्धे झाली आहेत. 
 
हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे, पुढच्या काळात भारतापुढे जे प्रश्न उभे राहणार आहेत, त्यात अशा प्रकारचे अनेक प्रश्न पुढे उभे राहतील. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा जगाच्या पाठीवर भारत असा एकच देश होता की, ज्याच्या नेतृत्वाला युद्धाचा अनुभव नव्हता. दुसरे महायुद्ध नुकतेच होऊन गेले होते व जगातील जवळजवळ सर्वच देश त्यात ओढले गेले होते. भारताचे सैन्य दोन्ही महायुद्धात लढले असले तरी त्याचा राजकीय नेतृत्वाशी संबंध आलेला नव्हता. त्यामुळे ‘आपणाला आक्रमण करायचे नसेल, तर सैन्य हवेच कशाला?’ इथपासून चर्चेला सुरुवात झाली होती. त्यावेळी पं. नेहरूंनी भारत व चीनमध्ये शांततामय सहजीवनासाठी पंचशील कराराची कल्पना सुचविली होती. एकमेकांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेविषयी आदर, अनाक्रमण, एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे, समानतेच्या भूमिकेतून परस्पर सहकार्य आणि शांततामय सहजीवन अशी ती पाच सूत्रे होती. दुसर्‍या महायुद्धामध्ये झालेल्या हिंसेने व विध्वंसाने जग एवढे बधिर झाले होते की, त्या पार्श्वभूमीवर या कल्पनेचे एवढे कौतुक झाले की, पं. नेहरूंचा रथ जमिनीवरून चार बोटे धावू लागला. लवकरच चीनशी सीमेबद्दल विवाद उत्पन्न झाला. पंतप्रधान व संरक्षणमंत्री या दोघांनाही युद्धाचा कोणताही अनुभव नसल्याने ‘चीनला सीमेबाहेर फेकून द्या,’ अशी सैन्याला आज्ञा केली की, ती ऐकून भारताचे सैन्य चिनी सैन्याला बाहेर फेकून देईल व चीनचेही सैन्य मुकाट मागे फिरेल, अशी त्यांची भाबडी कल्पना होती. प्रत्यक्षात भारताचा दारूण पराभव झाला व नेहरूंचा हवेत चालणारा रथ जमिनीवर उतरला. आवश्यकता पडली तर चिनी सैन्यावर अमेरिकन विमानदलाने हल्ला करावा, अशी विनंती नेहरूंनी केनेडींना केली, पण तशी वेळ येण्याच्या आतच चीनने माघार घेतली.
 
आता पुन्हा नव्याने चीनचा प्रश्न भारतापुढे आला आहे. आता तो १९६२ च्या प्रश्नाइतका सरळ व सोपा राहिलेला नाही. तो अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. अमेरिकेनंतर आपण जगाचे नेतृत्व करावे, अशी महत्त्वाकांक्षा चीनच्या मनात जागी झाली आहे. त्यासाठी आशियातील जपान व भारत या दोन महत्त्वाच्या देशांविरुद्ध उत्तर कोरिया व पाकिस्तान या दोन बेजबाबदार अण्वस्त्रधारी देशांना चीन समर्थन देत आहे. आजवर उत्तर कोरिया चीनवरच सर्वस्वी अवलंबून होता, हळूहळू पाकिस्तानचीही तीच अवस्था होत चालली आहे. अरुणाचल प्रदेशवर चीनने आपला दावा केलेलाच आहे व प्रत्येक प्रसंगी तो दावा भारताला व जगाला चीन जाणवून देत असतो. भारताच्या दृष्टीने काश्मीर ही वाहती जखम आहे. ती अधिकाधिक कशी वाढती राहील, यासाठी चीन प्रयत्नशील आहे. आपल्या लोकांच्याबाबतही चीन कोणत्या थराला जाऊ शकतो, ते सांस्कृतिक क्रांतीत व तिएनमान चौकात जगाने पाहिले आहे. त्यामुळे मानवी मूल्यांची चीनला यत्किंचितही चाड नाही. भारत बदनाम व्हावा या दृष्टीने युद्धभूमीवर व प्रचारातही नवनवे मार्ग चीन अवलंबत आहे. आजवर काश्मीरचे युद्ध हे दहशतवाद्यांचे होते, ते लोकयुद्ध व्हावे, असा जाणीवपूर्वक प्रयत्न चीन करीत आहे. अशा प्रकारच्या युद्धात दीर्घकाळ लढण्याची तयारी असल्याशिवाय व प्रतिकाराचे नवनवे मार्ग शोधल्याशिवाय यश मिळत नाही. आज अफगाणिस्तानमध्ये कितीतरी वर्षे लढाई सुरू आहे, तेथील सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेने अनेकदा घोषणा केल्या, पण ते शक्य झालेले नाही. सेनाप्रमुखांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर काही प्रसारमाध्यमांमधून टीका करण्यात आली आहे. पंचशील करारातील तत्त्वे चांगली असली तरी ती व्यवहारात यशस्वी व्हायची असतील, तर त्यावर दोन्ही पक्षांचा प्रामाणिक विश्वास असावा लागतो. पाकिस्तानने दहशतवादी धोरण हे अधिकृत बनविले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला एकटे पाडण्याच्या भारताने चालविलेल्या प्रयत्नामध्ये चीन अडथळे निर्माण करीत आहे. पाकिस्तानने ज्या प्रकारे कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा दिली, त्यावरून न्यायाचे कोणतेही संकेत पाळायचे नाहीत, असे पाकिस्तानने ठरविलेले आहे, हे स्पष्ट होते. पाकिस्तान काश्मीरच्या जनतेचा ढाल म्हणून उपयोग करीत आहे. त्याचा प्रचारासाठीही उपयोग करून घेत आहे. आता तर पाकिस्तान, चीनसोबत ‘इसिस’नेही काश्मीरमध्ये प्रवेश केला आहे. ‘इसिस’ची संस्कृती काय आहे, हेही जगाने पाहिले आहे. हे वास्तव लक्षात घेऊन चीन, पाकिस्तान व ‘इसिस’च्या संदर्भातील धोरणे स्वीकारली पाहिजेत. त्यात भलत्या अभिनिवेशांना स्थान नाही.
 
- दिलीप करंबेळकर

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121