अवंती: “मुंबईची दूध, भाजी कोंडी” मुंबईतील एका नामवंत दैनिकातील आजचा मथळा वाचलास का काकू....! मेधाकाकू, मी मुंबईकर.. माझ्या या शहरावर माझे प्रेम आहे आणि म्हणून मुंबईवरच्या या संकटाची मला काळजी वाटतीये...!
मेधाकाकू: अगदी काळजी वाटण्यासारखीच परिस्थिती आहे अवंती...! असे बघ कुटुंब कल्याणाची जबाबदारी घेणारा प्रत्येक नागरिक आपला व्यापार-उमिदूट आणि रोजी-रोटीसाठी हक्काने मुंबई गाठतो. अशी आपली मुंबई...! शेतीचे प्रश्न निर्माण करायचे, त्यासाठी नेहमीप्रमाणे मुंबईकरांना वेठीला धरायचे, प्रत्यक्षात जी मुंबई सर्व शेती - बागायतीची मोठी बाजारपेठ आहे. कोकणातले शेतीनिष्ठ यालाच म्हणतात.
असा गडी हट्या वाटेवर लावी काट्या...!!
आपल्याच शेतात कामे करताना आपला हा दुराग्रही आणि स्वार्थी - हेकट मित्र अशी विपरीत परिस्थिती स्वत:च्या आणि परिसरातील शेत जमिनीवर निर्माण करतो ज्यायोगे फक्त नुकसानच होणार आहे...! आपल्या शेतामधले उगवलेला भाजीपाला-दूध महामार्गावर फेकून देण्यास अन्य शेतकर्यांस भाग पाडणे. आपल्याच गोठ्यातील गाई-म्हशींनी दिलेले दूध जमिनीवर ओतून टाकणे. अशा उत्पादनांचा नाश करणे हे कर्म याच वाटेवर काटे पेरण्याच्या प्रकारचे. जर, हेच दूध व भाजीपाला गरीब रयतेला विनामूल्य देऊन काही पुण्यकर्म केले असते तर, त्याने समाधान या मंडळींना नक्कीच प्राप्त झाले असते...!!
अवंती : हो. मेधाकाकू. परिस्थितीचे अगदी योग्य विश्लेषण आहे बघ. मुंबई म्हणजे सर्वांचेच “सॉफ्ट टार्गेट” असावे असे वाटायला लागलय मला. नऊ वर्षांपूर्वी राष्ट्रशत्रूंनी मुंबईवर हल्ला केला होता. आज राष्ट्रवादी म्हणवणारी स्वदेशी मंडळी मुंबईवर असा छुपा हल्ला करतायत.
मेधाकाकू: हो. तसेच काम निर्माण करतायत ही मंडळी. या वाकप्रचाराचे फक्त आठ शब्द पुरेसे आहेत याचे वर्णन करायला.
उदीम करिता सोळा बारा शेत करिता डोईवर भारा.
त्याचे असे आहे की, शेती हा आपल्या देशातील पारंपरिक व्यवसाय. गेली सत्तर वर्षे, अनेक धनवान शेतकरी आपण याच व्यवसायातून खूप यशस्वी झालेले आपण पाहत आलोय...! निवडणुकीच्या उमेदवारी अर्जावर अनेक कोटींची मालमत्ता जाहीर करणारे यशस्वी शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातून आणि नाशिक जिल्ह्यातून आलेच, ज्यांनी आपल्यावर कित्येक वर्षे राज्य केले. पण आपल्याला प्रश्न पडलाय तो शेतकरी कर्ज माफीचा. एका बाजूला धनवान-राज्यकर्ते शेतकरी आणि तरीही ही कर्ज माफी का..? कोणावर आहे कर्ज...? स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे हे शेतकरी कर्जबाजारी का राहिले...! तर त्याचे कारण. ऋण काढून सण साजरा करण्याची दिली गेलेली नवी शिकवण. राज्यकर्त्यांनीच कोट्यावधी रकमा खर्च करून साजरे केलेले विवाह समारंभ, बाजार समित्यांमधले अडत्यांचे वर्चस्व आणि साठेबाज व्यापार्यांचे राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाने होणारे गैरव्यवहार. यातून बिगरशेती कर्जातून हा शेतकरी कधीच बाहेर येऊ शकला नाही आणि पिकलेले शेतसुद्धा त्याला नफा मिळवून देऊ शकले नाही कारण सोळा आणे पिकलेल्या शेताचे त्याला बारा आणेच मिळत राहिले आणि भरगच्च पिकलेले शेत त्याला आता डोईजड होऊ लागलं.. म्हणून आजची ही नासाडी. शेतमालाची नासाडी करणारा हा तोतया आहे. जातिवंत शेतकरी काळ्या आईचे धान्य आणि गाई-म्हशीचे दूध उत्पादन याचा असा विध्वंस कधीच करणार नाही...!!
अवंती : मेधाकाकू म्हणजे आधुनिक शेती फक्त धनवान शेतकर्यांनी करायची. गरीब शेतकर्याला यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवायचा नाही आणि मग आपले राज्य गेले म्हणून सनदशीर मार्गाने विरोध करायचे सोडून गरीब शेतकरी आणि रयतेला वेठीला धरायचे. असा यांचा कारभार झालाय. मुंबईतला गिरणी संप अद्याप कोणी विसरलेले नाही. असे बाबा आज सकाळी सांगत होते त्या संपामुळे काय झाले तो इतिहास अजूनही ताजा आहे...!!
मेधाकाकू: अवंती या अशा वागण्याला कोंकणातली एक म्हण फार संयुक्तिक आहे बघ...!!
जोंधळे कुट्या नांगरा गठ्या.
जोंधळे कुट्या म्हणजे आडमुठा माणूस, जो कोणाचेच काही ऐकायला-स्वीकारायला तयार नसतो...!!..थोड्याशा अतिशयोक्तीने असे म्हटले जाते की असा आडमुठा माणूस की जो जोंधळे कुटायला सांगितले तर नांगर वापरेल...!!..थोडक्यात इतकेच की कुठल्याही ध्येय-धोरणा शिवाय, निव्वळ राजकीय विरोध करण्यासाठीच कर्जमाफीची अपेक्षा ठेऊन गरीब शेतकर्यांना वेठीला धरणारा हा “जोंधळे कुट्या” आणि त्यासाठी त्याने रोखलेला नांगर...म्हणजे हा नियोजित शेतकरी संप...!!
उकिरड्याची दैना बारा वर्षानी देखील फिटते.
अवंती…अशी एक लोकश्रुति आहे की बारा वर्षात म्हणजे एका तपानंतर सामाजिक परिस्थिति मध्ये बदल घडणे अपेक्षित असते...!!.. मात्र ज्या राजकारण्यांनी आपल्यावर गेली सहासष्ट वर्षे राज्य केले त्यांना मात्र आपल्या स्वत:पलीकडे गरीब शेतकर्याची आर्थिक-शैक्षणिक परिस्थिति बदलता आली नाही...तंत्रज्ञान निर्माण करता आले नाही...आणि हा वाकप्रचार मात्र आपल्या या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी सपशेल खोटा शाबीत केला...!!...पारंपरिक बुद्धीवैभवाचा पराभव झाला की अशी परिस्थिति समाजात निर्माण होते...!!
अवंती: मेधाकाकू...आता मुंबईवर आलेल्या या संकटावर वर मात करताना...विवेक आणि चातुर्याची अपेक्षा कोणाकडून करायची...त्याचाच विचार मी करत्ये...!!
- अरूण फडके